सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

औरंगजेब




                                 



    औरंगजेब ! अज्ञानापोटी गूढ वलय प्राप्त झालेलं एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व. शिवाजीच्या प्रेमापोटी मराठी इतिहास प्रेमींनी वाळीत टाकलेलं. सर जदुनाथ सरकारांनी याचं ऐतिहासिक चरित्र लिहिलं, जे कोणत्याही शिवचरित्रापेक्षा अधिक प्रमाणित मानलं जातं, पण या व्यक्तिरेखेस ते पुरेपूर न्याय देऊ शकले नाहीत. अर्थात ते स्वाभाविक होतं. कारण या वाळीत टाकलेल्या पुरुषावर लिहिणारे ते बहुधा त्याकाळी एकमेव होते. परंतु त्यांच्या पश्चात या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्याची बुद्धी कोणालाच झाली नाही. अगदी शिवचरित्र अभ्यासकांना !

    वस्तुतः औरंगजेब म्हणजे निम्मा शिवाजी. पण हे समीकरणच कोणाच्या लक्षात आलं नाही. ना. सं. इनामदारांनी ' शहेनशहा ' कादंबरीच्या माध्यमातून या व्यक्तिमत्वाचे कंगोरे उकलण्याचा यत्न केला. पण तो देखील थिटा पडला.  
मानवी वर्तनामध्ये ज्या छटा असतात त्या सर्व औरंगजेबाच्या व्यक्तीमत्वात आहेत. दुराग्रह, संशय, मत्सर, प्रेम, उदारता, अनुदारता इ. हा मनुष्य स्वतःच्या मुलांवरती अतोनात प्रेम करतो. परंतु आपण बादशाह आहोत व आपली मुलं हीच आपली प्रतिस्पर्धी आहेत हे एक क्षण देखील विसरत नाही. आपल्या मुलांवरती, बापावर, परिवारावर, सरदारांवर इतकेच काय गुप्तहेरांवर देखील हा गुप्तहेर नेमतो. त्यांची बरी - वाईट कृत्य प्रसंगांनुसार त्यांना कळवितो. त्यातून तो हे दर्शवतो कि माझ्यापासून काहीही लपून राहत नाही. परंतु त्याच वेळी अधिकाऱ्यांच्या चुकांकरता त्यांची शिक्षेदाखल बदली करणे वा मनसबीमध्ये घट करणे यापलीकडे कारवाई करीत नाही. मग प्रश्न असा पडतो हे गुप्तहेर नेमण्याची गरजच काय?

    तुलनात्मकदृष्टया इथे जर आपण शिवाजीच उदाहरण घेतल तर शिवाजी देखील औरंगजेबाप्रमाणे जागरूक प्रशासक होत व त्याच्यापेक्षा अधिक करडा. उदा. प्रतापराव गुजरला आत्मबलिदान करायला भाग पडले. असं औरंगजेबाच्याबाबतीत दिसून येत नाही.

    औरंगजेबाच्या धार्मिक अनुदारते बद्दल अनेकांनी लिहिलेले आहे. वेगवेगळे तर्क, अनुमाने आपापल्या परीने प्रत्येकाने रचले. परंतु कुणी हे लक्षात घेतले नाही की, अकबराने जे सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले होते. त्याची प्रतिक्रिया अकबराच्या हयातीतच उमटू लागल होत. याचा परिणाम म्हणजे जहांगीर पासून औरंगजेबपर्यंत प्रत्येक तुर्की बादशाहने अकबराच्या धोरणाविरुद्ध क्रम स्विकारला ज्याचा कळस म्हणजे औरंगजेबाची कारकीर्द. कित्येक जणांचे असे मत आहे कि, दाराशुकोह्ने वैदिक तसेच हिंदूंचा अनुनय केल्यामुळे औरंगजेबाला कट्टर इस्लामवादाची कास धरावी लागली. सत्तेच्या राजकारणासाठी हे अनुमान योग्यच आहे. परंतु यामुळे औरंगजेब हा ढोंगी मुसलमान ठरतो याकडे दुर्लक्ष ठरते, जे ऐतिहासिक पुराव्यांच्या विपरीत आहे.

    औरंगजेबाच्या कारकिर्दीत तुर्की साम्राज्याने उत्कर्षाचा कळस गाठला. त्याचप्रमाणे त्याच्याच कारकिर्दी अखेर साम्राज्य ऱ्हास पावू लागले. असं कित्येकांचा आवडतं सिद्धांत आहे. परंतु वास्तविकता काय आहे ? तुर्की साम्राज्याचा पाया तकलादू असल्याचे जहांगीरच्या अखेरीसच उघड झाला होता. उदा :- महाबतखानाचा बंडावा. 

     शहाजहानच्या कारकिर्दी अखेर साम्राज्य भर भक्कम अवस्थेत पोहचल्याचा आभास निर्माण झाला तरी याच काळात विघटनाची क्रिया वेगाने सुरु झाली होती. प्रांतिक बंडाळ्या, सरहद्दी वरील युद्ध ही जरी तात्कालिक कारणे असली तरी तुर्की बादशाहांना लाभलेला दीर्घायुष्याचा शाप हेच तुर्की साम्राज्याच्या ऱ्हासाचे मुख्य कारण होते. बाबर किंवा हुमायुनला इथे स्थिरावण्याची संधीच मिळाली नाही. परंतु अकबर पासून प्रत्येक बादशाहला आपल्या मुलांच्या बंडाळ्यांना तोंड द्यावेच लागले. यामागे तख्तावर बसलेल्या बादशहाचे दीर्घायुष्य यापलीकडे दुसरे काही एक कारण नव्हते. उदा. शहाजानच्या अखेरीस दारासाहित सर्व शहजाद्यांचं निम्मं आयुष्य सरलं होत. तर औरंगजेबाच्या अखेरीस त्याची मुलं वार्धक्याकडे झुकू लागली होती. असो.
    
    औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाविषयी किंबहुना त्याच्या इतिहासाविषयी जितकं लिहावं तितकं कमीच आहे. सर जदुनाथ सरकारांनी याचं अधिकृत चरित्र लिहून एक जमाना उलटून गेला. एका अनवट वाटेची पाउलवाट बनवली. आता या पाऊलवाटेवरून पुढे जात याच्या चरित्राचे पुन्हा एकदा नव्याने संशोधनपूर्वक लेखन करणे हि काळाची गरज बनली आहे. कारण अर्धशतकपावेतो हि व्यक्ती हिंदुस्थानची सार्वभौम सम्राट होती. या व्यक्तीच्या निर्णयाची, धोरणाची प्रतिक्रिया म्हणून इथे अनेक राजकीय क्रांत्या घडून आल्या. त्याचं आकलन औरंगजेबाच्या चरित्राचा अभ्यास केल्याखेरीज होणे शक्य नाही.
  
 ता. क. - औरंगजेबावर लिहिण्यासाठी GST लागत असेल तर हा लेख परत घेण्यास मी तयार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: