शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

प्रस्तावित मल्हार चरित्र कच्चा खर्डा ( भाग ३ )

मल्हारराव होळकर चरित्रातील वादस्थळे 


१) जयपूरचं वारसा युद्ध २) कुंभेरीचा वेढा ३) जयाप्पाचा खून ४) अब्दालीच्या सामन्यास कुचराई ५) नजीबखानाचा बचाव ६) पानिपत युद्धातून पलायन ७) राक्षसभुवनच्या मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी जहागीर मागणी 


कसलीही राजकीय पूर्वपरंपरा नसताना केवळ स्वकर्तुत्वाच्या बळावर अठराव्या शतकात जी सरदार - संस्थानिक घराणी उदयास आली त्यांपैकी एक म्हणजे होळकर घराणे !


या घराण्याचा संस्थापक -- मल्हारराव असून याचा जन्म दि. १६ मार्च १६९३ रोजी पुण्याजवळील होळ मुरूम गावी झाला. ( १ ) मल्हाररावाच्या वडिलांचे नाव खंडूजी वीरकर असून ते होळ गावी चौगुल्याच्या वतनावर कार्यरत होते. ( क ) 

मल्हारराव तीन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पश्चात भाऊबंदांनी वतनावरून त्रास दिल्याने लहानग्या मल्हारीची आई जिवाई, त्यास घेऊन आपल्या भावाच्या आश्रयार्थ परगणे सुलतानपूर येथील तळोदे गावी गेली. 

मल्हाररावचा मामा, भोजराज बारगळ त्यावेळी कदम बांड्याकडे चाकरीस होता. ( ख )


मल्हारराव होळकरच्या उपलब्ध कैफियत, चरित्रांवरून असे दिसते की, आरंभी मल्हारराव आपल्या मामाच्या घरी मेंढरं राखण्याचे काम करी. होळकरांच्या कैफियतीत एका आख्यायिकेनुसार, जी अत्रे, लिखित मल्हारराव होळकर चरित्रात बऱ्यापैकी ग्राह्य धरली गेली आहे, तिचा सारांश पुढीलप्रमाणे :- मल्हार नेहमीप्रमाणे मेंढरं घेऊन रानात गेला असता एका झाडाखाली झोपला होता. त्यावेळी एक नाग त्याच्या डोईवर  धरून उभा होता. मल्हारची आई दुपारी जेवण घेऊन आली असता तिला हे भयंकर दृश्य दिसले. त्यानंतर यासंबंधी ब्राह्मण ज्योतिषास विचारले असता हा मुलगा पृथ्वीपती होईल असे त्याने सांगितले. तेव्हा मामाने त्यास मेंढरं राखायचे सोडून घोड्याचे काम दिले व पुढे आपल्या पथकात सामील करून घेतले. 

या कथेचा मतीथार्थ इतकाच की, मल्हारीची धाडसी स्वभाव पाहून व घरची जमियत बळकट असावी म्हणून भोजराजने त्यास योग्य वयात सैनिकी पेशाचे शिक्षण देऊन आपल्या पथकात भरती करून घेतले. (२)

बारगळांसोबत लहानसहान मोहिमांत सहभाग घेत मल्हाररावाने ज्याप्रमाणे युद्धनीतीचे थेट धडे गिरवले त्याचप्रमाणे आपल्या शौर्याची चमक दाखवत स्वतंत्रपणे स्वारांची एक छोटीशी तुकडी बनवली. पुढे याच घोडदळ तुकडीसह त्याने शाहूच्या प्रधान - सरदारांनी केलेल्या दिल्ली मोहिमेत सहभाग घेतला होता. 


शाहूच्या सरदारांची दिल्ली स्वारी :- उपलब्ध माहितीनुसार तुर्कांच्या नजरकैदेत असताना संभाजीपुत्र द्वितीय शिवाजी उर्फ शाहू यांस औरंगजेब बादशहाने ' राजा ' ही उपाधी व सात हजार मनसबदारी बहाल केली होती. ( ३ )

दि. २ मार्च स. १७००  रोजी राजारामाचा मृत्यू झाला. पश्चात ताराबाईने आपला पुत्र तृतीय शिवाजी यांस गादीवर बसवत औरंगजेबाकडे तहाची बोलणी आरंभली.

त्यानुसार दि. १२ मार्च १७०० रोजी ताराबाईच्या वतीने बादशहास सादर केलेल्या अर्जातील कलमे पुढीलप्रमाणे :- ' राजारामाच्या औरस पुत्रांना सात हजार जात व सात हजार स्वार अशा मनसबी नव्याने मिळाव्या. दक्षिणची देशमुखी मिळावी. हुजुरात हजर राहण्याची माफी मिळावी. तर पाच हजार स्वारांनिशी दक्षिणच्या सुभेदारांच्या बरोबर राहून बादशाही कामगिरी बजावू. सातारा, पन्हाळगड, चंदन वंदन, परळी, नांदगड इ. सात किल्ले बादशहांच्या ताब्यात देऊ. ' औरंगजेबाने हे अमान्य करत प्रथम सर्व किल्ले देण्याची मागणी करत नंतर मनसब, देशमुखी देण्यात येईल असा अर्जावर निकाल दिल्याने तहाचा प्रयत्न फिस्कटला. ( ४ ) ( ग ) 

पुढे औरंगजेबाचा मृत्यू होऊन त्याच्या मुलांत वारसायुद्ध पेटले. त्यात शहजादा मुअज्जमची सरशी होऊन तो बहादूरशहा किताब धारण करून तख्तावर बसला. 


मधल्या काळात शाहू तुर्कांच्या नजरकैदेतून सुटून राज्यावर मालकीहक्क सांगू लागताच ताराबाईने त्यास धुडकावून लावले. परिणामी उभयपक्षांत वारसाहक्काची लढाई जुंपून भोसल्यांची अनुक्रमे शाहू स्थापित सातारा, ताराबाई स्थापित कोल्हापूर अशी दोन राज्यं निर्माण झाली. 

पुढे स. १७०८ - ०९ मध्ये बहादूरशहा दख्खनमध्ये आल्यावर त्याच्याकडे शाहू व ताराबाईचे वकील गेले. पैकी ताराबाईने बादशहाकडे दक्षिणच्या सरदेशमुखी हक्कांची मागणी केली तर शाहूने चौथाई, सरदेशमुखी हक्कांची मागणी करत बदल्यात १५ हजार फौज औरंगाबादेस सुभेदाराच्या सेवेत ठेवण्याची तयारी दर्शवली. ( ५ ) ( घ ) 


बहादूरशहाने याप्रकरणी स्पष्ट निकाल न करता उभयतांनी आपसांत निवाडा करण्याची सूचना केली. परिणामी शाहू - ताराबाई वारसा संघर्ष स. १७१९ च्या मार्चपर्यंत चालूच राहिला.

दरम्यान स. १७१४ च्या ऑगस्टमध्ये कोल्हापुरास राज्यक्रांती होऊन ताराबाई व तिच्या मुलास, राजारामाच्या द्वितीय पत्नीने -- राजसबाईने कैद करत आपल्या मुलाला -- दुसरा संभाजी यांस गादीवर बसवले. मात्र यामुळे सातारकरांसोबत चालू असलेल्या संघर्षात कसलाही खीळ पडला नाही. मात्र स. १७१८-१९ मध्ये या संघर्षास संपुष्टात आणणारी एक क्रांतिकारी घटना घडून आली. जिचा उल्लेख करण्यापूर्वी आपणांस प्रथम दिल्ली दरबारातील उमरावांचे प्रमुख गट व त्यांचे आपसांतील हितसंबंध यांची थोडक्यात चर्चा करणे भाग आहे. कारण त्याशिवाय दख्खन किंबहुना हिंदुस्थानच्या राजकारणास कलाटणी देणाऱ्या सातारकर - दिल्ली दरबार दरम्यान घडलेल्या चौथाई, सरदेशमुखी हक्कांच्या तहाची चर्चा करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे मल्हारराव होळकराच्या पुढील काळातील राजकारणाचा संदर्भही लक्षात येणार नाही. 


दिल्लीच्या बादशहा सोबत सातारकर छत्रपतींचा मांडलिकी करार :- महंमद पैगंबर स्थापित इस्लाम विश्वबंधुत्वाचा नारा देत असला तरी महंमदच्या मृत्यूनंतर लगेचच शिया - सुन्नी पंथांच्या निर्मितीने त्या विश्वबंधुत्वास, एकात्मतेला तडा गेला. त्यात आणखी भर पडली महंमद पैगंबर सोबत रक्तसंबंध दर्शवणाऱ्या कुरैश, सय्यद वगैरे घराण्यांची. त्यांच्या वंशजांची. यामुळे इस्लामची त्याच्या जन्मभूमीतच विविध शकले होण्यास सुरुवात झाली. 

इस्लामच्या जन्मभूमीत इस्लामी बंधुभावास नख लागले असले तरी बाह्य जगतात इस्लामचा प्रसार वेगाने झाला. पाहता पाहता मध्य आशिया, दक्षिण आफ्रिका ओलांडून इस्लाम पश्चिमेस युरोपखंडात शिरून स्पेन - पोर्तुगालपर्यंत पोहोचला तर पूर्वेकडे हिंदुस्थान - चीन पर्यंत त्याची धडक बसली. 

इस्लामचा बाह्य जगतात होणार प्रसार भेदमुक्त नव्हता. इस्लाममध्ये सामील होणाऱ्यांचे भाषिक, वांशिक, प्रादेशिक तत्वावर विभाजन होत होते.


हिंदुस्थानात जे परदेशी मुसलमान सत्ता स्थापन करण्यास, नोकरी करण्याच्या उद्देशाने आले त्यामध्ये प्रामुख्याने इराणी व तुराणी तुर्कांचा मोठा भरणा होता. ( च ) 

खेरीज अफगाणांचीही मोठी संख्या होती. दख्खनमध्ये इराणी, तुराणी व अफगाणांखेरीज दक्षिण आफ्रिकेतील मुस्लिमांचाही मोठा भरणा होता. इकडे त्यांना सिद्दी वा हबशी म्हटले जात असे. या सर्वांशिवाय एतद्देशीय धर्मांतरित मुसलमान देखील होते. परन्तु परदेशी मुस्लिमांच्या लेखी त्यांचा दर्जा निम्न होता. 


या विविध भाषिक, प्रांतिक, वांशिक गटात विभागलेल्या मुस्लिम जगताचे प्रतिबिंब म्हणजे दिल्लीकर तुर्की बादशहाचा दरबार ! 

या दरबाराचा मुख्य धनी -- बादशहा स्वतः तुराणी तुर्क असल्याने त्यांचा स्वाभाविक ओढा तुराणी तुर्कांकडे असणे ओघानेच आले. 

आपल्या विचाराधीन काळात दिल्ली दरबारातील तुराणी गटात मीर कमरुद्दीन उर्फ निजामउल्मुल्कचं घराणं प्रमुख होतं. 

तुराणी गटाइतकाच प्रतिष्ठित दुसरा गट इराणी तुर्कांचा.

या खालोखाल अफगाण सरदार असून त्यांच्या मनातील गत वैभवाच्या -- शेरशहा सुरी वगैरे कालीन -- स्मृती रेंगाळत असल्याने संधी मिळताच ते बादशहा विरुद्ध बंडाचा झेंडा फडकावण्यास मागे पुढे पाहणारे नव्हते. परन्तु त्यांच्यातील एकोपा फार कमी वेळ टिकत असल्याने दरबारातील धीम्या, दिर्घसूत्री राजकारणात एक उपयुक्त शिपाईगडी म्हणूनच त्यांना महत्त्व होते. ( छ )

सिद्दी व देशी मुसलमानांना राजकीयदृष्ट्या तुर्की दरबारात महत्त्वाचे स्थान नव्हतेच. त्यामुळे त्यांची चर्चा अनावश्यक ठरते. राहता राहिले सय्यद ! महंमद पैगंबराच्या घराण्याशी थेट रक्तसंबंध सांगणारा एक वंश. ( ज ) 

सय्यदांविषयी इतर मुस्लिमांत आदरभाव असला तरी व्यवहारात मात्र ते सामान्यच गणले जात, असे खुद्द औरंगजेबाच्या उदाहरणावरून दिसून येते. ( ६ ) 


सय्यदांच्या पुष्कळशा घराण्यांपैकी एक घराणे -- बाऱ्हा सय्यद हिंदुस्थानात तुर्की बादशहाच्या सेवेत होते. या घराण्यातील अब्दुल्लाखान व हुसेन अलिखान या सय्यद बंधूंनी आपल्या कर्तबगारी व मुत्सद्देगिरीच्या बळावर बहादूरशहाच्या मृत्यूनंतर माजलेल्या वारसा कलहांत सहभाग घेत बहादूरशहाचा नातू फर्रुखसेयर यांस गादीवर बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परिणामी फर्रुखसेयरच्या कारकिर्दीत वजीर व मीरबक्षी ही साम्राज्यातील दोन महत्त्वाची पदे अनुक्रमे अब्दुल्ला व हुसैन यांस प्राप्त झाली.

सय्यदांची गर्विष्ठ, अहंकारी वागणूक व बादशहावरील त्यांच्या नियंत्रणामुळे दरबारातील तुराणी वगैरे गट त्यांच्या नाशास प्रवृत्त झाले. यातूनच पुढे विविध भानगडी होऊन प्रथम दक्षिणच्या सुभ्यावर तुराणी गटाच्या निजामाची दख्खन सुभेदार म्हणून अल्पकाल नेमणूक झाली. 

आपल्या दख्खन सुभेदारीच्या कार्यकाळात निजामाने कोल्हापूरकर संभाजीचा पक्ष घेत सातारकर शाहूचा उच्छेद चालवला. परंतु दिल्ली दरबारातील राजकीय कारवायांमुळे निजामास दख्खन सुभा सोडून दिल्लीस परतावे लागले तर सय्यद हुसैन याची दक्षिणेच्या सुभेदारीवर नियुक्ती करण्यात आली. ( झ )


सय्यद हुसैनची दख्खन सुभा म्हणून नियुक्ती करण्यामागे कोणत्याही तऱ्हेने सय्यदांचा नाश व्हावा हीच बादशहाची इच्छा असल्याने त्याने अंतस्थपणे दाऊदखान पन्नी, शाहू इ. ना सय्यद हुसैन विरुद्ध भर दिली होती. पैकी दाऊदखानास सय्यद हुसैनने दि. २६ ऑगस्ट १७१५ रोजी बऱ्हाणपूरच्या लढाईत गारद केले. ( ७ ) 

दख्खन सुभ्याचा कारभार हाती घेताच त्याने शाहुविरुद्ध जोरदार मोहिमा आखली. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आले की शाहूला बादशहाचा अंतस्थ पाठींबा आहे तेव्हा त्याने बादशाहवर कुरघोडी म्हणून शाहूसोबतच थेट तहाची वाटाघाट आरंभत त्याचा आपल्या पक्षास पाठींबा मिळवून घेतला. याकामी सय्यद हुसैनच्या पदरी असलेल्या शंकराजी मल्हार या मराठी मुत्सद्याने महत्वाची भूमिका बजावली. ( ट ) 


शाहू व बादशहाच्या वतीने सय्यद हुसैन दरम्यान घडलेल्या तहातील मुख्य अटी पुढीलप्रमाणे :- 

१) शिवाजीच्या वेळचे स्वराज्य, तमाम गडकोटसुध्दा शाहूचे हवाली करावे.

२) अलीकडे मराठी सरदारांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैदराबाद, कर्नाटक या भागातले, यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.

३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखांवर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठयांनी स्वतः वसूल करावे. या चौथाईचे बदल्यात आपली पंधरा हजार फौज मराठयांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीचे बदल्यात मोगलांचे मुलखात मराठयांनी चोऱ्या वगैरेंचा बंदोबस्त करावा.

४) कोल्हापूरच्या संभाजीस शाहू छत्रपतींनी उपद्रव करू नये.

५) मराठ्यांनी दरसाल बादशहाला दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी.

६) शाहू राजांची मातोश्री, कुटुंब छत्रपती संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजात आहेत, त्यास सोडून स्वदेशी पावते करावे. ( ८ )


इकडे दरबारी कारस्थानं अनिवार झाल्याने सय्यद अब्दुल्लाने सय्यद हुसैनला आपल्या मदतीकरता बोलावून घेतले. तेव्हा शाहूसोबत नुकत्याच केलेल्या करारास बादशाही मंजुरी मिळवण्याच्या बहाण्याने मराठी सेना मदतीस घेऊन सय्यद हुसैनने दिल्लीस प्रस्थान ठेवले. 


मल्हारराव होळकराचा स. १७१८ - १९ च्या दिल्ली स्वारीतील सहभाग :- होळकरांची कैफियत तसेच अत्रे, बर्वे कृत मल्हारराव होळकरच्या अनुक्रमे मराठी व इंग्रजी चरित्रातील माहिती जमेस धरल्यास असे दिसून येते की, शाहूच्या सरदारांनी स. १७१८ - १९ मध्ये केलेल्या दिल्ली स्वारीत मल्हारराव, बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या फौजेसोबत आपलं पथक घेऊन, एक शिलेदार म्हणून सहभागी झाला होता. परंतु हे मला अशासाठी सयुक्तिक वाटत नाही की, यांस अस्सल कागदपत्रांची जोड नाही. दुसरे असे की, भोजराज बारगळ हा सरदार कदम बांड्यांच्या पदरी होता तर कदम बांडे सेनापती खंडेराव दभाडेच्या हाताखाली. तसेच खुद्द सेनापती दाभाडे दिल्ली स्वारीत सहभागी असल्याने मल्हाररावास मोहिमेत सहभागी होण्यासाठी पेशव्याकडे जाण्याची गरजच काय ? सबब मल्हारराव, शिलेदार म्हणून दाभाड्यांच्या फौजेसोबत दिल्ली स्वारीत सहभागी झाला हेच मला तर्कानुमानाने अधिक सयुक्तिक वाटते. 

तसेच या स्वारीत मल्हारराव - बाजीराव यांच्यात शाब्दिक चकमक उडून, मल्हाररावाने बाजीरावाच्या दिशेने ढेकळं फेकून मारल्याची कथाही मला कल्पित वाटते. मल्हाररावाचे धैर्य, साहस ; बाजीरावाची दिलदारी, गुणग्राहकता व पुढील काळात बाजीराव पेशव्याच्या पदरी झालेला मल्हाररावचा अभ्युदय यांमुळे ही कथा मुद्दाम रचण्यात आली असावी असे माझे मत आहे. 


आर्थिक तसेच लष्करी शिक्षणाच्या दृष्टीने मल्हाररावास दिल्ली स्वारी उपयुक्त ठरली. या मोहिमेनंतर त्याने आपल्या पथकात वाढ केली. मल्हाररावाची चढती कमान पाहून भोजराजने आपल्या उपवर मुलीचा त्याच्यासोबत विवाह लावून दिला.

( ९ )


(१) मराठी रियासत खंड ३ :- गो. स. सरदेसाई,  सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चरित्र :- मुरलीधर मल्हार अत्रे, Life of SUBHEDAR MALHAR RAO HOLKAR Founder of the Indore State ( 1693 - 1766 A.D. ) :- Mukund Wamanrao Burway 

(२) उक्त

( ३ ) महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग - १ शिवकाल ( इ. स. १६३० - १७०७ ) :- डॉ. वि. गो. खोबरेकर

(४ ) मोगल दरबारची बातमीपत्रे - १, संपादक :- सेतू माधवराव पगडी 

( ५ ) महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८२८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर

( ६ ) उत्तरकालीन मुघल खंड दुसरा ( वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित LATER MUGHALS या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद ) अनुवादक :- प्रा. प्रमोद गोविंद ठोंबरे 

( ७ ) महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८२८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर

( ८ ) उक्त 

( ९ ) सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चरित्र :- मुरलीधर मल्हार अत्रे, Life of SUBHEDAR MALHAR RAO HOLKAR Founder of the Indore State ( 1693 - 1766 A.D. ) :- Mukund Wamanrao Burway 




( क ) उपलब्ध माहितीवरून या घराण्याचे आडनाव प्रथम वीरकर असल्याचे दिसून येते. परंतु पुढे शिलेदारी करत असता, मूळ होळ गावचे रहिवासी म्हणून होळकर हे आडनाव प्रचलित झाले असे अनुमान बांधता येते.

( ख ) मराठी रियासत खं. ३ मध्ये भोजराज संबंधी मिळणारी माहिती.

भोजराज हा कंठाजी कदम बांड्याच्या पागेत  २५ स्वारांचा मुख्य होता. तसेच सरदेसाईंनी भोजराजचा शिक्का दिला असून त्यातील मजकूर ' शिवजीसुत भोजराज बारगळ ' असा आहे. 

खेरीज सरदेसाई भोजराजचा उल्लेख ' भोजराज बारगळ चौगुला ' असा करतात. यावरून त्याच्याकडे चौगुल्याचे वतन होते असा अंदाज बांधता येतो.

 पुढील काळात मल्हाररावाचे स्वतंत्र पथक घेऊन शाहूच्या सरदारांसोबत दिल्ली मोहिमेत सहभागी होणे तसेच बाजीरावाकडे सरदारी स्वीकारताना बारगळांकडून आपणांस मागून घेण्याची पेशव्यास सूचना करणे यावरून भोजराज हा कदम बांड्यांच्या सैन्यात एक शिलेदार म्हणून कार्यरत होता असे बळकट अनुमान संभवते. 

( ग ) दिल्लीची तुर्की बादशाही व्यवहारात सार्वभौम होती. या सत्तेने दिलेली वतनंच कायम समजली जायची. खुद्द छ. शिवाजीने औरंगजेबाकडे तीनवेळा सरदेशमुखी वतनाची मागणी केल्याचा उल्लेख डॉ. खोबरेकर आपल्या ' महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८२८ ' या ग्रंथातील तिसऱ्या प्रकरणात करतात. अर्थात या विधानास त्यांनी संदर्भ दिला नसल्याने शिवाजीचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी ताराबाईचे यावेळी काय मत असावे याचे तार्किक अनुमान आपण बांधू  शकतो.

तत्कालीन राजकीय संघर्ष लक्षात घेता भोसले घराण्याची सत्ता नामशेष करण्याचे तुर्कांचे धोरण केवळ बादशाहच्या मृत्यूनंतरच बदलू शकत होते व त्याचा मृत्यू अथवा तुर्कांचा निर्णायक विजय / पराजय दृष्टिपथात नव्हता. अशा स्थितीत राजारामाच्या मृत्यूनंतर बादशाही सत्तेशी समेट करत शाहूचा वारसा डावलून आपल्या मुलाचे आसन बळकट करण्याच्या ताराबाईचा उद्देश असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 

( घ ) सरदेशमुखी हक्कांच्या बदल्यात ताराबाई तुर्कांना काय देऊ इच्छित होती याची चर्चा शेजवलकरांनी आपल्या ' निजाम - पेशवे संबंध १८ वे शतक ' या ग्रंथात तसेच डॉ. खोबरेकरांनी ' महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८२८ ' ग्रंथात केलेली नसल्याने यासंबंधी अधिक विवेचन करणे शक्य नाही.

( च )

( छ )

( ज ) सय्यद आपली उत्पत्ति महंमद पैगंबरची मुलगी फातिमा व तिचा नवरा अली यांपासून झाल्याचे मानतात. :- मुंबई इलाख्यातील जाती :- गोविंद मंगेश कालेलकर .. अधिक माहितीची गरज 

( झ ) निजामाने कोल्हापूरकरांचा पक्ष का स्वीकारला हे जाणून घेण्यासाठी आपणांस इतिहासात थोडं मागे जावं लागेल.

औरंगजेबाच्या अंतिम कालखंडात त्याला रायगड, जिंजी सारखे अभेद्य किल्ले जिंकून देणाऱ्या झुल्फिकारखानाच्या मनात दख्खनमध्ये स्वतंत्र राज्य स्थापण्याचा विचार घोळत होता. औरंगजेबाच्या पश्चात झालेल्या वारसा युद्धांत त्याने प्रथम शहजादा आझम व नंतर मुअज्जम उर्फ बहादुरशहाचा पुरस्कार केला. परिणामी बहादूरशहा तख्तावर येताच प्रथम त्यांस दख्खन सुभेदारी व नंतर वजिरी प्राप्त झाली. झुल्फिकारखानाने दख्खन सुभ्यावर आपला दुय्यम म्हणून दाऊदखान पन्नीची नियुक्ती केली. पुढे बहादुरशहाच्या पश्चात झुल्फिकारने बहादुरशहाच्या मुलाचा -- जहाँदरशहाचा पक्ष स्वीकारला. परन्तु जहाँदरची कारकीर्द औटघटकेची ठरवून सय्यद बंधू, निजाम उलमुल्क वगैरेंच्या पाठींब्यावर फर्रुखसेयर गादीवर आला व जहाँदर आणि झुल्फिकार यांस मृत्युदंड प्राप्त झाले. 

दिल्लीत हा वारसायुद्धाचा घोळ सुरू असताना इकडे दाऊदखानाने शाहूच्या सरदारांचा वाढता जोर पाहून त्यांना दक्षिणच्या सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी देण्याचे मान्य केले. ( स. १७१२ - १३ ) 

इकडे फर्रुखसेयर गादीवर बसताच दाऊदखानाची दख्खन सुभ्यावरून गुजरातला बदली करण्यात आली व निजामास दक्षिणेची जबाबदारी सोपविण्यात आली. हा घटनाक्रम लक्षात घेतल्यास निजामाने शाहूविरुद्ध कोल्हापूरकरांचा पुरस्कार करण्यामागील रहस्याचा उलगडा होतो.

( ट ) शंकराजी मल्हार हा पूर्वी राजारामाच्या पदरी सचिव पदी कार्यरत होता. पुढे काही कारणांनी त्याने नोकरी सोडून संन्यास घेत बनारसला काही काळ व्यतीत केला. परन्तु त्यातही मन न रमल्याने त्याने बादशाही चाकरी स्वीकारली. दिल्ली दरबारात त्याचा कोणामार्फत प्रवेश झाला याची माहिती मला मिळू शकली नाही. मात्र सय्यद हुसैनला दख्खन सुभेदारीवर नेमताना बादशहाने शंकराजी मल्हारला त्याच्यासोबत दिल्याचे डॉ. खोबरेकर आपल्या ' महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ ' या संदर्भ ग्रंथात नमूद करतात.

कदाचित यामागे शंकराजी मार्फत शाहूच्या मार्फतीने सय्यद हुसैनचा नाश घडवून आणण्याचा बादशहाचा हेतू असू शकतो. असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: