बुधवार, २० जुलै, २०१६

प्रकरण ३) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी



  

    इतिहास फक्त व्यक्तीच घडवतात असं नसून कधी कधी निसर्ग देखील हि भूमिका बजावत असतो, याचं प्रत्यंतर या काळातील घडामोडींवरून दिसून येते. राज्यातृष्णा हा राज्यकर्त्याच्या अंगचा सद्गुण मानला जातो. जशी शहाजहानला होती तशीच आदिलशहालाही होती व जर हे परके, उपरे अशी भावना मनी बाळगतात तर ती शहाजीने बाळगल्यास त्यात नवल ते काय !

    आपल्याकडे राज्य वा सत्ता, संस्थान यांच्याविषयी एक भलतीच अन् भ्रामक समजूत आहे. आकाराने, प्रदेश विस्ताराने राज्य वा संस्थान मर्यादित असेल तर त्याचं लष्करी बळ ते काय असं म्हणत आपण त्या राज्यचं, सत्तेचं महत्त्व दुर्लक्षित करतो. अवमूल्यन करतो. आपल्या याच वृत्तीमुळे इतिहासातील कित्येक महत्त्वाच्या बाबींकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालंय.

    याच जोडीला राज्यस्थापना किंवा स्वतंत्र राज्य संपादने या संकल्पनांचा शब्दशः अर्थ घेण्याचीही आपल्याला खोड आहे. या संकल्पनांचे प्रचलित अर्थ काहीही असले तरी त्यावेळी कोणते समजले जात होते याचा आपण कधी विचारच केला नाही.
मागील प्रकरणात आपण पाहिले कि, वतनदार हा एकप्रकारे सत्ताधीशच असतो. जर त्याची सत्ता वा त्याचे आर्थिक बळ वाढत गेले तर हवं ते स्थान वा इच्छित ध्येय तो साध्य करु शकतो.
मध्ययुगीन महराष्ट्राच्या इतिहासात कुडाळचे सावंत, जावळीचे मोरे, पालवणचा दळवी तसेच शृंगारपुरचे सुर्वे हे तसे स्थानिक सत्ताधीशच होत. अनेक कारणांनी जरी त्यांनी आदिल वा निजामशाही तसेच मोगली सत्तांचे वर्चस्व मान्य केले असले तरी यांच्या सत्तांना मान्यता देऊन व त्यांना मांडलिक बनवण्यावरच उपरोक्त राजवटी धन्यता मानत यावरून या सत्तांच्या सामर्थ्याची कल्पना यावी.

    शहाजी जरी प्रसंगानुसार निजाम, आदिल वा मोगलशाहीची चाकरी करत असला तरी तो देखील उपरोक्त संस्थानिकांप्रमाणेच स्वतःला समजत होता व त्यानेही एका विशिष्ट मर्यादित भूप्रदेशात आपले हितसंबंध निर्माण करण्यास आरंभ केला होता. त्याची सर्व धडपड हि उपरोक्त देशी संस्थानिकांप्रमाणेच संस्थान निर्मितीची होती. त्याकरता त्याला त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चाकरी करावी लागत असल्यास त्यात नवल ते काय !

    विजयनगरचे राज्य असो वा यादवांचे तत्पूर्वीचे साम्राज्य. या शाह्यांचे स्वतंत्र राजे कशाप्रकारे आपापला राज्याभिषेक करून घेत वा त्यांचा त्यांचा राज्याभिषेक होत होता किंवा नव्हता, याची तत्कालीन जनमानसाला कितपत कल्पना असावी ? जर मी चुकत नसेन तर या राजवटींच्या राज्याभिषेकासारख्या समारंभाची कल्पना मराठी इतिहासकारांतही क्वचीतांनाच असावी. इथे मी नमूद करतो कि, याक्षणी मला देखील नाही.

    आपल्या सत्तेला आपल्याहून बलिष्ठ सत्तेने मान्यता देणे हा जर तत्कालीन संस्थानिकांचा आपापल्या सत्तांच्या, अधिकारांच्या अधिकृत मान्यतेसाठी कायदेशीर मार्ग वाटत असेल तर त्यांस अमान्य करण्यात वा दूषणं देण्यात किंवा हलके समजण्याचा आपणांस अधिकार तो काय ?

    तत्कालीन बहुसंख्य तसेच सार्वभौमत्व वा त्यासम अधिकार मिरवणाऱ्या राजवटी इस्लामी होत्या. त्यांचे अधिकारी पुरुष --- तथा सत्ताधारी व्यक्ती आपापल्या सत्ताधारणेच्या प्रसंगी काही विशिष्ट कर्मे, कृत्यं करीत --- त्यानुसार खुत्ब्याचे वाचन, धर्मगुरूंकडून धर्माधिष्ठित सत्तेने आपणांस अधिकारी पुरुष म्हणून मान्यता दिल्याचा विधी वा उच्चार, परराज्य दरबारातील ( सार्वभौम तसेच मांडलिक ) आलेले वकील व अभिनंदनपर पत्र या गोष्टी अधिकार ग्रहण केल्याचे द्योतक ठरतात व या घटना आसपास घडत असताना व्यक्तींच्या मनावर अधिकार धारण करणे म्हणजे अमुक या गोष्टी घडून येणे असेच मानले जात असल्यास त्यात नवल ते काय !

    हिंदू धर्मीय व्यक्ती खुत्बा पढू शकत नाही. तसेच मुस्लीम व्यक्तीला धर्माकडून जशी ' राजा ' म्हणून मान्यता मिळते व त्याकरता जो विधी केला जातो तसा हिंदू धर्मात आहे व असल्यास तो कसा केला जातो याची कल्पना असणे शक्यच नाही. कारण यादवांनंतर कोणी तो विधी केला असेल व यादव जरी करत असले तरी तो हिंदू होता का वैदिक, हे देखील अभ्यासाने गरजेचे आहे.
इथवरच्या विवेचानावरून हे स्पष्ट होते कि, एका राजसत्तेच्या ज्या काही संकल्पना आज आपल्या मनी प्रचलित आहेत, त्या तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना कायम लावणे चुकीचे आहे. त्याखेरीज याच स्थळी आपण ' सार्वभौम ' हि संकल्पना देखील त्याकाळच्या परिघात पाहणे अत्यावश्यक ठरेल.

    मध्ययुगीन काळात युरोपियन राष्ट्रांना ' सार्वभौम ' शब्दाचा व त्या अर्थाचा शोध लागला असला तरी शास्त्रशुद्ध अर्थाने तो येथील लोकांना ठाऊक होता, नव्हता याची सुस्पष्टता होत नाही. मात्र, आपल्यापेक्षा दुर्बलला चिरडणे वा त्यांस आपले अंकित करणे हा इथे सार्वभौमत्वाचा अर्थ मानत असावेत, हे इथल्या वतनदारांच्या कारवायांवरून सहज लक्षात येते.

    वतनदारांच्या तुलनेने आदिल प्रभूती सत्तांची सार्वभौमत्वाची कल्पना थोडी प्रगत होती. त्यांची अधिकारदर्शक पदे, चिन्हे तसेच विधी होते. त्यांच्याहून अधिक मोगल सुबुद्ध होते. त्यामुळेच प्रसंग येताच त्यांनी आदिल प्रभूतींना आपले अंकित बनवत आपल्या सार्वभौमत्वास त्यांची दहशतीच्या बळावर का होईना मान्यता मिळवून घेतली.

    या घटनाक्रमांचा लौकिकात तसेच व्यवहारांत अर्थ असा बनला कि, मोगल हे सार्वभौम असून ते ज्या सत्तेला अधिकृतरीत्या मान्यता देतील तेच इथले अधिकारी - सत्ताधारी पुरुष. यामुळेच कि काय, जसजशी मोगोली सत्ता विस्तारत गेली तसतशी आपापल्या स्थानिक इनाम, वतनांना स्थानिक सत्तेच्या जोडीला मोगली मान्यतेची आवश्यकताही वाटू लागली. हि मानसिकता एका प्रदेशाची नसून समग्र देशाची होती हे लक्षात घेतल्यास इथल्या वतनदारांच्या मानसिकतेस वा त्यांना हिणवण्याचे काही कारण नाही. याच दृष्टीकोनातून शहाजीचे नोकऱ्या बदलण्यातील हेतू समजावून घेतले पाहिजेत.

    वंशपरंपरागत जहागीर व वतनांचे संरक्षण करून उत्तरोत्तर त्यात वाढ करणे हेच शहाजीचे उद्दिष्ट होतं. या उद्दिष्ट साध्यपूर्तीसाठी त्याने आपल्या नोकऱ्या बदलल्या. किंबहुना हेच विधान अधिक स्पष्टपणे असे करता येईल कि, इतरांप्रमाणेच शहाजीने आपल्या पराक्रमाचा बाजार मांडून त्याची पुरेपूर किंमत वसूल करण्याचा प्रयत्न केला.

     उपलब्ध माहिती पाहता भातवडीच्या संग्रामापासून ते मोगली सेवेत येऊन ती नोकरी सोडेपर्यंत शहाजीच्या पदरात म्हणावा तसा अधिकारपदाचा तसेच अतिरिक्त भूप्रदेशाचा लाभ झाला नाही.
निजामशाही सोडण्यापूर्वी त्याचं काय स्थान होतं हे समजायला मार्ग नसला तरी त्याच्या बापाला निजामशाहीत ' सरगुऱ्हो ' चा दर्जा असून निजामशाही सोडून आदिलशाहीत गेल्यावर शहाजीला सरलष्कर पद मिळाले. यावरून या दोन्ही पदांचा दर्जा समान असावा असे अनुमान बांधता येते. अर्थात या तर्कास आणखी एका प्रत्यक्ष पुराव्याचा आधारही आहे. आदिलशाहीतील सरलष्कर पद सोडून शहाजी निजामशाहीत परत आला व तिथून तो मोगलांच्या छावणीत गेला तेव्हा त्यांस पंचहजारी मनसबदारी प्राप्त झाली.

    तुलनेकरता इथं नमूद करतो कि, लखुजी जाधव जेव्हा निजामशाहीत होता, त्यावेळी त्याचा हुद्दा पंचहजारीचा असून त्याने मोगलांकडे नोकरी धरताच त्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे इतिहासकार नमूद करतात. हे लक्षात घेता शहाजीच्या पदरात सरकारी अधिकार, मान मरातबाचे म्हणावं तसं दान पडल्याचं दिसून येत नाही.

    त्या व्यतिरिक्त त्याच्या वतन, जहागिरीकडे पाहावे तर त्यातही म्हणण्यासारखी भर दिसून येत नाही. वारंवार नोकरी बदलल्यामुळे त्यात अतिरिक्त वाढीपेक्षा घटच दिसून येते. शिवाय त्याच्या वारंवार नोकऱ्या बदलण्याचा परिणाम म्हणजे त्याच्या जहागिरी प्रदेशावर अनुक्रमे निजामशहा, आदिलशहा व मोगलांची झालेली आक्रमणे. यामुळे त्याची जहागीर म्हणावी तशी स्थिरस्थावर झालीच नाही. त्यात भर पडली दुष्काळाची. स. १६२७ ते ३२ पर्यंत प्रथम कोरडा व नंतर ओला दुष्काळ दक्षिण हिंदुस्थानात पूर्व ते पश्चिम किनाऱ्यादरम्यानच्या विस्तृत प्रदेशांत पडला. या दुष्काळामुळे सर्वांचेच कंबरडे मोडून पडले. आदिल, कुतुबशाही या तडाख्यातून लवकर सावरली नाही. त्याचप्रमाणे जर मोगलांचे साम्राज्य विशाल नसते तर त्यांचाही याप्रसंगी निभाव लागला नसता. या पार्श्वभूमीवर आपल्याला शहाजीच्या निजामशाही पुनरुज्जीवनाचे प्रयत्न समजावून घेणे भाग आहे.

    प्रथमतः हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे कि, शहाजीने निजामशाहीचा पुनरुद्धार केव्हा केला. या घटनेच्या संदर्भात तारखांची निश्चिती होत नसली तरी स. १६३२ च्या मार्चमध्ये शहाजहानचे उत्तरेत प्रयाण, दि. १७ जून १६३३ रोजी दौलताबादचा किल्ला फत्तेखानाने निजामासहित मोगलांच्या ताब्यात देणे या दोन घटनांवरून आपल्याला शहाजीच्या कार्याची संगती जुळवायची आहे. तत्पूर्वी शहाजी या कृत्यास का प्रवर्तला याचाही विचार करणे अत्यावश्यक आहे.

    शहाजीने पेमगिरी उर्फ भीमगड येथे निजामशहाच्या वंशातील एका व्यक्तीस गादीवर बसवून त्याच्या नावे मुख्य सूत्रे आपल्या हाती घेतली. हि घटना स. १६३२ च्या ऑगस्ट मधील कि स. १६३३ च्या सप्टेंबर मधील, याविषयी इतिहास संशोधकांत मतभेद आहेत. या ठिकाणी फत्तेखानाने ज्या निजामशाहीची शरणागती दिली, त्या घटनेची तारीख दि. १७ जून १६३३ असल्याचेही लक्षात ठेवावे लागते. मिळून शहाजीच्या या कृत्याची अचूक नोंद नसली तरी त्यामुळे राजकारणात बऱ्यापैकी उलथापालथ झाल्याचे दिसून येते.

    प्रथम जर गृहीत धरले कि, फत्तेखानाने शरणागती पत्करण्यापूर्वीच शहाजीने दुसरी निजामशाही उभारली तर असे म्हणता येते कि, मोगली आक्रमणास विभागून त्याने त्याची धार बोथट करत निजामशाहीच्या बचावाचा डाव खेळत जोडीला आपले महत्त्वही वाढवण्याचा प्रयत्न केला.

    किंवा, फत्तेखानाच्या शरणागती नंतर शहाजीने निजामशाही उभारण्याचा डाव आरंभला तर असं म्हणता येतं कि, शहाजीने आपली उपद्रवक्षमता सिद्ध करून आपणांस हवा तो लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात, दोन्ही निष्कर्ष परिणामाअंती काढलेले असल्याने त्यांचे महत्त्व कितपत मानायचे हा भाग देखील आहे. असो.

    प्रथम आपण हे पाहू कि, शहाजीनेच निजामशाहीच्या पुनरुज्जीवनाचा घाट का घातला ? आधीच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे शहाजीला अपेक्षित असलेला मोबदला कोणत्याच सत्तेकडून मिळालेला नव्हता. त्याच्या नावावर चमकदार लष्करी विजयांची नोंद ज्ञात इतिहासात असलेली तर दिसून येत नाही. परंतु त्याच्या समकालीनांचे वर्तन पाहता त्यांनाही तो विशेष पराक्रमी --- दखल घेण्याजोगा वाटत होता असे दिसून येत नाही. तेव्हा स्वतःचं सामर्थ्य दाखवून देण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याच्यापुढे चालून आली असता शहाजीसारखा महत्त्वाकांक्षी मनुष्य तिची उपेक्षा करेल हे संभवत नाही.

    शहाजीने ज्यावेळी निजामशाहीच्या पुनरुज्जीवनाचा घाट घातला त्यावेळी त्या सत्तेचे बरेच सरदार आपापल्या टापूतील प्रदेश बळकावून नव्याने प्रस्थापित होणाऱ्या सत्तेकडून त्यांस मान्यता मिळवून घेण्याच्या विचारात होते. या सरदारांची प्रांतासहित नावे काव्येतिहास संग्रहात छापलेल्या शहाजीच्या कैफियातीत असून जरी ती कैफियत पूर्णतः विश्वसनीय नसली तरी किमान निजामशहाचे प्रांतिक अंमलदार मोगल वा आदिलशहाच्या अंकीत्वाखाली स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रस्थापित राजवटीच्या ऱ्हासकालात दृष्टीस पडणारे हे चित्र असल्यामुळे यावर विश्वास ठेवण्यात मला तरी काही गैर वाटत नाही.

    या सरदारांप्रमाणे शहाजी देखील मनात आणता तर त्यासही ते अशक्य होतं असं नाही परंतु त्याची विचारशक्ती इतरांप्रमाणे नसून सामन्यांपैकी असामान्य अशा मलिक अंबरादी प्रभूतींपैकी होती. चांदबीबीच्या खुनानंतर निजामशाही तशीही संपलीच होती. परंतु मलिक अंबर व मियान राजूलाच त्यात नवचैतन्य ओतण्याची स्फूर्ती झाली तद्वत शहाजीचा प्रकार म्हणता येईल.

    मलिक अंबरला ज्याप्रमाणे बाह्य घटकांचे सहाय्य झाले तसेच शहाजीलाही ते प्राप्त झाले. प्रथम मोगलांना अनुकूल असलेल्या विजापूरकरांनी नंतर पक्षबदल करत शहाजीला पाठिंबा दिला. याचं मुख्य कारण राजकीय असूनही त्याची स्पष्टता करण्याइतपत साधन सामग्री माझ्याकडे नसल्याने त्याची चर्चा करत नाही.

    दुरून डोंगर साजरे अशी आपल्यात म्हण आहे. मोगलांच्या सामर्थ्याला, साम्राज्याला चपखल बसते. वरकरणी मोगलांची राजवट येथे स्थिर, प्रस्थापित झाल्याचे भासत असले व तिचा पाया भक्कम असल्याचा समज असला तरी वस्तुस्थिती वेगळीच होती. मोगली राजवट हि पूर्णतः लष्करी स्वरूपाची असून लष्करावरच तिची संपूर्ण मदार होती. जरी तो काळ लष्करी बळावर आधारित राजवटींचा असला तरी जनाधाराचा जो मनःपूर्वक पाठिंबा --- मग तो अल्प का होईना --- लागतो, तो या राजवटीस बिलकुल नव्हता. याचे प्रत्यंतर शहाजीला मोगल विरोधकांची व मोगलांची चाकरी करताना चांगलेच आले.  

    शहाजहानच्या हाती सत्तेची सूत्रे जाताच कित्येक ठिकाणी लहान - मोठ्या बंडाळ्या निर्माण झाल्या. दक्षिणेत तर त्याचा सुभेदार खानजहानच त्याच्या विरोधात उभा राहिला. बुंदेलखंडात जुजहारसिंगाने बंडाचा झेंडा उभारला. त्याचे प्रकरण मिटते न मिटते तोच चंपतराय बुंदेल्याने पुन्हा एकदा बंडाची आग भडकावली. याच चंपतरायचा मुलगा छत्रसाल पुढे प्रसिद्धीस आला. खेरीज झारखंड, माळवा, बंगाल इ. प्रांतात किरकोळ उठाव होतच होते. पैकी, खानजहानचा बंडावा शहाजीच्या निजामशाही उभारणीपूर्वी झालेला असला तरी जुजहारसिंगाचा उठाव मात्र समकालीन होता. मोगल राजवट जर इथे रुजली असती, लोकप्रिय झाली असती तर असे उठाव होऊन प्रदीर्घकाळ चालले नसते, हे या उठावांचा उपशम करण्यासाठी लागलेल्या कालावधी वरून सहज लक्षात येते.

    शहाजीला सहाय्य झालेला आणखी एक बाह्य घटक म्हणजे निसर्ग ! स. १६२७ ते ३२ पर्यंतच्या दुष्काळामुळे दक्षिणेत जी परिस्थिती निर्माण झाली तिचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक आहे.

    या दुष्काळाची तुकाराम, रामदासादी समकालीन संतांनी केलेली वर्णने परीचायची आहेतच.जोडीला शिवभारतातील या दुष्काळाचे वर्णन पाहू :-  (५२) त्या दुष्ट निजामशहाच्या अशा प्रकारच्या अनेक दुष्कृत्यांमुळे भयंकर अवर्षण पडून लोकांच्या फार हालअपेष्टा होऊं लागल्या. (५३) पुष्कळ काळपर्यंत त्याच्या देशांत पाऊस न पडल्याने धान्य अत्यंत महाग झाले आणि सोने मात्र स्वस्त झाले. (५४) श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीथ घेत. (५५) खाण्यास कांही न मिळाल्यामुळे एकच हाहाकार उडून जाऊन पशु पशूंस आणि माणसे माणसांस अशी परस्परांस खाऊ लागली. (५६, ५७) त्या भयंकर अवर्षणामुळे, परचक्र आल्यामुळे, पिढीजाद - जुन्या प्रधानांच्या आणि विपुल सैन्याच्या अभावामुळे क्षणोक्षणी क्षीण होत जाणारा निजामशहा आणि त्याच्याबरोबरच दुष्ट फत्तेखान प्रबल मोगलांच्या हाती सापडले.  
संदर्भ ग्रंथ शिवभारत :- अध्याय ८, श्लोक क्र. ५२ ते ५७  
     
