गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

पां. गो. रानडे लिखित ‘ नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्या ? ‘



       स. १९४४ साली पांडुरंग गोपाळ रानडे यांनी ‘ नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्या ?’ नावाचा पाठपोठ असा सुमारे तेराशे पृष्ठांचा ग्रंथ लिहून तत्कालीन इतिहास संशोधकांत आणि अभ्यासकांत कमालीची खळबळ माजवली होती. या ग्रंथाची दखल खुद्द आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्रात घेतली तर होतीच पण याविषयी आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांनी नोंद केलेली आहे.
  रानडे यांनी लिहिलेला हा ग्रंथ नुकताच माझ्या वाचनात आला. अलीकडे ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात जुन्या दुर्मिळ ग्रंथांच्या ( भावी इतिहास संशोधक व लेखकांच्यासाठी महत्त्वाची सूचना, इतिहासाचे कोणतेही पुस्तक – मग ते १० पानी असो कि १००० पानी – त्यास नेहमी ग्रंथच म्हणावे. यामुळे होणारे फायदे सुज्ञांस सांगणे न लगे !) अभ्यासासाठी सध्या मी जात असतो. ( ‘ तू कुठे का जाईनास ? आम्हांला त्याचे काय ?’ हा प्रश्न वाचकांच्या मनी पडला आहे हे मी ओळखले आहे !) त्यावेळी सर्वप्रथम याच ग्रंथाचे वाचन करण्याचा मी निर्णय घेतला.
  प्रस्तुत ग्रंथ जेव्हा वाचण्यास हाती घेतला तेव्हा यात काय आहे याची मला पुरेपूर कल्पना होती परंतु, प्रत्येक प्रकरणागणिक जसजसे वाचन पुढे होत गेले तसतसे आपल्याला सांगितलेला इतिहास आणि प्रत्यक्षातला इतिहास यात जमीन – अस्मानचा फरक असल्याचे दिसून आले. कोणताही वाचक कोणत्याही लेखकाच्या मतांशी १००% सहमत नसतो. ( व्वा ! काय वाक्य जमले आहे राव !!)  हा नियम या ग्रंथास देखील लागू आहे पण याचा अर्थ असा नाही कि, या ग्रंथातील सर्वच लेखन त्याज्य असे आहे. सर्वप्रथम या ग्रंथाची जी प्रमुख वैशिष्ट्ये मला आढळली ती याठिकाणी नमूद करतो.
१)    या ग्रंथाला श्री. श्रीधर बळवंत नगरकर यांची जवळपास १०० पानांची प्रस्तावना लाभली आहे.
२)    प्रस्तावनेनंतर या ग्रंथास ७ मान्यवर व्यक्तींचे अभिप्राय जोडण्यात आले आहेत. पैकी पहिला अभिप्राय रियासतकार सरदेसाई यांचा असून तो ग्रंथास सर्वस्वी प्रतिकूल असा नाही हे विशेष !
३)    या ग्रंथास सुमारे ५५ संदर्भ ग्रंथांची यादी जोडण्यात आली आहे. पैकी ६ ग्रंथ इंग्रजी भाषेतील आहेत. उर्वरीत ४९ ग्रंथापैकी सुमारे ९ बखरी आहेत तर ९ ग्रंथ हे इतिहासकारच्या तर्कांना / अनुमांना आधार म्हणून वापरलेल्या आरोग्य, वैद्यक शास्त्रांशी संबंधित आहेत. राहता राहिले ३१ ग्रंथ तर, ते सर्व अव्वल दर्जाचे असून त्यांना त्याकाळी आणि आजही संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात आणले जात आहे. असा हा ग्रंथ सहजासहजी दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाही. तरीही स. १९४४ नंतर याची द्वितीयच काय पण कोणतीच आवृत्ती का निघाली नाही हा एक मोठा प्रश्नचं आहे. पण तो अनुत्तरीत नाही हे नशीब !

       ग्रंथाच्या नावावरून ग्रंथलेखनाचा मुख्य विषय काय आहे याची वाचकांना कल्पना येण्यासारखी आहे. या ग्रंथामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला कि त्यांनी आत्महत्या केली याची तपशीलवार आणि पुराव्यांच्या आधारे साधार अशी चर्चा करण्यात आली आहे. त्याखेरीज या निमित्ताने पेशवाई आणि पर्यायाने मराठी राज्याच्या विनाशाचीही चर्चा करण्यात आली असून याचे खापर नाना फडणीसवर फोडण्यात आले आहे. अर्थात, नाना फडणीसच्या तत्कलीन – म्हणजे रानडेंचा ग्रंथ प्रकाशित झाला त्या वेळचे – आणि आजच्या पाठीराख्यांना रानडेंचा हा निष्कर्ष अजिबात पटणार नाही हे मी जाणतो. परंतु, माझ्या मते सर्वचं पेशवेकालीन इतिहास ( ‘ स्वतःच्या ब्लॉगची प्रसिद्धी करतोयस काय बेट्या ? ‘ असाच प्रश्न तुमच्या मनात आला आहे ना ?) वाचक मंडळींनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा. कारण, स. १७६१ ते स. १८०० पर्यंतच्या पेशवे काळातील व घराण्यातील घडामोडी समजून घेण्यासाठी या ग्रंथाइतका माहितीपूर्ण असा दुसरा ग्रंथ अजून तरी माझ्या वाचनात आलेला नाही. शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशवे यांच्यातील संबंध, सांगोल्याच्या मोहिमेत पेशव्यांनी छत्रपतींच्या कडून अधिकारांचा घेतलेला राजीनामा, सदाशिवरावाचे तोतये व त्यामागील सत्य, सवाई माधवराव पेशव्याची आई - गंगाबाईचा मृत्यू, महादजी शिंदेचे निधन, नारायणराव पेशव्यास पकडण्याचा कट रचण्यात नाना फडणीससह सर्वच मुत्सद्दी कसे सहभागी होते याची आलेली माहिती, नारायणरावस पकडण्याचा कट रचण्यात आला त्यावेळी आनंदीबाई अथवा इतर कोणी ‘ध’ चा ‘मा’ केला होता कि नव्हता याची केलेली चर्चा, नारायणराव पेशव्याच्या खुनात रघुनाथराव खरोखर दोषी आहे कि नाही ? न्यायाधीश रामशास्त्र्यांनी नारायणरावच्या प्रकरणात खरोखर न्याय केला कि नाही ? परशुरामभाऊ पटवर्धनचा लढाईत मृत्यू झाला कि करवीरच्या छत्रपतींनी त्याची हत्या केली, सवाई माधवराव पेशवा तोल जाऊन गच्चीतून पडला कि त्याने आत्महत्या केली ? अशा अनेक गूढ आणि उघड घटनांचा रानडेंनी जो आढावा घेतला आहे तो खरोखर विस्मयकारक आहे. रानडेंनी ६० – ६५ वर्षांपूर्वी जे लेखनकार्य करून ठेवले आहे, त्या तोडीचे १% देखील इतिहासलेखन आजच्या घडीला कोणी करू शकेल असे वाटत नाही.  

३ टिप्पण्या:

Gamma Pailvan म्हणाले...

संजय क्षीरसागर,

जमल्यास तुम्ही या विषयाची ओळख करून द्यावी म्हणतोय. (सांगायला माझं काय जातंय म्हणा! ;-))

एक वेगळा दृष्टीकोन विकसित करता येईल. इतिहासातून शिकायचं असतं. शिकण्यासाठी बरीच सामुग्री सापडेलसे वाटते.

आपला नम्र,
-गामा पैलवान

sanjay kshirsagar म्हणाले...

गामा पैलवान साहेब, हा विषय माझ्या डोक्यात आहे पण अजून म्हणावी तशी साधन
सामुग्री उपलब्ध नसल्याने आणि या विषयावर लिहिण्याची आतून उर्मी अजून आली
नसल्याने हा टॉपिक पेंडिंग आहे.

Unknown म्हणाले...

संजय,
पां.गो.रानडे यांच्या(नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्त्या?) या पुस्तकाची द्वितीय आवृती निघाली पाहिजे.त्यासाठी संघटीत प्रयत्न झाला पाहिजे.त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे.
तात्या