सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

प्रकरण १८) सम्राट शिवाजी :- काही दुर्लक्षित बाबी





    स. १६६९ च्या अखेरीस औरंगने शिवाजी सोबत केलेला शांतता करार उधळून लावत त्याविरुद्ध युद्ध पुकारले. परंतु या शांतताभंगाचा फायदा औरंगपेक्षा शिवाजीलाच अधिक झाल्याचे दिसून येते.

शांततेच्या काळात शिवाजीने आपल्या राज्याची बंदोबस्ती करत असतानाच आपली उद्दिष्ट्ये ठरवून त्यानुसार कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी चालवली होती.


    स. १६६९ अखेर औरंगने शिवाजी विरुद्ध पुकारलेल्या युद्धामागे ज्याप्रमाणे दख्खन सुभेदार शहजादा मुअज्जमची शिवाजी सोबतची वाढती मैत्री कारणीभूत आहे तद्वत स. १६६७ मध्ये उद्भवलेल्या युसुफ्जाई बंडाचा देखील संदर्भ आहे. उपलब्ध माहितीनुसार युसुफजाईंचे बंड त्याचवर्षी दडपून टाकण्यात आले असले तरी या तसेच कित्येक इतर व्यापातून शिवाजीकडे लक्ष देण्यास औरंगला स. १६६९ पर्यंत फुरसद झाली नाही. खेरीज याच काळात औरंगने साम्राज्यातील सर्व देवळांचा नाश करण्याची आज्ञा काढत बनारस येथील विश्वेश्वर व मथुरेच्या केशवरायाच्या मंदिराचा विध्वंस केला. ( स. १६६९ - ७० )


    औरंगच्या या कारवाया विविध हेतूंनी प्रेरित होत्या. राज्यसंपदनार्थ कट्टरपंथीयांची मदत घेतल्याने त्यांना संतुष्ट करणे त्यास भाग होते. अर्थात, येथे त्याच्या कट्टरपणाविषयी वाद होऊ शकतो परंतु तूर्तास त्याचे येथे प्रयोजन नाही. खेरीज कट्टरपंथीयांची संतुष्टी करत असतानाच राज्याविरुद्ध हिंदूंचा उठाव होऊ नये याचीही दक्षता घेणे त्यास भाग होते. त्यामुळे कागदी हुकूम वा एखाद दुसरं देऊळ पाडून तो चाचपणी करत होता व अपेक्षेप्रमाणे हिंदू सत्ताधीशांनी त्याच्या या कृत्यांकडे नेहमीच्या उदासीन दृष्टीने पाहिले.


    तुर्की साम्राज्याला सर्वाधिक धोका त्याच्या सर्वात बलिष्ठ, विश्वासू अशा राजपुतांकडून होता. परंतु ते आपल्या काल्पनिक वैदिक क्षत्रियत्वात इतके गुंगून गेले कि, आपण हिंदू आहोत याचाच त्यांना मुळी विसर पडला होता.


    हिंदुस्थानात चाललेल्या या घडामोडींशी शिवाजीला कसलेच कर्तव्य नव्हते. तो आपल्या मूळच्या धोरणाप्रमाणे वागत असून त्यान्वये --- निजामशाही उभारताना शहाजीने ताब्यात घेतलेला प्रदेश तसेच मूळ निजामशाहीत मोडणारा सर्व भूभाग ताब्यात घेण्याची त्याची मनीषा होती. थोडक्यात सांगायचे झाले तर, शिवाजी हा स्वतःला निजामशाहीचा वारस समजत होता. त्याच्या या धोरणात आणखी काही उद्दिष्टांची भर पडली. ते म्हणजे स्वातंत्र्य अबाधित राखणे, दख्खनमधून तुर्कांना उखडून काढणे. यातील दुसरे उद्दिष्ट पैतृक वारशाचे होते तर प्रथम त्याचे स्वतःचे.

    यात आणखी काही उपप्रकरणांची भर प्रसंगत्वे पडत गेली. त्यानुसार दख्खनमधील सत्तांशी एकजूट करून तुर्की आक्रमण रोखणे. त्यासाठी गरज पडल्यास निजामशहा प्रमाणे या गटाचे नेतृत्व हाती घेणे, जे राज्याभिषेकानंतर शिवाजीने स्वीकारले. तसेच दिल्लीच्या तख्तावर आपल्या पसंतीचा मनुष्य बादशहा म्हणून स्थापित करणे.


    स. १६७० - ८० दरम्यान शिवाजीचे सर्व उद्योग वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चालले होते. त्यानुसार त्याने तुर्की शहजादे तसेच मनसबदारांशी अंतस्थ सूत जुळवले. विजापुरी दरबारातील दुफळीचा स्वतःच्या राज्य विस्तारार्थ फायदा उचलून घेत भावी तुर्की झगड्यात विजापुरी दरबारातील आपल्या विरोधकांची तुर्कांना मदत होऊ नये याची खबरदारी घेत त्यांचा बंदोबस्त करणे व लष्करी बळ वा सामोपचाराने कुतुबशहाला मैत्रीच्या तहाने बांधून घेणे.


    शिवाजीच्या राजकारणाचे धागेदोरे उकलण्यासाठी सर्वप्रथम आपणांस मुस्लीम शाह्यांची अंतःस्थिती, विशेषतः त्यातील पक्षभेद समजावून घेणे अत्यावश्यक आहे.


    बव्हंशी इतिहासकारांनी शिवचरित्राचे लेखन करताना या लढ्याचे( शिवाजी - तुर्क ) चित्रण हिंदू - मुस्लीम असे धार्मिक स्वरूपाचे केल्याने व इतरांनी त्यांचाच कित्ता गिरवल्याने या राजकारणाचे वास्तववादी आकलन कोणालाच होऊ शकले नाही.


    विजापूर, गोवळकोंडा येथील शासक हे परदेशी मुसलमान असले तरी त्यांच्या दरबारात, लष्करांत दख्खनी मुसलमान, सिद्दींचा मोठा भरणा होता. ज्यातील बव्हंशी हे धर्मांतरीत होत. या दख्खनींना परदेशी मुसलमान -- तुर्क, अफगाण, पठाण, अरब इ. कमी लेखत. किंबहुना यांच्यात शत्रुत्वाची भावना सदोदित वसत असल्याचे इतिहासात दाखले आहेत.


    बहामनी, निजामशाही या बलवान मुस्लीम राजवटी मुसलमानांच्या या अंतस्थ लाथाळ्यांनी धुळीस मिळाल्या होत्या व याची जाणीव बहुधा शिवाजीला जितकी होती, तितकी कोणत्याही हिंदू सत्ताधीशास नव्हती. यामुळेच सुरवातीपासून शिवाजीने दख्खनी मुसलमानांचा पक्ष घेत अफगाण, पठाण, तुर्क इ. विरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले होते. स. १६७० - ८० दरम्यान विजापूर - गोवळकोंडा यांच्याशी त्याचे जे व्यवहार झाले ते याच भूमिकेतून घडून आल्याचे दिसून येते.


    मुस्लिमांविषयी हाच दृष्टीकोन शिवाजीने तुर्की बादशाही विरोधात पुकारलेल्या लढ्यातही स्वीकारला, पण तो थोड्या वेगळ्या पद्धतीने. तुर्क आणि अफगाण तसेच पठाणांतील वैमनस्य त्यास ठाऊक होतेच. अफगाण, पठाण हे तुर्कांच्या चाकरीत जरी असले तरी मनोमन ते त्यांचा द्वेष करीत. यामुळेच तुर्की अधिकारी नेहमी त्यांच्या विषयी साशंक असत. दख्खन मधील बहादूरखान - दिलेरखान या तुर्की - पठाण दुकलीचा यामुळेच जम बसला नाही व परिणामी बहादूरखान शिवाजीला अंतस्थ सहाय्य होऊन दख्खनच्या राजकारणाचे पुढारपण आदिल ऐवजी शिवाजीला प्राप्त झाले. परंतु हा प्रकार राज्याभिषेकानंतर घडून आला. तत्पूर्वीच्या शिवाजीच्या राजकारणाची दिशा व त्यातील प्रमुख टप्पे तसेच राजकीय घडामोडी आपणांस थोडक्यात बघायच्या आहेत. 


    औरंगने शांतता कराचा भंग करताच शिवाजीने प्रथमतः पुरंदर तहात गमावलेला आपला सर्व मुलूख, किल्ले कब्जात घेण्याचा उद्योग चालवला. तसेच स. १६७० च्या ऑक्टोबरात त्याने सुरतेवर पुन्हा एकदा धडक मारत तेथून लुट गोळा करून व मार्गातील तुर्की मनसबदारांचा पराभव करून रायगडी परतला.


    तुर्कांविरुद्ध उघडलेल्या आघाडीवर सलामीलाच एवढं यश प्राप्त होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिलेरखान व शहजादा मुअज्जम यांच्यातील वैमनस्य व मुअज्जमचा शिवाजीकडे असलेला अंतस्थ ओढा. ज्यामुळे दख्खन मधील तुर्की अंमलदारांत गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन काही काळ बादशहा देखील या दोघांविषयी साशंक बनला. अफगाण युद्धाचा संदर्भ असल्याने दिलेरखान तर शिवाजी सोबतच्या घनिष्ठ मैत्रीने मुअज्जम संशयाच्या भोवऱ्यात आले. परंतु लवकरच हा भ्रम दूर झाला. तोपर्यंत शिवाजीने नाशिकमध्ये आपले हात - पाय पसरले होते.


    शिवाजीची वाढती सत्ता पाहून औरंगने महाबतखानाची दख्खन मोहिमेचा मुख्य सेनापती म्हणून नियुक्ती करत त्याच्या हाताखाली बहादूरखान, दिलेरखान व दाउदखान या नामांकित सरदारांना नेमले. परंतु महाबतखानासही अपेक्षित यश प्राप्त होऊ शकले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स. १६७२ मध्ये खैबरपरिसरातील टोळीवाल्यांचा बंडावा परत एकदा भडकून त्यात औरंगला आपली अव्वल दर्जाची लष्करी सामग्री ओतावी लागली. त्यामुळे साहजिकच महाबतखानाच्या हाताखील फौजफाट्यात, लष्करी साहित्यास कात्री लागली.


    टोळीवाल्यांचा दंगा इतका वाढला कि शेवटी खासा औरंगजेब स. १६७४ च्या जूनमध्ये पेशावर येथील हसन अबदाल येथे गेला. स. १६७५ च्या अखेरीपर्यंत त्याने साम, दंड, भेदाने हा बंडावा मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास मर्यादित यशावरच समाधानी होऊन मागे फिरावे लागले.

    तुर्कांची अफगाण मोहीम स. १६७८ पर्यंत रखडल्याने त्यांचे उत्कृष्ट सैन्यदल, रसद, बव्हंशी खजिना, शस्त्रास्त्रे यांचा ओघ त्या आघाडीवर वळवण्यात आल्याने दख्खन शिवाजीला मोकळी सापडली. इथे लक्षात घेण्याची मुख्य बाब म्हणजे अफगाण मोहिमेमुळे तुर्कांना पुढील काळात आपल्या लष्करात अफगाणांची भरती करून घेणे शक्य झाले नाही. ज्याचा फटका त्यांना लगेचच्या राजपूत युद्धात बसला. ज्याचा शिवाजीच्या उत्तरायुष्याशी घनिष्ट संबंध आहे.


    स. १६७२ मध्ये औरंगने महाबत व मुअज्जम यांना हिंदुस्थानात बोलावून घेत बहादूरखानास दख्खनचा सेनापती व सुभेदार म्हणून नियुक्त केले. या जागेवर त्याने जाने. १६७३ ते ऑगस्ट १६७७ पर्यंत काम पाहिले.


    अफगाण बंडाव्यामुळे बहादूरखानाला शिवाजी, आदिल, कुतुब या तीन सत्तांचा बंदोबस्त करून तुर्की साम्राज्याचा दख्खनमध्ये विस्तार करणे शक्य नसल्याने त्याने मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारत शिवाजीच्या तंत्राने आपले राजकारण चालवले. याचा परिणाम म्हणजे शिवाजीचा राज्याभिषेक व कर्नाटक मोहीम या दोन गोष्टी तुर्की उपद्रवाविना निर्विघ्न पार पडल्या.


    शिवाजीचा राज्याभिषेक :- शिवाजीचा राज्याभिषेक हि अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण घटना आहे. परंतु आपल्याला त्याचा फक्त राजकीय व सामाजिक अंगानेच विचार करायचा आहे.


    दि. २१ एप्रिल १६७२ रोजी अब्दुल्ला कुतुबशहा मरण पावला व त्याचा जावई अबुल हसन हा सुलतानपदी विराजमान झाला. या राजकारणात शिवाजीचा अंतस्थ हात किती होता याचा उलगडा होत नसला तरी या घटनेनंतर गोवळकोंड्यातील शिवाजीचा हस्तक -- निराजीपंताने नव्या कुतुबशहासोबत एक लक्ष होनांचा तह करून सहासष्ट हजार होनांचा खजिना रायगडी आणला. यावरून कुतुबशहाने शिवाजीचे मांडलिकत्व मान्य केले असा तर्क संभवतो परंतु सबळ पुराव्याअभावी असे विधान करने योग्य होणार नाही.


    दि. २४ नोव्हेंबर १६७२ रोजी अली आदिलशहाचा मृत्यू होऊन त्याच्या जागी सिकंदर हा चार वर्षांचा मुलगा तख्तावर विराजमान झाला.

  
    या दोन राजकीय नेत्यांच्या निधनामुळे शिवाजीकडे पुढारपण येणे स्वाभाविक होते व त्याने या संधीचा फायदा अचूक उचलला.


    विजापूरच्या कारभारात दख्खनी व पठाणी असे दोन पक्ष निर्माण होऊन आरंभी तुर्की सुभेदार व शिवाजीने दख्खनींची बाजू घेतली. या झगड्याच्या पुढील टप्प्यात दिलेरखानाचा प्रवेश होऊन त्याने दख्खनी सोडून पठाणांची साथ केली. परंतु हा राज्याभिषेकानंतरचा भाग झाला. सध्या आपणांस राज्याभिषेक प्रकरणाची चर्चा करायची आहे.


    इतर वतनदारांप्रमाणेच शिवाजीही आपल्या नावापुढे ' राजे ' पदवी लावी. परंतु या ' राजे ' पदाचा वतनदारी सत्तेपलीकडे --- सार्वभौम वा स्वतंत्र शासक या अर्थाशी कसलाही संबंध नव्हता. तुर्की शहजाद्याच्या मध्यस्थीने शिवाजीने तत्कालीन सार्वभौम सम्राट औरंगजेबकडून आपणांस -- राजा हा किताब मिळवून घेतला खरा परंतु यामुळे त्याच्या ' राजे ' पदास सार्वभौम सत्तेने वतनदारापेक्षा श्रेष्ठ पण आपलं अंकीत्व स्वीकारण्याच्या बदल्यात दिलेली मान्यता यापलीकडे अर्थ नव्हता व हि पदवीही तुर्कांशी जोवर सलोखा आहेत तोवरच शिवाजीकडे राहणार होती.


    तुर्की बादशाही सोबत युद्ध सुरु झाल्याने त्यांच्याकडून मिळालेली ' राजा ' उपाधी एकप्रकारे निरर्थक झाली परंतु याच सुमारास दख्खन मधील दोन जुन्या मुस्लीम सत्तांचे पुढारी मरण पावल्याने दख्खनचे राजकीय पुढारपण शिवाजीकडे ओघानेच आले. परंतु यांस कायदेशीरता लाभण्याकरता तसेच आजवर केलेल्या उद्योगास स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्याकरता त्यांस राज्याभिषेक विधी करवून घेणे आवश्यक वाटले.

    यातूनच मग गागाभट्टला बोलावणे, चिटणीसास राजपुतान्यात पाठवून तेथील घराण्याशी आपला वांशिक संबंध असल्याचे सिद्ध करणे या गोष्टी घडून आल्या.


    शिवाजी शिसोदिया कुलोत्पन्न राजपूत होता व आहे, हि इतिहासकारांची आवडती थियरी. परंतु या थियरीच्या मुळाशी काय आहे ?


    चिटणीसाने मेवाडकरांशी भोसल्यांचा संबंध दर्शवणारी वंशावळ आणली ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे.


    याकरता भक्कम पुरावा म्हणजे ' शककर्ते शिवराय, खंड १, पृ. क्र. ४९५ ' वर श्री. विजय देशमुखांनी दिलेले पुढील दोन उल्लेख :-


    १) .. शके १४७१ आश्विन शु. १० चे म्हणजे १० ऑक्टोबरचे एक खरेदीपत्र. या पत्रानुसार मालोजी  भोस्ल्याने जिंजी येथील निम्मी पाटीलकी इ. स. १४५९ च्या पूर्वी काही वर्षे विकत घेतल्याचे कळते. हा मालोजी बाबाजीचा पिता आहे हे निश्चित. मृत पित्याचे नाव पुत्राला ठेवण्याच्या तत्कालीन रीतीचा विचार करता बाबाजीने पुत्राचे नाव मालोजीच ठेवले हीही गोष्ट लक्षणीय वाटते.


    २) बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजी होते हे पैठणच्या राजोपाध्ये यांच्या नोंदीवरूनही सिद्ध होते. ती नोंद अशी --

    भोसले सिसोदे. राजश्री विठोजीराजे पिते बाबाजीराजे आजे मालोजीराजे. पुत्र खेलोजीराजे, मालोजीराजे, महादजी पुत्र खेलोजीराजे. महादजी, काकाजीराजे, नागोजी राजे, खंडोजीराजे मानकोजीराजे मोहरसु. लेख.

    या नोंदीनुसार मालोजी - बाबाजी - विठोजी - खेळोजी वगैरे अशी वंशावळ तयार होते. विठोजी हा शहाजीचा चुलता आहे. तेव्हा या नोंदीवरूनही बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजीच असल्याचे स्पष्ट होते.    


    या दोन नोंदी विचारत घेता व चिटणीस, शेडगावकर, कोल्हापूर, बृहदिश्वर येथील वंशवाळींची तुलना केली असता एक शेडगावकर बखर सोडली तर बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजी होते, असे कोणतीही वंशावळ सांगत नाही. तसेच शेडगावकर बखरीतील वंशावळीत मालोजीचा उल्लेख मालकर्ण असा केलेला आहे. तर चिटणीस बखरीतील वंशावळीनुसार बाबाजीच्या पित्याचे नाव संभाजी असे होते.   

     येथे आपणास प्रामुख्याने चिटणीस वंशावळ विचारात घेणे भाग आहे. कारण भोसले - शिसोदिया संबंध त्या घराण्यातील व्यक्तीनेच सिद्ध केलेला होता.


    चिटणीशी वंशावळ हाणून पडणारा दुसरा पुरावा म्हणजे शिसोदिया घराण्याचा वृत्तांत. ज्यानुसार सिसोदे परगण्याचा जागीरदार हमीर हा मेवाड अधिपती बनल्यावर त्याच्या वंशजांस सिसोदिया हे नाम प्राप्त झाले. आणि हमीर हा चिटणीस बखरीतील वंशावळीत दिलेल्या सजणसिंहाचा चुलतभाऊ व अजयसिंहाचा पुतण्या. महत्त्वाचे म्हणजे चिटणीस वंशावळीत अजयसिंहाचे नाव न येता लक्ष्मणसिंहाचे नाव येते जो सजणसिंहाचा आजोबा आहे.


    खेरीज राजवाडे लेखसंग्रह भाग - १ मध्ये पृ. क्र. २३२ वरील चर्चाही भोसले - राजपूत संबंध अमान्य करणारी आहे. त्यातील मुख्य आक्षेप उभय घराण्यांचे धर्माचार - कुलदैवत एक नाही. या आक्षेपाचे निरसन केल्याचे निदान माझ्या तरी वाचनात आले नाही.


     यामुळे शिवाजीने मेवाडकरांशी कागदोपत्री जोडलेला आनुवंशिक संबंध संशयास्पद असल्याचे सिद्ध होते. परंतु या संबंधांचे खापर वा दोष शिवाजीकडे जात नसून देशमुखांनी आपल्या शिवचरित्रात बाबाजी भोसल्याच्या खरेदीपत्राची नोंद जर खरी मानली तर मग शिवाजीच्या घराण्यात ' आपण शिसोदिया राजपूत ' असल्याचा समज किमान तीन चार पिढ्यांपूर्वी प्रचलित असल्याचे स्पष्ट होते.


    परंतु प्रश्न असा आहे कि अशी कोणती आवश्यकता, गरज भासल्याने भोसल्यांनी स्वतःस सिसोदिया राजपूत म्हणवून घेण्यास सुरवात केली ? तसेच जर ते खरोखर सिसोदिया राजपूत असते तर त्यांस ' मराठा ' म्हणवून घेण्याचा अधिकार काय ? कारण शिसोदिया हा राजवंश होता व दख्खनमध्ये या काळात एकाही मराठ्याचे स्वतंत्र राज्य नव्हते. तसेच लौकिकात शिसोदिया क्षत्रिय मानले जात, मराठ्यांना क्षत्रियत्वाचा अधिकार नव्हता. कारण ते हिंदू होते, वैदिक नाही.

यावरून मराठा - राजपूत यांच्यातील तुलनात्मक असमानता लक्षात घेता ' सिसोदिया राजपूत ' उच्च पायरीवरून ' मराठा ' या अवनत स्थानी येण्याची बुद्धी भोसल्यांना का व्हावी ? आजवरच्या इतिहासलेखनात या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.


    माझ्या मते, आपले सामाजिक स्थान उंचावण्यासाठी बाबाजी वा त्याच्या वडिलांनी स्वतःस सिसोदिया राजपूत म्हणून घेतले व तेच या घराण्यात पुढे प्रचलित झाले. परंतु सिसोदियांशी संबंध दर्शवणारी वंशावळ वा माहिती या घराण्याकडे नसून ती शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगी राजपुतान्यात जाऊन निर्माण करण्यात आली. इथे भोसले - सिसोदिया हा अनुवांशिक नसून फक्त राजकीय नातेसंबंध असल्याचे सहजसिद्ध आहे. परंतु शिवाजीचा वैदिक राज्याभिषेक व क्षत्रियत्वाचे इतिहासकार तसेच अभ्यासाकंना पडलेली मोहिनी यांमुळे वास्तवाचे त्यांस आकलन होत नाही कि दर्शन घडत नाही.


    आपले मूळ इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केवळ भोसले घराण्यानेच केला असे नाही तर ' शिवाजी निबंधावली भाग - २ ' मध्ये श्री. चिं. वि. वैद्यांनी स. १७४० सुमारच्या मराठ्यांच्या ९६ कुळ्यांच्या दोन याद्या दिल्या असून त्या अभ्यासल्या असता असे लक्षात येते कि, काही अपवाद सोडले तर बव्हंशींनी आपले मूळ हिंदुस्थानात असल्याचे नमूद केले आहे.

    कित्येकांचा समज आहे कि, शिवाजीच्या अनुकरणाने हा प्रकार घडून आला असावा. परंतु यातील उपकुळांची नावं पाहता यात तथ्य नसल्याचे दिसून येते.

    उलट शिवाजीच्या पूर्वीपासून -- जसे भोसल्यांचे बाबाजी तद्वत -- हाच प्रकार दख्खनमध्ये सुरु असून यामागे फक्त इतर वतनदारांपेक्षा आपलं असामान्यत्व, पराक्रमाने नव्हे तर जन्म, कुळाने दर्शवण्याचा खटाटोप चालल्याचे दिसून येते. याकरता सादर याद्यांतील उपकुळांची नावंच साक्षी आहेत.


    खेरीज इथे नमूद करण्यासारखी अत्यावश्यक बाब म्हणजे राजपूत तसेच मराठा हा वांशिक समुदायच मुळी नाही. मिश्र वंशांचे लोक या संज्ञांत समाविष्ट झाले आहेत. ज्यांच्या वंशजांनी नंतर कागदोपत्री वडाची साल पिंपळाला लावत स्वतःस ९६ कुली मराठा किंवा नुसतेच मराठा तसेच राजपूत म्हणवून घेतले आहे.


    शिवाजीने राज्याभिषेक प्रसंगी ज्या सिसोदिया कुळाशी आपला संबंध असल्याचे जाहीर केले -- क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी -- त्या शिसोदिया कुलाचे क्षत्रियत्व तरी निर्दोष आहे का ? याचे उत्तर नकारार्थी मिळते.


    सिसोदिया स्वतःस सूर्यवंशी म्हणतात पण त्याने फारसा फरक पडत नाही. तसेच ते स्वतःस रामपुत्र कुशचे वारस मानतात. परंतु तेही संशयास्पद आहे. कारण रामाला लव - कुश नावाचे पुत्र होते हे कुठे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. रामायणाच्या ज्या भागात रामाच्या मुलांचा उल्लेख येतो त्याच भागात रामाचे विलासी जीवनही येते. मग त्याचा विलास प्रक्षिप्त व मुले मात्र अप्रक्षिप्त हा कुठला युक्तिवाद ?


    दुसरे असे कि, सिसोदियांचा मूळ संस्थापक राजा गुहा, गुहील -- ज्याने स्थापलेल्या वंशास गुहीलोत अशी संज्ञा होती. या गुहील राजाचा पूर्वेतिहास उपलब्ध नाही. काही इतिहासकारांच्या मते तो शिलादित्य राजाचा पुत्र असून, त्याचा जन्म पित्याचा मृत्यू शत्रूहाती झाल्यावर झाला व त्याच्या आईने त्यामुळे अग्निप्रवेश करण्यापूर्वी गुहादित्य / गुहील यांस विजयादित्य ब्राह्मणास दत्तक दिला वा दान दिला. तर काहींनी यास ब्राह्मण वंशी मानले आहे.


     गुहील नंतरच्या पिढ्यांतील पराक्रमी राजा म्हणजे बाप्पा रावळ. याचाही पूर्वेतिहास अनुपलब्ध असून याच्या पित्याच्या नावाची स्पष्टता नाही. खुद्द बाप्पा रावळ म्हणजे महेंद्र कि कालभोज यावरही इतिहासकारांचे एकमत नाही. मात्र या बाप्पा रावळचे पालनपोषण ब्राह्मणाने केल्याचे काही इतिहासकार नमूद करतात तसेच तो भिल्लांमध्ये वाढल्याचेही काही जणांचे मत आहे.


    या उल्लेखांवरून गुहीलोत वैदिक धर्मीय वा वैदिक धर्मियांना आश्रय देणारे राजे असावेत असा तर्क करता येतो. परंतु हे क्षत्रिय वा राजपूत असल्याचे निःसंदिग्ध दाखले मिळत नाहीत व राजपुत्र या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप राजपूत झाले हे कोणत्याही व्युत्पत्तीशास्त्राने सिद्ध होत नाही. 

    गुहीलोत वंशाविषयी आणखी माहिती श्री. बी. एम. दिवाकर यांच्या ' राजस्थानका इतिहास ' ग्रंथात पृ. क्र. ३० वर असून त्यान्वये :- ' राणा कुम्भा ने भी बहुत छानबीन के बाद अपने आपको ब्राह्मण लिखवाया था. ' या विधानास दिवाकरांनी आधार दिला नसला तरी आणखी प्रत्यंतर पुराव्यांनी याची बळकटी करता येते.


    गुहीलोत वा सिसोदिया हे खरोख क्षत्रिय असते तर शिवाजीचा राज्याभिषेक करताना असा विधी करणारा पुरोहित राजपुतान्यातून बोलवण्याऐवजी वा विधीची लिखित प्रत तेथून मागवण्याऐवजी शिवाजीने गागाभटास पाचारण का करावे ? तसेच गागाला हा संपूर्ण विधी नव्याने का तयार करावा लागला ?


    शिवाजीने आपलं क्षत्रियत्व तसेच वांशिक संबंध चितोडशी सिद्ध करणे व चितोडकरांनी त्यास संमती देणे हा सर्व प्रकार राजकीय होता. ज्याचा सामाजिक - राजकीय फायदा शिवाजीला झाला तर त्यातील राजकीय धोका फक्त औरंगला उमगला.


    चितोडकरांशी शिवाजीचा संबंध सिद्ध झाल्याने समकालीन मराठ्यांत त्याचे स्थान उंचावले गेले. तो एका पुरातन राजघराण्याचा वंशज ठरला. त्याचप्रमाणे वैदिक राज्याभिषेक समयी त्यांस क्षत्रियत्वाची प्राप्ती झाली जे इतर मराठ्यांना तेव्हाही व आत्ताही अप्राप्य आहे. आणि यातील गंभीर राजकीय धोका म्हणजे शिवाजी - मेवाड युतीने तुर्की साम्राज्याच्या गळ्याभोवती फास आवळू लागला. तुर्कांना दख्खनमध्ये उतरण्यासाठी माळव्यापेक्षा राजपुताना - गुजरात मार्ग अधिक सोयीस्कर होता व तिकडे त्यांचे व्यापरी केंद्रही होते. यामुळेच निजामशाहीत मोडणारा प्रदेश जिंकत शिवाजी गुजरातकडे सरकू लागला.


     प. सा. सं. मधील ले. क्र. १७२९ मध्ये इंग्रज नोंद करतात कि, ' सुरतेचा सुभेदार व शिवाजी यांचे बरे आहे अशी आमची खात्री नसती तर सुरतेबद्दल आम्हांला काळजी वाटली असती. '

उपरोक्त माहिती खरी मानली तर सुरतेचा तुर्की सुभेदार निरुपायाने शिवाजीला अंतस्थरित्या अनुकूल झाल्याचे सिद्ध होते.


     या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर मेवाडकरांनी शिवाजी सोबत हातमिळवणी करून पदरात काय पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता याचा जसा अंदाज येतो तद्वत अफगाण युद्ध संपताच औरंगने मुर्खपणाने राजपूत युद्ध अंगावर ओढवून घेतले अशासारख्या विधनातील फोलपणाही परस्पर सिद्ध होतो.


    शिवाजीचे दोन राज्याभिषेक :- दि. ६ जून १६७४ रोजी शिवाजीने स्वतःस वैदिक धर्म पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला तर दि. २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक.  


    प्रथम राज्याभिषेक विधीत शिवाजीचा वैदिक धर्मात प्रवेश होऊन त्यास व त्याच्या मुलांस क्षत्रिय वर्णाची प्राप्ती झाली. तर दुसऱ्या राज्याभिषेकाने शिवाजी परत स्वधर्मात -- हिंदू धर्मात परतला असे वैदिक धर्माचे गाढे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे मत आहे.


    पैकी, वैदिक राज्याभिषेक प्रसंगी वेदोक्त मंत्रांचा उच्चार झाला असा जरी प्रवाद असला तरी पुढील काळात महाराष्ट्रात घडलेले वेदोक्त प्रकरण व त्या संबंधीचे लो. टिळकांचे केसरीतील लेख पाहता, ज्यार्थी भोसले कुळातील गृह्यसंस्कार पुराणोक्तनेच होत त्यार्थी शिवाजीच्या राज्याभिषेक समयी वेदोक्ताचा उच्चार झाला नसल्याचा किंवा शिवाजीकडून करवून घेतला नसल्याचा प्रवाद खरा वाटू लागतो. असो.


    सध्या आपणांस या चर्चेच्या तापोशिलात शिरायचे प्रयोजन नाही. परंतु एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या धर्मांच्या पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक का करून घ्यावेत ? याचा विचार आवश्यक आहे.


    राज्याभिषेकाची कल्पना नेमकी कोणाची ? या प्रश्नाचे उत्तर देशमुखांनी ' भट्टवंशकाव्यम् ' आधारे रामदासस्वामी असे दिले आहे. परंतु हे काव्य कधी रचण्यात आले याचा खुलासा देशमुख करत नाहीत. असो.


    क्षणभर देशमुखांचे मत ग्राह्य धरले तरी मग प्रश्न उद्भवतो कि, राज्याभिषेकाचे उपाध्यायपण स्वतः रामदासानेच का करू नये ? त्याचाही तितकाच अभ्यास होता ना ? कि मूर्ती पूजा व मुसलमानी अष्टक रचनेमुळे कट्टर वैदिकांच्या दृष्टीने तो हीन दर्जाचा होता व त्यामुळेच शिवाजीने गागाभट्टास पाचारण केले ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात, ज्याची इथे फक्त नोंद करत आहे.


     गागाभट्ट हिंदुस्थानातील नामांकित वैदिक विद्वान असल्याने व शिवाजीला आपले मूळ हिंदुस्थानातील असल्याचे सिद्ध करायचं असल्याने कदाचित गागाभट्टाची योजना झाल्याचे अनुमान संभवते. गंमतीची बाब म्हणजे याच गागाभट्टाच्या चुलत्याने ' शुद्रकमलाकर ' ग्रंथाची रचना केली होती. असो.


    वैदिक राज्याभिषेकामुळे हिंदू धर्मातील धर्मगुरू, साधू - संत मंडळी खवळून उठणे स्वाभाविक होते. ज्यांचे नेतृत्व यावेळी निश्चलपुरी गोसावी करत होता.


    निश्चलपुरीने अशुभ भवितव्ये वर्तवली त्याप्रमाणे वर्तमान घडून आल्याने शिवाजीने तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला यावर माझा विश्वास नाही. (१) मुळात निश्चलपुरी उभ्या शिवचरित्रात याच समयी कसा उगवला ? (२) शासकासमोर त्याचे अशुभ कसे काय वर्तवू शकतो ? आणि (३) तांत्रिक अभिषेक समयी शिवाजी निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश घेणार असता त्याचा उपाध्याय त्यास विरोध करतो अशा आशयचा उल्लेख श्री. देशमुखांनी आपल्या शिवचरित्रात दिला आहे व त्यापुढे निश्चलपुरीच्या कथनानुसार शिवाजीने मंत्रोपदेश स्वीकारल्याची त्यांनी नोंद जोडलीय, तिचा अर्थ काय होतो ?


    गंमतीचा भाग म्हणजे इतका खटाटोप करून शिवाजीने आपणांस शिसोदिया कुलोत्पन्न क्षत्रिय राजपूत सिद्ध केले, त्याचा त्याने व्यवहारात फारसा उपयोग केलाच नाही. उदा :- प. सा. सं. ले. क्र. १९०१ मध्ये शिवाजीने मालोजी घोरपड्यास राज्याभिषेकानंतर पाठवलेले पत्र छापले आहे. घोरपडे - भोसले घराण्याचे संस्थापक वंशावळी नुसार अजयसिंहाची मुले व सख्खे भाऊ होत. त्यामुळे हे दोघेही गोत्राचे समजले जातात. त्यान्वये भोसले राजपूत ठरले तर घोरपडेही राजपूत ठरतात. तरीही राज्याभिषेकानंतर घोरपड्यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी त्यांचा उल्लेख ' आपल्या जातीचे मराठे ' असाच वारंवार करतो. इतकेच काय सभासदही शिवाजीचा उल्लेख ' मऱ्हाठ पातशहा ' असाच करतो.


    शिवाजीच्या वैदिक राज्याभिषेकाने व त्यानिमित्त वैदिक धर्म प्रवेशाने हिंदू धर्मात अस्वस्थता निर्माण झाली हे उघड आहे. तो क्षोभ शांत करण्यासाठी व परत स्वधर्मात परतण्यासाठी शिवाजीने निश्चलपुरीचा आधार घेतला. परंतु प्रकरण इतक्यावर संपुष्टात न येता या हिंदू - वैदिक धर्मयुद्धांत पुढे कवि कलश सह संभाजीचा बळी जाऊन हे दोघे  खऱ्या अर्थाने हिंदू धर्मवीर बनले !           

                                                                                                             ( क्रमशः )


* सादर लेखात आधारासाठी घेतलेले बव्हंशी ग्रंथ http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

** साहित्यावरील जीएसटी कराचा निषेध **

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन शिवचरित्र निबंधावली वाचून काढली पण ९६ कुळी संपूर्ण यादी मिळाली नाही. तर कृपया संपूर्ण यादी असलेल्या पुस्तकाची लिंक देऊ शकाल का?

sanjay kshirsagar म्हणाले...

जी, सर्वात जुनी संपूर्ण यादी प्रसिद्ध झाल्याचे माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. सध्या वैद्यांनी संपादित केलेली त्रुटीत यादीच त्यातल्या त्यात जुनी मानतात.

अनामित म्हणाले...

तुमच्या तात्काळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद....कधीहि यादी मिळाली तर कृपया एक लेख लिहा

Unknown म्हणाले...

संजय तुझा ब्लॉग मला थोडा उशीराच वाचनात आला पण तरीही तुझे पूर्वग्रह लिखित विश्लेषण खुप काही सांगून जाते ..! उत्तर द्यायचे म्हंटले तरी अनेक विषय राहून जातील ! नीयतीच्या जर मनात असेल तर आपण समोरासमोर कधीतरी भेटू !