शुक्रवार, १० जून, २०२२

नवं पानिपत - कच्चा खर्डा २

प्रकरण २)


दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचा अल्पशा आजाराने मृत्यू घडून आला. पश्चात दि. २५ जून रोजी बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी उर्फ नाना यांस छ. शाहूने पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत, मधल्या चार दोन महिन्यांचा काळ वजा केल्यास -- नानासाहेबाकडे साधारणतः वीस वर्षे पेशवेपद होते. त्यातही शाहूचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे स. १७४९ डिसें. पर्यंत आरंभीची नऊ वर्षे त्याची सत्ता छत्रपतींमुळे नियंत्रित होती. पुढे शाहूच्या पश्चात झालेल्या राजकारणात त्याची दोन तीन वर्षे खर्ची पडली तरी नंतर आठ नऊ वर्षे नानासाहेबाने अनियंत्रित सत्ता उपभोगली. याच उर्वरित आठ नऊ वर्षांच्या काळात पेशवाईचे भाग्य कळसास पोहोचले खरे, परंतु भरतीची लाट ओसरून जितक्या त्वरेने ओहोटीस आरंभ होतो, तसाच काहीसा प्रकार नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात घडून आल्याचे आपणांस दिसून येते.


पानिपत प्रकरण उभारणीत नानासाहेब पेशव्याचा देखील मोठा वाटा असल्याने त्याच्याविषयी संक्षेपात जाणून घेणे आपणांस भाग आहे.


नानासाहेबाचा जन्म दि. १२/१६ डिसेंबर १७२० रोजी झाला. रणशूर पित्याप्रमाणे नानासाहेब लष्करी नेतृत्वात कुशल नसला तरी महादोबा पुरंदरे व चुलत चिमाजी आपाच्या हाताखाली राजकारणाचे त्यांस शिक्षण मिळाल्याने प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजावर त्याची पकड होती. खेरीज कट कारस्थानांत तर तो बाजीराव - चिमाजी पेक्षाही सवाई होता.


नानासाहेबाचा स्वभाव राजकारणी व्यक्तिप्रमाणे संशयी असला तरी त्यांस खुनशीपणाची जोड असल्याने हा अतिशय धोकादायक मनुष्य होता. पेशव्याची पत्रांतील भाषा कितीही गोड, प्रेमळ, लाघवी तसेच विद्वत्तापूर्ण असली तरी स्वसामर्थ्याची घमेंड व अनिवार हांव हे त्याचे दुर्गुण आपणांस तेव्हाच कळून येतात. त्यामुळेच जरी पेशव्यास लष्करी अंग नसले तरी सरदारांवर त्याची दहशत असल्याने धनीपणाचा बोज राखून त्यांस आपली कामं साधून घेता आली. अर्थात, कधी कधी सरदार त्याची अवज्ञाही करीत, परंतु त्यांना परस्पर शिक्षा देऊन सावरून घेण्याचीही अजब हातोटी पेशव्याकडे होती. याचे प्रत्यंतर जयाजी शिंद्याच्या मारवाड तसेच रघुनाथरावाच्या हिंदुस्थान स्वाऱ्यांत आपणांस दिसून येते, ज्याची पुढे तपशीलवार चर्चा केली जाणार आहे.


नानासाहेबाच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने दोन पिढ्यांचा -- विशेषतः बाजीरावाने आरंभलेला उद्योग शेवटास नेण्याचा प्रयत्न केला. अर्थात या प्रयत्नांना राजकीय समजूतदारीची जोड नसल्याने पेशवाईस, परिणामी समस्त मराठी राज्यास त्याचे परिणाम भोगावे लागले, ज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात पानिपताने झाली.


यासंबंधात माळवा, बंगाल, कर्नाटक ही प्रकरणे पुरेशी बोलकी आहेत. पैकी आपल्या विषयाशी संबंधित माळवा, बंगालची येथे आपण थोडक्यात चर्चा करू.


माळव्याची सुभेदारी मिळवण्यासाठी बाजीरावाने शक्य तितके प्रयत्न करूनही त्यांस प्राप्त झाली नाही. पश्चात पेशवेपद प्राप्त होताच नानासाहेबाने प्रथमतः माळव्यावर लक्ष केंद्रित करत एकीकडे स. जयसिंहाच्या मध्यस्थीने बादशहा सोबत बोलणी आरंभली तर दुसरीकडे निजामाला त्याच्या मुलाविरुद्ध -- नासिरजंग -- मदत करत त्याच्याकडून आपणांस अडथळा होणार नाही याकडे लक्ष पुरवले.

स. जयसिंहामार्फत माळव्याच्या सुभेदारीकरता दिल्ली दरबार सोबत चाललेल्या वाटाघाटींना जोर यावा म्हणून पेशव्याने सरदारांकरवी धारचा कब्जा घेतला. परिणामी बादशाहने स. जयसिंह, प्रयागचा सुभेदार अमिरखान, अयोध्येचा सफदरजंग, खानडौराचा मुलगा समसामुद्दौला, अजमखान इ. उमरावांना माळव्यावर स्वारीचा हुकूम दिला.

पैकी, पेशव्याने सरदारांकडून सफदरजंग व अमिरखान यांस मार्गात अडथळा उत्पन्न केल्याने स. जयसिंहाने पेशव्यासोबत तहाची बोलणी आरंभली. प्रथेस अनुसरून पेशव्याने समग्र हिंदुस्थानच्या चौथाईची मागणी करत बादशाही मुलखाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली परंतु स. जयसिंहाने त्यांस माळवा आणि गुजरात या दोन प्रांतांच्या सुभेदारीची फर्मानं मिळवून देण्याचे मान्य करताच पेशव्याने आपली संमती दर्शवली. त्यानुसार दि. ७ सप्टें. १७४१ रोजी माळव्याची सुभेदारी शहजादा अहमदच्या नावे करत नायब सुभेदार म्हणून पेशव्याची नियुक्ती करून बादशहाने आपली अब्रू राखली.  ** {१}


** तळटीप :- वाटाघाटींमध्ये माळव्यासोबत गुजरात सुभ्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात सनदा फक्त माळव्याच्याच मिळाला. 

माळव्याची सनद नानासाहेब पेशव्यास कधी मिळाली याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. 

ग. ह. खरे संपादित ' ऐतिहासिक फार्सी साहित्य ४ था खंड,'  यामध्ये माळव्याची सनद दिली असून त्यावरील तारीख दि. १७ सप्टें. १७४१ अशी आहे.

अ. रा. कुलकर्णी व ग. ह. खरे संपादित ' मराठ्यांचा इतिहास खंड दुसरा ' मधील पेशवा बाळाजी बाजीराव प्रकरणाचे लेखक सदाशिव आठवले यांच्या मते माळव्याच्या नायब सुभेदारीच्या सनदा स. १७४३ च्या ऑगस्टमध्ये तयार झाल्या परंतु बादशाही मोहर होऊन प्रत्यक्ष पेशव्याच्या हाती स. १७५० साली पडल्या.





माळव्या सोबत गुजरात सुभ्याच्या सनदांसाठी पेशवा प्रयत्नशील का होता हे थोडक्यात समजावून घेतलं पाहिजे.

गुजरातमध्ये सेनापती दाभाडे व त्यांचे हस्तक गायकवाड कार्यरत असताना बाजीरावाने गुजरात सुभेदार सरबुलंदखानाकडून छ. शाहूच्या नावे चौथाई व सरदेशमुखीची सनद प्राप्त केली. ( पे. द. १५, पृ. क्र. ८४-८५, सदर लेखांकांची तारीख दि. ९/०२/१७२८ )


छ. शाहूने चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आपाला गुजरातमध्ये निम्मा मोकासा देऊ केला. ( शाहू रोजनिशी ले. क्र. १०५, स. १७२५-२६ )

चिमाजी आपाकडील गुजरातमधील निम्मा मोकासा दूर करण्यात येऊन तो खंडेराव दभाड्यास परत देण्यात आला. ( शाहू रोजनिशी ले. क्र. १५९, स. १७२७-२८ ) 


दि. १५/१२/१७३० रोजी चिमणाजी बल्लाळ कडील गुजरात मधील निम्मा मोकासा दूर करण्यात येऊन तो त्रिंबकराव दाभाड्यास देण्यात आला. ( पे. द. ३०, पृ. क्र. २९९ )


प्रश्न असा आहे कि, चिमणाजी बल्लाळ कडून मोकासा दूर केल्याच्या दोन वेगवेगळ्या सालांतील नोंदी आहेत परंतु मोकासा दिल्याची नोंद मात्र एकच.

दुसरे असे की, चिमणाजी कडील मोकासा दूर करून दाभाड्यांना देण्यामागे छ. शाहूच्या मनात सेनापती - पेशवे यांदरम्यान कज्जा निर्माण व्हावा अशी भावना असल्याचा थेट आरोप बाजीराव पेशव्याने चिमाजीला लिहिलेल्या एका पत्रात केला आहे. ( पे. द. १२, ले. क्र. ३९, दि. १२/११/१७३० )


उपलब्ध पत्रव्यवहारातील घटनाक्रम लक्षात घेता गुजरात जर छत्रपतींकडून मिळणार नसेल तर देशाची सार्वभौम सत्ता – दिल्लीच्या तुर्की बादशाहीकडून त्या प्रांताच्या सुभेदारीची सनद घेण्याचा पेशव्याचा खटाटोप दिसून येतो.




या सर्व व्यवहारात निजामाच्या गृहकलहांत भाग न घेता किंवा नासिरजंगास निजामाविरुद्ध मदत करून पेशव्याला निजामास या प्रकरणापासून दूर राखता आले असते व यदाकदाचित नासिरजंग विजयी होऊन पेशव्यावर उलटल्यास, त्याच्या वडील भावास -- गाजीउद्दीन फिरोजजंग -- हाताशी धरून गृहकलह अधिक चेतवता आला असता ( हाच डाव पुढे आठ नऊ वर्षांनी नानासाहेबाने अंमलात आणला ही गोष्ट निराळी. ) व पर्यायाने दख्खनमधील मराठी सत्तेचा मुख्य प्रतिस्पर्धी त्याला परस्पर निर्बल करता आला असता. परंतु स्वबुद्धी वा सल्लागारांच्या भरीला बळी पडून त्याने निजामास एकप्रकारे जीवनदान प्राप्त करून दिले. असो.


माळव्याची सनद प्राप्त केल्यानंतर स. १७४२ - ४३ मध्ये नानासाहेब पेशव्याने बादशाही मदतीच्या नावाखाली रघुजीच्या बंगाल स्वारीत व्यत्यय आणण्याचे पुण्य गाठीशी बांधले. त्याची पेशव्यापुरती पूर्वपरंपरा बघायची झाल्यास बाजीराव पेशव्याने स. १७३२ - ३८ दरम्यान केव्हातरी दिल्लीच्या तुर्की बादशहाकडे तहासाठी पाठवलेल्या मागण्यांची यादी पेशवे दप्तर १५, पृ. क्र. ९५ वर देण्यात आली आहे, त्यामध्ये पेशव्यास झालेल्या कर्जाबाबत बंगालमधून पन्नास लक्ष देण्यात यावे तसेच प्रयाग, काशी व मथुरा येथे पेशव्यास जहागीर देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. दुसरे म्हणजे, नादिरशाहच्या हिंदुस्थान  स्वारीसमयीच बाजीराव आणि रघुजी भोसल्यात एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपाबाबत तंटा निर्माण झाला होता. त्याचवेळी बाजीराव हा प्रश्न शस्त्रबळाच्या जोरावर निकाली काढायच्या विचारात असता नादिरशाहच्या स्वारीमुळे त्याने हा वाद क्षणभर बाजूला ठेवला. बापाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे नानासाहेब पेशव्याने मनावर घेतले. 


बंगालचे राजकारण :-  फर्रूखसेयरच्या कारकिर्दीत मुर्शीदकुलीखानाकडे बंगाल व ओरिसाची सुभेदारी होती. मुर्शीदकुलीखानाच्या मृत्यूनंतर त्याचा जावई शुजाउद्दीन याच्याकडे उपरोक्त दोन्ही प्रांतांची सुभेदारी राहून त्यात स. १७३३ मध्ये बिहारची भर पडली. सारांश, बंगाल बिहार व ओरिसा या तीन सुभ्यांवर त्याची हुकूमत सुरू झाली. पैकी, बिहारच्या सुभ्यावर त्याने आपला दुय्यम म्हणून अलीवर्दीखान याची नेमणूक केली होती. 

दि. १३ मार्च १७३९ रोजी शुजाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा सरफराजखान हा सुभेदारीवर दाखल झाला. काही कारणांस्तव उभयतांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन अलीवर्दीने बंगालवर स्वारी केली. त्यावेळी घेरिया येथे झालेल्या युद्धात सरफराज मारला जाऊन बंगाल सुभ्याची अलीवर्दीस प्राप्ती झाली. ( दि. १० एप्रिल १७४० ) 

यानंतर पुढच्याच वर्षी त्याने ओरिसावर स्वारी करून तो प्रांत देखील आपल्या कब्जात घेतला. ( मार्च १७४१ )

आपल्या या कृत्यास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून अलीवर्दीने बादशहा व दरबारातील प्रमुख मानकऱ्यांना मिळून सुमारे एक कोटी रुपयांचा भरणा केला.  {२}


बंगालमध्ये ही राज्यक्रांती घडून येत असताना नागपूरकर रघुजी भोसले छ. शाहूच्या आज्ञेने तत्कालीन कर्नाटक स्वारीवर होता. ( ज्यामध्ये प्रामुख्याने आजचे कर्नाटक राज्य तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा व तामिळनाडू मधील काही प्रदेशाचा समावेश होतो. ) {३}


अलीवर्दीसमोर निभाव न लागल्याने ओरिसाचा दुय्यम सुभेदार व मृत बंगाल नबाब शुजाचा जावई रुस्तुमजंग मच्छलीपट्टणला पळून आला होता. तेथून रुस्तुमचा जावई बाकरअली याने रघुजी भोसल्याशी संधान बांधून त्याच्याकडे ओरिसा ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली. 

रघुजीने त्याच्या सोबत काही लष्करी पथके मदतीसाठी पाठवली. ज्यांच्या बळावर बाकरअलीने कटकचा ताबा घेत तेथील अलीवर्दीचा जावई व दुय्यम सुभेदार सईद अहमद यांस कैद केले. ओरिसाची बातमी मिळताच अलीवर्दीने पुन्हा कटकवर स्वारी करून बाकरअली व त्याच्या सोबतच्या मराठी सैन्याचा पराभव करून त्यांना ओरिसातून बाहेर काढले. या घटनेमुळे रघुजीला त्वेष चढून त्याने बंगाल स्वारीचे प्रकरण हाती घेतले. {४}


स. १७४१ अखेरीस रघुजीने आपला विश्वासू सरदार भास्करराम कोल्हटकर यांस अलीवर्दीखानाच्या मुकाबल्यास पाठवले. तेव्हापासून अलीवर्दी व रघुजीचा जो झगडा जुंपला, तो स. १७५१ मध्ये उभयतांत तह होऊन मिटला. त्यान्वये -- (१) आधी नबाबाच्या सेवेत असलेला परंतु नंतर रघुजीला सामील झालेला मीर हबीब याने, अलीवर्दीचा नायब म्हणून ओरिसाचा कारभार बघावा व प्रांताचा खर्च भागून जो शिल्लक राहिल तो वसूल भोसल्यांना द्यावा. (२) बंगाल,बिहार, ओरिसा सुभ्यातून भोसल्यांना दरसाल बारा लाख चौथाई खातर देण्यात यावे. (३) सुवर्णरेखा नदी, ही उभयतांची सरहद्द समजण्यात यावी. {५}


जवळपास दहा वर्षे चाललेल्या या झगड्यात केवळ मत्सर आणि अनिवार हांव यांमुळे कारण नसताना नानासाहेब पेशव्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला व त्या नादात हिंदुस्थानच्या राजकारणावरून त्याचे लक्ष विचलित होऊन पेशवाईचे तारू पानिपतच्या खडकावर जाऊन फुटले असे परिणामावरून म्हणता येते. 


रघुजी व पेशव्याच्या बंगाल स्वाऱ्या ( स. १७४१ - १७४७ )  :- स. १७४१ अखेरीस नागपूरकर भोसल्यांनी आपला विश्वासू सरदार भास्करराम कोल्हटकरास बंगाल स्वारीकरता रवाना केले. याच सुमारास अनेक हेतू मनाशी बाळगत नानासाहेब पेशवा हिंदुस्थानची वाट चालू लागला. मार्गात त्याने गढा मंडळवर स्वारी केली. तेथील गोंड राजा लढाईत मारला गेल्यावर स्थळ पेशव्याच्या हाती पडले. खेरीज भोसल्याच्या मुलखातील काही स्थळांना उपद्रव देऊन पेशवा माळवा - बुंदेलखंडात शिरला. {६}


यास्थळी तत्कालीन राजकारणाचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक आहे. स. जयसिंहाच्या अंतस्थ पाठिंब्याने पेशव्याला -- पर्यायाने मराठी सत्तेला माळवा प्रांताची प्राप्ती झाली असली तरी, मराठी सत्ता माळव्यात प्रस्थापित व्हावी अशी जयसिंहाची मनापासून अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळेच एकीकडे पेशव्याला माळव्याची सुभेदारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी खटपट करत असतानाच त्याने दुसरीकडे राजपुताना, माळवा व बुंदेलखंडातील राजपुतांचा मराठी सत्तेविरुद्ध संघ उभारण्याचा प्रयत्न आरंभला. ज्याचे दृश्य स्वरूप आपणांस पे. द. २१, ले. क्र. ८,९ मध्ये दिसून येते. ज्यामध्ये माळवा,बुंदेलखंडातून मराठी सरदारांना उखडून काढण्यासाठी आखलेल्या योजनांची आपणांस थोडीफार माहिती मिळते. विशेष म्हणजे ले. क्र. ८ नुसार ज्यावेळी जयपूर दरबार पेशव्याच्या सरदारांविरुद्ध आखलेल्या योजनांना मूर्त स्वरूप देत होता, त्यावेळी पेशवा बंगाल स्वारीत गुंतला होता.


याच काळातील दिल्ली दरबारचे राजकारणही आपणांस लक्षात घेतले पाहिजे. दरबारात आपले पूर्वीचे स्थान, महत्व प्राप्त करून घेण्यासाठी अमीरखानाने बादशहाला असा सल्ला दिला की, शाही नियमानुसार सरकारी अधिकारी मरण पावल्यास त्याची मालमत्ता सरकारजमा होते. बंगालमध्ये मुर्शीदकुलीखान, सरफराजखान हे दोन सरकार नियुक्त नबाब मरण पावले असून सर्व सत्ता अलीवर्दीने बळकावली आहे. तसेच मृत नबाबांची मालमत्ता तो सरकार दरबारी रुजू करत नाही व याक्षणी तो शत्रूशी -- रघुजी भोसल्यासोबत झगड्यात गुंतल्यामुळे अयोध्येचा नबाब सफदरजंग याच्या करवी आपण अलीवर्दीने बळकावलेले प्रांत पुन्हा ताब्यात घेऊ शकतो.

याच सुमारास रघुजीच्या आक्रमणाने त्रस्त होऊन अलीवर्दीने दिल्ली दरबारकडे मदतीची मागणी केली होती. चालून आलेल्या संधीचा फायदा उचलण्याच्या बुद्धीने बादशहा महमदशहाने सफदरजंगास बिहार - बंगाल प्रांती जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार सफदरजंग डिसें. १७४२ मध्ये पाटण्यास पोहोचला. मात्र नानासाहेब पेशवा देखील याच काळात अलीवर्दीखानाच्या मदतीसाठी बुंदेलखंडातून तसाच पुढे बिहारकडे येत असल्याचे समजताच सफदरजंग स. १७४३ जानेवारी पूर्वार्धात आपल्या प्रांतात परतला. {७}


नागपूरकर भोसल्यांना बंगालमध्ये शह देण्यासाठी नानासाहेब पेशवा संधी शोधत होता. ती त्यांस स. १७४२ च्या उत्तरार्धात मिळाली. रघुजीच्या फौजांचे दडपण वाढू लागल्यावर अलीवर्दीखानाने बादशहाकडे मदतीची मागणी केली व बादशाहने याकामी पेशव्याची योजना केली. {८}


यानुसार पेशवा बंगाल प्रांतात शिरला. दि. ३१ मार्च १७४३ रोजी बऱ्हामपूर जवळ प्लासीच्या निकट अलीवर्दीसोबत पेशव्याची भेट होऊन उभयतां दरम्यान तहनामा झाला. त्यानुसार :- (१) अलीवर्दीने छ. शाहूला वार्षिक चौथाई देणे व

(२) पेशव्याला लष्करी खर्चाकरता बावीस लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. बदल्यात (३) रघुजी भोसल्यास बंगाल स्वारीपासून रोखण्याची जबाबदारी पेशव्याने घ्यावी असे ठरले. {९}


तहनामा झाल्यावर लगेचच अंमलबजावणीस सुरुवात झाली. रघुजी भोसले यावेळी बंगाल स्वारीवर असून त्याचा मुक्काम नजीकच कटवा - बरद्वान दरम्यान होता. पेशवा आणि अलीवर्दीचे जोडसैन्य आपल्यावर चालून येत असल्याचे  समजताच त्याने बिरभूमकडे माघार आरंभली. तेव्हा पेशव्याने अलीवर्दीच्या सैन्याशी फारकत घेत वेगाने रघुजीचा पाठलाग करत त्यास बेंडूच्या घाटात गाठले. त्याच्या सैन्याचा पराभव करून लुटले. रघुजीला बंगालमधून पिटुन काढल्यावर पेशवा गयेस गेला. तिथे धार्मिक विधी करून त्याने पुण्यास प्रयाण केले. {१०}


रघुजी - पेशवा युद्धाचे पडसाद सातार दरबारात उमटले.छ. शाहूने पेशवे - रघुजी दरम्यान चौथाई वसुली क्षेत्राची विभागणी केली, ज्यान्वये – माळवा, आग्रा, अजमेर, अलाहाबाद पेशव्याकडे तर ओरिसा, बंगाल, अयोध्या रघुजी भोसल्याकडे नेमून देण्यात आले. खेरीज बिहार सुभ्याची दोघांमध्ये वाटणी होऊन टिकारी, भोजपुर हे दोन सालीना बारा लाख उत्पन्नाचे प्रांत पेशव्याच्या वाटणीस आले तर उर्वरित बिहार रघुजीकडे सोपवण्यात आला. {११}

 

छ. शाहूने पेशवा - नागपूरकर भोसल्यांत समझोता घडवून आणला त्यामुळे तांत्रिक आणि व्यावहारिकदृष्ट्या घोटाळेच माजले. 

कारण – (१) चौथाई - सरदेशमुखी तहान्वये छ. शाहू हा बादशाहचा मांडलिक असून त्याचे स्थान दख्खन सुभेदाराच्या हाताखाली होते. (२) माळव्याची नायब तथा दुय्यम सुभेदारी मिळाल्याने लौकिकात पेशवा हा छत्रपतींपेक्षा अधिकारपदाने मोठा ठरतो. (३) रघुजी भोसल्याने एकप्रकारे छ. शाहूच्या संमतीने बंगाल मोहीम हाती घेतली होती. (४) पेशवा, बादशाही आज्ञेने बंगाल नवाबाच्या बचावार्थ रघुजी भोसल्याविरुद्ध चालून गेला होता. (५) याकरता बंगाल नवाब पेशव्याला युद्धखर्च म्हणून बावीस लाख रोख रक्कम व छ. शाहूला बंगाल सुभ्यातून चौथाई देण्यास तयार होता. (६) शाहूने आपल्या अधिकारांत पेशव्यास बिहार मधील दोन प्रांतांतून चौथाई वसुलीचे अधिकार दिले. ज्यांस बादशाहची पण मान्यता दिसते. {१२}

परंतु प्रश्न उपस्थित झाला तो बंगाल सुभ्याच्या चौथाई बद्दल. बादशाह व अलीवर्दीने चौथाई छ. शाहूस दिली असली तरी वसुलीचे अधिकार पेशव्यास दिले होते. व ते देखील रघुजी भोसल्याचा त्या प्रांतांना होणारा उपद्रव रोखण्यासाठी. मात्र 

शाहूच्या योजनेने बंगाल व इतर सुभ्यांचे संरक्षण बाजूला राहून फक्त मराठी सरदारांकरता लुटीचे राखीव क्षेत्र असेच स्वरूप बनले. अलीवर्दीने पुढे भोसल्यांच्या भास्कररामास भेटीस बोलावून दग्याने मारले, त्यांस शाहूचे हे अदूरदर्शी धोरण काही अंशी कारणीभूत ठरले असे निःसंशयाने म्हणता येते. 

(७) उपलब्ध पुराव्यांवरून खुद्द पेशव्याला देखील हा समझोता मनापासून मान्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रघुजीच्या बंगाल संबंधी हालचालीं विषयक माहिती घेत त्यांस शक्य झाल्यास अटकाव करण्याच्या उपाययोजनाही तो आखत असल्याचे दिसून येते. या संदर्भात पु. द. भाग १, ले. क्र. १५९ हा अत्यंत महत्वाचा आहे. संपादकांना याची तारीख निश्चित करता आली नसली तरी प्रत्यंतर पुराव्यांवरून सदर लेखांक हा स. १७४६ अखेरचा – सदाशिवरावाच्या प्रथम कर्नाटक स्वारीआधीचा असल्याचे दिसून येते. ज्यानुसार रघुजी विरुद्ध अलीवर्दीस भर देत त्यांस चौथाई न देण्याचा तसेच प्रसंग पडल्यास अलीवर्दीला भोसल्याविरुद्ध लष्करी मदत करण्याचा पेशवेबंधूंचा मानस असल्याचे दिसून येते. यासंबंधी शिं. इ. सा. भाग १, ले. ५९ अत्यंत महत्वाचा आहे. सदर लेखांक दि. २९ एप्रिल १७४७ रोजीचा असून यामध्ये जयाजी शिंदे कोट्याच्या बाळाजी यशवंतास लिहितो की, ' आमचे वर्तमान तरी बगाले प्राते जावयाचे प्रयोजन नाहीसारखे जाले. त्या प्राते फौज कोणाची न गेली म्हणून माघारे फिरोन बघेलखडातून दरमजलीने उजेनीकडे येत असो '

याचे कारण असे दिसते की, अलीवर्दीने रघुजीच्या मुलाला – जानोजी भोसल्यास पराभूत करून माघार घेण्यास भाग पाडले होते. {१३}



स. १७४७ नंतर नानासाहेब पेशव्याचे बंगाल विषयक धोरण :-  स. १७४७ पासून नानासाहेब पेशव्याच्या बंगाल तसेच समस्त हिंदुस्थान विषयक धोरणात बदल झालेला दिसून येतो. यामागील तात्कालिक कारणे अनेक असली तरी मुख्य फक्त तीन आहेत, ती म्हणजे – (अ) स. १७४७ च्या पूर्वार्धात छ. शाहूने नानासाहेबाची पेशवेपदावरून केलेली हकालपट्टी ** (ब) दि. २१ मे १७४८ रोजी हैद्राबाद संस्थान संस्थापक व दख्खन सुभेदार चीन किलीचखान निजाम उल्मुल्क याचा झालेला मृत्यू आणि (क) दि. १५ डिसें. १७४९ रोजी छ. शाहूचे निधन.



** तळटीप :- बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाचे स्वार्थी राजकारण, राज्याचे कर्ज फेडण्यातील अपयशादी कारणांमुळे स. १७४७ च्या पूर्वार्धात काही काळ छ. शाहूने त्यांस पेशवेपदावरून दूर केले होते, जे त्याने प्रथम नम्रतेने वागून व नंतर लष्करी बळाचा धाक दाखवून परत मिळवले. ( संदर्भ :- मराठी रियासत खंड ४, पृ. क्र. १४७ ते १५६ )




या सलग तीन वर्षांत घडलेल्या मुख्य तीन घटनांनी – विशेषतः छ. शाहूचे निधन व त्यानंतरची सातार दरबारातील राज्यक्रांती, पेशव्यास सर्वाधिकार प्राप्ती व त्याची आसन स्थिरता यामध्ये स. १७५२ चा सप्टेंबर उजाडला. त्यानंतर निरंकुश पेशव्याने बंगाल प्रकरण निकाली काढण्याचे योजले.

याकरता त्याने आपल्या धाकट्या बंधूची – रघुनाथरावाची योजना केली. रघुनाथराव उर्फ दादासाहेबाच्या प्रथम हिंदुस्थान स्वारीत, त्याने अलीवर्दीकडे मागील तीन वर्षे थकलेल्या चौथाईची मागणी केली. प्रकरण रघुजी भोसल्याकडे जाताच त्याने याबद्दल रघुनाथरावाच्या वर्तनाचा निषेध पत्राद्वारे पुण्यास सदाशिवरावाकडे व्यक्त केला व सोबत रघुनाथरावास अशा कृत्यापासून परावृत्त करण्याची मागणीही केली. {१४}


रघुनाथरावाच्या मागणीचा शेवट काय झाला हे समजायला मार्ग नसला तरी दि. १४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजी भोसलेच्या मृत्यूनंतर पेशव्यास नागपूरकरांवर आपला शह बसवण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या पश्चात धाकट्या स्त्रीचा परंतु सर्वात जेष्ठ मुलगा जानोजी गादीवर यावा अशी रघुजीची इच्छा असून तसे त्याने पेशव्यासही कळवले होते. परंतु रघुजीच्या इतर मुलांस – विशेषतः प्रथम पत्नीचा मुलगा मुधोजी यांस – ही व्यवस्था मंजूर नव्हती. भावांभावंतील हा तंटा निर्णयासाठी पेशव्याकडे आला. ज्याचा निकाल दोन वर्षांनी लागला.


 दरम्यान स. १७५६ मध्ये अलीवर्दीखान मरण पावल्यावर त्याच्या जागी खानाचा नातू सिराजउद्दौला बंगालच्या नबाबीवर आला. सिराज व बंगालच्या इंग्रजांचा तंटा याच सुमारास विकोपास जाऊन दि. २३ जून १७५७ रोजी प्लासी येथे इंग्रजांनी सिराजचा पराभव केला. हा तोच काळ आहे, ज्यावेळी अब्दाली हिंदुस्थानात लुटालूट करून मायदेशी परतला होता तर रघुनाथराव आणि होळकर दिल्लीच्या वाटेवर होते.


 विस्तारभयास्तव बंगालमधील इंग्रज तसेच पेशव्याच्या राजकारणासंबंधी फारसे विवेचन करत नाही. फक्त मुख्य मुद्द्यांचा येथे निर्देश करत प्रकरण आटोपते घेतो ** :- 

(१) दख्खनमध्ये हैद्राबाद संस्थान संस्थापक निजामाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये वारसा हक्कासाठी संघर्ष झाले. ज्यामध्ये फ्रेंचांचे निजामदरबारी वजन वाढले. 

(२) निजाम दरबार तसेच कर्नाटकीय राजकारणातील फ्रेंचांचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन पेशव्याने इंग्रजांना जवळ केले. 

(३) स. १७५५ च्या आरंभी, पेशव्याने तुळाजी आंग्र्याविरुद्ध इंग्रजांची मदत घेतली.

(४) दि. १२ फेब्रु. १७५६ रोजी पेशवा - इंग्रजांच्या संयुक्त चढाईत विजयदुर्गाचा पाडाव होऊन आंग्र्यांचे आरमार जळून खाक झाले. 

(५) सहेतुक असो वा कसेही, दोन वर्षे भोसले बंधूंना दख्खनमध्ये गुंतवून ठेवत एकप्रकारे पेशव्याने बंगालमधील राज्यक्रांतीत इंग्रजांना अप्रत्यक्षपणे मदत केली.

(६) ज्याप्रमाणे कर्नाटक प्रांतातील, सातार दरबारमधील प्रतिस्पर्ध्यांना बाहेर काढण्या व तो प्रांत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नानासाहेब पेशव्याने निजामाचा वापर केला ; तसाच काहीसा प्रकार त्याने बंगाल प्रांतासाठी योजला.

(७) काशी, प्रयाग ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश नानासाहेब पेशव्याने रघुनाथरावास, त्याच्या प्रथम हिंदुस्थान स्वारीत दिले होते.

(८) रघुनाथरावाच्या दुसऱ्या हिंदुस्थान स्वारीत देखील त्याने दिल्लीच्या भानगडीत न पडता बंगाल स्वारी हाती घ्यावी अशी पेशव्याची आज्ञा होती. विशेष म्हणजे याच काळात नुकतीच प्लासीची लढाई घडून आली होती.

(९) दत्ताजी व जनकोजी शिंदे शुक्रताली जाण्याच्या मुळाशी देखील बंगाल स्वारीच असल्याचे उपलब्ध साधनांवरून स्पष्ट होते.

(१०) स. १७५९ अखेर वा स. १७६० च्या आरंभी रघुनाथराव शिंद्यांच्या मदतीला बंगाल स्वारीकरता जाणार होता परंतु आयत्या वेळी सदाशिवरावाची योजना करण्यात आली.

(११) अब्दालीचा मुकाबला करणे हा मुळात हेतूच नसल्यामुळे सदाशिवराव उर्फ भाऊसाहेबाने मोहीम कूर्मगतीने चालवली.

(१२) पानिपतचा अकल्पित फटका व नादुरुस्त प्रकृती, यांमुळे नानासाहेब पेशव्याची बंगाल मोहीम गुंडाळली जाऊन भविष्यात अशी स्वारी होण्याचा संभव देखील राहिला नाही.

(१३) बंगाल प्रकरणी नानासाहेब पेशवा आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या उद्दिष्टांमधील फरकही लक्षात घेणे आवश्यक आहे. पेशव्याला बिहार - बंगालचे आकर्षण तेथून होणारी द्रव्यप्राप्ती व राज्यविस्तार इथपर्यंत मर्यादित होते. त्याउलट इंग्रजांना द्रव्य तसेच प्रादेशिक लोभाखेरीज मुख्य आकर्षण होते बिहार मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होणाऱ्या सोऱ्याचे. त्यापासून बनल्या जाणाऱ्या दारुगोळ्याने त्यांच्या तोफा - बंदुका, पर्यायाने सैन्य अजिंक्य ठरणार होते. सारांश, नानासाहेब पेशव्याकडे राज्यकर्त्याचे धोरण तरी कितपत होते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.



** सदर कलमासाठी संदर्भ ग्रंथ :- 

१) पेशवा-इंग्रज संबंध तसेच कर्नाटकचे राजकारण यासाठी :- मराठी रियासत खंड ४, ब्रिटिश रियासत खंड १

२) पेशव्यांच्या स्वार्थी राजकारणाच्या चर्चेसाठी :- निजाम-पेशवे संबंध

३) स. १७५० नंतर पेशव्याच्या बंगाल-बिहार संबंधी राजकारण व स्वारीकरता :- शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ३, ले. क्र. ५९,६१,६२,९०,९४,९६,९७,९८,९९,१००,१०१,१०२,१०५,११२ इ.




संदर्भ ग्रंथ :- 

१) मालवा में युगान्तर :- पृ. क्र. २९९ - ३०२


२) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६३ तळटीप क्र. २


३) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ११० - १११


४) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ४६ - ४७


५) उक्त :- पृ. क्र. ९७ व १०५


६) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ६० - ६३


७) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ५८


८) उक्त :- पृ. क्र. ५८ ; तसेच पे. द. १५, पृ. क्र. ८९


९) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६० तसेच पृ. क्र. ६० ६१ वरील तळटीप


१०) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ६६ - ६९ ; तसेच मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६१


११) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६३ 


१२) उक्त :- पृ. क्र. ७६


१३) उक्त :- पृ. क्र. ८१ - ८२


१४) उक्त :- पृ. क्र. १०१










1 टिप्पणी:

deom म्हणाले...

उत्तम विश्लेषण !