शनिवार, १६ मार्च, २०१३

गंगोबातात्या



           छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पुढे पेशव्यांनी साम्राज्यात रुपांतर केले असे सामान्यतः म्हटले जाते. पेशव्यांच्या या राज्यविस्ताराच्या कामी त्यांना अनेक शूरवीरांची व मुत्सद्द्यांची मदत झाली. त्यांपैकी एक म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड हा होय ! गंगाधर चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या हे नाव मराठी इतिहासप्रेमी वाचकांना अगदीच अपरिचित असे नाही. होळकरांचा गोडबोल्या कारभारी, पानिपत मोहिमेत दिल्लीचा किल्ला जाटाच्या ताब्यात देण्याच्या कटातील हा फितूर मुत्सद्दी, माधवराव – रघुनाथराव यांच्या भांडणात राघोबाची बाजू घेतल्याबद्दल भर दरबारात पेशव्याच्या हातून मार खाणारा वृद्ध मुत्सद्दी इ. अनेक सत्य – असत्य कथांच्या रूपाने हे ऐतिहासिक पत्र मराठी इतिहास वाचकांच्या मनात घर करून आहे.

           मराठी भाषेत इतिहास विषयक लेखन जरी विपुल प्रमाणात झाले असले तरी आजही संदर्भ ग्रंथांपेक्षा मराठी वाचकांवर कथा – कादंबऱ्यांची मोहिनी आहे. खंडीभर पुरावे धुंडाळून शेजवलकरांनी ‘ पानिपत १७६१ ‘ हा ग्रंथ लिहिला खरा, पण त्याचे वाचन किती जणांनी केले हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याउलट विश्वास पाटलांनी प्रचलित कथा – दंतकथांच्या आधारे लिहिलेली ‘ पानिपत ‘ कादंबरीचे आज भारतातील प्रमुख भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. शेजवलकरांच्या पानिपत ग्रंथातील गंगोबातात्या हा लढवय्या आणि मुत्सद्दी आहे तर पाटलांच्या कादंबरीतील गंगोबा हा गोडबोल्या, भित्रा व मराठी राज्याशी द्रोह करणारा असा मुत्सद्दी आहे. आज मराठी इतिहास वाचकांना पाटलांनी रंगविलेला गंगोबाच माहिती आहे. शेजवलकरांच्या गंगाधरपंताची कोणाला फारशी माहितीच नाही. या ठिकाणी विश्वास पाटलांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही तसेच गंगोबाचे उदात्तीकरण देखील करण्याची माझी इच्छा नाही. प्रस्तुत लेखाचा मुख्य उद्देश म्हणजे गांगोबाच्या चरित्राचा एक धावता आढावा घेणे हा होय !

   पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात मल्हाररावाचे प्रस्थ वाढू लागले होते. लौकिकात जरी मल्हारराव पेशव्यांचा सरदार असला तरी व्यवहारात मात्र तो एक स्वतंत्र संस्थानिकच होता. प. बाजीरावाच्या कालापासूनच होळकरावर नियंत्रण घालण्याचा पेशव्यांचा उद्योग चालला होता. आपला एखादा विश्वासू सेवक कारभारी म्हणून मल्हाररावच्या पदरी नेमून त्याच्या पायांत बेडी अडकवण्याचा पेशव्यांचा डाव होता व या खेळीतील त्यांचा मोहरा बनला गंगाधर यशवंत चंद्रचूड ! निंब गावचा हा मुत्सद्दी व योद्धा होळकरांचे कारभारी पद भूषवण्यास एकदम लायक होता. पेशव्यांनी मोठ्या चलाखीने गंगोबाला होळकराकडे नेमले खरे, पण मल्हारराव याबाबतीत वस्ताद निघाला. गंगोबाने मल्हाररावावर ताबा बसवण्यापूर्वीच होळकराने त्यास आपल्या घोळात घेतले. परिणामी पेशव्यांची, विशेषतः पेशव्याचा मुख्य कारभारी या नात्याने सदाशिवरावाची गंगोबावर नाराजी ओढवली. वस्तुतः, मल्हाररावसारख्या चतुर शूरवीराला रगडून पेशव्यांचा अंकित करणे हि जबाबदारी गंगोबाच्याच काय पण खुद्द पेशव्यांच्या देखील कुवतीबाहेरची होती. पण हि वस्तुस्थिती पेशव्यांनी कधी लक्षातच घेतली नाही.

       होळकरांच्या पदरी कारभारी म्हणून नोकरीस लागल्यावर गंगाधरचे नशीब पालटले. फडावरील मुत्सद्देगिरी व कारकुनीला अंगच्या पराक्रमाची जोड असल्याने पुढील काळात गंगोबावर लष्करी मोहिमा सोपवून मल्हारराव काहीसा निश्चिंत राहू लागला होता. अनुभवाने गंगोबालाही एक गोष्ट चांगलीच समजून आली होती. एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या नोकऱ्या करण्यापेक्षा होळकराचाच पक्ष घेऊन राहिलेले केव्हाही चांगले. स. १७५० नंतर गंगोबाने आपला हा विचार हळूहळू अंमलात आणण्यास आरंभ केल्याचे दिसून येते. स. १७५० नंतर होळकरी सैन्याने ज्या मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला त्या सर्व मोहिमांमध्ये गंगोबाचा सक्रीय सहभाग असल्याचे दिसून येते. स. १७५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंग व रोहिले – पठाणांचा झगडा जुंपला. त्यावेळी वजिराच्या मदतीला शिंदे – होळकरांच्या फौजा गेल्या. त्या संघर्षात गंगोबाची तलवार तळपली. पुढे स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात मल्हाररावाचा मुलगा खंडेराव याचा अपघाती मृत्यू झाला. पुत्रनिधनाने वृद्ध मल्हारराव रणभूमीवरून काहीसा निवृत्त झाला व लष्कराची जबाबदारी गंगोबा व तुकोजीवर येऊन पडली. रघुनाथरावाचा प्रसिद्ध अटक मोहिमेत होळकरी सैन्याचे नेतृत्व प्रामुख्याने या दोघांनीच केले. स. १७६० मध्ये बुराडी घाटच्या लढाईनंतर अब्दालीसोबत लढण्यास होळकरांनी पुढाकार घेतला. त्यावेळी झालेल्या संग्रामात २७ फेब्रुवारी १७६० रोजी गंगोबाने दिल्लीजवळील सिकंदरा, या नजीबच्या जहागीरीतील प्रदेशावर स्वारी करून लूट मिळवली. ४ मार्च १७६० रोजी अफगाण सैन्याने छापा मारून गंगोबाला उधळून लावले तरी त्याचा हा पराक्रम खास दुर्लक्षणीय नाही.

     पानिपत युद्धानंतर बदललेल्या परिस्थितीनुसार पुढील राजकारणाचा उपक्रम ठरविणारे भेलसा मुक्कामातून नानासाहेब पेशव्याने लिहिलेले एक पत्र नाना पुरंदरे, विठ्ठल शिवदेव व गंगोबातात्यालाच उद्देशान लिहिले आहे. त्यात उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी पेशव्याने या तिघांवर सोपविल्याचे दिसून येते. स. १७६५ मध्ये मल्हारराव व इंग्रजांचा झगडा जुंपला. त्यावेळी झालेल्या लढायांमध्ये होळकरी सैन्याचे नेतृत्व गंगोबाने केले. या संग्रामात होळकरांच्या सैन्याने इंग्रजांचा पराभव करून उत्तर हिंदुस्थानात मराठी राज्याची प्रतिष्ठा राखली. स. १७६६ मध्ये मल्हारराव वारल्यावर मात्र गंगोबाचे आसन काहीसे डळमळीत झाले. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू मालेराव यास होळकरांची सरदारकी मिळाली असली तरी स. १७६७ मध्ये त्याचे निधन झाल्याने होळकरांचा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला. यावेळी अहिल्याबाईस दत्तक पुत्र घेण्याची परवानगी देऊन होळकरांचे कारभारी पद आपणांस मिळावे अशी गंगोबाने रघुनाथरावाकडे मागणी केली. परंतु राघोबादादा त्याची मागणी पूर्ण करण्यास असमर्थ होता. माधवराव पेशवा म्हणून राजकारणात स्थिर झाला होता. स. १७६७ अखेरीस त्याने तुकोजीला होळकरांच्या सरदारकीची वस्त्रे देऊन त्यास अहिल्याबाईच्या आज्ञेत वर्तण्याची आज्ञा दिली. त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानचा कारभार शिंदे, होळकर, पवार, राजेबहाद्दर इ. सरदारांनी गंगोबातात्याच्या सल्ल्याने करावा अशीही आज्ञा काढली. माधवरावाच्या या हुकुमावरून गंगोबाच्या राजकीय प्र्स्थाची महती लक्षात येते.

     असे असले तरी, याच माधवरावच्या विरोधात जाऊन कारस्थाने करण्यास गंगोबाने मागे – पुढे पाहिले नाही. पेशवे घराण्यातील चुलत्या – पुतण्याच्या वादात त्यावेळी कित्येक सरदारांची मने दुलग झाली होती. त्यांपैकी काही तटस्थ राहिले तर कित्येकांनी आपापल्या नायकाचा स्वीकारला. रघुनाथरावाने होळकरांकडे मदतीची मागणी केली त्याचप्रमाणे माधवरावाने देखील अशीच मागणी केली. तुकोजी होळकराने कोणताच पक्ष स्वीकारला नाही मात्र गंगोबा रघुनाथाच्या पक्षाला मिळाला. स. १७६८ च्या जून महिन्यात धोडप येथे माधवरावाने रघुनाथरावाचा पराभव केला. अटकेपार भरारी मारणारा राघोबादादा आता पेशव्यांचा नजरकैदी बनला. या लढाईत गंगोबादेखील सहभागी होता व पराभवानंतर तो कैदी म्हणून पेशव्यांच्या हाती लागला. पेशव्याने त्यास प्रथम नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. पुढे त्यास पुणे दरबारात हजार करण्यात आले. कैदेतून सुटका हवी असल्यास ३० लाख रुपये दंड भरावा लागेल अशी पेशव्याने त्याच्यासमोर अट मांडली. तात्याने एवढ्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा पेशव्याने भर दरबारात त्यास छड्या मारल्या. खरे तर ३० लाखांचे एक निमित्त होते. आपण वारंवार तात्याचा पक्ष घेऊन, उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी त्याच्यावर सोपवून देखील तो रघुनाथरावची बाजू घेतो याचा पेशव्याला राग होता. तो राग त्याने अशा पद्धतीने व्यक्त केला. यातून फारसे काही नसले तरी पेशव्याचा एक हेतू मात्र साध्य झाला व तो म्हणजे सखारामबापू सारखी मंडळी पेशव्याच्या विरोधात कारस्थाने करण्यास काहीशी कचरू लागली.

       स. १७७२ मध्ये माधवरावच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवा झाला. आरंभी रघुनाथाचे व नारायणाचे उत्तम रहस्य होते पण पुढे लवकरच दोघांत तंटे निर्माण होऊन पेशव्याने चुलत्यास कैदेत टाकले. यावेळी दादाने आपल्या सुटकेसाठी व सत्ताप्राप्तीसाठी कित्येक कट आखले. त्यातील एक कट सिद्धीस गेला पण त्यात नारायणराव पेशवा जीवानिशी गेला. त्या कटात गंगोबाचा देखील सहभाग होता. नारायणराव मारला गेल्यावर दादा पेशवा झाला. आपले मुख्य कारभारीपद गंगोबाला देण्याचा त्याचा विचार होता पण प्रत्यक्षात मात्र गंगोबाला त्याने कारभारीपद दिले नाही. पेशवेपद हाती पडताच दादाने आपला जम बसवण्यास आरंभ केला खरा आपण वर्षभरातच त्याच्या विरोधात सरदारांनी बंड पुकारल्याने दादाचे आसन डळमळीत झाले. पुण्यातून त्याची गच्छंती होऊन कारभार बारभाई मंडळाकडे आला. या सर्व घडामोडींमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मात्र गंगोबाला लाभले नाही. २० फेब्रुवारी १७७४ रोजी तो मरण पावला.

२ टिप्पण्या:

rahul म्हणाले...

In Maharashtra , we all like the historical novels, not true history. on that basis we argue. still we red novels but not want to read good history writings of the historians..

sanjay kshirsagar म्हणाले...

राहुल,
आपल्या विचारांशी पूर्णतः सहमत आहे.