शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

‘ पानिपत असे घडले ‘ मध्ये नेमके काय आहे ?

                                       


         अडीचशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची मराठी मनावर झालेली जखम अजूनही काही भरून आलेली नाही. अर्थात हे भावनेला हात घालणारे किंवा भावनिक आवाहन करणारे ठरीव ठशाचे वाक्य नसून एक वस्तुस्थिती आहे. विविध कारणांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी – गाठीचा योग येतो. इकडच्या तिकडच्या गप्पा करताना मराठी साहित्य हा विषय चर्चेला येऊन गाडी पानिपतवर येऊन अडखळते. श्री. विश्वास पाटील यांची ‘ पानिपत ‘ कादंबरी वाचली नाही वा तिचे नाव ऐकले नाही अशी उभ्या महाराष्ट्रात फार कमी माणसं असतील. पाटलांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला मराठी मनात व साहित्यात जे मानाचे स्थान आपल्या कादंबरीच्या रूपाने मिळवून दिले आहे, त्याबद्दल तमाम मराठी इतिहासप्रेमी मंडळी नेहमी त्यांचे ऋणी राहतील. याला मी देखील अपवाद नाही.
             नशीबाचा काय खेळ असतो माहिती नाही पण पाटलांच्या पानिपत कादंबरीने ‘ पानिपतच्या ‘ विषयाची मला तोंडओळख झाली आणि या विषयाने मी झपाटून गेलो. अर्थात, अठरा – वीस वर्षांपूर्वीच्या त्या काळात पानिपतने झपाटलेले असे कित्येक वेडे होते आणि आजही आहेत. परंतु, ज्या पानिपतवर मराठी भाषेत जे काही साहित्य उपलब्ध असेल ते हरप्रयत्ने मिळवून वाचण्याच्या वेडाने झपाटून गेलेला माझ्यासारखा – जगाच्या दृष्टीने अपंग – अशा वेड्या पीराने त्याच विषयावर लेखन करून त्याचे ग्रंथात रुपांतर करावे हा केवळ नशीबाचा खेळ वा परमेश्वरी कृपाच म्हणावी लागेल !
                   ‘ पानिपत असे घडले ‘ या ग्रंथाचे लेखन करण्यास मला किती वर्षे अभ्यास करावा लागला याची मी कधी नोंद ठेवली नाही. त्यामुळे अमुक इतक्या वर्षांनी संशोधन करून मी ‘ पानिपत असे घडले ‘ चे लेखन केले असे नक्की सांगू शकत नाही. बरे, यास इतिहास संशोधन म्हणावे तरी पंचाईत ! कारण, मोडी लिपीचा मला अभ्यास नाही. तेव्हा मान्यवर संशोधकांनी संशोधित करून प्रकाशित केलेल्या अस्सल पत्रांच्या अभ्यासावर माझी मुख्य मदार असल्याने मी नेमका संशोधक आहे की कथा – कादंबरीकार असा अनेक ‘ पढत पंडितांना ‘ प्रश्न पडला आहे. मी कधीच गटबाजीच्या फंदात पडलेलो नसल्याने मला  कोणत्या गटात ढकलायचे हे मी त्या गटबाजांवर सोडून देतो.
                पानिपत विषयावर लेखन पुष्कळजणांनी केले आहे. मात्र, अनेकदा मला असे आढळून आले आहे की, वाचकांना विश्वास पाटलांच्या पानिपत पलीकडे वा अलीकडे काही काही माहिती नसते. वैद्यांची ‘ दुर्देवी रंगू ‘ किंवा बापटांची ‘ पानपतची मोहीम ‘ तर आता फारशी कोणाच्या स्मरणातही नाही. शेजवलकरांचे ‘ पानिपत : १७६१ ‘ इंग्रजीच काय मराठीत पण वाचण्याची तसदी घेणारे असे किती महाभाग आज आहेत ? याचा परिणाम म्हणजे, कादंबरीकार विश्वास पाटलांना ‘ इतिहास संशोधकाचा ‘ दर्जा प्राप्त झाला आहे व त्यांची पानिपत कादंबरी हि कादंबरी न राहता तो एक संदर्भ साधनाचा ग्रंथ बनला आहे. आजपर्यंत खुद्द पाटलांनी आपली ‘ पानिपत ‘ हि एक कादंबरी आहे असेच म्हटले आहे, पण वाचकांनी त्यांचे हे म्हणणे अजूनही गंभीरपणे घेतले नाही. याला पाटील तरी काय करणार म्हणा ? वाचकांनी पाटलांच्या कादंबरीलाच संदर्भ ग्रंथाचा दर्जा दिल्याने त्यातून निर्माण होणारे जे गोंधळ आहेत त्यांचे निरसन कसे करायचे हा एक मोठा प्रश्नचं आहे.
        उदाहरणार्थ :- (१) पानिपतावर मराठ्यांची उपासमार झाली अशा आशयाची वर्णने काही बखरींमध्ये आढळून येतात. पाटील हे सिद्धहसत लेखक असल्याने त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने मराठ्यांची हि उपासमार अतिशय प्रभावीपणे रंगवली. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं ‘ उपाशी लोकांनी मृत जनावरांची हाडे दळून त्यांचे पीठ पाण्याबरोबर खाणे, झाडांचा पाला – मुळ्या चावून खाणे इ. ‘ गोष्टी वाचकांनी खऱ्या घडल्याचे मानून घेतले. आता यातून नेमका काय अर्थ निघतो याची कोणी कल्पना केली आहे का ? पाटलांनी दिलेलं उपासमारीचे वर्णन खरे मानले तर त्यावेळी पानिपतावर हजर असलेल्या स्पृश्य – अस्पृश्य व्यक्तींनी – त्यात पेशवे व त्यांचे ब्राम्हण सरदार आणि ब्रम्हवृंद मंडळी देखील आली –- अभक्ष्य भक्षण व ते देखील मृत जनावरांचे केले असेच सिद्ध होते.
(२) पानिपतच्या युद्धात पूर्वेकडे निघालेलं मराठी सैन्य थेट पूर्वेला न जाता आग्नेय दिशेला का वळालं याचे समाधानकारक उत्तर खुद्द शेजवलकर आपल्या पानिपत विषयक ग्रंथात देऊ शकले नाहीत. परंतु वाचकांना देखील अब्दालीच्या छावणीच्या जवळून जाण्याइतका भाऊ मूर्ख होता का असा प्रश्न सहसा पडला नाही. कारण, शेजवलकर हे प्रत्यक्ष पानिपतला भेट देऊन आले होते. मान्य आहे, शेजवलकरांनी पानिपतला भेट दिली होती, पण त्यावेळी काय पानिपतचे युद्ध सुरु होते का, कि ज्यामुळे शेजवलकरांना, भाऊ आग्नेय दिशेला अब्दालीच्या छावणीजवळून जात असल्याचे दिसून आले ?
(३) पानिपतच्या युद्धात लढाईच्या पूर्वार्धात मराठी सैन्याची डावी बाजू – अर्थात गारद्यांची पथके – अर्ध्याहून अधिक निकालात निघाली होती हे सर्वजण मान्य करतात. मग लढाईतून जेव्हा मराठी सरदारांनी माघार घेण्यास आरंभ केला तेव्हा त्यात गारद्यांच्या शेजारी असलेल्या विंचूरकर, गायकवाड यांच्यापेक्षा मल्हाररावाचा – जो मराठी सैन्याच्या उजव्या बगलेवर उभा होता, त्याचा – पहिला क्रमांक का लावला जातो ? प्रथम गायकवाड, विंचूरकर, पुरंदरे निघाले व नंतर होळकर निघून गेला हे अस्सल पत्रांमध्ये नमूद असताना देखील पानिपत युद्धातून होळकराने सर्वप्रथम माघार घेतली असे का सांगितले जाते ? बरे, होळकर निघाला असला तरी समोरचा शत्रू काय त्याला सुखासुखी जाऊ देणार होता का ? नजीबची व होळकराची मैत्री असली तरी नजीबच्या आजुबाजूला असलेले अफगाण सरदार होळकरास काय असाच जाऊ देणार होते ? शेजवलकरांनी हे प्रश्नच मुळी विचारात घेतले नाहीत व पाटील हे तर कादंबरीकार असल्याने त्यांना या चर्चेत शिरण्याचे काही प्रयोजनच नव्हते. त्यांनी मान्यवर इतिहास संशोधकांचे निष्कर्ष जमेस धरून होळकर भर दुपारी कसा पळून गेला याचे चित्रण केले. अर्थात, कादंबरीकार या नात्याने त्यांना इतिहासाशी वा ऐतिहासिक सत्याशी बांधून घेणे बंधनकारक आहे असे नाही. त्यामुळे त्यांना या बाबतीत दोष देणे चुकीचे आहे. पण त्यांची कादंबरी म्हणजेच खरं इतिहास असे मानणाऱ्या वाचकांना काय म्हणावे तेच समजत नाही.
(४) पानिपतावर लाख मराठा कापला गेला, लाख बांगडी फुटली असे नेहमी म्हटले जाते. प्रत्यक्षात, खरोखर एवढी माणसे मारली गेल्याचे कोणत्या अस्सल कागदपत्रात नमूद केलेलं आहे हे कोणी सांगेल का ?
(५) पानिपत युद्धातील पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब पेशवा मरण पावला हे एक विनोदी प्रकरण आहे. पानिपत घडून येण्यापूर्वीच पेशवा अतिशय आजारी असल्याचे उल्लेख असेलेली कित्येक पत्रे आजवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या मुद्द्याकडे वाचकांचे लक्ष वेधून घेण्याचा खुद्द शेजवलकरांनी देखील आटोकाट प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयशचं आले असे म्हणावे लागेल.
             या पानिपतशी प्रत्यक्ष संबंधित अशा गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्ष पानिपतपूर्व देखील अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
उदाहरणार्थ :- (१) बुराडी घाटचे प्रकरण झाल्यावर होळकराने अब्दालीला जेरीस आणून तह करण्यास भाग पाडले होते. या तहाची नोंद अनेक इतिहासकारांनी घेतली पण त्याचे महत्त्व मात्र कधी लक्षात घेतले नाही. शेजवलकरांनी तर या घटनेकडे अजिबात दुर्लक्ष केले व विश्वास पाटील हे कादंबरीकार असल्याने त्यांना घटनेचे महत्त्व फारसे वाटले नाही. अर्थात, कादंबरीकाराच्या दृष्टीने हा मुद्दा ग्राह्य धरला वा गाळला तर फारसा फरक पडत नाही म्हणा. त्यामुळे त्यांना दोष का द्यावा ?
(२) पानिपत मोहिमेवर दादाच्या ऐवजी भाऊची नेमणूक का करण्यात आली याविषयी कित्येकांनी विपुल चर्चा केली आहे व आजही केली जात आहे. मात्र, विश्वासरावाची या स्वारीवरील नियुक्ती हि पूर्वनियोजित होती याकडे फारसे कोणी लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
                सारांश, ‘ पानिपत असे घडले ‘ या माझ्या सुमारे साडेपाचशे पानी ग्रंथात या सर्व आणि इतर अनेक प्रश्नांची मी चर्चा उपलब्ध पुराव्यांच्या – संदर्भ साधने व अस्सल पत्रांच्या – आधारे केलेली आहे. या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैगुण्य असे म्हणता येईल की, या ग्रंथास संदर्भ ग्रंथांची सूची जोडण्यात आली नाही. परंतु, आज या घडीला असे कित्येक लेखक आहेत की, न वाचलेल्या / अभ्यासलेल्या ग्रंथांची नावे ते संदर्भ ग्रंथ सूचीत बेधडकपणे लिहून टाकतात. वाचक केवळ त्या ग्रंथांच्या यादीने दडपून जाऊन त्या लेखकाने केलेलं विधान प्रमाण मानतो. जर संदर्भ ग्रंथ सूचीला एवढेचं महत्त्व असेल तर मग ती समाविष्ट केली काय अन न केली काय, दोन्ही सारखेचं ! म्हणूनचं मी या ग्रंथात संदर्भसूचीचा समावेश केला नाही.
                    
                                                                            
पानिपत असे घडले…                                     
ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
प्रुष्ठ्संख्या: ५८८
मुल्य: रु. ५००/- मात्र    

  भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०

फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६                                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: