प्रकरण - १
सदर प्रकरणास आधारभूत संदर्भग्रंथ :-
मराठी रियासत खंड १ ते ३, मुसलमानी रियासत दोन्ही खंड, सरकारकृत औरंगजेब चरित्र, मनुची - असे होते मोगल, शेजवलकरांचे निजाम पेशवे संबंध, डॉ. खोबरेकरकृत महाराष्ट्राचा इतिहास
दोन्ही खंड, मुरलीधर अत्रे कृत होळकर
चरित्र, सेतू माधवराव पगडी संपादित मोगल
दरबारची बातमीपत्रे
शेजवलकर
लिखित निजाम पेशवे संबंध पुस्तकातील निजामाचा आपल्या मुलांना उपदेशाधारे प्रकरणाचा
आरंभ व पुनर्लेखन आवश्यक.
मल्हारराव
होळकराचा जन्म, बालपण, कौटुंबिक इ. तपशील पाहण्यापूर्वी
आपणांस सर्वप्रथम तत्कालीन समाजाची राजकीय, सांस्कृतिक स्थिती समजावून घेणे भाग
आहे.
होळकरांचा
उत्कर्ष पेशव्यांच्या सेवेत आल्याने तर पेशव्यांचा छत्रपतींच्या चाकरीत झाल्याने
कोणत्याही मराठी संस्थनिकाचा -- जो तत्कालीन मराठी साम्राज्याच्या घटकावयव होता --
पूर्वेतिहास पाहताना अपरिहार्यपणे आपणांस शिवचरित्राकडे वळावेच लागते.
... या
पर्वतरांगांमुळे येथील प्रदेशातील हवामानही वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे. पश्चिम
समुद्रकिनाऱ्यापासून सह्याद्री पर्वतरांगांपर्यंतचा प्रदेश हा डोंगराळ असला तरी
भारी पर्ज्यनाचा असून घाटमाथ्यापासून जसजसे आपण पूर्वेकडे जाऊ तसतसे पर्जन्यमान
कमी होत असल्याचे आपणांस दिसून येते. त्यामुळे घाटावरील जमीन सुपीक असूनही
अनिश्चित पावसामुळे शेती हा स्थिर मानवी जीवनास पोषक असलेला व्यवसाय नेहमीच
बेभरवशाचा राहिला. शेतकरी, शेतीचे संरक्षण करण्यास जर प्रबळ अशी सुरक्षा व्यवस्था असेल ; शेतीकरता आवश्यक तो अर्थपुरवठा तसेच
सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असतील तरच हा उद्योग फायद्याचा.
ज्यावेळी
या भूभागावर अहमदनगरची निजामशाही व विजापूरच्या आदिलशाहीची संयुक्त सत्ता होती
त्या काळात, या
विधर्मीय सत्तानी शेतीकडे विशेष लक्ष पुरवल्याने हा प्रदेश भरभराटीस येऊ लागला
होता. समुद्रकिनाऱ्यावरही या सत्तांचा अंमल असल्याने सागरी व्यापारही बऱ्यापैकी
चालल्याचे दिसून येते. परंतु हि स्थिती फार काळ टिकू शकली नाही. निजाम व आदिल, दोन्ही सत्ताधीश परस्परांवर आक्रमणं
करून परस्परांच्या ताब्यातील भूप्रदेश उध्वस्त, गिळंकृत करण्याच्या नादात असतानाच
हिंदुस्थानातील -- तत्कालीन संज्ञेनुसार नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेशास
हिंदुस्थान तर दक्षिणेकडील भागास दख्खन म्हणत -- बव्हंशी भूभागावर आपली सत्ता
स्थापन केलेल्या तुर्की सम्राट अकबराचे लक्ष नर्मदेच्या दक्षिणेस, दख्खनकडे वळून त्याची पहिली धाड
नगरच्या निजामशाहीवर येऊन पडली. ( स. १५९५ - १६०५ )
अकबराच्या
तडाख्यातून नामशेष होता होता निजामशाही कशीबशी सावरली खरी, परंतु दख्खनच्या राजकीय पटलावर निजाम व
आदिल यांना एक जबरदस्त शत्रू उत्पन्न झाला हे निश्चित !