    तसेच वा. सी. बेंद्रे संपादित ' सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कुतुबशाही ' मधील दुष्काळ विषयीची माहिती पुढीलप्रमाणे :-  ' गेल्या दोनतीन वर्षांत जसा पाऊस पडावा तसा पडला नाही. त्यामुळे तांदुळाचा भाव दर होनास बारा मण होता तो सात मण झाला. इ. स. १६३० च्या पावसाळ्याचे सुरवातीस ( जून ) हा भाव साडेतीन मणांवर आला. अर्धा पावसाळा गेला तरी पाऊसाचा एक थेंबही पडला नाही. या अवर्षणाने पाण्याचा अगदीच तुटवडा पडला. शंभर गज खणले तरी पाणी लागेना. ..... ..... ...... ...... हुसेन सागर, इब्राहीम पट्टणचा तलाव, हैद्राबदेतील तलाव, खोल विहिरी वगैरेस कोठेच पाण्याचा थेंब राहिला नव्हता. बागेतील झाडे वाळून गेली. घरांत मेलेल्यांस व त्याचप्रमाणे बाजारांत व इतरत्र मेलेल्यांस मूठमाती देण्यास कोणी मिळेना. अशी भयंकर स्थिती प्राप्त झाली. कुत्बशाहाने फर्मान काढून जेथे जेथे धान्य सामग्री साठवली होती तेथून ती शहरात आणविली. ती विकण्यास व साठविण्यास आज्ञा केली. तेव्हा शहरांत खावयास मिळू लागले. इतरत्र सोन्याच्या भावाने धान्य मिळू लागले. तेव्हा कुत्बशाहाने सर्वत्र आणखी लंगरखाने काढले. येईल त्यास त्याच्या पोटापुरते फुकट अन्न पुरविण्याचा हुकुम दिला. लोकांच्यांत चालण्याची शक्ति राहिली नाही म्हणून अन्न जवळपास मिळावे याकरितां लंगरखान्यांची संख्या वाढविली. आळीआळींतून लंगरखाने काढले. भुकेने बेजार होऊन रस्त्यांत पडलेल्या लोकांसाठी मोठमोठी कांजीची तपेली गाड्यांवर घालून रस्त्यारस्त्याने हिंडवावीत व चमच्याने प्रत्येकाच्या तोंडात कांजी घालीत जावे असे हुकुम दिले. सरदार, सरकारी नोकर व इतर मोठमोठ्या लोकांस या कामात शक्य ती मदत करण्याचा हुकुम दिला. मोठमोठे सरदार व श्रीमंत शक्य ते अन्नदानहि देऊं लागले. पाणी लागेपर्यंत ठिकठिकाणी विहिरी खणण्याचे काम सपाट्याने चालू केले. अशा तऱ्हेने शक्य ते प्रयत्न केले. खास हैद्राबादेतच एक लाखांवर माणसांस कफनी पुरविल्या. याशिवाय असंख्य लोक इतरत्र मेले असतील ते वेगळेच. ' 
    
    खेरीज डब्ल्यू. एच. मूरलँड लिखित व राजेंद्र बनहट्टी अनुवादित ' अकबर ते औरंगजेब ' या संदर्भग्रंथात व्हॅन ट्विस्ट या गुजरात मधील डच व्यापाऱ्याच्या वृत्तांताचा काही भाग दिला आहे. त्यानुसार दुष्काळाची तीव्रता इतकी होती कि, माणसं जीव जगवण्यासाठी जिवंत तसेच आसन्नमरण स्थितीतील लोकांना खाऊ लागली. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबं विष घेऊन आत्महत्या करू लागली.

    जिथे स्थिर शासन होते अशा गोवळकोंडा व गुजरात प्रांतात हि अवस्था असेल तर ज्या प्रदेशात गेली कित्येक वर्षे युद्ध - मोहिमांखेरीज काही झालेच नाही अशा निजामशाही राजवटीत मोडणाऱ्या प्रदेशात काय अनर्थ झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. असो.

    उपरोक्त विपरीत नैसर्गिक परिस्थिती कोणाला प्रतिकूल वाटावी तर कोणाला अनुकूल. इथे शहाजीने हीच अनुकुलता जाणून उचल खाल्ली व आपला डाव आरंभला. सुरवातीला त्यांस यशही प्राप्त झालं. आदिलशहाने शहाजी स्थापित निजामशहाला पाठिंबा व मान्यता दिल्याने ती सत्ता अधिकृत बनली. भलेही मोगल त्यांस अनधिकृत मानत असतील परंतु स्थानिक प्रदेशातील बलिष्ठ सत्तेचे पाठबळ लाभल्याने शहाजीच्या पक्षास नैतिक बळ प्राप्त झाले. परंतु निजामशाहीच्या बचावासाठी चाललेला हा झगडा बराच लांबला. त्यात शहाजहान हा देखील बऱ्यापैकी चिकट निघाला. त्याने निजामशाही नष्टच करण्याचा चंग बांधून आपले शक्य तितके सामर्थ्य याच मोहिमेकरता पणाला लावत अखेर स. १६३६ च्या आरंभी तो स्वतःच नर्मदापार झाला.

    हेकेखोरपणा, दुराग्रह याबाबतीत शहाजहान औरंगजेबचा खरोखर बाप होता. परंतु परिस्थितीनुसार माघार घेत बिघडलेला डाव हलकेच सुधारून घेण्याची त्याची वृत्ती औरंगजेबात नव्हती. त्यामुळेच जवळपास एकसारख्याच असेल्या परिस्थितीला बाप लेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले.

    शहाजहान दक्षिणेत आला त्यावेळी कुतुबशहा, आदिलशहा, पोर्तुगीज व शहजी या चौघांची झालेली मोगलविरुद्ध आघाडी त्याला हरप्रयत्ने फोडून निजामशाही नष्ट करून इथे मोगलांची सत्ता प्रस्थापित करायची होती. पैकी पोर्तुगीज त्याच्या आवाक्याबाहेर होते. तेव्हा त्याने शहाजी, आदिल व कुतुब विरुद्ध आघाडी उघडली. या तिन्ही शत्रूंवर त्याने लष्करी बळ व दरडावणी असा दुहेरी मारा केला. पैकी, सुरवातीला शरणागती कुतुबशहाने पत्करली व त्याने सरळसरळ मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले. आदिलशहा मात्र सहजासहजी नमला नाही. परंतु एका मर्यादेनंतर त्याचाही नाईलाज होऊन त्यानेही शहाजहानसोबत तह करून चालू युद्धातून अंग काढून घेतले.

    शहाजहानच्या आगमनासोबत आदिल व कुतुबच्या शरणागतीमुळे या घटनेविषयी मनात नाही म्हटले तरी औत्सुक्य निर्माण होतेच. माझ्या मते, या दोन सत्तांच्या या भूमिकेचे कारण नुकत्याच होऊन गेलेल्या दुष्काळात आहे. नैसर्गिक आपत्तीचे परिणाम हे तात्कालिक जसे असतात तसेच काही दीर्घकालीनही असतात.

    दुष्काळ व त्यानंतर येणारी रोगराईमुळे स्थलांतरं हि अनिवार्य ठरतात. अशा स्थलांतरांमुळे गावं - शहरं ओस पडतात. पुन्हा ती वसवणं व पहिल्यासारखी भरभराटीला आणणं व ते नच जमल्यास  त्यांचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी उपाय योजण्यात वर्षं निघून जातात. किंबहुना एका पिढीचं आयुष्य तरी यातच खर्ची पडतं. यादरम्यानचा जो संक्रमणाचा काळ असतो, तो अनेकार्थांनी महत्त्वाचा असून बऱ्याचशा लहानमोठ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक उलथापालथी याच कालखंडात झाल्याचे आपल्या दृष्टीस पडते. दख्खनचा इतिहासही याला अपवाद नाही.
                                                                                 ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: