गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

पानिपत असे घडले


              
पानिपत असे घडले


       ' पानिपत असे घडले ' या ग्रंथात पानिपत विषयी मी नव्याने काय संशोधन मांडले आहे याची चर्चा या ठिकाणी करता येणे शक्य नाही. मात्र पानिपतच्या युद्धाविषयी प्रस्तुत ग्रंथात वाचकांना नवीन काय वाचावयास मिळेल याची या ठिकाणी ग्रंथातील उतारांच्या सहाय्याने थोडीशी तोंड ओळख करून देत आहे, तसेच या ग्रंथाच्या ebook ची तसेच हार्ड कॉपीच्या ऑनलाईन खरेदीसाठीची लिंक देखील सोबत जोडण्यात आली आहे.  

 
          पानिपतावर मराठे हरले, हे कोणीचं अमान्य करत नाही, पण पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याऐवजी बव्हंशी मराठे हे शाकाहारी होते, त्यांच्या अंगावर गिलच्यांप्रमाणे चामड्याची जाड जाकिटे नव्हती किंवा अंगी चिलखत नव्हते अशा तऱ्हेची फालतू कारणे सांगून आपल्या इतिहासकारांनी, स्वतःच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून दिले आहे. युद्धातील विजयाची किंवा घटनांमागची कारणे याच कोटीक्रमाने शोधायची म्हटल्यास, मग असेही म्हणता येते कि, अताईखान हा शुद्ध शाकाहारी होता ! पानिपतच्या युद्धात मारले गेलेले सर्व अफगाण हे ' उघड्या पाठीचे ' होते !! आहार - पोशाख हि जर मराठ्यांच्या पराभवाची कारणे आहेत, तर हीच कारणे / हेच नियम अब्दालीच्या बाजूने लढून मृत्यू पावणाऱ्या लोकांना लावता येऊ शकतात. एवढी हिंमत आमच्या विद्वान इतिहासकारांमध्ये आहे का ? सारांश, खाण - पान अथवा वस्त्रे यांच्या माध्यमातून एखाद्या समुदायाच्या संस्कृतीचा मागोवा घेता येतो पण युद्धातील पराभवाच्या कारणांचा आढावा घेता येत नाही.

भाऊने अब्दालीशी तह केला नाही किंवा योग्यवेळी त्याने लढाईचा निर्णय घेतला नाही म्हणून सर्व इतिहासकार त्याला गर्विष्ठ, घमेंडी, दुराग्रही, हट्टी इ. विशेषणांनी संबोधतात. वास्तविक हि दुषणे इतर ठिकाणी किंवा प्रसंगी म्हणा, अयोग्य अशीच आहेत. परंतु, पानिपत युद्धाच्या संदर्भात जर बोलायचे झाले तर हि विशेषणे भाऊसाठी योग्य अशीच आहेत !! पानिपतचे युद्ध चालू झाल्यावर त्याने आपला दुराग्रह जर बाजूला ठेवला असता तर अंती परिणाम निश्चित वेगळा झाला असता असे म्हणता येईल. भाऊचा मुख्य उद्देश म्हणजे, अब्दालीसोबत निर्णायक युद्ध टाळून, किरकोळ झुंजी देत यमुनेकडे निघून जाणे हा होय ! निर्णायक युद्ध न करता लढाई देत यमुनेकडे जायचे असल्यामुळे, लष्करी गोलाची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोलाच्या रचनेत, आपल्या सैन्यातील घोडदळाचा मोठा भरणा लक्षात घेऊन, जरुरीपुरते काही बदल करण्यात आले. त्यानुसार, शत्रू सैन्य गोलाच्या नजीक आल्यास, गोलाच्या त्या बाजूला उभ्या असलेल्या सरदाराने गोलातून बाहेर पडून शत्रू सैन्याला सडकून काढावे आणि परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहावे असे ठरवण्यात आले. याचा परिणाम म्हणजे, शहावलीचा पराभव झाला आहे व त्याचे सैन्य पळत सुटले आहे हे पाहून देखील हुजुरातीचे सरदार परत मागे फिरले. कारण ; शत्रू सैन्याला पळवून लावण्याचे मुख्य काम त्यांनी बजावले होते. आता काही काळापुरता तरी त्यांचा मार्ग निर्धोक राहणार होता.

        
पानिपत युद्धातील भाऊच्या दुराग्रही किंवा नानासाहेब पेशवा आपल्या पत्रात लिहितो त्यानुसार, ' आधी उगीच कुतर्क करावा हा भाऊचा जातिस्वभाव ' असल्याने त्याचा व मराठी सैन्याचा अंती घात झाला !! आपल्या लष्कराच्या कार्यक्षमतेवर त्याचा पुरेपूर विश्वास होता. आपली फौज गिलच्यांना भारी आहे हे त्याला माहिती होते. इथपर्यंत त्याचा तर्क ठीक होता असे म्हणता येईल, परंतु त्याचबरोबर गोलाच्या रचनेचा वापर करून, शत्रूचे निर्णायक हल्ले परतवून लावत, एकप्रकारे आक्रमण - बचाव अशी संमिश्र लढाई खेळत आपण यमुना गाठू हा त्याचा कुतर्क म्हणता येईल.  


मराठ्यांकडे जसे दारूचे बाण होते, तसेच नजीबकडे देखील असल्याचा उल्लेख मिळतो. एकावेळी तो हजार - हजार बाणांचा मारा करत असे. या बाणांच्या दणदणाटाने ' आकाश आणि पृथ्वी दिसेनाशी होत आणि कान फुटून जात ' अशी माहिती काशीराज आपल्या बखरीत देतो. मराठ्यांनी त्या दिवशी शत्रूवर चाल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण या बाणांच्या माऱ्यापुढे त्यांचे काहीएक चालले नाही अशा आशयाचे विधान काशीराज आपल्या बखरीत करतो. शेजवलकरांचे देखील जवळपास असेच मत आहे...... ...... ...... ......
प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, हुजुरातीकडे  अशा बाणांचा साठा असून देखील अफगाण सैन्याला ते फारसे त्रस्त करू शकले नाहीत. याचा अर्थ, या बाणांचा विशेष असा फायदा हुजुरातीला मिळाला नाही. त्याचप्रमाणे, काशीराज किंवा शेजवलकर म्हणतात त्यानुसार दारूच्या बाणांचा नजीबला काही विशेष फायदा मिळाला असे म्हणता येत नाही. तसेच, नजीबने मुक्तहस्ताने केलेल्या या बाणांच्या वापरामुळे शिंदे - होळकरांना त्याच्यावर आक्रमण करता आले नाही हे देखील साफ खोटे आहे.  मुळात शत्रू सैन्य व शिंदे - होळकरांच्या फौजा समोरासमोर म्हणजे दोन - तीन किलोमीटर्स अंतरावर समोरासमोर आल्या त्याच मुळी दुपारी दोनच्या सुमारास.

 
विश्वासराव हा हुजुरातीचा नामधारी का होईना पण प्रमुख नेता असल्याने फारतर हुजुरातीच्या सैन्याचा धीर खचला, अशा आशयाच्या विधानावर एकवेळ भरवसा ठेवता येऊ शकतो पण विश्वासरावाच्या मृत्यूमुळे सबंध मराठी सैन्याने कच खाल्ली हे विधान चुकीचे आहे. उलट, विश्वासराव मेला आहे हे समजूनसुद्धा मराठी पथके रणभूमीवरून रेसभरसुद्धा मागे हटली नाहीत ! कदाचित यावर असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो कि, भाऊ रणात हजर असल्यामुळे विश्वासराव मेला तरी मराठी सैन्य लढले. पण अशा तऱ्हेच्या युक्तिवादात काही दम नाही. कारण ; मग भाऊ जिवंत असतानाचं मराठी लष्कर पळत सुटले होते, त्याचे कारण काय असावे ?  

  
होळकरासमोर नजीबच्या सैन्याचे मोर्चे असल्यामुळे लढाई न करता होळकर पळून गेला अशा आशयाची कित्येक विधाने आधुनिक इतिहासकारांनी पानिपतच्या लढाईसंदर्भात लेखन करताना, मल्हाररावाविषयी लिहिलेली आहेत. अर्थात, होळकराविषयी असलेला हा गैरसमज केवळ आजचा नसून त्यावेळी देखील तत्कालीन लोकांच्या मनात होता हे फारसी बखरींवरून लक्षात येते. .... ....... ....  होळकाराने पानिपतच्या लढाईत सक्रीय सहभाग घेतला होता. तो जर लढला नसता तर चार - साडेचारच्या दरम्यानचं अब्दालीच्या डाव्या आघाडीवरील पथके हुजुरातीच्या उजव्या कुशीवर येऊन आदळली असती ! परंतु, या मुद्द्याकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ...... ...... नजीबने होळकरास पळून जाण्यासाठी वाट दिली असे मान्य केले तर मग प्रश्न असा उद्भवतो कि, नजीबच्या डाव्या बाजूला असलेल्या शहापसंदखान, मुल्ला सरदार रोहिला या दोघांनी होळकरास सहजासहजी कसे जाऊ दिले ? ........... ........
पानिपतच्या लढाईमध्ये आणि पानिपत घडून गेल्यावर देखील कित्येकदा होळकर व नजीब एकमेकांच्या विरोधात लढल्याचे इतिहासकारांनीचं नमूद केलेले आहे. हे लक्षात घेता, पानिपतावर होळकर - नजीब एकमेकांविरुद्ध अजिबात लढले नाहीत असे म्हणणे एकदम चुकीचे आहे, होळकरावर अन्याय करणारे आहे ! 


पवारांची फौज पळून जात असल्याचे दृश्य नजरेस पडतांच, इतर सरदारांच्या  फौजेची हिंमत खचली. विपरीत प्रसंग पाहून विंचूरकर, गायकवाड व माणकेश्वर यांनी लढाई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. या क्षणी माघार घेणे हेच श्रेयस्कर असे त्यांचे मत बनले. त्यानुसार गोलाच्या मधून हे सरदार आपापल्या निवडक लोकांसह पानिपतच्या दिशेने सटकले. या सरदारांनी पाच – सव्वापाचच्या  आसपास डावी बाजू सोडली असावी. गोलाच्या डाव्या बाजूचे सरदार निघून गेल्यावर मराठी लष्कराची गळती सुरु झाली. या सरदारांपासून प्रेरणा घेऊन भाऊच्या खास वर्तुळातील नाना पुरंदरे लढाई सोडून निघून गेला. नाना पुरंदरे साधारण साडेपाचच्या आसपास होळकरांच्या मोर्च्याजवळ पोहोचला. यावेळी मल्हारराव होळकर लढाई सोडून निघाला होता किंवा निघण्याच्या तयारीत होता. नाना पुरंदरे निघून गेल्यावर काही मिनिटांनी नाना फडणीसने देखील आपल्या घोड्याचे तोंड पानिपतकडे वळवले.    


भाऊच्या सोबत, म्हणजे जवळपास यावेळी समशेरबहाद्दर, जनकोजी शिंदे व संताजी वाघ हे व आणखी काही प्रमुख सरदार होते. या सरदारांची व भाऊची प्रत्यक्ष भेट घडून आली असल्याचा किंवा अशी भेट घडली नसल्याचा देखील पुरावा आता उपलब्ध नाही व भविष्यात अशा प्रकारचा पुरावा उपलब्ध होण्याची शक्यता अजिबात नाही. परंतु, तर्काच्या आधारे असे म्हणता येते कि, या सरदारांपैकी काहींची भाऊसोबत गाठभेट घडून आली होती व सरदारांच्या सल्ल्याने भाऊने लढाई सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.




या अखेरच्या गुद्दगुद्दीत, झीटीस आलेले मुसलमान व जीवावर उदार झालेले मराठे एकमेकांवर निकराने तुटून पडले. या भयंकर गोंधळातचं सदाशिवरावभाऊ अडकला होता. बाहेर निसटून जायचे सर्व मार्ग आता बंद झाले होते. आजूबाजूला असलेल्या मराठी सैनिकांची संख्या वेगाने घटू लागली होती. आता आपल्या निसटून जाता येणार नाही हे भाऊने ओळखले. आल्या परिस्थितीला सामोरे जाण्याखेरीज आपल्या हाती काही नाही हे ओळखून मराठ्यांचा हा हट्टी, गर्विष्ठ, घमेंडी सेनापती मोठ्या धैर्याने मृत्यूला समोर गेला. यावेळी पानिपत येथे सूर्यास्त होऊन गेला होता !





http://www.bookganga.com/eBooks/Book/4900400902881415755.htm 

 http://www.sahyadribooks.org/books/PanipatAseGhadle.aspx?bid=829



८ टिप्पण्या:

deom म्हणाले...

संजय, अनेकवार अभिनंदन या विषयावर जे आपण लिखाण त्यासाठी. खरे तर फार उपकार आहेत तुमचे माराठीजनांवर.

जसे विजयाचे श्रेय सेनापतीला दिले जाते, तसे पराजयासाठीहि तोच जवाबदार असतो. "हातघाईच्या लढाईत मराठे सर्वांचे बाप आहेत" हे खुद्द ब्रिटीशानीही मानले, आणि हाच सल्ला त्यांनी इतरानाही दिला. मराठे हरले ते केवळ त्यांच्या सेनापतींच्या चुकामुळे. पानिपत या विषयात हेच नेमके टाळले गेले आणि मग कल्पनातील कारणे शोधली गेली. कल्पनेतील कहाण्या रचण्यात आल्या.

यामुळे झाले असे, पानिपत पराभवामुळे मराठे जेवढे दबले नसतील त्यापेकश्या ते या अनामिक भीतीमुळे पार ढेपाळले. आपली एक पूर्ण शोर्यावान पिढी पानिपतावर गारद झाली, पुढची पिढी बापाविना, पानिपतच्या बागुलाबोव्याखाली वाढली. शोर्याचा वारसा जणू नाहीसा झाला. पण इतिहास संशोधन करणार्यांना याचे काय, त्यांनी तर कोन एकाचा कैवार घेऊन लिखाण केले.

या पार्श्वभूमीवर तुमचे लिखाण तेजाने तळपत आहे. तुम्ही असे लिखाण पुढे चालू द्यावे हीच श्रीं चरणी प्रार्थना.

sanjay kshirsagar म्हणाले...

deom,
आपल्या मतांशी मी सहमत आहे. जर विजयाचे श्रेय सेनापतीला द्यायचे असते तर पराभवासाठी देखील त्यास जबाबदार धरले पाहिजे. या ठिकाणी एका प्रोफेशनल सेनानीचा पार्ट टाईम सेनापतीसोबत सामना घडून आला. परंतु असे असले तर युद्धासारख्या प्रसंगी निर्णय घेण्यात जो चुकला तो हरणार हे निश्चित असते आणि भाऊने प्रत्यक्ष युद्ध सुरु असताना काही चुका केल्यामुळे मराठी सैन्यास पराभूत व्हावे लागले हे उघड आहे. भाऊचा प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षा तडफदार होता, मराठी सैन्यात शिस्त नव्हती, गिलचे धिप्पाड आणि मांसाहारी होते इ. कारणांखाली पानिपतच्या पराभवाची बरीचशी खरी कारणे लपवण्यात आली. असो, या कारणांचा शोध घेण्याचा मी जो प्रयत्न केला त्यात मी पूर्णतः यशस्वी झालोय असे म्हणत नाही. माझ्या या निष्कर्षांच्या आधारे नव्या दमाचे संशोधक अंतिम सत्यापर्यंत पोहोचतील अशी मला आशा आहे. मी फक्त वाटाड्याची भूमिका बजावली !

Harshad Vaidya म्हणाले...

pan mag bhausaheb chukale tar tyanni nemkya kontya chuka kelya
v tasech panipat kadambarit jo ullekh kela ahe tyanusar holkar v shindyanche diwan he jar dehli viknyacha kat karat hote hi gosht kiti khari
raghunathrao yanchya bhausaheb yuddhat saras nasle tari rajkaran karnyat nakkich hushar hote ka
n tyaveli marathyanchya jya lokanni bhaunna madatach keli nhi ashya lonkacha kay

Harshad Vaidya म्हणाले...

pan mag bhausaheb chukale tar tyanni nemkya kontya chuka kelya
v tasech panipat kadambarit jo ullekh kela ahe tyanusar holkar v shindyanche diwan he jar dehli viknyacha kat karat hote hi gosht kiti khari
raghunathrao yanchya bhausaheb yuddhat saras nasle tari rajkaran karnyat nakkich hushar hote ka
n tyaveli marathyanchya jya lokanni bhaunna madatach keli nhi ashya lonkacha kay

"BETTER FOR TOMORROW" म्हणाले...

मल्हाररावांचे भाऊंनी का ऐकले नाही,त्यामुळेच पराभव झाला

"BETTER FOR TOMORROW" म्हणाले...

मल्हाररावांचे भाऊंनी का ऐकले नाही,त्यामुळेच पराभव झाला

सतीश भालेराव म्हणाले...

सदरचे पुस्तक कुठे मिळेल. कृपया मुंबईतील एखाद्या पुस्तक विक्रेता सुचवावा. धन्यवाद.

Unknown म्हणाले...

नजीबखान हा मल्हारराव होळकरांचा मानस पुत्र होता काय
असेल किंवा नसेल तरी असे का म्हंटल्या गेले आहे.