रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

नजीबउद्दौला






      नजीबखान म्हणजे पानिपतचा उत्पादक - संहारकर्ता अशी इतिहासकारांची एक आवडती थियरी आहे. परंतु प्रत्यक्षात वास्तव निराळेच असून पानिपतचा उत्पादक, संहारकर्ता नानासाहेब पेशवाच असून केवळ त्याची नालायकी झाकण्यासाठीच इतिहासकारांनी बौद्धिक व्यभिचार केला आहे.     



    नजीबखान उर्फ नजीबउद्दौला म्हणजे मराठी इतिहास अभ्यासकांच्या आकलनावर एक प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या ऐतिहासिक चरित्राचा अनेक अंगानी विचार न करता केवळ स्वतःला सोयीस्कर अशी एखादी बाजू विचारात घेत केवळ त्यावरून त्याचे मूल्यमापन करण्याची आपल्याला दांडगी हौस. यातूनच मग औरंग, नजीब सारखी पात्रं बहिष्कृत ठरत वाळीत टाकली जातात व त्याचं थेट परिणाम मराठी राज्याच्या इतिहास लेखनावर होतो.

    नजीबच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. अफगाणिस्तानातून जगायला आलेला तो एक रोहिला. वस्तुतः पठाण, अफगाण, रोहिले हे भेद भाषिक, प्रांतिक तसेच अनुवांशिक तत्वांवर असूनही त्यांची गल्लत करण्याचे कार्य आपल्या महान इतिहासकारांनी करून ठेवलं आहे. त्यामुळे दिल्लीचे राजकारण व त्यातील विविध पक्षांचे हितसंबंध यांचे आकलन कधीच कोणाला होऊ शकले नाही.

    अफगाण व दिल्लीच्या तुर्की बादशाहीचे संबंध, पठाण व रोहिले तसेच अफगाण यांचे परस्पर संबंध यांचा आम्ही कधीच स्वतंत्रपणे विचार केला नाही. सरसकट सर्वांना मोगल, मुसलमान, अफगाण या संज्ञेत बसवत आम्ही आमच्या अकलेचे तारे मात्र तोडले.

    यामुळेच ज्या नजीबचे स. १७५५ पूर्वीच्या दिल्लीतील व्यवहारात फारसे  नावही येत नव्हते त्यांस स. १७६० मध्ये अचानक महत्त्व प्राप्त का व्हावे हा प्रश्नही आम्हांला पडत नाही.

    रघुनाथरावाच्या प्रथम दिल्ली स्वारीत मल्हारराव होळकर पंजाब स्वरीकरता उत्सुक असताना पेशवेबंधूंनी त्यांस मोडता घालून मागे फिरवल्याचे आम्ही समजून घेत नाही. इतकेच काय पण अटक स्वारीनंतरही पेशव्याने रघुनाथास अटकेच्या आसपास वा दिल्लीस राहून न देता तडक दक्षिणेत येण्याची आज्ञा करून उत्तरेचं बनून आलेलं राजकारण कसं उधळून लावलं हे जाणून घेत नाही.

    होळकराने नजीबला जिवंत सोडले म्हणून पानिपतावर मराठी सैन्याचा पराभव झाला असे आपण आपल्याच सोयीने उर बडवून सांगतो. पण या उरबडवेगिरित आपण अजाणतेपणी नजीबचं महत्त्व वाढवून मराठी सरदार, सेनानी, सैन्याचं अवमूल्यन करतोय याचं मात्र आपल्याला भान राहत नाही. आणि राहणारही कसे ? एकदा अकलेला सोडचिठ्ठी दिली कि ती वापरण्याचा प्रश्नच येतो कुठे !

    नजीबला सोडून होळकराने कोणतं राजकारण साध्य केलं हे जाणून घेण्याची कुवत नसली तरी किमान, अटक स्वारीत रोहिले, पठाण, शीख, तुर्क मराठी सैन्याबरोबर अब्दालीच्या पथक्यांना बडवून मायदेशी पिटाळण्यात सहभागी होते या शंभर वेळा वाचलेल्या ऐतिहासिक माहितीचाही आपल्याला विसर पडावा इतके आपण मंदबुद्धी आहोत.  

    नागपूरकर भोसले व पेश्व्यात शाहू छत्रपतीने कार्यक्षेत्र विभागणी करून आग्रा, अजमेर, प्रयाग हे पेशव्याकडे तर लखनौ, बिहार, पैनबंगाल भोसल्याकडे दिले होते. यामुळेच पेशव्याला स्वतःच्या वाटणीस आलेल्या पृर्वेकडील प्रांताचा --- अलाहाबाद - प्रयाग --- तसेच नागपूरकरांच्या ताब्यात गेलेल्या भूप्रदेशाच्या स्वामित्वाचा लोभ सुटला होता व यासाठीच त्याने शिंद्यांची तिकडील भागावर योजना केली होती. होळकराची नाही.
    याचे कारण शिंदे होळकरापेक्षा अधिक स्वामिनिष्ठ वा पराक्रमी हे नसून शिंदे पेशव्यांचे लौकिक व व्यवहारात नोकर होते. हिंदुस्थानातील पेशव्यांच्या सत्तेचे प्रतिनिधी, मुतालिक होते. त्याउलट होळकर - पेशवा संबंध हे छत्रपती - आंग्रे संबंधाप्रमाणे होते.
    त्यामुळेच पूर्वेकडील स्वारीत होळकराचे अंग नसावे अशी नानासाहेब पेशव्याची इच्छा होती. हि बाब अस्सल पत्रांवरून सिद्ध होते. पण बघणार कोण न् वाचणार कोण ?

    शिंद्याची नजीबवरील स्वारी म्हणजे समस्त रोहिले, पठाण व सुजाच्या अस्तित्वावर घाला असल्याने त्यांची तात्पुरती आघाडी होणे स्वाभाविक होते व तसेच झाले. इतकेच काय पानिपत मोहिमेवर नियुक्त झालेला भाऊ देखील याच पूर्वेकडील उपद्व्यापाच्या नादाने फसल्याचे दिसून येते. अन्यथा आपल्याच मुतालिकाने अब्दालीसोबत केलेला तह अमान्य करण्याचे पेशव्याला कारण तरी काय होते ?

    अब्दाली विरुद्ध चालून जाणाऱ्या भाऊचे प्राथमिक बेत पाहता तो आगऱ्याजवळ यमुना ओलांडून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. ते बंगाल - प्रयाग स्वारीसाठीच. पण त्याच्या दुदैवाने अब्दालीनेही यमुनापार तळ ठोकल्याने त्यांस नाईलाजाने दिल्लीपर्यंत मजल मारली व त्यामुळेच राजकारण त्याचे स्वतःच्या कमी व शत्रूच्या तंत्रानेच अधिक चालत गेले.

    हिंदुस्थानी सत्ताधीशांच्या दृष्टीने दख्खनी मराठी सरदार हे उपरे होते. ज्याप्रमाणे शिवाजी तुर्क, पठाणांना दख्खनमध्ये उपरा मानत होता तसेच.
    यामुळेच मराठी सरदारांना विरोध करण्याचे आपसांत झगडणाऱ्या हिंदुस्थानी सत्ताधीशांचे अधूनमधून प्रयत्न होत व त्यांना त्या बाबतीत त्यांचे तात्पुरते नायकही मिळत. आरंभी तुर्की बादशाही जोरात असल्याने त्यांनी हातपाय मारुन पाहिले. नंतर राजपूत पुढे आले. त्यानंतर जाट व सरतेशेवटी नजीबखान !

    नजीबला किंवा इतर रोहिल्यांना तुर्की बादशाही बद्दल फारशी आपुलकी होती वा प्रेम होते अशातला भाग नव्हता. त्यांच्या दृष्टीने तुर्क हे तसे शत्रुवतच ! परंतु अकबर स्थापित या तुर्की बादशाहीकडे हिंदुस्थानचे सार्वभौमत्व असल्याची जनमानसात समजूत प्रचलित असल्याने या सत्तेचा कितीही विध्वंस केला असला तरी प्रत्यक्ष तुर्की बादशाही परिवारास इजा करण्याचे धैर्य वा विचार क्वचितच कोणाच्या मनात आले.
    तख्तनशीन बादशहाची हत्या करणारा इमाद उर्फ गाजीउद्दिन हा तुर्क असून त्याच्या या कृत्यामुळे बव्हंशी शाही परिवारातील सदस्य त्याच्या विरोधात गेले. त्याउलट पुढे पेशव्याच्या मदतीने बादशाह बनलेल्या शहा आलम तसेच इतर बादशाही सदस्यांचे नजीबखानशी स्नेहाचे संबंध होते.
    धोरणात्मक दृष्टीने पाहता नजीब हा तुर्की राजवटीचे लचके तोडून मोठा झालेला तर गाजीउद्दिन तुर्की बादशाहीचा डोलारा सांभाळण्यासाठी धडपडत होता. तरीही शाही परिवार पानिपत पूर्व व नंतर नजीबलाच अनुकूल ! याचे कारण काय असावे हे शोधण्याची आम्हांला अद्यापही बुद्धी झाली नाही.

    नजीबचे शिंदे घराण्यासोबत हाडवैर असल्याचा एक प्रवाद आहे. परंतु अस्सल पत्रांनुसार ज्यावेळी महादजी शिंदेच्या सरदारकीचा चिवडा झाला त्यावेळी महादजीने नोकरीसाठी नजीबकडे संदर्भ लाव्ब्ला होता, हे कितीजणांना माहिती आहे ? नजीबच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला -- झाबेताखानला -- बापाचा हुद्दा वा इतर मानाचे पद मिळावे यासाठी जितका तुकोजी प्रयत्नशील होता तितकाच महादजीही होता. पण हळद होळकरांच्या नावाने लागते. हि आपली निःपक्षपाती वृत्ती !
स. १७६९ आसपास रामचंद्र गणेश, विसाजी कृष्णच्या हाताखाली दख्खनी फौजा हिंदुस्थानात रवाना झाल्या त्यावेळी बापाप्रमाणेच माधवरावालाही पूर्वेकडील स्वारीचे वेध लागून त्याने त्याकरता आवश्यक असल्यास नजीबची मदत घेण्याची सूचना सरदारांना केली होती.
    त्याचप्रमाणे नजीबच्या मृत्यूनंतर पेशव्याने त्यास उद्देशून वाहिलेली शिव्यांची लाखोली अस्सल पत्रांत नमूद असली तरी त्यावरून नजीबच्या चरित्राचे, कर्तबगारीचे अवमूल्यन न होता उलट त्याची कर्तबगारी, तत्कालीन राजकारणातील त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

    हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासात सामान्यतः स. १७५५ पासून ते स. १७७० पर्यंतचा पंधरा वर्षांचा काळ हा नजीबच्या कारवायांचा म्हणून ओळखला जातो. त्यातही स. १७६१ ते ७० पर्यंतची जेमतेम नऊ दहा वर्षे नजीबच्या हाती दिल्ली दरबारची सूत्रे होती. या दहा वर्षांतील नजीबच्या कामगिरीवरूनच त्याच्या कर्तबगारीचे मूल्यमापन करताना इतकेच म्हणता येईल कि, याच्यामुळे गंगा - यमुना खोऱ्यातील रोहिले, पठाण व अयोध्येच्या नवाबाचे पेशवा व त्याच्या सरदारांपासून संरक्षण झाले. त्याचप्रमाणे दिल्लीकर तुर्की बादशाहची मराठी सरदारांना दिल्लीपासून दूर ठेवण्याची इच्छाही मर्यादित प्रमाणात पूर्ण झाली.




                        लेखनावरील #जीएसटी कर आकारणीचा निषेध !!!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

एक तरी संदर्भ लिहा राव लेखात खाली नाहीतर हवेतला गोळीबार आहे हे सरळ दिसतंय आणि कोणती पत्रे आहेत ती सरळ लिहा इकडे