या तिन्ही सत्तांच्या सत्ताधीशांच्या
धर्म एकच असला व निजाम वगळता उर्वरित दोघे परदेशी तुर्क मुसलमान जरी असले तरी धर्म, वंश हि बाब राजकीय
स्वार्थापुढे क्षुद्र होती. त्यामुळेच ज्या ज्या वेळी दिल्लीकर तुर्कांच्या निजाम
वा आदिलशाहीवर मोहिमा होत, त्या त्या वेळी या दोन्ही सत्तांची रयत -- ज्यात मुस्लिमांचाही
समावेश होता -- मोठ्या प्रमाणावर भरडली जात असे.
अकबर नंतर जहांगीरच्या काळात तुर्कांचे
दख्खनमधील आक्रमण काहीसे रेंगाळले. याचा फायदा घेऊन निजामशाही बलवान करण्याचा मलिक
अंबरने प्रयत्न करून पाहिला परंतु त्यास काही मर्यादा होत्या. पश्चात शहाजहानने स.
१६३० - ३६ पर्यंत अतिशय शिवतपणे प्रयत्न करून नगरच्या निजामशाहीस खणून काढत
दख्खनमधील आपला वर्चस्ववाद वाढीस लावला.
यावेळी निजामशाहीच्या अस्तित्वाकरता जो
लढा झाला, त्यात शहाजी भोसल्याने विशेष पराक्रम गाजवल्याने तो तत्कालीन
सत्तांच्या नजरेत भरणे स्वाभाविक होते. तशीच त्याची महत्वाकांक्षाही तत्कालीन
चाणाक्षांच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. त्यामुळेच वेळोवेळी निजामशाही -
आदिलशाही चाकरीत प्राप्त झालेली, सह्याद्री पर्वतरांगांलगत असलेली पुणे परिसरातील त्याची जहागीर
त्याच्याकडे कायम ठेवून विजापूरकरांनी शहाजीला आपल्या सेवेत घेत कर्नाटक प्रांती
मोहीमेस पाठवून त्यांस तिकडेच अतिरिक्त जहागीर नेमून देत गुंतवण्याचा प्रयत्न
केला.
निजामशाहीच्या बचावप्रसंगी सह्याद्री
पर्वतरांगांचा ज्या प्रकारे शहाजीने आश्रय घेतला व बलाढ्य तुर्की सैन्याचा काही
काळ सामना केला त्यावरून शिवाजीच्या यशाचे रहस्य तसेच राजधानीकरता रायगडसारख्या
ठिकाणच्या निवडीचे मर्म लक्षात यावे.
निजाम - आदिलशाहीत नोकरी करत असतानाच
शहाजीने विशिष्ट प्रदेशात जहागीर प्राप्त करत स्वतंत्र राज्यस्थापनेचा प्रयत्न
आरंभालाच होता. निजामशाहीच्या पाडावानंतर जरी त्या उद्योगात तात्पुरता खंड पडला
असला तरी शिवाजीने तोच उद्योग आपले आनुवंशिक कर्तव्य समजत नेटाने पुढे चालवला.
इथे यास्थळी आपणांस मुद्दामहुन लक्षात
घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे शहाजीला पुणे व आसपासच्या भागात जो भूप्रदेश
जहागिरीदाखल प्राप्त झाला व शिवाजीच्या पुढील उद्योगाचे केंद्र बनला, तो भूप्रदेश मूळ
निजामशाहीतील असून त्या सत्तेच्या ऱ्हासानंतर तिथे फक्त शहाजीचाच अंमल होता.
ज्याचा फायदा शिवाजीला होऊन अल्पावधीतच त्यांस आपला जम बसवता आला. पुढे
क्रमाक्रमाने यशाची शिखरं चढत शिवाजीने दि. ६ जून १६७४ रोजी रायगडावर स्वतःस
राज्याभिषेक करवून घेत स्वतंत्र सत्तेची अधिकृत घोषणा केली. नंतर लगेचच दक्षिण
दिग्विजय करत आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. याच काळात दख्खनमधील
विजापूर व गोवळकोंड्याची सत्ता दुर्बल झाल्याने दख्खनस्थित सत्तांमध्ये शिवाजीस
प्रमुखत्व मिळून तुर्कांच्या दख्खनमधील शिरकावास आळा घालण्याचे कार्य त्याच्यावर
येऊन पडले.
शिवाजीच्या पश्चात हि जबाबदारी अनुक्रमे
संभाजी, राजाराम व ताराबाई यांनी सांभाळली. स. १६८० ते १७०७ हा सत्तावीस
वर्षांचा काळ शिवाजी स्थापित मराठशाहीकरता अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
याकाळात संभाजीसारखा तडफदार छत्रपती दरबारी कारस्थानाला बळी पडत शत्रूहाती कैद
होऊन मारला गेला. त्यानंतर राज्याची सर्व सूत्रे नामतः राजारामाच्या तर
प्रत्यक्षतः दरबारी मंत्री - सरदारांच्या हाती क्रमशः जाऊ लागली.
राजारामाच्या निधनानंतर राज्याचा स्वामी
कोण ? हा प्रश्न दरबारी मुत्सद्द्यांसमोर उपस्थित झाला. त्यावेळी
औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीपुत्र शाहू हाच खरा राज्याचा वारस व आपण केवळ
त्याचे प्रतिनिधी, या राजारामाच्या भूमिकेचं स्मरण मुत्सद्द्यांनी ताराबाईस दिले
असता तिने आपल्याच मुलास राज्याधिकारी बनवण्याचा घाट घातला. वस्तुतः इथे राज्याचा
उत्तराधिकारी कोण ? हा प्रश्न नसून राज्याचा वारस कोणाच्या पसंतीचा असावा ? हा मुख्य मुद्दा होता
व याच कारणास्तव पुढे राज्याची दोन शकलं झाली. यासंबंधी बव्हंशी मान्यवर इतिहासकार
ताराबाईस दोष देतात, हि त्यांची चूक आहे.
या
मुख्य प्रश्नाचं मर्म समजण्यासाठी आपणांस इतिहासात प्रसिद्ध पावलेला व
इतिहासकारांनी गौरवलेला ' मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम ' म्हणजे काय ? हे समजावून घेणे भाग आहे.
व्यवहारात
एखाद्या सत्तेचा / संस्थेचा प्रमुख करडा, कर्तबगार असेल तर त्याच्या हाताखालील
सेवकवर्ग त्यांस भिऊन वर्तत असतो. मात्र अधूनमधून आपलं उपद्रवमूल्य तो मालकाच्या
नजरेस आणत असतो. ज्यामुळे प्रसंगी कितीही करडा, शिस्तप्रिय मालक असला तरी त्यांस
आपल्या चुकार नोकरांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष
करावे लागते. कर्तव्यातील कसुरीकडे हा काणाडोळा, त्या व्यक्तीच्या उपयोगितामूल्याकडे
बघून करावा लागतो हे उघड आहे. हा एक प्रकार झाला. दुसरा असा कि, धन्याची करडी शिस्त न मानवल्यास चुकार
चाकर प्रसंगी त्या मालकाची नोकरी सोडून जातात किंवा मग त्याचीच उचलबांगडी करण्याचा
प्रयत्न करतात. समाजात ' संस्था ' अस्तित्वात आली तेव्हापासून हा प्रकार अव्याहतपणे सुरु आहे, त्यांस अद्यापि खीळ पडलेली नाही व
अपवादही कोणी नाही.
शिवाजीच्या
राज्यात हे दोन्ही प्रकार चालत होते. प्रसंगी मंत्री - सरदार त्याची अवज्ञा करत, नोकरी सोडून जात. कधी कधी त्यालाही
चाकरांच्या प्रमादांकडे दुर्लक्ष करावे लागे. परंतु सेवकवर्गाने शिवाजीलाच
सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केल्याचे ज्ञात इतिहासात नमूद नाही. मात्र
शिवाजीच्या पश्चात स्थिती बदलली. सेवकवर्गाला स्वतःच्या पसंतीचा, मर्जीचा राजा हवा होता व त्याकरता
त्यांनी वारसाहक्क डावलून -- ज्याला तत्कालीन समाजव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व
होते -- संभाजी ऐवजी राजारामाची निवड केली. परंतु संभाजीने आपल्या नोकरांचे डाव
हाणून पाडत सत्तासूत्रे हाती घेतली. परिणामी त्याची उणीपुरी आठ नऊ वर्षांची
कारकीर्द घरच्या - बाहेरच्या शत्रूंशी झगडण्यातच खर्च झाली. त्याचा शेवटही याच
कारणांनी घडून आला.
इथे
प्रश्न असा उद्भवतो कि, संभाजी ऐवजी राजाराम का ? ना तो लढवय्या होता, ना धोरणी मुत्सद्दी. उलट शिवाजीचे निधन झाले त्यावेळी तो अवघ्या १०
वर्षांचा होता. मात्र अशा स्थितीतही मंत्री - सरदारांना राजा म्हणून संभाजी ऐवजी
राजारामच हवा होता, याचे कारण काय असावे ?
या
प्रश्नाचे उत्तर हिंदू - वैदिकांच्या धार्मिक झगड्यात मिळते. शिवाजीने प्रथम वैदिक
पद्धतीने राज्याभिषेक करवुन घेतला व नंतर तांत्रिक अभिषेकाच्या रूपाने तो पुन्हा
हिंदू धर्मात प्रवेशला. संभाजीनेही हाच प्रकार केला होता. खेरीज, शिवाजीने या दोन्ही धर्मियांची अंतर्गत
चुरस बऱ्यापैकी दाबून ठेवलेली. तो स्वतः धर्मादी बाबींना कारणापुरतेच महत्त्व देत
असे. मात्र संभाजी हा हिंदू धर्मियांचा उघड पक्षपाती बनला. त्याच्या तांत्रिक
प्रेमाविषयी जे काही काळंकुट्ट लेखन बखर वाड्मयात मिळते, ते याच त्याच्या हिंदुधर्म प्रेमामुळे.
वैदिकांनी त्याच्या द्वेषास त्यामुळेच आरंभ केला व अशी व्यक्ती राज्याची अधिकारी
बनल्यास आपल्या धर्माचे महत्त्व, अस्तित्व धोक्यात येईल म्हणून त्यांनी सातत्याने त्यांस सत्तेवरून
खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच संभाजीऐवजी अल्पवयीन राजाराम गादीवर आल्यास सत्तेची
सूत्रे आपल्या हाती येतील या मोहाने काही सरदारही त्यांच्या पक्षास मिळाले.
परिणामी संगमेश्वरी तुर्कांच्या छाप्यात संभाजीला सोडून सरदार निघून गेले. बाकी
गोष्टी इतिहासात दाखल आहेत.
इथवरच्या
विवेचनावरून धार्मिक, सामाजिक, आर्थिक वगैरे बाबींमुळे राज्याचा वारस कोण असावा ? या प्रश्नांना दरबारी मंडळींचे
स्वारस्य का होते, याचा उलगडा व्हावा. तसेच हि स्थिती केवळ रायगड दरबारात होती असे
नाही. तर त्याचवेळेस विजापूर, दिल्ली तसेच नंतरच्या काळात सातारा, पुणे, हैद्राबाद इ. दरबारातही कायम असल्याचे
दिसून येते.
राजारामाच्या
मृत्यूनंतर ताराबाईने आपल्या मुलास छत्रपतीपद देण्याचा निर्णय घेतला. राजारामाच्या
तुलनेनं ताराबाई कठोर असल्याने सेवकवर्ग संभाजीपुत्र शाहूच्या नावाचा जप करू
लागला. याकरता, राजारामही
शाहुलाच उत्तराधिकारी मानत होता, याचे दाखले देऊ लागला. परंतु ताराबाईवर याचा परिणाम काय होणार होता !
तिने हे दाखलेच नव्हे तर खुद्द शाहुलाही धुडकावून लावले. ज्या राज्यावर शाहू आपला
अधिकार सांगण्यासाठी आला ते राज्यच मुळी त्याचे नाही. वडिलोपार्जित राज्य
संभाजीसोबत लयास गेलं. आज जे आहे, ते राजारामाने अर्जित केलेलं असल्याचं तिचं म्हणणं होतं व ते अधिक
सयुक्तिक असूनही तिचे बरेचसे सरदार - मंत्री शाहूकडे गेले. तेव्हा निष्ठावंत सरदारांसह तिने नव्या
राज्याची ( कोल्हापूर ) उभारणी केली. हा झाला अधिकृत दरबारी सरदार - सेवकांचा भाग.
आता जे अघोषित सरदार, शिलेदार होते त्यांची कथा संक्षेपात पाहू.
एक
साधं उदाहरण आहे. जेवताना सावकाश, प्रत्येक घास नीट चावून खाल्ल्यास पचनक्रिया व्यवस्थित होते. तेच उलट
बकाबक घास तोंडात कोंबल्यास त्याचे दुष्परिणाम व्यक्तीस त्वरित भोगावे लागतात. हाच
नियम राज्यविस्तारासही लागू पडतो. अलेक्झांडर किंवा गेंघीझखानाची
साम्राज्यं अल्पावकाशात विस्तारली व तेवढ्याच झपाट्याने ऱ्हास पावली. हि उदाहरणे
प्राचीन काळातील म्हणावीत तर मध्य तसेच आधुनिक युगात देखील याच प्रकारची वारंवार
पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ औरंगजेबाची दक्षिण मोहीम, नेपोलियनची गरुडझेप, ईस्ट इंडिया कंपनीचा डलहौसीच्या काळात
संस्थाने खालसा करून अल्पावधीत सत्ता विस्तारण्याचा प्रयत्न, दोन्ही महायुद्धातील जर्मनीचे
साम्राज्यविस्ताराचे धोरण याच सदरात मोडणारे. एवढेच नव्हे तर शिवाजीने आपली उभी
हयात खर्चून उभारलेलं राज्य खणून काढताना औरंगजेबास किती प्रयास पडले ! तेच
नंतरच्या काळात मराठी सरदारांनी देशभर राज्यविस्तार करूनही सहजगत्या इंग्रजांना
त्यांचा पराभव करता आला. या विवेचनाचे सार इतकेच कि, कोणत्याही गोष्टीस पुरेसा व योग्य वेळ
द्यावा लागतोच. तिथे गडबड घाईचे काम अजिबात उपयोगी नाही व याचाच औरंगजेबास विसर
पडला.
प्रस्तावित
दख्खन मोहिमेत त्याचे मुख्य उद्दिष्ट झपाट्याने आपल्या सत्तेचा विस्तार करणं, हेच होतं. मात्र हे कार्य करत असताना
त्याकरता लागणाऱ्या आर्थिक, मनुष्य बळादी मोहिमेच्या एकूण नियोजनाची त्याने म्हणावी तशी
पूर्वतयारी केलेली नव्हती. दक्षिणेतील विजापूर, गोवळकोंडा, रायगड या तीन मुख्य राजवटींच्या
राजधान्या तेथील सत्ताधिशांसह ताब्यात घेताच आपल्या साम्राज्याचा विस्तार होऊन चार
पिढ्यांचा उद्योग शेवटास जाईल अशी त्याची भावना असावी. परंतु अल्पावकाशात जिंकलेले
प्रांत ताब्यात ठेवणे, तेथील प्रशासनाची व्यवस्था लावणे, बंडाळी माजू न देता खालसा राजवटींतील
लढाऊ वर्गास आपल्या सेवेत सामावून घेणे तुर्की साम्राज्याच्या खजिन्यास पेलवणार
आहे का, याचा
त्याने पुरेपूर विचारच केला नाही. त्यामुळेच लागोपाठ विजापूर, गोवळकोंडा व रायगड हि तीन प्रमुख
सत्तास्थानं तेथील राजपरिवारांसह -- अपवाद राजारामचा -- त्याच्या ताब्यात येऊनही
या राजवटींमध्ये मोडणारा समग्र प्रदेश त्याच्या कब्जात येऊ शकला नाही.
दख्खन
मोहीम लांबल्याने लष्करावरील खर्चात भरमसाठ वाढ झाली होती. हि लष्करी खर्चाची निकड
भागवण्याची शक्ती शाही खजिन्यात, बादशाहच्या राजधानीतील दीर्घकालीन अनुपस्थितीने अजिबात राहिली
नव्हती. ज्यावेळी मुख्य सत्ताधीश एका पिढीच्या -- साधारण पंचवीस वर्षांची एक या
हिशोबाने -- काळाइतका मुख्य राजधानीपासून दूर राहतो तेव्हा साहजिकच राजधानी व
आसपासच्या प्रदेशांत चलबिचल माजते. जर शंभर वर्षांहून अधिक काळ तुर्की अंमल कायम
असलेल्या दिल्ली व आसपासच्या प्रदेशांत अशी चलबिचल माजून बंडाळी सारखे प्रकार उद्भवत
असतील तर मग दक्षिणेतील नुकत्याच तुर्की साम्राज्यात दाखल झालेल्या प्रांतांची काय
कथा !
दोन
अडीच दशकं चाललेल्या अविरत युद्ध मोहिमांनी स्थिर जीवनाचा पाया असलेली शेती
पूर्णतः उजाड झाली होती. येथील शेतकरी सुगीच्या हंगामात शेती करून इतरवेळी
शिपाईगिरीचा धंदा करीत, त्यामुळे राज्याच्या महसुलात घेत होत नसे तसेच खजिन्यावरही फारसा ताण
येत नसे. मात्र औरंगजेबाच्या महत्त्वाकांक्षेने येथील शेती, शेतकरी, व्यापारी वगैरे स्थिर जीवनास आवश्यक
अशा सर्व सेवा - धंद्यांचा बळी घेऊन जगण्यासाठी त्यांच्यासमोर केवळ लुटमारीचाच
धंदा पर्याय म्हणून ठेवला. परिणामी प्रत्येक गावी हत्यारबंदांची टोळी तयार होऊन
आसपासच्या प्रदेशांत कधी स्वतंत्रपणे तर कधी अनेक टोळ्या एकत्रित येऊन लुटमारीकरता
धाडी घालू लागल्या. या टोळ्यांना हाताशी धरत कित्येक महत्वाकांक्षी व्यक्ती आपापलं
नशीब आजमावण्यास पुढे सरसावले. शत्रुप्रदेशातील लुटमारीच्या बदल्यात कधी
औरंगजेबाकडून तर कधी राजाराम / ताराबाईकडून ते वतनं, जहागिरी पदरात पाडून घेऊ लागले. हा
प्रकार केवळ मराठी राज्यात मोडणाऱ्या प्रदेशात चालू होता असे नसून, एकेकाळी विजापूर - गोवळकोंड्याच्या
राजवटीत मोडणाऱ्या भागातही सुरु असून तेथील राजवटी खालसा झाल्याने बेकार बनलेले
सरदार - शिपाईही मराठी सरदारांना सामील होऊन या उद्योगात सामील झाले होते.
लुटमारीच्या
आशेने गोळा होणाऱ्या शेकडो - हजारोंच्या झुंडीत मूठभर खडे सैन्य मिसळले कि, केवळ संख्येच्या बळावर दहशतीने यांचा
कार्यभाग उरके. प्रकरण अंगाशी आलं कि, क्षणात यांची पथकं रणातून गायब होत.
यालाच इतिहासकारांनी अज्ञानापोटी गनिमी कावा म्हटलं असो.
केवळ
लुटमारीच्या आशेने सैनिकी पेशा स्वीकारलेल्या मनुष्यांना युद्धमान स्थिती कायम
असणे हितावह वाटणे अस्वाभाविक नाही. यामुळेच शक्य असूनही मराठी सरदारांनी
औरंगजेबास छापा मारून कैद करण्याचा प्रयत्न केला नाही.
मराठी
राज्यचालकांना याची कल्पना असल्याने त्यांनीही परस्पर शत्रू दुर्बल होतोय या
भावनेपोटी अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केले. यातूनच पुढील काळात सहसा शत्रूला उखडून न
काढण्याची मराठी नेतृत्वाची -- विशेषतः पेशव्यांची राजनीती बनून गेली. या वृत्तीचा
उगम याच काळात झाला असे म्हणणे चुकीचे आहे कारण, स्वार्थभावना मनुष्यात जन्मतः आहे. मात्र या वृत्तीस विशेष प्रोत्साहन या
तथाकथित स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात मिळाल्याने तिची भरपूर जोपासना झाली हे
निश्चित !
संभाजी
कैद झाल्यापासून ते शाहू तुर्कांच्या नजरकैदेतून सुटून राज्यात येईपर्यंत व
त्यानंतरचाही काही काळ -- मराठी सरदारांचा तुर्कांविरुद्धचा जो लढा होता तो
विस्कळीत, असंघटित
स्वरूपाचा होता. यामुळे या काळात माळवा - गुजरात प्रांतात मराठी सरदारांनी जी काही
धामधूम उडवली त्यामागे निश्चित एक धोरण होते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरते.
राज्यचालकांच्या
दृष्टीने पाहता गुजरात - माळव्यावरील हल्ले हे सैन्याचा खर्च भागवणे, शत्रूचे लक्ष विचलित करणे तसेच या
प्रांतांमधून शत्रू सैन्याला होणार रसद पुरवठ्यास अडथळा करणे याकरता उपयुक्त होते.
मात्र या हल्ल्यांवरून याच काळात माळवा - गुजरातमध्ये सत्ता स्थापण्या -
विस्तारण्याचा मराठी राज्यकर्त्यांचा विचार होता असे म्हणणे चुकीचे ठरेल.
सातत्याने
युद्धमान स्थितीचा लोकजीवनावर मोठा परिणाम होतो. लोकांमधील नीती - अनीतीची वाढ, दोष - गुणांचे प्रभाव या बाह्य
स्थितीवरही बऱ्यापैकी अवलंबून असते का ? ... ( अपूर्ण )
३ टिप्पण्या:
I am an eager reader of whatever you write and publish ! Keep up good work.
Mast
नमस्कार संजय क्षीरसागर!
लेखातलं हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे.
>> लुटमारीच्या आशेने गोळा होणाऱ्या शेकडो - हजारोंच्या झुंडीत मूठभर खडे सैन्य मिसळले कि,
>> केवळ संख्येच्या बळावर दहशतीने यांचा कार्यभाग उरके.
महत्त्वाचं अशासाठी की नेमक्या याच पद्धतीने लोकसेना ( = legion ) उभारली जाते. निदान युरोपात तरी ही एक पद्धत आहे. जगात इतरत्रही असू शकते. अर्वाचीन काळची एक जबरदस्त लोकसेना ही चेकोस्लोव्हाकिय होती (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Czechoslovak_Legion ). ही पहिल्या महायुद्धाच्या काळी १९१७ साली जन्माला आली. ऑस्ट्रिया-हंगेरीच्या संयुक्त सैन्यातील युद्धबंदी झालेल्या सैनिकांनी हिची प्रामुख्याने उभारणी केली. तिच्यात नंतर ऑस्ट्रिया व हंगेरीच्या दडपणाखालून मुक्त झालेल्या युरोपीय प्रदेशांतील अनेक सामान्य जन दाखल झाले. हिची कहाणी कमालीची रंजक आहे.
हिने युक्रेनपासून लढाया लढायला सुरुवात केली. तिचा युरोपात परत यायचा मार्ग खुंटला. तेव्हा ती पार सैबेरियाच्या दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे प्रशांत महासागराच्या किनारी व्लादीवोस्तोक पावेतो लढंत गेली. तिथून नौकेने परत युरोपात दाखल झाली. अशा रीतीने अर्ध्या जगाची प्रदक्षिणा घालून मायदेशी परतली.
सांगायचा मुद्दा असा की शेती (वा तत्सम आर्थिक उपजीविका) नाहीशी झाली की लूटमार करणे हा एकमेव पर्याय राहतो. किती सुसंस्कृतपणे ही लूटमार होते त्यावर त्या प्रदेशाचं भवितव्य ठरतं. आज इराक मध्येही अशीच परिस्थिती आहे. तिथे आयसिस जन्मास आलीये. आपल्या इथे सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना उभारली होती ती ही अशीच एक लोकसेना होती.
चेकोस्लोव्हाकिया, इराक, भारत तीन सेनांच्या तीन तऱ्हा दिसतात. घटाघटाचेरूप आगळे .... !
आपला नम्र,
-गामा पैलवान
टिप्पणी पोस्ट करा