सोमवार, २५ जुलै, २०१६

प्रकरण ४) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी




    स. १६३६ च्या आरंभी शहाजहान दक्षिणेत उतरताच प्रथम कुतुबशहाने शरणागती पत्करत मोगलांचे मांडलिकत्व मान्य केले. अर्थात, उभयपक्षांत झालेल्या तहाच्या अटी पाहता कुतुबशहाने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारलं म्हणण्यापेक्षा दास्यत्व पत्करलं असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. कुतुबशहाच्या पाठोपाठ आदिलशहानेही मोगलांची ताबेदारी स्वीकारण्यात धन्यता मानली. आदिलशाहीच्या या भूमिकेमुळे शहाजी आता एकाकी पडला. तरीही त्याने शक्य तितका मोगलांचा प्रतिकार करण्याचे ठरवले व कदाचित काही प्रमाणात तो यशस्वीही झाला असता परंतु शहाजी व निजामशाही सरदारांचे बळ लक्षात घेऊन शहाजहानने शहाजी स्थापित निजामशाही गुंडाळण्यासाठी विजापूरकरांचीच मदत घेत त्यांस शरण येण्यास भाग पाडले. या सर्व घटनाक्रमापैकी आपण मोगल - विजापूरकर तह व शहाजीची शरणागती या दोन मुख्य घटनांचाच येथे शक्य तितका तपशीलवार विचार करायचा आहे. कारण, शिवाजीने स्थापलेल्या स्वराज्याची पार्श्वभूमी वा स्वराज्याची बीजं याच काळात घडलेल्या या तहांत दडल्याचे माझे मत आहे.

    मोगल - विजापूरकरांच्यात झालेल्या तहाची चर्चा करण्यापूर्वी प्रथम मोगल - गोवळकोंडा दरम्यान झालेल्या तहाच्या अटी येथे देतो. प्रस्तुत विषयमर्यादेत गोवळकोंड्याचा फारसा संबंध येत नसला तरी विजापूर, गोवळकोंडा व दिल्ली या तीन दरबारांचे संबंध समजावून घेण्याकरता हा तह उपयुक्त ठरेल.

    वा. सी. बेंद्रे संपादित ' सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कुतुबशाही ' मधील शहाजहानने दि. २९ ऑगस्ट १६३६ रोजी कुतुबशहास पाठवलेल्या अंतिम तहनाम्याचा सारांश :- " कुत्बउल्मुल्क याने जाणावे की, ज्या अर्थी ते आमचे चाकर बनले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलखामध्ये आमच्या नावाने खुत्बा पढावयास लाविला आहे व आमच्या शुभ नावाने नाणी ( दिनार व दिरम ) पाडण्याचे ठरविले आहे ; व त्याचप्रमाणे ठरवून दिलेली पेशकशहि त्यांनी दरबाराकडे भरली आहे व यापुढे निजामउल्मुल्कला जे काही देत होते त्यापैकी दोन लाख होन दर वर्षी सरकारी खजिन्यांत खंडणी म्हणून देण्याचे शपथपूर्वक वचन दिले आहे त्याअर्थी त्यांचे सर्व जुने गुन्हे माफ करून त्यांस क्षमा केली आहे. आणि त्यांच्याकडे हल्ली जो मुलूख आहे तो त्यांचेकडे ठेवला आहे. आता त्यांच्या वंशजांनी या अटींप्रमाणे वागावे, विरुद्ध आचरण करू नये. तसेच आम्ही किंवा आमची मुले अगर आमचे उमराव यांनी त्यांच्या मुलखास उपद्रव देऊ नये. आणि सुवर्णपत्रावर लिहिलेल्या तहाच्या अटींविरुद्ध जाऊ नये. हा करार वंशपरंपरेने कायम राहावा. " 

    उपरोक्त तहाच्या अटींवरून प्रथम आपल्या लक्षात येते, ते म्हणजे कुतुबशहा हा पूर्वी निजामशहाचा मांडलिक होता. त्यानंतर प्रसंगत्वे त्याने विजापूरकरांचेही मांडलिकत्व स्वीकारल्याचे इतिहासात नमूद आहे. यावरून या सत्तेच्या लष्करी ताकदीची कल्पना यावी. दुसरे असे कि, या तहातील अटींची रचना पाहता गोवळकोंड्याची सत्ता क्रमाक्रमाने संपुष्टात आणण्याचे साधनच मोगलांना प्राप्त झाले होते व पुढे वेळोवेळी त्यांनी याचा वापर केल्याचेही दिसून येते. तिसरे असे कि, गोवळकोंड्याच्या सत्तेला आता विस्ताराकरता फक्त दक्षिणेतला --- तत्कालीन कर्नाटकाचाच प्रदेश उपलब्ध राहिला होता. जिथे विजयनगरच्या उध्वस्त साम्राज्याचे अवशेष पाळेगार तथा लहान संस्थानिकांच्या रूपाने मूळ धरून होते. एकूण, तात्पुरतं तरी का होईना मोगलांनी कुतुबशहाला निजामशाही प्रदेशातील राजकारणातून बाहेर काढण्यास यश मिळवले.

    आता आपण मोगल व आदिलशाही दरम्यान झालेल्या तहाच्या अटींचा विचार करू.

सर. औरंगजेब १ पृ. ३८ }   ( ४०७ ) { श. १५५८ वैशाख शु. १२
अब. हमी. १६८ - ७३ }             { इ. १६३६ मे ६
शहाजहान व महमद अदिलशहा यांचा तह.
(१) विजापूरच्या आदिलशहाने दिल्लीपतीचे मांडलिकत्व मान्य करावे.
(२) निजामशाही राज्याचा मुलूख बादशहा आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावा. आदिलशहाने बादशाही मुलखाची मर्यादा ओलांडू नये व नवीन तहाने हस्तगत झालेल्या मुलुखाचा ताबा बादशहाला बिनतक्रार करू द्यावा.
(३) विजापूरच्या सुलतानाच्या मूळच्या मुलुखाला निजामशाहीपैकी खालील मुलूख नव्याने जोडण्यात यावा :- पश्चिमेकडे, भीमा व सीना या दोन नद्यांमधील, सोलापूर व परिंडा ह्या किल्ल्यांसह, सोलापूर व वांगणी महाल ; ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे ; निजामशाही कोकण ; आणि पुणे व चाकण हे दोन परगणे. हा सर्व मुलूख मिळून दरसाल २० लक्ष होन किंवा ८० लाख रुपये वसुलाचे ५० परगणे होतात. राहिलेला निजामशाहीचा मुलूख निर्विवादपणे मोगलांच्या राज्याला जोडावा.
(४) आदिलशहाने तहाकरितां म्हणून २० लक्ष रुपये रोख किंवा जिन्नसांचे रूपाने द्यावे. ( वार्षिक खंडणी ठरविली नाही. )
(५) गोवळकोंड्याचे राज्य हे बादशाही संरक्षणाखालील असे समजून त्याच्याशी विजापूरकरांनी सलोख्याने व ' वडील भावाप्रमाणे ' वागून हद्दीबद्दल किंवा मूल्यवान नजराणे देण्याबद्दल तसदी देऊ नये. मांजरा नदी ही उभयतांचे राज्यांमधील सरहद्द मानावी.
(६) परस्परांनी एकमेकांचे नोकरांस वळवू नये किंवा पळून गेलेल्यांस थारा देऊ नये. शहाजहानने आपण स्वतः व आपले पुत्र यांच्या वतीने विजापूरकरांचे नोकरांना बादशाही नोकरीत न घेण्याची हमी घेतली.
(७) शहाजी भोसल्याने निजामशाही वंशांतील एका मुलाला पुढे करून जुन्नर त्रिंबक इत्यादि किल्ले अजूनही आपल्या हातांत ठेविले होते, ते तो शहाजहानचे हवाली करीपर्यंत त्याला विजापूरकरांनी आपल्या नोकरींत ठेवू नये. तसे करण्याचे त्याने नाकारल्यास त्याला विजापूरचे मुलखांत आश्रय किंबहुना प्रवेशही मिळू नये.

संदर्भ ग्रंथ :- शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड १

    वा. सी. बेंद्रे संपादित ' सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कुतुबशाही ' मध्ये कुतुबशाही संदर्भात उपरोक्त तहातील एक कलम बेंद्र्यांनी दिले असून त्यात आदिलशहाचा शहाजहानने ' जमिनदार ' म्हणून उल्लेख केल्याचे नमूद केलंय. असो.

    आता आपण शिवकालीन पत्रसारसंग्रहात दिलेल्या मोगल - आदिल दरम्यान झालेल्या तहाच्या अटींचा विचार करू. उपरोक्त तहातील क्र. ३ व ७ अट वैशिष्ट्यपूर्ण आहे. अट क्र. ३ नुसार जो भूप्रदेश शहाजहानने विजापूरकरांना देऊ केला होता, त्या प्रदेशावर शहाजीचा अंमल होता. म्हणजे विजापूरकरांना हा प्रदेश काबीज करायचा झाल्यास त्यांना शहाजीसोबत लढणे क्रमप्राप्त होते. आता यातली मुख्य खोच अशी कि, शहाजहानला हरप्रयत्ने निजामशाहीचा नाश हवा होता व एकट्याच्या बळावर --- किमान शहाजीला दक्षिणेतील इतर सत्तांचा पाठिंबा आहे तोवर तरी तो हे कार्य त्वरित सिद्धीस नेऊ शकत नव्हता.

    दुसरे असे कि, आदिलशहालाही या प्रदेशाचा लोभ पूर्वीपासून होता. व त्यासाठी त्याने प्रयत्नही केले होते. परंतु स्वबळावर अल्पावधीत तो प्रदेश ताब्यात घेणे त्यासही शक्य नव्हते. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दक्षिणेत मोगलांचा शिरकाव झाल्यास भविष्यात आदिल, कुतुब या सत्तांना धोका असल्याची एक समजूत होती. अर्थात यात तथ्य नाही असे नाही. परंतु भविष्यात होणाऱ्या आक्रमणास तोंड देण्याकरता वर्तमानात आपली सत्ता विस्तारणे, मजबूत करणे आवश्यक असते याची विजापुरी मुत्सद्द्यांना चांगलीच कल्पना होती. उलट निजामशाहीचे अस्तित्व राखल्यास त्यापासून कोणाचाच फायदा नसून दख्खनी सत्ता आपसांत झुंजण्यात मग्न राहिल्या असत्या किंवा मोगल - शहाजीची युती झाल्यास आदिलशाही राज्यालाही धोका पोहोचू शकत होता. शिवाय कुतुबशहाने मोगलांची ताबेदारी स्वीकारल्याने तिकडूनही संभाव्य हल्ल्याची शक्यता होतीच.

    सारांश, कितीही शक्यता आजमावून पाहिल्या तरी मोगलांशी हातमिळवणी करून आदिलशाहीने शहाजी स्थापित निजामशाहीचा नाश का करू नये याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. असो.

    प्रस्तुत तहनाम्यातील अट क्र. ७ आपल्या विषयाच्या मर्यादेत विशेष महत्त्वाची आहे. या अटीचे दोन भाग असून त्यातला पहिला भाग --- निजामशाहीच्या शरणागतीचा --- शहाजहानच्या हिताचा असून दुसरा भाग --- शहाजीने विजापुरी नोकरीत राहण्याचा --- आदिलशाहीच्या हिताचा होता. माझ्या समोर मुख्य प्रश्न असा आहे कि, हि अट नेमक्या कोणत्या पक्षाने प्रथम मांडली ? तसेच या तहाच्या वाटाघाटीत शहाजीचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग किती होता ? कारण, शहाजीला न विचारता त्याला बंधनकारक अशी अट विजापूरकर तहामध्ये घालू शकत नव्हते. त्याचप्रमाणे शहाजीला जर नोकरीच करायची तर त्याला दिल्ली वा गोवळकोंडा किंवा इतरही दरबार उपलब्ध होते. मग त्याने विजापूरचीच नोकरी करावी अशी आदिलशहा अपेक्षा कशी बाळगू शकतो ?

    प्रस्तुत तहाची तारीख शिवकालीन पत्रसार संग्रहात ६ मे १६३६ अशी दिली असून ती सर्वमान्य अशीच आहे. या तहानंतर शहाजहानने आपला मुक्काम आटोपता घेत औरंगजेबची दक्षिण कारभारावर नेमणुक करत उत्तरेत प्रयाण केले. हि गोष्ट मोगल सामर्थ्याच्या मर्यादा अधोरेखित करणारी आहे.

    मोगल - आदिलशाहीत तह झाल्यावर उभयतांच्या संयुक्त फौजा शहाजी स्थापित निजामशाहीवर चालून गेल्या. या संयुक्त आघाडीस तोंड देणं आवाक्याबाहेर असल्यानं शहाजीने स. १६३६ च्या ऑक्टोबर मध्ये आदिलशहाचा सरदार रणदुल्लाखान याच्याकडे निजामशाहीची शरणागती देत आदिलशाहीची नोकरी पत्करली. या दरम्यान उभयतांच्या काय वाटाघाटी झाल्या याची स्पष्टता करणरा पत्रव्यवहार मला उपलब्ध झालेला नसला तरी शिवभारत व जेधे शकावली - करीना वरून या गोष्टीवर काही प्रमाणात प्रकाश टाकता येतो.

    प्रथम आपण परमानंद कृत शिवभारतातील शहाजीच्या शरणागतीचा वृत्तांत पाहू.
" तेव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यांपैकी काही मुलूख दिल्लीच्या बादशहास आणि काही आदिलशहास दिला. (२०)
शहाजी हा हट्टी स्वभावाचा असतांहि त्याने आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणे दिल्लीचा बादशहा आणि आदिलशहा यांच्याशी तह केला. (२१)
निजामशहाचे राज्य मिळाल्याने परमुलखावर हल्ला करणारे ते मोगल परत फिरले असतां, शहाण्या आदिलशहास आपण दुर्बळ आहो असे वाटू लागले आणि त्याने आपल्या मनात विचार केला की, ज्या सामर्थ्यवान् मोगलांनी निजामशहास युद्धांत बुडविले ते मलाहि बहुधा बुडवितील ; म्हणून ह्या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन. ( २२ - २५ ) "

    यानुसार शहाजीने आपला देश, अर्थात वंशपरंपरागत जहागीर व वतने सोडून उर्वरित निजामशाही प्रदेश मोगल, आदिलच्या हवाली केला. तसेच आपली दुर्बलता जाणून व भविष्यातील मोगली आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आदिलशहानेच त्यांस आपल्या नोकरीत घेतल्याचे परमानंदचे म्हणणे आहे.

    परमानंद हा शिवाजीच्या दरबारातील कवी असल्याने त्याच्या माहिती बद्दल काही प्रमाणात शंका उपस्थित केली जाऊ शकते. तेव्हा शिवाजीच्या घराण्याचा ज्यावर प्रभाव पडू शकत नाही अशा जेधे घराण्याच्या शकावली व करीन्यातील नोंदीचा आपण विचार करू.

    जेधे शकावली :- " शके १५५७ युव संवछरे शाहाजी राजे माहुलीस गेले तेथे रणदुलाखान ईदिलशाही व खानजमा मोगलाचा सुभा जाऊन वेढा घाळून निजामशाहा हाती घेतला शाहाजी राजे ईदिलशाही चाकर जाले ते समई रणदुलाखानाने कान्होजी जेधे नेले होते तेथे माहराजाची भेटी जाली. "

    जेधे करीना :- "  शाहाजी राजे यांणी पेमगिरीस पातशाही नसलावरी छत्र धरिले तेथे सांट होईना किला लाहान या करिता माहुलीस पातशाही नसल घेऊन गेले फौजेनसी राहिले तेथे शके १५५७ युवा संवछरी रणदुलाखान ईदिलशाही व खान जमाखान मोगलाचा सुभा जाऊन दुतर्फा वेढा घालून बैसले कान्होजी नाईक रणदुलाखाना समागमे नेले होते त्यांणी अंतस्ते माहाराजासी राजकारण राखिले होते किलीयावरी सामान नाहीसे जाले लोकास उपवास पडो लागले किला जेर जाला तेव्हा तह जाला की गंगेपलीकडील मुळूक व पातशाही नसल मोगलाच्या सुभ्याकडे घ्यावे गंगे अलीकडील मुळूक ईदिलशाहाकडे घ्यावा तो माहाराजास जाहागीर द्यावा माहाराजानी बारा हजार श्वारानसी चाकरी करून वजिरी करावी यैसी बोली घातली त्या प्रमाणे खानानी विज्यापुरास लेहून पातशाहाचा कौल व फर्मान आणविला त्यावरी माहाराजानी असल नसल राजापुरीस पाठवीले दुसरे मुसलमानाचे मूल नसल मोगलाकडे दिल्हे. "            

    सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, जेधे शकावली व करीना यांच्या लेखनादरम्यान किती काळाचे अंतर आहे याची स्पष्टता होत नाही. शकावलीतल्या नोंदी त्रोटक आहेत. व त्याच नोंदी थोड्या विस्तारित रुपात करीन्यामध्ये येतात. हा प्रथम आक्षेप असून दुसरा आक्षेप असा कि, घटना घडताच तिची नोंद करणे व त्या त्रोटक नोंदीवरून थोडा विस्तारित वृत्तांत नंतर देणे यामध्ये मोठे अंतर असून त्यामुळे घटनेच्या वृत्तांतावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न उद्भवतो. शिवाय प्रस्तुत घटनेचा काल शकावली व करीन्यात शके १५५७ दिलाय तो प्रत्यंतर पुरावा पाहता १५५८ असायला हवा असे इतिहासकारांचे मत आहे.

    तेव्हा शकावली, करीन्यास पूरक पुरावा तत्कालीन पत्रव्यवहारांत सापडतो का हे पाहत शहाजीची विजापूर दरबारातील नोकरी व त्यांस मिळालेल्या भूप्रदेशाचे -- जहागिरीचे स्वरूप स्पष्ट करता येईल.

    जेधे शकावली / करीना हा कान्होजी जेधे या देशमुख वतनदाराच्या घराण्यातील दस्तऐवज असून कान्होजी जेधे हा शहाजीचा समकालीन असून पुढे शिवाजीच्या नोकरीत रुजू झाला. कान्होजीकडे कारी गावचे देशमुखी वतन असून हा गाव पूर्वी निजामशाही राजवटीत मोडत होता. यासंबंधीचा विश्वसनीय उल्लेख शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्र क्र. ९९ मध्ये येतो. म्हणजे कान्होजी जेधे हा पूर्वी निजामशाही नोकर असल्याचे सिद्ध होते. या विधानास बळकटी देणारी काही पत्रे उपरोक्त संग्रहात प्रसिद्ध झालेली आहेत.

    निजामशाही प्रदेश कुरतडत आपला राज्यविस्तार करण्याचे आदिलशाहीचे जुनेच धोरण असल्याने त्या सत्तेची या प्रदेशात -- पुणे व परिसर --घुसखोरी होणे स्वाभाविकच होते. जेव्हा परसत्ता सरहद्दीच्या निकट वा आत येते तेव्हा सरहद्दीवरील वतनदार मंडळींत चलबिचल होऊन जिकडे बळकटी तिकडे त्यांची ओढ, हा प्रकार तत्कालीन घडामोडींत नेहमीच दिसून येतो. आदिलशाही सत्ता निकट येताच कान्होजी जेधेही तिकडे रुजू झाला. परंतु तो तिथे फार काळ राहिल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येत नाही. बहुधा तत्कालीन राज्यक्रांतीच्या गोंधळात तो देखील आपलं सामर्थ्य वाढवून आपल्या वतनाचा --- एकप्रकारे संस्थानाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कान्होजीचे वास्तव्य ज्या प्रदेशात होते, त्याचं प्रदेशात शहाजीची जहागीर होती. म्हणजेच, शहाजी व कान्होजीचा संबंध निजामशाही राजवटीपासूनचा दिसतो.

    स. १६३० च्या आसपास कान्होजी रणदुल्लाखान या विजापुरी सरदारास रुजू झाल्याचे पत्रसार संग्रहावरून लक्षात येते. तेव्हा जेधे करीन्यात कान्होजी मार्फत शहाजीने रणदुल्लाखानाशी तह केल्याच्या विधानास बळकटी येते. कारण पूर्वापार संबंध नसता अशा प्रकारे रदबदली वा तरफदारी किंवा मध्यस्थी करण्याचे काही कारण दिसत नाही. अर्थात, अशा कामासाठी मध्यस्थ म्हणून जर आर्थिक वा इतर लाभ होणार असेल तर कोणतीही व्यक्ती मध्यस्थीस तयार होऊ शकते. असो.
    
    शहाजीचा बंदोबस्त होणे मोगलांपेक्षा विजापूरकरांच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. कारण त्याचे वर्चस्व ज्या प्रदेशात होते, जवळपास तोच प्रदेश तहामध्ये त्यांना मिळाला होता. तसेच शहाजीचा पुरता नाश करण्याचे धोरण स्वीकारणे आदिलशाहीला परवडणारे नव्हते. कारण, निजामशाहीतील जे सरदार शहाजीच्या पक्षाला अजून चिटकून होते त्यांची नाराजी ओढवून आदिलशहाला तहात मिळालेल्या भूप्रदेशाचा कब्जा घेणे अवघड गेले असते. तिसरे असे कि, शहाजी जर त्याच्या जहागिरी प्रदेशाच्या बदल्यात तह करण्यास तयार होत असेल तर त्याच्याविरोधात मोहीम दीर्घकाळ लांबवण्यात अर्थ तरी काय, असाही आदिलशाही मुत्सद्द्यांचा विचार असू शकतो. शिवाय शहाजीची वंशपरंपरागत जहागीर, वतने खालसा करणे जरी आदिलशाहीस शक्य असले तरी यामुळे इतर सरदारही बिथरण्याचा संभव नाकारता येत नव्हता. एकूण पाहता शहाजी भोसलेला नष्ट करणे हा या झगड्याचा हेतू नसून विशिष्ट भूप्रदेश काबीज करणे हा प्रधान हेतू असून तो साध्य होत असल्यास निरर्थक प्राणहानी का करावी, असा व्यावहारिक विचार करून आदिलशाहीने शहाजीसोबत तह केल्याची शक्यता दिसते.

    या विधानास अधिक बळकटी देणारा पुरावा स. १६५६ च्या जुलैमध्ये शहाजीने आदिलशहास पाठवलेल्या पत्रातच मिळतो. त्यात शहाजी लिहितो कि, " ... .... पेशजी भिस्त रोजी रुस्तुमजमाबराबरी ( रणदुल्लाखान ) माहोलीहून हुजूर आलो ते वख्ती चौ लाखाची जागीर दिधली. "
संदर्भ ग्रंथ :- मराठ्यांचा इतिहास साधन परिचय - संपादक : प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक 

    उपरोक्त विवेचनास अधिक पूर्तता आणण्यासाठी आपण जेधे करीना, शिवभारतातील शहाजीचा वृत्तांत व मोगल - आदिल तहातील अट क्र. ७ मधील मजकुराची तपशीलवार चर्चा करू.

    मोगल  आदिल दरम्यान स. १६३६ च्या मे मध्ये झालेल्या तहाची कलमे वरवर पाहिली तरी त्या तहामध्ये शहाजीचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची शंका येते व पुढील घटनाक्रम तसेच शिवभारत, जेधे करीन्यातील माहिती या शंकेस बळकटी देत मोगल - आदिल तहामध्ये शहाजीचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध करतात. कारण, शहाजी विरोधातली प्रस्तावित मोहीम अल्पावधीत यशस्वी होईल, हे आगाऊ भविष्य मे महिन्यात आदिलशहास पडणं शक्य नाही. दुसरे असे कि, शहाजीला नोकरीत घेण्याची आतुरता आदिलशहास का व्हावी ? कारण, स. १६३६ च्या मे महिन्यात शहाजी हा निजामशाहीचा मुख्य सूत्रधार होता. तो बलाबल पाहून बोलणी करेल तर बरोबरीच्या नात्यानेच. नोकरीसाठी आर्जवं करण्याची शक्यता त्याचं पद, दर्जा पाहता संभवत नाही व आदिलशहा देखील विना त्याची संमती असता शहाजीला बंधनकारक अशी अट तहात घालेल हे शक्य नाही.

    माझ्या मते, मोगलांशी तह करताना व तत्पूर्वी आदिलशहा व शहाजी यांच्यात पत्रव्यवहार होऊन त्याच्याच संमतीने, सल्ल्याने आदिलशहाने शहाजी विषयी मोगलांना बांधून घेतले. या विधानास बळकटी येण्याकरता अट क्र. ७ ची भाषा पुन्हा एकदा काळजीपूर्वक अभ्यासाने आवश्यक आहे. 

    प्रस्तुत तहनाम्याची मूळ शब्दशः नक्कल माझ्याकडे नाही व पत्रसारसंग्रहात सारांशरूपाने हा तहनामा दिला असला तरी त्यातील सारांशरुपी मजकुरावरून असे दिसून येते कि, शहाजी जोवर निजामशाहीची शरणागती देत नाही तोवर त्यास नोकरी वा आश्रय न देण्याचे बंधन मोगलांनी विजापूरकरांवर घातले होते. म्हणजेच शहाजी प्रसंग पडला तर विजापूरकरांचा आश्रय करणार हे मे महिन्यात वा तत्पूर्वीच ठरले होते व ते स्वाभाविक होते. कारण शहाजीच्या उद्योगांना आदिलशाहीनेच जाहीर पाठिंबा दिल्याने शहाजीच्या रक्षणाची जबाबदारी --- निदान या प्रकरणापुरती --- नैतिकदृष्ट्या विजापूरकरांवर येते. अर्थात, नैतिक - अनैतिकतेस राजकारणात कवडीचीही किंमत नसते हे गृहीत धरले तरीही, ज्या अटींवर शहाजीने शरणागती पत्करली त्याच अटींवर तो मोगलांशी स्वतंत्रपणे तह करू शकत होता व भौगोलिकदृष्ट्या त्याच्या मूळ जहागिरीचा प्रदेश मोगली सरहद्दीला लागून असल्याने व भविष्यात आदिलशाही गुंडाळण्याचे मोगलांचे स्वप्न असल्याने मोगलांशी त्याचा तह जुळून येण्यास कसलाच अडथळा होणे शक्य नव्हते.
माझ्या मते, या सर्व गोष्टींचा फायदा शहाजीने घेतला वा त्यांस मिळाला.

    तात्पर्य, शहाजीसारख्या उपद्व्यापी व्यक्तीची आपल्या सरहद्दीवरील भूप्रदेशात मोगल व आदिल या दोघांनाही आवश्यकता होती व सरहद्द प्रांतातील काही अनुकूल गोष्टी लक्षात घेऊन शहाजीने आदिलशाहीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येते.

    स. १६३६ च्या ऑक्टोबरात शहाजीने रीतसर शरणागती पत्करली व आदिलशाहीची नोकरी धरली. यावेळी त्याच्या ताब्यात असलेली जहागीर, वतनं कायम ठेवण्यात येऊन व्यवहारात आपल्या सत्तेचा बोज राखण्यासाठी आदिलशाही ती बहाल केल्याचा देखावा रचण्यात आला. अर्थात, हे काही एकमेव उदाहरण आहे अशातला भाग नाही. यापूर्वी निजामशाही सरदार सिद्दी रेहानने सोलापूर बळकावून ते आदिलशहाला देत बदल्यात कऱ्हाड, कोल्हापूर प्रांती एक लक्ष उत्पन्नाचा मुलूख जहागिरीदाखल मिळवल्याचे द. वि. आपटे शिवभारताच्या प्रस्तावनेत लिहितात. त्याचप्रमाणे कान्होजी जेधे प्रभूतींचीही उदाहरणे आहेत. इतकेच काय, नंतरच्या काळातही सिद्दी जौहरने कर्नूलची जहागीर अशाच मार्गाने प्राप्त करून घेतली होती. हि सर्व उदाहरणे पाहता पुणे व लगतच्या परिसरावरील शहाजीचा ताबा अधिकृत सत्तांनी निमुटपणे मान्य केल्याचेच दिसून येते.

    शहाजीला विजापूर दरबाराने आपल्या सेवेत घेतले असले तरी त्याचा यावेळी हुद्दा काय ठरवण्यात आला होता किंवा त्यास कोणते पद दिले होते याची स्पष्टता होत नाही. महाराज, फर्जंद, वजीर म्हणून त्याचे उल्लेख मिळतात ते स. १६४५ - ४६ नंतरचे. असो. याविषयी व विशेषतः शहाजीस मिळालेल्या पुणे प्रांतातील जहागिरी संबंधी अधिक चर्चा आपण पुढील प्रकरणी करू.
                                         ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: