ज्याप्रमाणे चित्राची फक्त एक बाजू पाहून समस्त चित्राची कल्पना येत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या ऐतिहासिक घटनेची एकतर्फी हकीकत वाचून त्यासंबंधी सर्वज्ञान झाले असे म्हणता येत नाही.
पेशवाईच्या इतिहासात पानिपतची लढाई किंबहुना समस्त मोहीम अनन्यसाधारण महत्त्व बाळगून आहे. पानिपतच्या अनर्थास कोण कारणीभूत ठरलं, युद्धातून कोण पळालं वगैरे बाबींवर बरंच काथ्याकूट झालेलं आहे आणि पुढेही होत राहील. प्रस्तुत लेखात आपल्याला ही मोहीम किंबहुना प्रकरणच पेशवाईच्या इतिहासात का उद्भवले हे बघायचं आहे.
पानिपतच्या मुळांचा शोध घेण्यासाठी आपणाला थोडं इतिहासात मागे जावं लागेल.
हिंदुस्थानात तुर्की सत्तेचा पाया घालणारा बाबर मूळ फरगणा येथील सत्ताधीश होता. तेथील सत्ता संघर्षात त्याला आपलं राज्य गमवावं लागलं, तेव्हा तेथून तो काबुलला आला. काबूलचा निर्धन प्रदेश राज्याचा खर्च भागवण्यासाठी असमर्थ ठरल्याने त्याची नजर हिंदुस्तानकडे वळाली. येथे त्याने सत्ता स्थापन केली व पुढे त्याच्या वंशजांनी या सत्तेचा साम्राज्याप्रत विस्तार केला. मात्र आपली पाळंमुळं फरगणा - समरकंद या मध्य आशियातील ठिकाणांत आहेत हे, ते कधीच विसरले नाहीत. त्याचप्रमाणे काबूल, कंदाहार हे महसुलाच्या दृष्टीने तुटीचे सुभे असून देखील संरक्षक व पैतृक वारसा यामुळे त्यांनी नेहमीच महत्त्वाचे मानले.
पैकी कंदाहारचा सुभा शहाजहान बादशहाच्या काळात इराणच्या शहा अब्बासने जिंकून घेतला ( स. १६४९ )
राहिला काबूलचा सुभा. तो नादिरशाहने आपल्या हिंदुस्तान स्वारीत जिंकून घेतला. ( स. १७३८ - ३९ )
विशेष महत्वाचा भाग म्हणजे हा काबूलचा सुभाच एक प्रकारे पानिपत उद्भवण्यास कारणीभूत ठरला.
तुर्की प्रशासनात काबूल सुभ्याचा खर्च भागवण्यासाठी सिंधू नदीच्या पूर्वेकडील काठावरचे सियालकोट, गुजरात, औरंगाबाद व पसरुर या चार महालांचा महसूल लावून देण्यात आला होता. नादिरशाहने ज्यावेळी काबुल जिंकले तेव्हा पूर्वपरंपरा लक्षात घेऊन त्याने लाहोरच्या तुर्की सुभेदारास उपरोक्त चार महालांतून सालीना वीस लक्ष रुपये देण्याच्या करारावर सही करण्यास भाग पाडले.
पुढे नादिरशाहचा खून होऊन अहमदशहा अब्दालीचा उदय झाला. तो स्वतःला अफगाणांचा बादशहा म्हणून घेत होता. त्याचप्रमाणे अफगाण तसेच हिंदुस्तानच्या काही भागावर -- जो नादिरशाहने आपल्या हिंदुस्थान स्वारीत जिंकला होता -- नादिरशहाचा राजकीय वारस म्हणून आपला हक्क सांगत होता. त्यामुळे काबूल, कंदाहार ताब्यात येताच त्याची नजर लाहोरकडे वळली.
अब्दालीने हिंदुस्तान वर स. १७४८-४९ मध्ये प्रथम स्वारी केली. मानपुरच्या लढाईत तुर्की सैन्याने त्याचा पराभव केला. त्यानंतर स. १७४९-५० मध्ये अब्दालीने दुसरी हिंदुस्तान स्वारी केली. यावेळी लाहोर सुभेदार मीर मन्नूने त्याला सियालकोट, पसरूर, गुजरात आणि औरंगाबाद या चार महालातून वार्षिक १४ लाख रुपये देण्याचे मान्य केले. परंतु काही कारणांनी अब्दालीला कबूल केलेल्या रकमेचा भरणा करण्यास लाहोर सुभेदाराला अपयश आल्याने स. १७५१-५२ मध्ये अब्दालीने तिसऱ्यांदा हिंदुस्तानवर स्वारी केली. यावेळी मात्र त्याने लाहोर व मुलतान हे दोन्ही सुभे आपल्या राज्यात जोडून घेतले. यासंदर्भात दिल्लीच्या तुर्की सम्राटा बरोबर झालेल्या करारात असे ठरवण्यात आले की लाहोरच्या सुभेदारपदी अब्दालीने निवडलेल्या व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात येईल, मात्र तसे आदेश दिल्लीच्या बादशाही कचेरीतुन काढण्यात येतील.
यामागे दिल्लीच्या तुर्की बादशाहीचा व्यवहारात बोज राखावा हा उद्देश होता.
स. १७५२ मध्ये अबदाली सोबत ज्यावेळी तुर्की बादशाहीच्या तहाच्या वाटाघाटी सुरु होत्या त्याच वेळी, अब्दालीच्या मुकाबल्यासाठी दिल्लीचा वजीर सफदरजंग याने होळकर - शिंद्यांसोबत बादशाही संरक्षणाचा करार केला. त्यातील मुख्य कलमांनुसार अब्दालीच्या बंदोबस्ताकरता तीस लाख रुपये ; मुलतान, पंजाब, ठठ्ठा, भकर या सुभ्यांची व त्यांच्या फौजदारीची तसेच सियालकोट, पसरुर, औरंगाबाद व गुजरात या चार महालांच्या साऱ्याची चौथाई सैन्याचा खर्चाकरता मराठी सत्तेस प्राप्त झाली.
तात्पर्य या दोन परस्परविरोधी तहांमुळे पानिपतची निर्मिती झाली.
हा संघर्ष बोलाचालीने टाळण्याचे प्रयत्न जरूर झाले.
गो. स. सरदेसाई कृत मराठी रियासत ( मध्य विभाग ३ ) स. १९२२ च्या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ९७ वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रघुनाथरावाने लाहोर स्वारी केली त्या सुमारास अब्दाली पेशावरास असून त्याचा वजीर शहावलीखान याच्यासोबत मल्हारराव होळकराची तहाची वाटाघाट सुरु होती. त्यानुसार अबदाली व पेशव्याच्या दरम्यान समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु कोणत्या कारणांनी हा बनाव बनून आला नाही, याची स्पष्टता सरदेसाईंनी केलेली नाही. तसेच पुढील आवृत्तीत हे उल्लेख काढून टाकण्यात आले. असो.
यानंतर अब्दालीने हिंदुस्तान वर पाचवी स्वारी केली. ज्यामध्ये प्रथम बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेचा निकाल लागला. त्यानंतर मल्हाराव होळकर व जनकोजी शिंद्याने धावपळीच्या युद्धात अब्दालीला टेकीस आणले. त्यावेळी रोहिला सरदार हाफिज रहमत खान मार्फत तहाची वाटाघाट चालून असे ठरवण्यात आले की, (१) रोहिल्यांनी मराठी सरदारांचा पक्ष धरावा. (२) अब्दालीला मार्गस्थ करावे. (३) नजीब खानाची कुमक न करावी. (४) सरदारांनी त्याच्या वाटेस न जावे. पेशवे दप्तर २, लेखांक क्र. १२२ यामध्ये ही तहाची वाटाघाट नमूद करण्यात आली आहे. या पत्राची तारीख संपादकांनी १३ मार्च १७६० अशी दिली आहे. बहुधा या सुमारास दख्खनमधून सदाशिवरावाची हिंदुस्तान स्वारीकरता नियुक्ती झाल्याने हा तह अमलात आला नाही.
पुढे सदाशिवरावाचा दिल्लीमध्ये मुक्काम असताना उभयपक्षी तहाचे बरेच प्रयत्न झाले. परंतु हिंदुस्तान मोहिमेचा मराठी पक्षाचा सेनापती, हा नामधारी होता. राजकीय बाबतीतचे सर्व अधिकार नानासाहेब पेशव्याकडे होते. त्यामुळे हरेक बाबतीत पेशव्याच्या आज्ञेखेरीज सदाशिवरावास निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. आणि याचमुळे पानिपतवर कोंडीत पकडले गेल्यानंतर ही सदाशिवरावास तह करून आपली सुटका करून घेता आले नाही.
पानिपत जिंकल्यामुळे अब्दालीचे प्रश्न मिटले अशातला भाग नाही. लाहोर, मुलतान हे सुभे ताब्यात ठेवण्यासाठी त्याला शिखांसोबत संघर्ष करावा लागला व त्या दरम्यानच त्याचा दि. २३ ऑक्टोबर १७७२ रोजी रोगग्रस्त अवस्थेत अंत झाला. पानिपतनंतर अब्दालीने हिंदुस्थानवर फिरून स्वारी केली नाही, असं म्हणणाऱ्यांचं भूगोल व इतिहास विषयक अज्ञान यावरून लक्षात यावं.
संदर्भ ग्रंथ :-
१) औरंगजेबाचा इतिहास ( जदुनाथ सरकार लिखित A SHORT HISTORY OF AURANGZIB या ग्रंथाचे भाषांतर ) अनुवादक - डॉ. भ. ग. कुंटे
२) उत्तरकालीन मुघल खंड दुसरा, वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद, अनुवादक – प्रा. प्रमोद गोविंद ठोंबरे, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती ऑगस्ट १९९८
३) मराठी रियासत ( खंड ४ ) :- गो. स. सरदेसाई
४) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( स. १७५०-६१ ) :- वि. का. राजवाडे
५) मुघल साम्राज्याचा ऱ्हास, भाग १ ( जदुनाथ सरकार लिखित फॉल ऑफ मुघल एम्पायरचा मराठी अनुवाद ) :- अनुवादक - ग. श्री. देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा