रविवार, १० जुलै, २०१६

प्रकरण २) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    काही ऐतिहासिक संकल्पना, संज्ञा अशा असतात कि त्या पूर्णतः समजून न घेतल्यास इतिहास आकलनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याचं प्रत्यंतर म्हणजे शिवाजीची राज्यस्थापना.  शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेच्या घटनेस साधनांच्या अभावी थोडे काल्पनिक वळण इतिहास लेखनाच्या आरंभीच्या काळात द्यावे लागले. त्यानंतर साधनं जसजशी उपलब्ध होत गेली तसतशी जुनी काल्पनिक संकल्पना त्याज्य बनत गेली. परंतु काही वेळा कल्पिताने ऐतिहासिक सत्यावरही मात केल्याचे दिसून येऊ लागले. त्यानंतर ऐतिहासिक सत्याचा स्वीकार करणे वा पूर्वपरंपरेने चालत आलेला काल्पनिक इतिहास कवटाळून बसने हे दोनच पर्याय इतिहास अभ्यासक, वाचकांपुढे राहिले.


    शिवाजीच्या राज्यस्थापनेच्या उद्योगात वरील दोन्ही प्रकारांची बऱ्यापैकी सरमिसळ झाल्याने काही ठिकाणी माहितीअभावी गोंधळ निर्माण झाला तर काही स्थळी हेतुतः गोंधळाची स्थिती निर्माण करण्यात आली.


    शिवाजीच्या पूर्वजांची जी काही थोडीफार विश्वसनीय माहिती मिळते त्यानुसार शिवाजीचा पणजा बाबाजी भोसले यांस निजामशाहीतून पांडे पेडगावची जहागीर प्राप्त झाली होती. बाबाजीच्या पश्चात त्याचे पुत्र मालोजी व विठोजी त्याचे वारसदार बनले. मालोजीला निजामशहाकडून नंतर ' राजा ' हि पदवी, पंचहजारी मनसबदारी तसेच पुणे, सुपे, चाकण चौऱ्यांशी व इंदापूरची देशमुखी तसेच कुटुंब ठेवण्याकरता शिवनेरीचा किल्ला प्राप्त झाला. ( स. १५९० )


    अर्थात शिवाजीचे पूर्वज हे वतनदार असून शिवाय तत्कालीन कायदेशीर सत्तेकडून त्यांना ' राजा ' हि सन्मानाची पदवीही बहाल झालेली होती. या स्थळी वतनदार या संकल्पनेला आपण समजावून घेऊ. त्याशिवाय शहाजी - शिवाजीच्या उद्योगाची संगती लावता येणार नाही.


    वतन या अरबी शब्दाचा अर्थ जन्मभूमी असा होतो. परंतु इकडे या शब्दाला विशिष्ट अर्थ लाभून विशिष्ट सेवेच्या बदल्यात मिळणारा वंशपरंपरागट मोबदला असा अर्थ प्राप्त झाला. सामान्यतः गावगाड्यातील पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वगैरे मंडळी आपल्याला वतनदार म्हणून परिचित आहेत. परंतु इतिहासाचा दाखला पाहिला तर एखादं पद देखील वतन म्हणून वंशपरंपरागत मिळू शकते. उदाहरणार्थ राज्याभिषेकानंतर बाळाजी आवजी चिटणीसाने चिटणीशीचा दरख वंशपरंपरागत मागून घेतला होता. असो.


    मालोजीला मिळालेल्या देशमुखी वतनाचे स्वरूप आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इतिहासकारांच्या मते देशमुख गावातील काही जमिनीचे मालक असून गावच्या प्रशासनात भाग घेण्याचा त्यांचा वंशपरंपरागत अधिकार होता. यांना काही ठिकाणी शेतसारा माफ असून शिवाय सरकारतर्फे त्यांना अधिक उत्पन्नही प्राप्त होत असे. यांची मुख्य जबाबदारी म्हणजे गावचे प्रशासन पाहणे, मुख्य सत्तेला वेळोवेळी लागेल ती व शक्य असेल तितकी मदत पुरवणे. देशमुखांच्या सत्तेला शासन व गाव दोघांकडूनही मान्यता असे. किंबहुना असेही म्हणता येते कि, गावातील या वतनदार मंडळींची सत्ता, अधिकार मान्य करून व कायम ठेवून तत्कालीन सत्ताधीश त्यांच्यावर आपला अंमल गाजवीत. तेव्हाचा काळ लक्षात घेतला तर केंद्र सरकारचा ग्रामीण जीवन --- प्रशासनाशी थेट संबंध क्वचितच येत असे. केंद्र सत्तेशी जो काही गावचा व्यवहार होई तो या वतनदार मंडळींच्या मार्फत. त्यामुळे या मंडळींना प्रतिष्ठा, अधिकार व अतिरिक्त महत्त्व मिळणे स्वाभाविक होते.


    वतनदारांना अधिकांश महत्त्व दक्षिणेतील मुस्लीम राजवटीत मिळाले व तेदेखील महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशांत. याचे मुख्य कारण येथील विशिष्ट नैसर्गिक स्थितीत आहे.


    इथे स्थापलेल्या वऱ्हाड व अहमदनगरच्या सत्ता वजा केल्या तर बव्हंशी मुस्लीम राजवटी परदेशी व त्यातही तुर्की होत्या. उदाहरणार्थ आदिलशाहीचा संस्थापक युसुफ हा इस्तंबुलमधला तुर्क होता तर बरिदशाहीचा संस्थापक कासीम बरिद हा जॉर्जियन तुर्क असून गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा संस्थापक सुलतान कुली हा उत्तर इराणातील तुर्क होता. नगरची निजामशाही तसेच वऱ्हाडची इमादशाही मात्र धर्मांतरित मुसलमानांनी --- अनुक्रमे महाराष्ट्रीयन व कर्नाटकी ब्राम्हणांनी उभारलेली होती.


    या सत्तांना आपापल्या राजवटी स्थापण्या - विस्तारण्यासाठी या वतनदार मंडळींवरच अवलंबून राहावे लागे. कारण, लष्करात व प्रशासनात परदेशी मुस्लिमांना ते किती प्रमाणात आयात करणार ? शिवाय इथली आपल्या धर्मबांधवांची संख्या वाढवावी तर धर्मांतरासाठी बळजोरीचा मार्ग कायमस्वरूपी वापरणे अशक्य. लोकं धर्मापायी जीव देतील पण धर्म सहसा सोडणार नाहीत. त्यामुळे हा रक्तरंजित मार्ग नेहमीच अवलंबणे अशक्य. अशा वेळी प्रस्थापित वतनदारांचा बहुमान वगैरे देऊन गौरव करत त्यांच्यामार्फत सत्ता विस्तार, रक्षणाचा प्रशस्त राजमार्ग त्यांनी निवडला. एकूण, तत्कालीन राजवटींना आर्थिक व लष्करी बळ पुरवणाऱ्या संस्था म्हणून या वतनदारांकडे पाहता येईल.


    शासन दरबारी असलेल्या महत्त्वाचा फायदा हि वतनदार मंडळी आपापली स्थानिक सत्ता विस्तारण्याकरता घेत असत. हाती असलेलं वतन रक्षून त्यात आणखी नवनवीन वतनांची भर --- कोणत्याही प्रकारे घालणे हे एक त्यांचे वंशपरंपरागत कर्तव्यच होते.

जर सूक्ष्मरित्या अवलोकन केलं तर स्वतंत्र सत्तास्थापनेचा मार्ग या वतनदारीच्या माध्यमातूनच जातो. तत्कालीन ' राजे ' म्हणवून मिरवणाऱ्या मंडळींना जे काही महत्त्व प्राप्त झाले होते ते याच कारणांमुळे.


    वतनदारीचे हे स्वरूप लक्षात घेता बाबाजीला मिळालेल्या वतनाचे, अधिकाराचे व सामर्थ्याचे स्वरूप लक्षात येते. त्यात मालोजीला आपल्या कर्तबगारीने अधिकची भर टाकता आली. विशेष म्हणजे भोसले मंडळी एकीकडे देशमुखी वतनं पण अनुभवत होती व सरदारकीही करत होती. अर्थात अशा पद्धतीने वर्तनारे हे एकमेव घराणे होतं असंही नाही. घोरपडे वगैरे समकालीन मंडळीही याच परंपरेची. मालोजीने आपल्या वडिलोपार्जित वतनात भर घालत ' राजा ' या पदवीची प्राप्ती केली. निजामशहाने दिलेली हि पदवी, निजामशाही स. १६३६ पूर्वी दोनदा बुडूनही भोसले मंडळींकडे अबाधित राहिली. मधल्या काळात जरी त्यांनी विजापूर व दिल्ली दरबारी नोकरी धरली असली तरी त्यामुळे या पदवीस धक्का पोहोचला नाही. याचा दुसरा अर्थ असाही होतो कि, कायदेशीररीत्या अधिकृत मान्यता असलेल्या सत्तेने दिलेल्या वतनांना, इनामांना तसेच बहुमान - पदव्यांना -- जरी ती सत्ता अस्तंगत पावली तरी धक्का बसत नसे. तिच्या जागी येणारी दुसरी सत्ता, त्या पदव्या / बहुमान / इनामांचा जर त्रास होत नसेल तर ती पूर्ववत ठेवत असे. शहाजी कर्नाटक प्रांती गेल्यावर तसेच तत्पूर्वीही राजाप्रमाणेच वर्तत असे ते याच कारणांमुळे. तात्पर्य, शहाजी हा जन्मजात राजपुत्र होता व नंतर तो प्रत्यक्ष राजा, महाराजाही बनला. शिवाजीने स्वतःस राज्याभिषेक करवून छत्रपती म्हणवून घेण्यास आरंभ केला होता. परंतु यामध्ये थोडा सूक्ष्म भेद आहे. मालोजी व शहाजीच्या राजा, महाराजा या पदव्या जरी स्वकष्टार्जित होत्या तरी त्यांना बहाल केलेल्या होत्या. शिवाजीच्या ' छत्रपती ' पदाची कथा निराळी होती. ती पुढे प्रसंगानुसार सविस्तर येईलच.


    वतन शब्दाचा अर्थ, संकल्पना लक्षात घेऊन आपल्याला शहाजीच्या चरित्राकडे बघावे लागेल.


    स. १६०० मध्ये चांदबिबीसोबत अहमदनगरची निजामशाहीचा देखील नाश झाला. परंतु मलिक अंबर व मियान राजूच्या अंगभूत पराक्रम, मुत्सद्देगिरीमुळे निजामशाहीचे पुनरुज्जीवन झाले. त्यावेळी शहाजी लहान होता पण वयात येताच तो आपल्या नोकरीत रुजू झाला व अल्पवधीतच निजामशाही दरबारातील महत्त्वाच्या सरदारांत त्याची गणना होऊ लागली.


    स. १६२४ मध्ये मलिक अंबरने मोगल व आदिलशाहीच्या जोड सैन्याचा भातवडी येथे जो पराभव केला त्यांत मुख्य जबाबदारी निजामशाहीतील मराठा सरदारांनीच पार पाडली. त्यामध्ये शहाजी एक प्रमुख सरदार होता. परंतु मलिक अंबर जसा गुणग्राहक होता तसाच मत्सरीही होता. त्यामुळे शहाजीसोबत त्याचे खटके उडाल्यामुळे व इतर काही कारणांमुळेही शहाजीने निजामशाही सोडून आदिलशाहीत नोकरी पत्करली. मात्र नव्या सत्तेकडून त्याने आपल्या वंशपरंपरागत अधिकारांस मान्यता मिळवून घेत त्यांच्या लष्करी मदतीच्या बळावर निजामशाहीत मोडणारा आपला वतनी प्रदेश कब्जात घेण्यास आरंभ केला. आदिलशहाला आपला राज्यविस्तार करायचा असल्याने शेजारच्या राज्यातील नाराज वतनदार, सरदार मंडळींना प्रलोभनं देत आपल्या सेवेत ओढण्याचा त्याचा वर्तनक्रम होता. अर्थात हे धोरण केवळ आदिलशहाचेच होते असे नाही तर सर्वच राजवटी त्याप्रमाणेच वर्तत होत्या.


    आदिलशाहीत शहाजी फार काळ राहिला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे स. १६२६ व २७ मध्ये अनुक्रमे मलिक अंबर आणि दुसरा इब्राहीम आदिलशहा यांचे मृत्यू होय. महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू हे राजकारणात नेहमीच क्रांती घडवून आणत असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. मलिक अंबर हा निजामशाहीचा खरा सूत्रधार, चालक होता तर इब्राहीम आदिलशाहीचा सर्वेसर्वा ! पैकी, मलिक अंबर नंतर त्याचा मुलगा फत्तेखान मुख्य वाजीरीवर दाखल झाला तर इब्राहीम नंतर त्याचा मुलगा महंमदशहा आदिलशाहीचा सत्ताधीश बनला.


    आदिलशाहीतील सत्ताबदलात नव्या मालकाला आपल्या नोकराविषयी --- शहाजीबद्दल बिलकुल भरवसा नव्हता तर शहाजीही आपल्या नव्या मालकाविषयी साशंक असावा. शिवाय यावेळी निजामशाहीत तसेही प्रमुख महत्त्वाचे मुत्सद्दी, लढवय्ये फारसे नसल्याने शहाजीला आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पुर्तेसाठी निजामशाहीत जाणे आवश्यक वाटले व त्याने तिकडची वाट धरली.

मलिक अंबरनंतर निजामशाहीचं भवितव्य अधांतरी असल्यानं शहाजीसारख्या जुन्या नोकरांची त्यांना अतिआवश्यकता होती. तेव्हा शहाजीच्या अटीनुसार त्याचा पूर्वीचा अधिकार, इनामादाखल प्रदेश त्याच्या ताब्यात देण्याचे निजामशहाने मान्य केले. ( स. १६२८ )


    शहाजी निजामशाहीत परतला खरा पण तिथे फार काळ राहिला नाही. स. १६२९ च्या ऑगस्टमध्ये निजामशहाच्या प्रेरणेने शहाजीचा सासरा --- लखुजी जाधव आपल्या दोन मुलांसह व एका नातवासोबत मारला गेला. शहाजीने हि घटना धोक्याची घंटा जाणून निजामशाहीचा त्याग करत मोगल दरबारची नोकरी पत्करली.

                                            
                                      ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: