बुधवार, २० मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - २ )


छ. शिवाजी निर्मित स्वराज्याचे खरे वारस आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी शाहू - ताराबाई आपापले सर्व बळ एकवटून कार्य करीत होते. स्वराज्याचा लढा आता भोसले घराण्याचा झगडा बनला होता व या झगड्यांत दोन्ही पक्षांचे प्रमुख अपवाद केल्यास इतरांना फारसा रस नव्हता. याचे कारण म्हणजे, या झगड्यातून काय अर्थप्राप्ती होणार हे दिसतच होते. अशा परिस्थितीत कित्येक मराठी सरदारांनी पक्ष बदलाचा पर्याय स्वीकारला. ताराबाई - मोगल अशी युती दिसताच शाहूच्या दरबारातील कित्येक सरदार फिरून ताराबाईस रुजू झाले. काही महाभाग असेही होते कि, भोसले घराण्याच्या तंट्यात पडून फुकट मरण्यापेक्षा सरळसरळ मोगलांची चाकरी करण्यास निघून गेले. अर्थात, त्यांनाही दोष का द्यावा ? ताराबाई व शाहू देखील आपणांस स्वराज्याचे खरे वारस म्हणून मोगली मान्यता मिळवण्यासाठीच तर झगडत होते ! सारांश, कनिष्ठांनी वरिष्ठांचे अनुकरण मात्र करावे पण योग्य अयोग्य हा विचार न करावा हि सामाजिक मानसिकताच या उदाहरणातून दिसून येते इतकेच !
ताराबाई - शाहू यांच्या झगड्यास वैतागून मोगलांकडे जाणाऱ्यांमधील सर्वात मोठे प्रस्थ म्हणजे चंद्रसेन जाधव ! शाहूच्या या प्रमुख सेनापतीस फितूर करण्याचा ताराबाईने बराच प्रयत्न केला व चंद्रसेनने देखील आपण ताराबाईस अनुकूल असल्याचा देखावा रचला. त्यानिमित्ताने त्याने थोरात, निंबाळकर, पवार इ. सरदारांनाही शाहूविरोधात चिथावणी दिली. दरम्यान शाहूसोबत तंटा करण्यास त्याला जे निमित्त हवे होते ते बाळाजी विश्वनाथच्या रूपाने त्यास प्राप्त झाले. शाहूने बाळाजीला ' सेनाकर्ते ' हे नवीनच पद दिले. त्यामुळे सेनापती चंद्रसेन जाधवास हे आपल्या अधिकारक्षेत्रातील अतिक्रमण वाटल्यास नवल नाही. त्यातच हरणाचा / काळ्या कबुतरा तंटा बाळाजी व चंद्रसेनच्या सेवकांमध्ये उद्भवून दोन्ही पक्षांची बाचाबाची झाली. तेव्हा जाधवाने बाळाजीस कैद करण्याचा घाट घातला. जीवावरील संकट जाणून बाळाजी शाहूच्या आसऱ्यास धावला. शाहूने बाळाजीस अभय देताच चंद्रसेनाने शाहूला निरोप पाठवून बाळाजीस आपल्या हवाली करण्याची मागणी केली अन्यथा आपण चाकरी सोडून जात असल्याची धमकी दिली. शाहूने जाधवाची समजूत घालण्यासाठी व तो ऐकत नसल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हैबतराव निंबाळकरास पाठवले. निंबाळकराने जाधवास उधळून लावले तेव्हा चंद्रसेन ताराबाईच्या दरबारात रुजू झाला. ( स. १७११ ) पुढे त्याने हैबतराव निंबाळकरास ताराबाईच्या पक्षात आणण्याची कामगिरी बजावली आणि संधी मिळताच मोगल मुत्सद्दी निजाम याच्या पदरी तो गेला. परंतु हा भाग पुढील काळात घडला असल्याने तूर्तास इतकेच पुरे.
चंद्रसेन निघून जाताच शाहूने, चंद्रसेनाचा भाऊ संताजी यास सेनापतीपद दिले. इकडे बाळाजी विश्वनाथाने पिलाजी जाधव, अंबाजी पुरंदरे इ. मदतीने फौजफाटा वाढवून शहूची बाजू बळकट करण्याचा उद्योग आरंभला. कारण, परसोजी भोसले व चिमणाजी दामोदार वगळल्यास शाहूकडे आता फौजबंद असे कोणी मराठी सरदार फारसे नव्हते व हे दोघेही खानदेशाकडे असल्याने आणि पेशवा बहिरोपंत पिंगळे हा निष्क्रिय राहिल्याने शाहूची अवस्था बिकट बनली होती. दरम्यान चंद्रसेन जरी शाहूला सोडून गेला असला तरी शाहूच्या उर्वरित सरदारांचे मनोधैर्य अजून कायम होते. स. १७११ च्या अखेरीस कोरेगाव नजीक खटाव येथील कृष्णराव खटावकर या मोगली ठाणेदारास लढाईत ठार करून बाळाजी विश्वनाथाने खटाववर शाहूचा अंमल बसवून दिला. या मोहिमेत बाळाजीला श्रीपतरावची मदत झाली. स. १७१२ मध्ये ताराबाईच्या आज्ञेनुसार आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे कोकणातून पुढे घाटावर, सातारच्या दिशेने येऊ लागला. त्यास रोखण्यासाठी शाहूने बहिरोपंत पेशव्यास रवाना केले. परंतु, कान्होजीने बहिरोपंतास कैद करून शाहूच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. खुद्द पेशवाच कैद झाल्याने शाहूची स्थिती बिकट झाली. पण प्रसंग जाणून त्याने बाळाजी विश्वनाथास पेशवेपद दिले. याकामी अंबाजी पुरंदरेची बाळाजीला मोठीच मदत झाली. बाळाजीस पेशवा बनवून कान्होजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शाहूने त्याच्यावर सोपवली. ( स. १७१३, नोव्हेंबर ) पेशवेपद मिळताच बाळाजी आंगऱ्याच्या मोहिमेवर रवाना झाला. युद्धापेक्षा वाटाघाटींनी आंगऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा बाळाजीने प्रयत्न केला व त्यात तो यशस्वी झाला. कान्होजीने शाहूची ताबेदारी मान्य केली. अर्थात, यामागे बाळाजीची मुत्सद्देगिरी कारणीभूत असली तरी ते काही प्रमुख कारण नाही. कान्होजी शाहूकडे वळण्यास तत्कालीन राजकारणातील एक अपघात प्रामुख्याने कारणीभूत ठरला. ( स. १७१४ )
स. १७१४ मध्ये शाहूचा पाडाव करण्याच्या खटपटीत ताराबाई मग्न असताना, राजारामची द्वितीय पत्नी राजसबाई व तिचा मुलगा संभाजी दुसरा यांनी ताराबाई व तिचा पुत्र तिसरा शिवाजी यांना कैदेत टाकून कोल्हापूची सत्ता आपल्या हाती घेतली. सुप्रसिद्ध मुत्त्सद्दी रामचंद्रपंत अमात्य याने हे कारस्थान रचले. हा कट यशस्वी होण्यास शाहू व निजाम या दोघांनी हातभार लावल्याचे मानले जाते. कोल्हापुरास हि राज्यक्रांती झाली त्यावेळी कान्होजी आंग्रे व बाळाजी विश्वनाथ युद्धाच्या तयारीने समोरासमोर आले होते. परंतु, कोल्हापूरची बातमी समजताच आंगऱ्याचे नैतिक बळ खचले. नव्या परिस्थितीत आपले स्थान काय हा प्रश्न त्याच्यासमोर उद्भवला. आंगऱ्याची मनःस्थिती जाणून व संभाजीने त्यास आपल्या पक्षात घेण्याआधी आपणच त्यास शाहूच्या ओटीत घातले असता अंती फायदा आपलाच आहे हे ओळखून बाळाजीने त्यास शाहूच्या पदरी आरमारप्रमुखाची लालूच दाखवली. त्याशिवाय कोकणात जे काही प्रांत व किल्ले आंगऱ्याने ताब्यात घेतले होते, ते त्याच्याच ताब्यात राहतील असे आश्वासनही दिले. या बदल्यात आंगऱ्याने शाहूस छत्रपती म्हणून मान्यता द्यायची होती. अशा या व्यवहारात आपले काहीच नुकसान नाही हे पाहून कान्होजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. ( स. १७१४ )
मोगल आघाडीवर यावेळी भलतीच हालचाल चालली होती. निजाम उल्मुल्क हा स. १७१३ मध्ये दक्षिणचा सुभेदार म्हणून कारभारावर दाखल झाला. ढासळत्या मोगल बादशाहीची अंतःस्थिती जशी त्याला माहिती होती तशी शाहू, ताराबाई वा इतर मराठी सरदारांना नव्हती. दक्षिणेत स्वतंत्र पंथ पाहण्याचा त्याचा गुप्त हेतू होता व त्यासाठी तो प्रयत्नशील होता. वरवर मोगल बादशाहीचा अधिकारी म्हणून काम करताना तो येथे आपले हितसंबंध जुळवू लागला होता. ताराबाई व शाहू अशी दोन फळ्यांत विभागलेली मराठेशाही त्याच्या महत्त्वकांक्षेला अनुरूप अशीच होती. या दोघांपैकी एका पक्षाला मदत करण्याच्या नावाखाली दक्षिणेतील आपले आसन बळकट करण्याचा त्याचा डाव होता. शाहू - ताराबाई वादांत, ताराबाई कैदेत जाउन संभाजी आला आणि निजामाच्या गळाला संभाजीरुपी मासा अलगद लागला. शाहू मोगलांच्या कैदेत लहानाचा मोठा झाला होता तर ताराबाई सुमारे २० - २२ वर्षे मोगलांशी राजकारण व युद्ध या दोन्ही माध्यमांतून लढत होती. या दोघांवर कब्जा बसवणे निजामाला थोडे अवघड होते. त्यामानाने अननुभवी संभाजी त्याच्या कारस्थानात फसणे सोपे होते व तसेच घडले. मात्र निजामाच्या धुर्ततेचा कळस असा कि, त्याने शाहूला आपण त्याचे हितचिंतक असल्याचे भासवून काही काळ अक्षरशः गाफील ठेवले. ब्रिटन लढाई हरते पण युद्ध जिंकते असे म्हटले जात असे, त्या धर्तीवर मोगल लढाई हरत पण मुत्सद्देगिरीत निदान मराठी सत्ताधीशांच्यापुढे तरी जिंकत असे म्हणावेसे वाटते.
निजामाच्या दुर्दैवाने मोगल बादशाहने स. १७१५ मध्ये त्यास उत्तरेत बोलावले व दिल्लीच्या प्रसिद्ध सय्यद बंधूंमधील हुसेनअली सय्यद यास दक्षिणच्या सुभ्यावर नेमले. निजाम व सय्यदांचे वैर असल्याने हुसेनअलीने दक्षिणेत आल्यावर शाहूचा पक्ष स्वीकारला. मोगलांशी वैर पत्करण्याची कोल्हापूरच्या संभाजीची तयारी नसल्याने तो अगदीच गप्प बसला. याचा फायदा शाहूने बरोबर उचलला व मोगलांच्या पाठींब्यावर त्याने बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्याचे कार्य प्रथम हाती घेतले. यात पहिला नंबर लागला तो दमाजी थोराताचा ! शाहू, ताराबाई, मोगल अशा वारंवार चाकऱ्या बदलणाऱ्या थोराताची निष्ठा अशी कोणावरच नव्हती. अशा मंडळींची फार काळ गय करणे शाहूला परवडण्यासारखे नव्हते. बाळाजी विश्वनाथास त्याने थोराताच्या बंदोबस्तासाठी पाठविले. परंतु, बोलाचालीने दमाजीला सरळ करायला गेलेल्या बाळाजीस थोराताने कपटाने कैद केले. अखेर दंड भरून त्यास आपली सुटका करावी लागली. तेव्हा शाहूने सचिवास दमाजीच्या मुसक्या आवळण्यास पाठविले. परंतु दमाजीने अल्पवयीन सचिव नारो शंकर यासच छापा मारून कैद केल्याने शाहूच्या आक्रमणातील एकप्रकारे हवाच काढून घेतली. वस्तुतः पेशव्याचा पराभव झाल्यावर खुद्द शाहूने थोरातावर चालून जायला हवे होते किंवा सचिवाचे प्रकरण घडल्यावर तरी स्वतः मोहिमेवर बाहेर पडायला हवे होते पण का कोणास ठाऊक, तो स्वतः काही स्वारीसाठी बाहेर पडलाच नाही. ( स. १७१६ - १७ ) पुढे स. १७१८ मध्ये बाळाजी विश्वनाथने हुसेनअली सय्यदची मदत घेऊन मोगली तोफखान्याच्या सहाय्याने दमाजी थोराताचा पराभव करून त्यास कैद केले. त्याची हिंगणगावची गढी मातीस मिळवली तर गावावरून गाढवाचा नांगर फिरवला. दमाजीला शाहूने पुरंदरावर कैद करून ठेवले. पुढे शाहूच्या राण्यांनी त्याच्या वतीने रदबदली केल्याने शाहूने दमाजीस कैदमुक्त केले. पण स. १७२८ मध्ये दमाजीने कोल्हापूरच्या संभाजीसोबत  हात मिळवणी करून शाहूविरोधात दंड  थोपटले. तेव्हा फिरून त्यास पकडून शाहूने पुरंदरावर  कैदेत टाकले. या  बंदीवासातच दमाजीचा अंत झाला.
औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला चढवून त्याच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापण्याचे कार्य संताजी घोरपडेच्या साथीने विठोजी चव्हाणाने पार पाडले. स. १६९९ मध्ये कर्नाटकांत मोहिमेवर असताना विठोजी लढाईत मारला गेला. त्याचा मुलगा उदाजी यास बापाचे पद व जहागीर मिळाली. शाहू व ताराबाई यांच्या झगड्यात त्याने नेहमीच ताराबाईचा व पुढे संभाजीचा पुरस्कार केला. स. १७६२ मध्ये एका लढाईत उदाजी मरण पावला पण शाहू हयात असे पर्यंत त्याने शाहूच्या मुलखावर वारंवार हल्ले चढवून त्यास त्रस्त केले. उदाजी पराक्रमी असला तरी तो मनापासून कोल्हापूरकारांशी एकनिष्ठ असल्याने शाहूच्या उद्योगास त्याचे पाठबळ लाभले नाही. शाहूने कित्येकदा त्याच्यावर मोहिमा आखल्या, त्यास पराभूत करून कैद देखील केले पण उदाजी काही त्यास बधला नाही. उदाजीला कायमचे कैद करणे व ठार करणे वा त्यास अनुकूल करून घेणे हे तीनच पर्याय शाहूपुढे होते. पण त्याने यातील कोणताच पर्याय न निवडल्याने उदाजी चव्हाणाच्या शौर्याचा मराठी राज्यास कसलाही फायदा न होता हा मोहरा वाया गेला. कमीत कमी त्याने उदाजीला कायमचे कैदेत टाकून ठेवले असते तर इतर बंडखोर सरदारांना थोडा तरी आळा बसला असता. उलट उदाजीला वारंवार कैद करून सोडून देण्याच्या वृत्तीमुळे इतरांना दहशत अशी कधीच बसली नाही. परिणामी पेशवाई संपेपर्यंत या बंडखोर सरदारांचा सातारच्या राज्यास नेहमीच उपद्रव होत राहिला.   गुणग्राहक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूच्या कीर्तीला लागलेले हे एक मोठे वैगुण्यच मानले पाहिजे.
छ. शिवाजी महाराजांच्या जावयाचा -- महादजी निंबाळकराचा वंशज -- रंभाजी निंबाळकर हा मोगलांच्या तर्फेने पुणे प्रांतावर नियुक्त होता. या रंभाजीस आपल्या बाजूला ओढून घेण्याची शाहूने बरीच खटपट केली पण रंभाजी मोगलांशीच एकनिष्ठ राहिल्याने स. १७१६ मध्ये खंडेराव दाभाड्याच्या करवी  शाहूने त्यास पुण्यातून पळवून लावले.
स. १७१५ ते १७१८ पर्यंत हुसेनअली सय्यदने दक्षिणच्या सुभेदारीचे काम पाहिले. राजारामच्या काळात शंकराजी मल्हार हा सचिवपदाचे काम पाहत होता. पुढे त्याने राजकारण त्यागून काशीला प्रयाण केले. तेथे काही काळ व्यतीत करून त्याने दिल्ली दरबारात मराठी पक्षाची बाजू मांडण्याचे काम केले. या शंकराजीस हुसेनअलीचा कारभारी म्हणून बादशाहने नियुक्त केले. हुसेनअली दक्षिणेत आला तेव्हा या शंकराजी मार्फत त्याने शाहूशी सलोखा साधण्याचा प्रयत्न केला व या प्रयत्नांचे फलित म्हणजे (१) मोगल बादशाहीतर्फे शाहूस शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून मान्यता मिळाली. (२) त्याव्यतिरिक्त शाहूच्या अधीन असलेल्या मराठी सरदारांनी अलीकडे जो मुलुख संपादन केला, त्यावरील शाहूच्या मालकीस मंजुरी मिळाली. (३) शाहूच्या परिवारास कैदेतून मुक्त करण्याचे मान्य केले. (४) दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार शाहूला मिळाला. याबदल्यात शाहूने पुढील अटी मान्य केल्या -- (१) चौथाईच्या बदल्यात पंधरा हजार फौज मोगल बादशाहीच्या मदतीस पाठवावी. सरदेशमुखीच्या बदल्यात मोगल मुलखातील चोऱ्या वगैरे उपद्रवांचा बंदोबस्त करावा. (२) मोगल बादशहाला दरसाल दहा लक्ष खंडणी देणे. (३) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव देऊ नये. स. १७१८ आमध्ये हा तह ठरला  व या तहास मोगल बादशाहची मान्यता मिळवण्यासाठी हुसेनअली सय्यदसोबत बाळाजी विश्वनाथ व प्रमुख मराठी सरदारांना स. १७१८ च्या अखेरीस शाहूने दिल्लीला पाठवले. स. १७१९ च्या मार्चपर्यंत दिल्लीत अनेक उलाढाली होऊन अखेर तहावर बादशाही शिक्कामोर्तब झाले. स. १७१९ मध्ये शाहूचा सर्व परिवार दक्षिणेत येउन पोहोचला. तब्बल १० - १२ वर्षांनंतर येसूबाईची व शाहूची भेट झाली.
दिल्ली मोहीम पार पाडल्यावर बाळाजीच्या मदतीने शाहूने आपल्या राज्यकारभाराची फिरून एकदा घडी बसवण्याचा प्रयत्न केला. मोगलांसोबत झालेल्या दीर्घकालीन संग्रामात कित्येक मराठी सरदार मोठमोठ्या फौजा बाळगून स्वतंत्रपणे मोहिम आखत होते. या सरदारांनी लष्करी बळावर बराच मुलुख काबीज केला होता. या सरदारांच्या सत्तेला मान्यता देऊन त्यांनी नाममात्र शाहूचे आधिपत्य मानावे अशा प्रमुख अटीवर बाळाजी विश्वनाथाने त्यांना सातारच्या दरबारात खेचले. यामुळे शिवाजीनिर्मित स्वराज्याचे सरंजामशाहीत रुपांतर झाले असले तरी याची सुरवात राजारामच्या काळातच झालेली असल्याने प्रस्थापितांना शाहूने फक्त मान्यता दिली असेच म्हणावे लागते. स. १७२० मध्ये राज्यकारभाराची घडी बसवत असताना बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ मरण पावल्यावर रिक्त झालेले पेशवेपद शाहूने, बाळाजीच्या मोठ्या मुलास ---  बाजीरावास दिले. इथे शाहूच्या एकूण कारकीर्दीचा पूर्वार्ध संपून उत्तरार्धास आरंभ होतो.

२ टिप्पण्या:

Gamma Pailvan म्हणाले...

नमस्कार संजय क्षीरसागर,

आपली अनुदिनी (ब्लॉग) अतीव वाचनीय आहे. बरीच नवीन माहिती मिळते आहे. याबद्दल धन्यवाद. हा विषय मराठी मानसाच्या (व माणसाच्याही) अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अनेक कथा कादंबऱ्यांमुळे बरेच कल्पित प्रसंग खरे वाटू लागतात. खऱ्याखोट्याची सरमिसळ झाल्याने इतिहासातून शिकण्याच्या प्रक्रियेस खो बसतो. सत्य हुडकून त्यामधून शिकण्यासाठी विविध धडे घालून देण्याच्या आपल्या परिश्रमांस विनम्र अभिवादन! :-)

आता विषयाकडे येतो. कान्होजी शाहूकडे वळण्यास जी करणे दिली आहेत त्यात आजून एका कारणाची भर घालावीशी वाटते. ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंगरे यांचे अध्यात्मिक गुरू एकच होते. श्रीब्रह्मेंद्रस्वामी असे त्यांचे नाव आहे. श्री. माळगावकर नामक लेखकाने लिहिलेल्या कान्होजी आंगऱ्यांवरील इंग्रजी पुस्तकात ही माहिती वाचल्याचं मला अंधुकसं आठवतं. मी प्रस्तुत पुस्तक वाचलं नसून पु.ल.देशपांड्यांनी केलेला अनुवाद वाचला आहे.

असेच विविध विषयांवर आपल्याकडून विपुल लेखन होवो. :-)

आपला नम्र,
-गामा पैलवान

sanjay kshirsagar म्हणाले...

गामा पैलवानजी, सर्वप्रथम प्रतिक्रियेविषयी मी आपला आभारी आहे.
कान्होजी आंग्रे वरील माळगावकर लिखित व देशपांडे कृतअनुवादित पुस्तक मी पण वाचले आहे. आपण म्हणता तसा ब्रम्हेंद्रस्वामी विषयी उल्लेख त्यात आहे. परंतु स्वामीच्या राजकीय वजनाची पुरेशी माहिती न मिळाल्याने तो उल्लेख मी टाळला इतकेच. असो, असाच लोभ असावा हि विनंती !