शुक्रवार, ५ जून, २०२०

शिवचरित्राचा गजानन मेहेंदळेंनी वैदिकवादी दृष्टिकोनातून केलेला विपर्यास









बव्हंशी जीवन इतिहास अभ्यासात व्यतीत केलेली व्यक्ती केवळ हेतुतः ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करत विपर्यस्त इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांस प्रश्न विचारण्याचे कटू असले तरी मुख्य कर्तव्य पार पाडणे आम्हांस भाग आहे.
श्री. गजानन मेहेंदळे सरांचा इतिहास अभ्यास, अनुभव, ज्ञान पाहता ते या क्षेत्रातील केवळ तपस्वी, महर्षीच म्हटले पाहिजेत. परंतु परवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला व त्या सुमारे दीड तासांच्या भाषणात सरांनी ज्या प्रमाणे आपल्या कष्टाळू तसेच अभ्यासू वृत्तीचा परिचय जसा आम्हांस पुन्हा एकदा करून दिला, त्याचप्रमाणे त्यांचे एक इतिहास अभ्यासक, इतिहासकार म्हणून झालेलं नैतिक अधःपतन याची देहा याची डोळा पाहण्याचा योग आमच्या नशिबी यावा हे मोठं दुदैवचं म्हणावं !

श्री. मेहेंदळेंच्या भाषणाचा विषय होता शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन. या अनुषंगाने देशावरील इस्लामी आक्रमणे, त्यांनी येथे स्थापन केलेल्या सत्ता व त्या सत्तांचे परिणाम यांची साधक बाधक चर्चा होणे अपेक्षित होते व तसे झालेही. परंतु हे करत असताना मेहेंदळेंनी असा काही जाहीररीत्या बौद्धिक व्यभिचार केला कि त्याची संभावना करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. वस्तुतः दि. १० जुलै २०१५ रोजी पुण्यातील जंगली महाराज समाधी मंदिर येथे श्री. मेहेंदळ्यांनी शिवचरित्रावर, संभाजी भिडेंच्या उपस्थितीत एक व्याख्यान दिले होते. त्याच भाषणात थोडी भर घालून मेहेंदळ्यांनी प्रस्तुतचे व्याख्यान सजवले आहे.

या देशावर इस्लाम धर्मियांची आक्रमणं झाली, त्यांनी अत्याचार केले या गोष्टी निर्विवाद आहेत. परंतु हा इतिहास सांगण्यापूर्वी मेहंदळे आपल्या भाषणाच्या आरंभी दोन गोष्टी प्रामुख्याने मांडतात. एक म्हणजे मुंबईत श्री शिवछ्त्रपतींच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली त्या प्रसंगी यशवन्तराव चव्हाणांनी अशा आशयाचे उद्गार काढले होते कि, ' जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोहचली असती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषणात येणाऱ्या हिंदू शब्दाची परिभाषा त्यांनी सांगितली आहे कि, ' कायद्याकरता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी हिंदू या शब्दात पारंपरिक हिंदू आणि बौद्ध,  जैन, शीख या सर्वांचा समावेश केला होता. आणि तोच अर्थ मला अभिप्रेत आहे. '

परिणामतः व्याख्यानाचा सर्व रोख इस्लामी आक्रमक, त्यांचे अत्याचार यांवर एकतर्फी राहून शिवरायांनी त्याचे कसे निवारण केले यासंबंधी मेहेंदळे फारशी माहिती देत नाहीत. त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेतला तर त्यांनी मुस्लिमांना सेवेत घेतले नाही, मशिदी पाडून मंदिरे उभारली, मुस्लिम साधूंना इनामं दिली नाहीत वगैरे वगैरे. जणू शिवरायांनी केवळ या कृत्यांद्वारेच इस्लामी आक्रमणाचा मुकाबला केला वा सूड उगवला असे मेहेंदळेंना म्हणायचंय  का ?  कारण जवळपास तास दीड तासाच्या भाषणात सुमारे तासाहून अधिक काळ महंमद पैगंबर ते आताच्या इसिस पर्यंतचा इस्लामी अत्याचाराचे दाखले देणाऱ्या मेहेंदळ्यांनी आपल्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त भाषणात शिवचरित्रास किती मिनिटं दिली ? जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटं असावीत. त्यातही प्रामुख्याने शिवभारताच्या आधारे अफझलखान स्वारी, नेताजी पालकरास पुन्हा हिंदू धर्मात घेणे, दक्षिण दिग्विजयात उध्वस्त केलेल्या मशिदी वगैरे. शिवचरित्र केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का ?

बरं, हा मुद्दा सोडला तरी मेहेंदळेंनी केलेल्या इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांचे विवेचन ऐतिहासिक सत्यास धरून आहे का ? विसाव्या शतकात डॉ. आंबेडकरांनी कायद्याकरता केलेली हिंदू शब्दाची व्यख्या गृहीत धरून जर तुम्ही सातव्या शतकात स्थापन होऊन साधारणतः अठराव्या शतकापर्यंत हिंदुस्थानावर स्वाऱ्या करणाऱ्या इस्लामी आक्रमणाची चिकित्सा करणार असला तर हि ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा वा बौद्धिक व्यभिचार ठरत नाही का ?
उदाहरणार्थ तैमूरलंगच्या हिंदुस्थानवरील स्वारी तसेच हिंदूंच्या कत्तलीचे मेहेंदळेंनी आपल्या ओजस्वी वाणीने, तैमूरच्याच आत्मचरित्राच्या आधारे वर्णन केले असून तैमूरने हि स्वारी काफ़िरांविरुद्ध धर्मयुद्ध करण्याकरता हिंदुस्थान स्वारी केल्याचे म्हटले आहे. खेरीज लोणी गावी त्याने निरपराध गावकऱ्यांना पकडून त्यातील हिंदू तेवढे निवडून त्यांना ठार केल्याचेही ते सांगतात. परंतु या स्वारीत तैमूरचा मुकाबला करणाऱ्या दिल्लीच्या शासकाचे -- महंमदशहा तुघलक -- ते नाव सांगत नाही कि त्याच्या धर्माचा उच्चार करत नाहीत.
याखेरीज महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान स्वारीत दिल्लीच्या वाटेवर असताना मार्गात त्याला जाटांशी झगडावे लागले होते व या जाटांची त्याने कत्तलही उडवली होती. विशेष म्हणजे या जाटांना तो ' ते फक्त नावाचे मुसलमान ' असल्याचे म्हणतो. स. १३९८ - ९९ मधील हि गोष्ट आहे. जाट हिंदू नव्हे तर मुसलमान समजले जात होते. यासारखाच एक उल्लेख आपणांस त्र्यं. शं. शेजवलकर लिखित पानिपत १७६१ मधील नानासाहेब पेशव्याच्या एका पत्रात मिळतो. या पत्रानुसार पानिपतमुळे उत्तर  हिंदुस्थानात पेशव्यांची सत्ता अस्थिर झाली होती. अशा स्थितीत उत्तरेतील मराठी अंमलाखालील प्रदेश सोडायचाच झाल्यास तो राजपुतांवर सोपवण्यात यावा परंतु जाट मुसलमानाकडे नाही, अशी पेशव्याची सूचना होती. आता मेहेंदळेंनी भाषणाच्या आरंभी जी काही हिंदू शब्दाची व्याख्या गृहीत धरली आहे, ती इथे लागू करता येईल का ? याचे उत्तर मेहेंदळ्यांनीच द्यावं.
( संदर्भ :- पानिपत : १७६१ त्र्यं. शं. शेजवलकर, Malfuzat-i Timuri, or Tuzak-i Timuri, by Amir Tîmûr-i-lang
In The History of India as Told by its own Historians. The Posthumous Papers of the Late Sir H. M. Elliot. John Dowson, ed. 1st ed. 1867. 2nd ed., Calcutta: Susil Gupta, 1956, vol. 2, pp. 8-98.
ऑनलाईन लिंक :- https://www.infinityfoundation.com/mandala/h_es/h_es_malfuzat_frameset.htm ) 

दुसरी महत्त्वाची बाब अशी कि, जरी तैमूर खुद्द आपल्या आत्मचरित्रात हिंदुस्थान स्वारीस धर्मयुद्धाचे स्वरूप देत असला तरी त्याच्या आत्मचरित्रातच या स्वारीमागील मुख्य आर्थिक प्रेरणेचा उल्लेख आला असून मेहेंदळेंनी मात्र तो खुबीने टाळला आहे. किंबहुना कोणत्याही इस्लामी शासकाच्या स्वारीमागचे मुख्य कारण राज्यविस्तार वा आर्थिक लाभ असल्याचे त्यांना लक्षातच घ्यायचं नाही. उदाहरणार्थ, पानिपत युद्धास अब्दाली - नजीब जरी लौकिकात जिहाद म्हणत असले तरी या जिहादात अब्दालीकडून सहभागी झालेल्या सुजाचा दिवाण काशीराज काय मुसलमान होता ? सुजाचे गोसावी कोणत्या परंपरेचे मुस्लिम जिहादी होते ? वस्तुतः देवासाठी म्हणून सोडलेल्या स्त्रीचा गावातील मातबर मंडळींनी उपभोग घ्यावा त्या धर्तीचा हा मुस्लिम आक्रमकांचा जिहाद ! ज्याचा मुख्य हेतू केवळ धनतृष्णा !! परंतु आपला मालक किंवा खुद्द आपण यःकश्चित द्रव्याकरता हे कृत्य केलं असं  कोणता मुस्लिम  सत्ताधीश म्हणेल ? इतकेच काय, औरंगजेबाने दक्षिणेतील बुडवलेल्या आदिल आणि कुतुबशाह्या, या कोणत्या जिहादी युद्धाच्या निकषात मोडतात ?

मेहेंदळ्यांची हिंदू विषयक व्याख्या ऐतिहासिक सत्यास कशी विकृत करते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे गजनीच्या महंमदाची सोमनाथ स्वारी. स. १०२४ च्या उत्तरार्धात महंमद सोमनाथ स्वारीकरता खैबर, पेशावर, मुलतान, अजमेर मार्गे अनहिलवाड्यास आला.
पंजाब प्रांत महंमद गजनीच्या ताब्यात असल्याने व येथील काही सत्ताधीश त्याचे मांडलिक असल्याने महंमदला या स्वारीत मनुष्यबळ तसेच रसदेचा पुरवठा प्रामुख्याने हिंदुस्थानी सत्ताधीशांकडून झाला.
सोमनाथास जाताना महंमद प्रथम अजमेर व नंतर अन्हीलवाड्यास गेला. या दोन्ही ठिकाणचे राजे त्याच्याशी सामना न करता पळून गेले. यामागील कारणपरंपरा अशी कि अजमेर - अन्हीलवाड्याच्या सत्ताधीशांत, वीसलदेव - भीम यांच्यात वैमनस्य होते. यामुळे वीसलदेवाने महंमदला मोकळा मार्ग देणे स्वाभाविक होते. परंतु सोळंकी राजा भीम व त्याची सेना महंमदाच्या सामन्यास का उभी राहिली नाही ?
गुजरातच्या चालुक्य सोळंकी राज्यात व दरबारात जैन धर्मियांचा प्रभाव होता. राज्यावर कोणी बसावे, कोणी बसू नये यासंबंधीच्या उलाढाली करणे तसे प्रसंगी खूनही पाडण्यात ते मागे पुढे पाहत नव्हते. महंमदाच्या सोमनाथ स्वारी प्रसंगी गादीवर असलेला राजा भीम, जैन धर्मीय होता कि नव्हता याची स्पष्टता होत नसली तरी त्याच्या कारकिर्दीत जैन धर्मियांना मिळालेला आश्रय तसेच अबुच्या पहाडावरील त्याने उभारलेली जैन मंदिरे, राजा भीम किंवा सोळंकी राज्यातील जैन प्रभावास पुष्टी देतात व यावरून हाच तर्क संभवतो कि, महंमदाची स्वारी हिंदू तीर्थस्थळाकडे होणार असल्याने जैन धर्मियांनी या प्रसंगी निव्वळ बघ्याची भूमिका घेत महंमदला मोकळा मार्ग दिला. ( संदर्भ :- सोमनाथाचे इस्लामी रहस्य - संजय क्षिरसागर, चपराक दिवाळी अंक स. २०१७ )
तात्पर्य, प्रचलित हिंदू शब्दाची व्यख्या गृहीत धरून गतकालीन घटनांची मांडणी करणे अनैतिहासिक आहे. हा केवळ ऐतिहासिक सत्याचा नसून इतिहासाचा देखील केलेला खून आहे.

दुसरी गोष्ट अशी कि, इस्लामी शासकांनी हिंदूंच्या केलेल्या कत्तलींची.  मुळात अशा कत्तली झाल्याच नाहीत असे कोणी म्हणतही नाही. परंतु अशा कत्तलींचे त्या त्या आक्रमकांच्या दरबारी भाट - आश्रितांनी अतिशयोक्तीने मांडलेले आकडे जसेच्या तसे गृहीत धरावेत हा मेहेंदळेंचा आग्रह असून त्या मागची मीमांसा त्यांनी केली असून ती मुळातूनच ऐकली पाहिजे. परंतु त्यासोबत हेही नमूद करावं लागेल कि, या कारणमीमांसेवरून मेहेंदळेंचीच विकृत भावना जास्त दृग्गोचर होते.
असाच काहीसा भाग इस्लामी आक्रमकांच्या परधर्मीय स्त्री विषयक धोरणाच्या चर्चेचा आहे. ज्यामध्ये मेहेंदळेंनी पार पैगंबरापासून दाखले दिलेत. परंतु ते देत असताना मेहेंदळेंचा तोल सुटून विकृतीकडे ढळल्याचे साफ दिसून येते. इच्छुकांनी तो भाग स्वतःच प्रत्यक्ष ऐकून खात्री करून घ्यावी.

इस्लामी आक्रमकांच्या मंदिर विध्वंसाची कथा देखील याहून वेगळी नाही. मुळात आरंभी जी आक्रमणं झाली, या इस्लामी आक्रमणाच्या वेळी देशात त्या त्या ठिकाणी कोणत्या धर्मियांच्या राजवटी होत्या हा मुद्दा मेहेंदळ्यांनी,  डॉ. आंबेडकरांनी कायद्याकरता केलेली हिंदू शब्दाची व्याख्या आरंभीच जमेस धरून निकाली काढलेला. त्यामुळे इस्लामी आक्रमकांना येथे कोणी विरोध केला, मदत कोणाची कशी झाली याची चर्चाच मुळी बाद होते व मग समोर साकार होते ते एक भेसूर काळेकुट्ट चित्र... निर्बल हिंदूंच्या बलवान मुस्लिमांकडून होणाऱ्या कत्तली व त्यांच्या देवळांचा विध्वंस. वस्तुतः हे एकप्रकारे इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण व हिंदूंचे मानसिक खच्चीकरण आहे. परंतु याची जाण निर्बुद्ध हिंदूंना कुठून व्हावी !
मात्र परंपरेने चालत आलेला इस्लामी दहशतवादाचा बागुलबुवा हिंदूंपुढे उभे करण्याचा वैदिक अजेंडा मेहेंदळे साळसूदपणे येथे राबवत पुढे जातात. इस्लामी आक्रमकांनी येथील देवळं फोडली, उध्वस्त केली. हे कोणीच नाकारत नाही. म्हणून त्याची व्हावी तशी वास्तविक चिकित्सा करायची संधी व कुवत असूनही मेहेंदळेंसारखी अभ्यासू व्यक्ती त्याकडे साफ दुर्लक्ष करते हे एक दुदैवच म्हणावे लागेल. असो.

आपल्या भाषणात मेहंदळे शिवाजी महाराजांनी कल्याणमधील मशिदीचे रूपांतर धान्याच्या कोठारात केले असे ईस्ट इंडिया कंपनीचा एक नोकर -- डॉक्टर फ्रायरच्या वृत्तांतधारे सांगतात. आता याच फ्रायरच्या शिवकालीन पत्रसारसंग्रह क्र. १९०२ मधील वृत्तांतानुसार महाराजांची ' सर्व प्रजा एकप्रकारे गुलामगिरीचा अनुभव घेत आहे... देसाई लोकांकडे जमिनी दुप्पट धाऱ्याने जबरदस्तीने देऊन त्याची वसुली करण्यासाठी त्यांचा छळ केला जातो.. कित्येक ब्राहमण शिवाजीच्या कैदेत .. मात्स्य - न्यायाने प्रजेची नागवण चालू असल्यामुळे करते पुरुषच नव्हे तर कुटुंबेच्या कुटुंबे बंधनात खितपत राहतात.. आदिलशाही अंमलात कर फार हलके होते व लोकही आबादानीत होते...' यावर मेहेंदळ्यांचे काय म्हणणे आहे ?  

इस्लामी आक्रमकांनी येथील मंदिरे पाडून मशिदी उभारल्या. वेळ पडताच हिंदूंनीही याचा सूड उगवायला मागे पुढे पाहिले नाही. उदाहरणार्थ, औरंगजेबाने काशी विश्वनाथचे देऊळ पाडून त्याजागी मशीद उभारली. पुढे अहिल्याबाई होळकरांनी या मशिदीशेजारीच काशी विश्वेश्वराचे मंदिर उभारले, हि माहिती मेहेंदळ्यांनी आपल्या भाषणात दिली आहे. परंतु.. स. १७४२ मध्ये मल्हारराव होळकर औरंगजेबाने उभारलेली काशी येथील मशीद पाडून त्याजागी मंदिर उभारण्याच्या प्रयत्नांत होता. परंतु स्थानिक पंच द्रविड ब्राह्मणांस जीवाचे भय पडल्याने त्यांनी होळकर आणि नानासाहेब पेशव्यास या कृत्यापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. काही राजकीय कारणांनी होळकरास तेथून निघून जावे लागल्याने हा मनसुबा प्रत्यक्षात येऊ शकला नाही हि गोष्ट मात्र ते सांगत नाहीत. याचे कारण काय असावे ? ( संदर्भ :-  रियासतकार सरदेसाई कृत मराठी रियासत खंड ४,  डॉ. मोतीचंद्र लिखित काशी का इतिहास  )
किंवा औरंगजेबाच्याच काळात स. १६८५ - ८८ दरम्यांनी जाटांनी केलेल्या उठावात सिकंदरा येथील अकबराच्या कबरीची लूट करत तेथील इमारतीची नासधूस केली होती. ( जदुनाथ सरकार लिखित औरंगजेब चरित्र ) या देशातील हिंदू केव्हाही निर्बल नव्हते. वेळ येताच ते आपल्यावरील अत्याचारांचा पुरेपूर सूड उगवत होते. परंतु या गोष्टी मेहेंदळेंना सांगाव्या वाटत नाहीत. का, त्यांना इतिहासातील हिंदूंचे मुस्लिमांकडून सतत मार खाणारा एक असहाय्य, दुर्बलांचा समूह असेच विकृत चित्र वर्तमानात मांडायचे आहे ?

जो मुद्दा मंदिर विध्वंसाचा तोच हिंदूंच्या गुलामी व धर्मांतराचा. मेहेंदळे  सोयीस्कर पुरावे रचत येथेही एक भेसूर चित्र उभं करतात. त्याकरता मुस्लिम शासकांच्या पदरी असलेल्या लेखकांनी ज्या नोंदी लिहून ठेवल्या, त्यांचा आधार घेतात. परंतु हि चित्राची एक बाजू झाली. या देशात मुसलमान कधीच बहुसंख्यांक नव्हते. मग अल्पसंख्यांक मुसलमान, बहुसंख्यांक हिंदूंना गुलाम कसे बनवू शकले ? हिंदूंची त्यावर काय प्रतिक्रिया होती ? कि त्यावेळी हिंदूंची स्वातंत्र्य तसेच धर्मभावना प्रखर नव्हती ? असे कित्येक प्रश्न मेहेंदळेंचे भाषण ऐकणाऱ्याच्या मनात उपस्थित होतात परंतु मेहेंदळेंना बहुधा ते पडले नसावेत.
उदाहरणार्थ, टिपूने हिंदूंचे धर्मांतर केले असे मेहेंदळे सांगतात. मग त्या टिपूच्या धार्मिक अत्याचारांचा हिंदूंचा नेता म्हणून छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी कोणत्या प्रकारे सूड उगवला ? निजामाच्या सहाय्याने पेशव्यांनी काढलेल्या टिपूवरील मोहिमेत किती बाटवलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात परत घेण्यात आले ? यासंबंधी पुणे तसे सातारा दरबारची सरदारांना काही आज्ञा होती का ? यासंबंधी मेहेंदळे चकार शब्द काढत नाहीत.

गुलामगिरीचा मुद्दा तर याहून सर्वस्वी वेगळा आहे. टोळीजीवनात पराभूत प्रतिपक्षातील स्त्री - पुरुषांना गुलाम बनवण्याची प्रथा होती. मनुष्यजीवन भटकंती कडून स्थिर जीवनाकडे जसजसे वळत गेले तसतशी या पद्धतीतही स्थित्यंतरे होत गेली. हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या अरब वा तुर्कांच्या तुलनेने येथील समाज हा स्थिर जीवन पद्धतीत बऱ्यापैकी रुळलेला होता. इस्लामपूर्व काळातील येथील गुलाम प्रथेचे स्वरूप अद्यापि अस्पष्ट असे असले तरी मध्ययुगीन काळात इथेही हिंदू सत्ताधीशांनी स्त्री - पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी करत पदरी बाळगल्याचे उल्लेख आहेत. विशेषतः पेशवाईत तर यांचे बाजार भरत, हि गोष्ट मेहेंदळेंनी बऱ्यापैकी दुर्लक्षित केलेली दिसते.

गुलामीच्या प्रथेकडेही आपणांस एकाच दृष्टिकोनातून बघता येत नाही. उदाहरणार्थ, मुस्लिमांनी जे गुलाम पदरी बाळगले, ज्यांचे धर्मांतर केले ते पुढे स्वकर्तृत्वाच्या बळावर मोठमोठ्या पदांवर विराजमान झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. मलिक काफूर, खुश्रुखान, कुतुबुद्दीन ऐबक इ.
तुलनात्मकदृष्ट्या पाहता मुस्लिमांच्या पदरी असलेल्या गुलामांपेक्षा मध्ययुगीन मराठी सत्ताधीशांकडील गुलामांचे -- ज्यांना बटीक, कुणबिणी संज्ञा होती -- जीवन बऱ्यापैकी सुसह्य असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. गुलामांना मालमत्ता समजले जात असल्याने कर्जासाठी त्यांना तारण ठेवणे, भाड्याने देणे, मालमत्तेच्या विभागणीवेळी त्यांचेही समान वाटप करून घेणे असे प्रकार चालत. कित्येकदा गुलाम स्वतःच्या बदली पैसे वा दुसरी व्यक्ती गुलाम म्हणून देऊन स्वतःची सुटका करून घेत असे. 
( सन्दर्भ ग्रंथ :- मराठ्यांचा इतिहास खंड २, संपादक :- अ. रा. कुलकर्णी, ग. ह. खरे )  

लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे शिवराज्याभिषेक दिना निमित्त मेहेंदळ्यानी केलेले भाषण म्हणजे त्यांच्याच दि. १० जुलै २०१५ च्या भाषणाची आवृत्ती असल्याने त्या जुन्या भाषणात मेहेंदळ्यांनी या गुलामां संदर्भात काही संदर्भ दिले आहेत, तेच येथे संक्षेपात देतो. त्यानुसार महाराजांच्या पदरी असलेला सिद्दी हिलाल हा खेळोजी भोसल्याचा क्रीतपुत्र. म्हणजेच विकत घेतलेला गुलाम, परंतु मुलाप्रमाणे वाढवलेला. हीच स्थिती अफझल प्रसंगी महाराजांच्या दहा अंगरक्षकांत ज्याचा समावेश होतो, त्या सिद्दी इब्राहिमचीही असल्याचे खुद्द मेहेंदळ्यांनी नमूद केलं आहे. म्हणजे हिंदू देखील मुस्लिम गुलाम विकत घेऊन पाळू शकत होते. हेच यातून ध्वनित होते.

केवळ मेहेंदळेंच्या व्याख्यानाचा संदर्भ घेतला तर मुस्लिमांच्या गुलाम प्रथेप्रमाणेच त्यांनी ख्रिस्त्यांच्या गुलामगिरी प्रथेचा उल्लेख केलेला नाही.
डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग १ मधील प्रकरण २६, पृष्ठ क्र. १९९ वर डच आणि महाराजांमधील तहाची कलमे दिली असून त्यात गुलामांचा व्यापार करू नये अशी एक अट आहे.
पोर्तुगीजांनी गैर ख्रिस्त्यांचा केलेला धर्मच्छल तर मशहूर आहे. परंतु मेहेंदळ्यांना त्याचाही अलगदपणे विसर पडल्याचे दिसून येते.

दि. ३० नोव्हेंबर १६६७ चे इंग्रजांचे एक पत्र उपलब्ध आहे, जे गोव्याहून पाठवण्यात आले होते. त्यानुसार गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने ख्रिस्त्यांखेरीज इतर धर्मियांना हद्दपारीची आदेश दिला होता, त्यामुळे क्रुद्ध होऊन महाराजांनी बारदेशवर स्वारी केली. यावेळी त्यांनी चार पाद्रींना -- ज्यांनी स्वधर्मीयांखेरीज इतरांच्या प्राणनाशाची सल्ला दिला होता -- कैद करून त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगितले असता, त्यांनी नकार दिल्याने त्यांचा शिरच्छेद केला. पोर्तुगीज व्हाइसरॉयला हि बातमी समजताच त्याने घाबरून जाऊन आपला आदेश रद्द केला.  
( सन्दर्भ :- शिवकालीन पत्र सार संग्रह,खंड १, ले. क्र. ११८६ )   

यामध्ये अधिकची भर स. शं. देसाई लिखित पोर्तुगीज - मराठा संबंध प्रकरण ६ नुसार अशी कि :- स. १६६७ मध्ये महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेशवर स्वारी केली त्यावेळी त्यांनी स्त्री - पुरुष, मुले यांना कैद केले होते. ज्यांची पुढे स. १६६७ डिसेंबर मध्ये पोर्तुगीज - शिवाजी यांच्यात घडून आलेल्या तहानव्ये सुटका करण्यात आली.
पोर्तुगीजांचे उदाहरण अशासाठी महत्त्वाचे आहे कि, महाराजांचा स्त्रिया व मुले यांना कैद न करण्याचा कटाक्ष प्रसिद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर हि घटना विसंगत दिसत असली तरी मला त्यात अजिबात आश्चर्य वाटत नाही. शत्रूला जशास तसे उत्तर दिल्याखेरीज त्यास दहशत बसत नाही हे कित्येकदा व्यवहारात अनुभवास येते. मात्र या धर्तीवर महाराजांनी आदिल, मोगल बादशाहीत प्रजा कसलाही भेद न करता कैद केल्याचे उदाहरण मेहेंदळे देतील का ?

छत्रपतींचेच धार्मिक धोरण पुढे पेशव्यांनी चालवले असे आपल्या भाषणात नमूद करताना मेहेंदळे, पेशव्यांनी अमुक एक ठिकाणची मशीद पाडून मंदिर उभारले वगैरे उदाहरणे देतात. याच पेशवाईतील एक उदाहरण मी येथे देत आहे. थो. बाजीराव पेशव्याच्या काळात जी वसईची मोहीम घडून आली, त्यामागे पोर्तुगीजांकडून होणार हिंदूंचा धार्मिक छळ, पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशात हिंदूंना नसलेलं धार्मिक स्वातंत्र्य हे एक कारण होतं.
या मोहिमेत वसई आणि गोवा असे दोन आघाड्यांवरून मराठी सरदारंनी पोर्तुगीज मुलखावर आक्रमण केले. पैकी वसईचा मोर्चा खुद्द चिमाजीआपाने सांभाळत तो किल्ला काबीज केला तर गोव्याकडे व्यंकटराव घोरपडे हा पेशव्यांचा आप्त व सरदार चालून गेला. आपला पराभव दृष्टीस पडताच पोर्तुगीजांनी या व्यंकटराव घोरपडे, दादाजी भावे  तसेच छ. शाहूचा मंत्री नारोराम यांच्यामार्फ़त शाहू सोबत तहाची वाटाघाट चालवली. तसेच आपल्याला अधिकाधिक अनुकूल तह घडून यावा म्हणून भावे, घोरपडे तसेच नारोराम यांना त्यांनी लांच देऊ केली. यामुळे जेव्हा घोरपडे, भाव्याने पोर्तुगीजांसोबत केलेल्या तहाच्या वाटाघाटीत पोर्तुगीज इन्क्विजीशनच्या अधिकाऱ्यांनी हिंदूंच्या वाट्याला जाऊ नये, पोर्तुगीज अंमलाखालील हिंदूंकडून शेंडी कर घेऊ नये व हिंदूंना पूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यावे या अटींबाबतचा आग्रह सोडून दिला.
वस्तुतः बाजीरावाची पोर्तुगीज अंमलात हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा होती परंतु त्याच्या मृत्यूने ती अधुरीच राहिली. पश्चात चिमाजी आपा वगैरेही त्याबद्दल विशेष आग्रही राहिले नाहीत.
( सन्दर्भ ग्रंथ :- पोर्तुगीज मराठा संबंध - स. शं. देसाई )   

छ. शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य उभारलं ते मुख्यत्वे मुस्लिम सत्ताधीशांविरुद्ध लढून, आणि हि बाब निर्विवाद आहे. परंतु ती राजकीय स्थिती होती. तिला कसलाही धार्मिक आधार नव्हता. किंबहुना राजकारणात धर्म हि सोयीस्कर परंतु प्रभावीपणे वापरता येणारी बाब / शस्त्र असल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. तसेच शिवरायांनी ज्याप्रमाणे आदिल, मोगल यांच्याशी जसा झगडा केला तसाच तो जावळीचे मोरे, पालवणचे दळवी, शृंगारपूरचे शिर्के, वाडीचे सावंत, दक्षिण दिग्विजयात कित्येक हिंदू पाळेगार - संस्थानिक तसेच सावत्र बंधू व्यंकोजी सोबतही त्यांचे संघर्ष घडून आले.
या संघर्षांची वासलात कोणत्या लेबलाखाली लावायची ? केवळ स्वातंत्र्य म्हणावं तर मग प्रत्येकाच्या स्वातंत्र्य विषयक कल्पना, भावना वेगवेगळ्या असू शकतात. जशी काल परवा पर्यंत संघ मुख्यालयावर तिरंगा न फडकावण्याची संघाची भावना होती. टीका झाली परंतु त्यांनी आपलं स्वातंत्र्य जपलेच ना ?
शिवरायांचा दक्षिण दिग्विजय मोहिमेत सावत्र बंधू व्यंकोजी सोबत संघर्ष घडून आला. यासंदर्भात महाराजांनी व्यंकोजीला पाठवलेल्या पत्रात ' मी तुर्कांना मारतो. तुझ्या सैन्यात तर सगळे तुर्कच आहेत. तुझा विजय कसा होईल ' अशा आशयाचा उल्लेख असल्याचे मेहेंदळे, महाराजांच्या सैन्यात फारसे मुसलमान नव्हते हे दर्शवण्यासाठी सांगतात. मग याच तुर्कांनी स्थापित विजापूरची आदिलशाही मोगलांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सैन्य रवाना केल्याचे, खुद्द महाराजांनीच व्यंकोजीस पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे, त्याची वाट काय ? ( पसासं ले. क्र. २२३६ )

खेरीज मालोजी घोरपड्यास लिहिलेल्या पत्रात महाराजांनी त्यांस विजापूरची नोकरी सोडून आपल्या वा कुतुबशाहीच्या चाकरीस येण्यास सांगताना पठाणांची साथ सोडण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे कुतुबशाही देखील तुर्क वंशीयांचीच होती. यावरून तुर्क म्हणजे मुसलमान असा अर्थ घ्यायचा कि वांशिक अर्थाने त्याकडे पाहायचे हे मेहेंदळेंनीच सांगावे.   
( मराठ्यांचा इतिहास साधन परिचय :- संपादक - अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक,  ले. क्र. ४९ )    

शिवचरित्राचा विषय चालला असता त्यात पेशवाईचा उल्लेख होणे क्रमप्राप्त आहे. आधी उल्लेखल्याप्रमाणे नानासाहेब पेशवा व त्याच्या  सरदारांनी काही मशिदीचे मंदिरात रूपांतर केल्याचे मेहेंदळ्यांनी साधार सांगितले आहे. त्याचप्रमाणे नानासाहेब पेशव्याच्या एका पत्रात तो स्वतःला ' आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य ' म्हणवून घेत असल्याचाही त्यांनी उल्लेख केलाय व तो खरा आहे. परंतु शिवाजीचा स्वतः शिष्य म्हणवून घेणाऱ्या नानासाहेबाने मशिदीचे मंदिरात रूपांतर करणे एवढीच काही हिंदूधर्म संरक्षण, संवर्धनाची कामगिरी पार पाडली नाही.

त्याने कित्येकदा संधी येऊन मुस्लिम निजामाला दक्षिणेतून समूळ उखडून काढले नाही. दक्षिणेत -- तत्कालीन संज्ञेनुसार कर्नाटकात वारंवार स्वाऱ्या करून त्याने सोदे, बिदनूर, म्हैसुर, कनकगिरी, चित्रदुर्ग, सुरापूर सारखी हिंदूंची संस्थाने रगडून काढत सावनूरकर, कडपा, कर्नुल, अर्काटकर सारखी मुस्लिम संस्थाने कायम राखली. रघुजी भोसले बंगालमधून अलिवर्दीखानास उखडून काढण्याच्या प्रयत्नात असता महाराजांचा शिष्य म्हणवून घेणारा नानासाहेब पेशवा अलिवर्दीच्या बचावासाठी रघुजीवर चालून गेला. मेहेंदळ्यांच्या लेखी बहुधा रघुजी मुसलमान असावा. पेशव्यांचा दिवाण महादोबा पुरंदरे दिल्लीस महादेवभट हिंगणे -- पेशव्यांचे वकील -- यांस लिहितात कि सासवडच्या देशपांडेगिरीच्या वतनाची बादशाही सनद दिल्लीहून पाठवावी. खुद्द पेशवे बादशहाकडून माळव्याच्या सुभेदाराच्या सनदा घेण्यासाठी आर्जवे करताना दिसतात. यासंबंधी भरपूर विवेचन त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या ' निजाम - पेशवे संबंध अठरावे शतक ' ग्रंथांत भरपूर केली असून जिज्ञासूंनी अवश्य त्याचे वाचन करावे.

संभाषणाच्या ओघात मेहेंदळ्यांनी पुढील आशयाचा एक मुद्दा मांडला आहे कि, शहाजी महाराजांपासून स्वतंत्र होत शिवाजी महाराज राज्यकारभार करू लागल्यापासून मुस्लिम व्यक्तीस त्यांनी आपल्या नोकरीत -- विशेषतः लष्करी सेवेत घेतले नाही. महाराजांच्या सेवेत किती मुसलमान होते, नव्हते हे आपण आगामी पुस्तकात पुराव्यानिशी मांडणार असल्याचेही ते नमूद करतात. मला एक समजत नाही. इथे स. १७६१ मध्ये पानिपतावर गेलेल्या मराठी सैन्याची विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत स. १६५० - ८० दरम्यानची शिवरायांच्या सेवेतील हिंदू - मुसलमान सेवकांच्या याद्या मेहेंदळ्यांना कोठून प्राप्त झाल्या बरे ? कि महाराजांनी त्यांची रिक्रुटमेंट ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती ?

वर्तमान काळात आपल्या देशातील केंद्र सत्ता हाती आलेला वैदिक संघ आपल्या वैदिक धर्माचा हिंदुत्वाच्या नावाखाली छुपा प्रचार करण्याची एकही संधी सोडत नाही मग मेहेंदळ्यांनी जो कालखंड आपल्या व्याख्यानासाठी निवडलाय, त्याकाळी धर्म व राजसत्तेची फारकत असणे शक्यच नव्हते. राज्यकर्ते आपल्या धर्माचा छुपा वा उघड प्रचार, प्रसार करतच होते. हिंदूंनी मुस्लिम व्हावे याकरता औरंगजेबाने अनेक कृल्पत्या केल्या. परंतु टिपूवर जो सामूहिक सक्तीच्या धर्मांतराचा आरोप आहे, तसा त्याच्यावर करता येत नाही. दुसरी गोष्ट अशी कि, औरंगजेबाच्या या धर्मप्रसरास, बाटलेल्या हिंदूंना परत स्वधर्मी घेत शिवाजी महाराजांनी प्रत्युत्तर दिले. परंतु पुढे टिपूने दक्षिणेत जे हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले, त्यावेळी पेशवा व त्याच्या सरदारांनी काय केले ? दक्षिणेतील लहान मोठ्या हिंदू संस्थानिकांशी एकी करून त्यांनी टिपूला का उखडून काढले नाही ? कि त्यांच्या धार्मिक भावना तितक्या प्रखर नव्हत्या ?
बरं, हा प्रश्न जर मेहेंदळेंना अडचणीचा जात असेल तर त्यांनी किमान एका प्रश्नाचं मुद्देसूद, साधार व ऐतिहासिक सत्याशी प्रामाणिक राहून उत्तर द्यावं कि, छत्रपती शिवरायांनी दोनवेळा राज्याभिषेक का केला ? त्यातही प्रथम वैदिक आणि नंतर तांत्रिक वा हिंदू पद्धतीने ?

आपल्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात मेहेंदळे म्हणतात कि, मराठ्यांच्या साम्रज्याचा.. हिंदू साम्राज्याचा परिणाम म्हणजे जिझिया रद्द झाला, मूर्तिभंजन रद्द झाले.
यापैकी जिझिया कर मुहम्मदशहाच्या कारकिर्दीत स. १७२० मध्ये रद्द करण्यात आला. या कामी जयपूरचा सवाई जयसिंग, तत्कालीन अयोध्या सुभेदार राजा गिरीधर बहादूर यांनी बादशहाकडे रदबदली केली. पुढे स. १७२३ मध्ये निजामाने या कराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. नंतर स. १७२४ - २५ मध्ये नाममात्र तो बसवण्यात आला तरी त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही वा त्याचा उल्लेखही नंतरच्या इतिहासात आढळत नाही. 
( संदर्भ ग्रंथ :- वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित LATER MUGHALS ग्रंथाचा मराठी अनुवाद - उत्तरकालीन मुघल )
मेहेंदळ्यांचा संदर्भ घेतला तर यावेळी मराठी राज्य अद्यापि दक्षिणेत स्थिर झालं नव्हतं. तेव्हा हा कर रद्द होण्याचं कारण मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे मराठा वा हिंदू साम्राज्य नसून तत्कालीन राजकीय स्थिती असल्याचे उपलब्ध पुराव्यावरून दिसून येते.

मंदिर - मूर्ती विध्वंस बाबत म्हणायचं तर मेहेंदळेंना पानिपतोत्तर निजामाच्या पुणे स्वारीचे विस्मरण कसे झाले ? शेजारी मराठ्यांचे बलवान हिंदू साम्राज्य असूनही टिपूने दक्षिणेत अत्याचार कसे केले ? स. १७७६ मध्ये पेशव्यांचा करवीरकर छ्त्रपतींशी झगडा झाला. त्यावेळी पेशव्याचा सरदार कोन्हेरराव पटवर्धनांच्या सैन्याने शृंगेरीकर शंकराचार्याच्या मठाची लूट केली आणि या घटनेनंतर याच मठाला टिपू सुलतानाने पुष्कळ देणग्या दिल्या त्याचे काय ? मेहेंदळ्यांच्या पद्धतीने जर फक्त विशिष्ट धर्मियांचेच अत्याचार - अनाचार निवडून समाजमन बनवायचे झाल्यास अशा उदाहरणांची उपलब्ध इतिहासात अजिबात कमतरता नाही.

उदाहरणार्थ, मुस्लिम शासक बऱ्याचदा स्वधर्मीयांना गुन्हेगारी प्रकरणात उदार वा दयाळूपणे वागवत मात्र त्याचवेळी परधर्मियांना कठोर शिक्षा करत यासंबंधीची भरपूर उदाहरणे उपलब्ध आहेत तसेच पेशवाईत एका गुन्ह्याबद्दल ब्राह्मण व ब्राह्मणेतरांस वेगवेगळा न्याय दिल्याचेही ढीगभर दाखले आहेत. उद्या हेच दाखले घेऊन एखाद्याने ब्राह्मणांकडून ब्राह्मणेतरांवर होणारे अत्याचार म्हणून ओरड केली तर ती मेहेंदळे प्रभूतींना सहन होईल ?

 वस्तुतः शिवराज्याभिषेक दिना निमित्त मेहेंदळेंना एका चांगल्या विषयावर.. शिवचरित्राच्या अज्ञात, दुर्मिळ अशा बाजूंवर बोलण्याची चांगली संधी लाभली होती. उदाहरणार्थ, स. १६८४ मध्ये कारवारात एका मुसलमानाने गाय मारली म्हणून संभाजीने त्या मुसलमानास जाहीररीत्या फाशी दिल्याचे मेहेंदळे साधार सांगतात. मग हाच संभाजी अवघ्या चार पाच वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांवर रुसून औरंगजेबाच्या नोकरीत का गेला होता ? कि त्यामागे खुद्द शिवाजी महाराजांचे काही अज्ञात राजकारण होते ? यावर प्रकाश टाकणारे एखादे अभ्यासू व्याख्यान मेहेंदळे देऊ शकत होते.

त्यांना केवळ इस्लामी आक्रमण वा इस्लाम धर्म याविषयी बोलायचे होते तर त्याकरताही चांगले मुद्दे त्यांना उपलब्ध होते. उदाहरणार्थ येथील इस्लामी शासकांचे व्यक्तिगत व सार्वजनिक -- शासक व प्रजा या नात्याने -- आचरण कितपत इस्लामला धरून होते ? त्यात काही विरोधाभास होता का ? कितपत त्यांनी महंमद पैगंबराच्या आदर्शवादी वर्तनाचे पालन केले ? इ. परंतु मेहेंदळ्यांनी या सरळ मार्गाने जाण्याऐवजी वाकडी वाट निवडत येथील इस्लामी शासकांचे बाह्य आचरण.. लोकांशी ज्याचा संबंध येतो त्याबाबतीतले आचरण कितपत इस्लामला धरून होते ? कितपत मोहम्मद पैगंबराचा आदर्श त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला होता ? हा इतिहासाच्या विकृतीकरणाचा मार्ग निवडत हिंदुस्थानावरील इस्लामी आक्रमकांची वस्तुनिष्ठ चर्चा करण्याची अमौलिक संधी दवडली.

किंवा त्यांना जर इस्लामवरच भाषण द्यायचे होते तर महंमद पैगंबरचा कुराणातील इस्लाम व हिंदुस्थानावर स्वाऱ्या करणाऱ्या तुर्क - अफगाणांचा इस्लामांतील साम्य - भेद याचाही ते तुलनात्मक आढावा घेऊ शकत होते. इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी तुर्क - अफगाणांचे आपापले टोळीधर्म होते व जरी त्यांनी इस्लाम स्वीकारला असला तरी त्यावर आपले संस्कार केले होते. अगदी हिंदुस्थानात देखील ज्या गैरमुस्लिमांनी इस्लाम स्वीकारला त्यांनी आपापल्या मूळ धर्माचे आचरण अंशतः चालूच ठेवले. पॅन इस्लाम किंवा इस्लामी मूलतत्ववाद उदयास तर याच कारणांमुळे आला. फार लांब कशाला.. इथल्या मूळच्या हिंदूंनी जेव्हा वैदिक धर्म स्वीकारला तेव्हा मूळ वैदिक धर्माचा भाग नसलेली परंतु हिंदूंमध्ये प्रचलित असलेली मूर्तीपूजा धर्मांतरानंतरही कायम राखली. अगदी पुण्याचे पेशवे देखील धर्मांतरितच. यामुळेच ते वैदिकबाह्य देवतांची -- गणपती, शंकर इ. मूर्तिपूजा करत असल्याचे उल्लेख आपणांस कागदपत्रांत आढळतात. असो.

मेहेंदळेंनी आपल्या भाषणात कुराणातील जिझिया संबंधी एकमेव आयत व तिच्या अर्थाची चर्चा केली आहे. त्यान्व्ये जे ग्रंथधारक अल्लाह, कयामत, अल्लाहचा प्रेषित महंमदवर विश्वास ठेवत नाहीत ;अल्लाह व त्याच्या प्रेषिताने जे निषिद्ध ठरवले ते निषिद्ध मानत नाहीत तसेच खऱ्या धर्मावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासोबत... जोवर ते स्वाथावून नम्र होऊन जिझिया देत नाहीत तोपर्यंत युद्ध करण्याची आज्ञा आहे. याचे विश्लेषण मेहेंदळेंनी योग्य केलं आहे परंतु हिंदूंच्या बाबत त्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. मूळ कुराणात ग्रंथधारकांखेरीज इतरांसाठी -- ग्रंथधारक म्हणजे ज्यू, ख्रिस्ती -- जिझियाची आज्ञा नाही हे स्वतः मेहेंदळेच सांगतात व इस्लामचा एक भाष्यकार अबू हनीफाच्या मते ग्रंथधारकांखेरीज मुर्तीपुजकांचाही यात समावेश करण्यास हरकत नसल्याचेही नमूद करतात. 
 वास्तविक या मुद्द्यावरून मेहेंदळे कुराण, पैगंबर यांची चिकित्सक चर्चा करू शकत होते. कारण कुराण हा ईश्वर निर्मित ग्रंथ मानला तर अबू हनीफाची हि दुरुस्ती त्या ग्रंथास थेट मनुष्यनिर्मित ठरवते व इथेच महंमद पैगंबर आणि इस्लामचे अलौकिकत्व संपुष्टात येऊ शकतं. परंतु हे सर्व सोडून मेहेंदळेंना अवदसा आठवली ती कत्तली, धर्मांतरे, बलात्कार व पैगंबराचे शरीरसंबंध यांच्या विकृत वर्णनाची !

भाषणाच्या अंती मेहेंदळे म्हणतात कि, शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे उद्दिष्ट म्हणजे हिंदूंचे रक्षण, त्यांचा उत्कर्ष व त्याकरता इस्लामी राजवटींचा नाश. मेहेंदळे हेही नमूद करतात कि लोकं ते हिंदुत्व काढून घेण्यासाठी रयतेचा राजा वगैरे बरच काही करतात त्यातला एक हेतू त्यातलं हिंदुत्व काढून घेणे हा असतो. आणि या व्याख्यानाचा एकप्रकारे समारोप त्यांनी कवी भूषणच्या  -- अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी या ओळींनी केला आहे.
म्हणजे व्याख्यानाच्या सुरवातीला यशवन्तराव चव्हाणांच्या भाषणाचा संदर्भ व अखेरीस भूषणच्या या काव्यमय ओळी. यातून मेहेंदळेंना शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदू धर्मवीर आणि मुस्लिमांचे द्वेष्टे होते असेच चित्र उभं करायचं आहे.
कवी भूषण हा उत्तर हिंदुस्थानचा रहिवासी. याचे जन्मगाव मला उपलब्ध होऊ शकले नाही परंतु हा मुस्लिम शासित प्रदेशातून दक्षिणेत आला होता. उत्तर आणि दक्षिणेतील मुस्लिम शासकांच्या धार्मिक धोरणांत बऱ्यापैकी फरक होता. इथे मुसलमाना अत्यल्प असल्याने बहुसंख्यांक हिंदूंच्या मनाविरुद्ध जाणेही त्यांना शक्य नव्हते. यामुळेच त्यांच्या शाह्या इथे कायम झाल्या व त्यांचे संरक्षक हिंदू बनले. तात्पर्य, भूषणने आपल्या जन्मभागात अनुभवलेली स्थिती व दक्षिणेतील परिस्थिती यांचा मेळ घालून एकप्रकारे शिवराय प्रशस्तीपर छन्द रचला आहे. त्याला शब्दशः प्रमाण मानत महत्त्व देणे मला चुकीचे वाटते. 

यासंदर्भात मला श्रीराम तिवारी यांच्या ' औरंगजेब कालीन मराठा अमीर - वर्ग की भूमिका ( १६५८ - १७०७ ई. ) ' या शोध प्रबंधाचा उल्लेख करणे आवश्यक वाटते. प्रस्तुत शोधकर्त्याने -- श्रीराम तिवारींनी सर्व संदर्भ साधने अभ्यासून आपला निष्कर्ष नोंदवला आहे कि, इतर औरंगजेबपूर्व मोगल बादशहांच्या तुलनेने औरंगजेबाच्या कारकिर्दीत मराठा मनसबदारांची संख्या सर्वाधिक होती. या प्रबंधात त्यांनी मराठा मनसबदारांची यादीही दिली आहे.
एकीकडे मेहेंदळे सहित बव्हंशी इतिहासकार औरंगजेबाचे हिंदू द्वेष्टा असे चित्र रंगवतात तर त्याची दुसरी बाजू श्रीराम तिवारी आपल्यासमोर अशी पेश करतात. यातील खरे चित्र कोणते मानायचे ? विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन आपल्याला हवी तेवढीच आणि तितकीच बाजू मांडणाऱ्या मेहेंदळे प्रभूती इतिहासशास्त्रास लागलेल्या किडीचे कि ऐतिहासिक साधनांधारे इतिहासाची कृष्ण - धवल अशा सर्वच बाजू मांडणाऱ्या इतिहास अभ्यासकांचे ? निर्णय तुमच्या हाती आहे. काल्पनिक इतिहासात रममाण व्हाल तर तुम्ही आपला केवळ वर्तमान वा भूतकाळच नव्हे तर भविष्यकाळही बरबाद करून बसाल !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: