गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

धारचा वेढा लढवताना आनंदीबाईने बापू व नानास लिहिलेलं पत्र



    
     पत्राची पार्श्वभूमी :- नारायणरावाच्या खुनानंतर बारभाईचे कारस्थान सिद्धीस आले आणि रघुनाथरावास पुण्याच्या कारभाऱ्यांच्या विरोधात निजाम, इंग्रज अशा परकियांच्या सोबत स्वकीय सरदारांकडे देखील मदतीसाठी याचना करावी लागली. त्या काळात म्हणजे स. १७७६ च्या सुमारास रघुनाथरावाने गुजरातमध्ये इंग्रज व गायकवाडांच्या आश्रयास जाण्याचा निश्चय केला. यावेळी आनंदीबाई गरोदर असल्याने या धावपळीत तिचा निभाव लागणे कळत होते. तेव्हा रघुनाथरावाने माळव्यात पवारांना आनंदीबाईस ठेऊन घेण्याची आज्ञा केली. पेशवे कुटुंबाची अवज्ञा करण्याची ताकद पवारांमध्ये नसल्याने त्यांनी धार येथे आनंदीबाईस राहण्याची परवानगी दिली. अर्थात, या आज्ञा वा परवानगी हि सर्व औपचारिकता झाली. बारभाई व दादाच्या लढ्यात कोण जिंकतो आणि कोण हरतो याकडे दौलतीतील सरदारांचे लक्ष लागले असल्याने व दोघांकडून प्रत्येकाला आपापला स्वार्थ साधून घ्यायचा असल्याने जवळपास सर्वच सरदार दोन्ही पक्षांकडे अंतस्थ सूत्रे राखून होते. पवारांचे उदाहरण देखील याच प्रकारात मोडणारे. असो, पवारांनी आनंदीबाईस आश्रय दिल्याचे समजताच बापू व नाना यांनी आनंदीबाईच्या बंदोबस्तासाठी त्रिंबकराव शिवदेव यास दोन हजाराचे पथक देऊन रवाना केले. आनंदीबाई भिल्ल व गारद्यांना आपल्या नोकरीत ठेऊन राज्याविरोधी कारवाया करते यास्तव तिच्या बंदोबस्ताचे कार्य हाती घेतल्याची भूमिका कारभाऱ्यांनी उठवली होती. यात कितपत तथ्य होते अथवा नाही याची चर्चा या ठिकाणी प्रस्तुत स्थळी करणे शक्य नाही. मात्र, पुण्याच्या फौजेशी आनंदीबाईने जो लढा दिला तो इतिहासात बऱ्यापैकी गाजाण्याच्या योग्यतेचा होता खरा, पण राघोभरारीच्या पत्नीच्या वाट्याला हा गौरव कोठून येणार म्हणा ! धारचा वेढा लढवत असताना आनंदीबाईने सखारामबापू व नाना फडणीस या दोघांना जवळपास एकाच मजकुराची दोन पत्रे पाठवली. पैकी, बापूस लिहिलेलं पत्र या ठिकाणी देत आहे.


ता. ३ – ९ – १७७६    
                 
                      || श्री शंकर ||

         चिरंजीव राजश्री सखारामबापू यांसी प्रति सौ. आनंदीबाई आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत जाणे. बहुत दिवस जाहाले. तुम्हांकडून पत्र न आले याचे कारण काय ? त्यास यैसे न करणे. सदैव पत्र पाठवून संतोषवीत जाणे. यानंतर इकडील मजकूर तर राजश्री रंगराव महादेव व कोनेर शिवदेव येथे येऊन किल्ल्यासी खटपट करितात. नित्य उठोन गोलागोली होत आहे. कही बंद केली आहे. तुमचे नाव घेतात की, आम्हांस त्यांनी पाठविले आहे कीं, “ किला घेऊन आपल्यास पुण्यास न्यावे. त्यास आम्हीं त्याजला उत्तर दिले कीं, आम्हांस पुण्यास त्यास नफा कोणता ? हे त्याच्या चित्तांत असते तरी शिंदे, होळकर व हरी बलाल या कामास नामर्द नव्हते. तुम्ही येथे येऊन एक महिना होऊन चुकला. बंदुखा मारून लोक मात्र जखमी करता तिही रुपयाची गांवची माणसे ठेऊन धामधूम मात्र किल्याभोवती करिता ही गोष्ट तुम्हास योग्य नाही. याप्रमाणे त्यांजकडे निरोप पाठविला. त्याजवरून त्यांणी दहा पांच कलमे लबाडीची लिहून पाठविली. त्याचे उत्तर कलमास योग्य केले. येकीकडे वकील बोलावयास पाठवावे व येकीकडे मोरच्यांचे बंदोबस्त करावे. याप्रमाणे करतात. लबाड्याही फार बोलतात. आम्ही त्यास बाहेर निरोप पाठविला की आम्ही व चिरंजीव येथे आलो आहों. तुम्ही येऊन मोर्चे लाविले. तुम्हांस किला न आला तरी तुमची आबरू मात्र गेली. बाइकावर तलवार कोणीही धरली नाही ती तुम्ही धरलीत, येवढे मात्र तुमचे पदरी पडले. श्री सत्तेने कदाचित किला तुमशी मऊ बोलिला तरी आंत धणी मर्द नाही. बाइका मुलासी तरवार धरून पराक्रम काय विशेष जाहला. आम्हांस तों हेंच मोठेपण कीं, तुम्हांकडील पांच – सात माणूस व हजार दीड हजार स्वार इतका अटंबर घेऊन येथे येऊन बसला. मोरचेही नवगांवांत आणिले. इतके असोन आम्ही महीनाभर लढाई घेतली. आणि ही जर परियंत लढवेल तवपावेतों लढतच आहों हेंच आमचें थोरपण आहे. आम्ही बाइका होऊन आंतून लढतो. तुम्ही पुरुष असोन बाहीरून लढता यांतच लहान मोठेपण शाहणे आहेत ते निवडीत असतील. याप्रमाणे त्यांचे आमचे बोलणे जाले. परंतु ते लहान माणूस त्यास शंका कांहीच नाही. तर हेंच बोलणे तुम्हांसी आहे. आणकीही घरगुती जाबसाल कीं आम्ही येथे आलो कोणते समयास ? कारण कोणते, रुपयाचेही त्या काळांत बळ किती ? च्यार चांगले माणूस काय असेल, आम्ही कोणे तऱ्हेने येथे आहो हे तुम्हास कळत नसेल की काय ? तुम्ही तो दौलतीमध्ये शहाणे येक आहां.* असे असोन आम्हांवर तलवार धरोन उभे राहिला. या गोष्टीस तुम्हास वाईट कसे म्हणावे ? इतका उद्योग कोणते कारणासाठी केला आहे हे कळत नाही. पुरुषाकडे केला तर असो. आम्हांकडे करून तुम्हांस नफा काय ? तरी हि गोष्ट तुम्हांस योग्य नाही. तरी यासी मनाचि चिठ्ठी पाठवून आम्हांस येथे खर्चावेचासाठी दो चव लाखाचे परगण्याच्या यादी व शहाणा माणूस पाठवून देणे. कटकटीसी आम्हां तुम्हांसी प्रयोजन नाही. इतके असोन तुमच्या थोरपणास जो योग्य असेल ते करणे. श्री सत्ता प्रमाण आहे. शा. छ. ९ रजब बहुत काय लिहिणे हे विनंती.

    
 (*) चिन्हाचा खुलासा :- याच मजकुराचे पत्र आनंदीबाईने नाना फडणीसास लिहिले होते. येथे (*) चा खुलासा येणेप्रमाणे --- नाना फडणीसास पाठविलेल्या पत्रात, “ फडणीस कारभारी आहां “ असे शब्द आहेत.


संदर्भ ग्रंथ :-
१)  नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्या ? – पांडुरंग गोपाळ रानडे             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: