रविवार, २४ मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - ३ )


                स. १७२० मध्ये बाजीरावाकडे पेशवेपद आल्यावर सातारच्या राजकारणास निराळे वळण लागले. स. १७२८ पर्यंत दरबारावर शाहूचे वर्चस्व होते पण स. १७२८ मधील  पालखेडच्या लढाईनंतर दरबारासह खुद्द शाहूवर देखील बाजीरावाचा प्रभाव वाढू लागला. पालखेडच्या यशाचा हा दुष्परिणाम सातार दरबार तसेच शत्रू दरबारातील मुत्सद्यांच्या नजरेतून सुटला नाही. स. १७३० नंतर परराज्यातील वकील व मुत्सद्दी थेट सातार दरबारसोबत बोलणी न करता पुण्याला शनिवारवाड्याचे उंबरठे झिजवू लागले. परंतु याविषयी या ठिकाणी अधिक लिहिणे योग्य नाही. प्रसंगानुसार याची माहिती पुढे येईलच. 
             स. १७२४ मध्ये दक्षिणचा सुभेदार मुबारीझखान व निजाम यांच्यात तंटा निर्माण झाला. मुबारीझ हा मोगल बादशहाचा अधिकारी म्हणून तर निजाम बंडखोर म्हणून लढण्यास समोरासमोर आले. दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा निजामाचा बेत मोगल दरबारांत आता उघड झाला होता. त्याचा हा बेत हाणून पाडण्यासाठी खुद्द मोगल बादशहा प्रयत्नशील होता व त्याच्याच प्रोत्साहनाने मुबारीझखान निजामाच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. या झगड्यात शाहूच्या नेतृत्वाखालील मराठी फौजांची गरज दोन्ही पक्षांना होती व मोगल बादशहाने शाहूला, मुबारीझखानास मदत करण्याचा हुकुमही पाठवला होता. परंतु, शाहूच्या संमतीने बाजीराव, दाभाडे, भोसले इ. सरदार निजामाच्या मदतीस गेले व स. १७२४ च्या सप्टेंबर अखेर साखरखेडले येथे झालेल्या लढाईत मुबारीझखानाचा पराभव होऊन तो मारला गेला आणि दक्षिणेत निजामाची सत्ता कायम झाली. स. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणलेल्या सनदांनुसार दक्षिणच्या सहा सुभ्यातुन सरदेशमुखी व चौथाई वसुलीचे हक्क शाहूला देण्याचे निजामाने मान्य केले होते. त्या भरवशावर शाहूने निजामाला मदत केली पण एकदा वेळ निघून गेल्यावर निजामाने आपण त्या गावचेच नाही असे दाखवून शाहूला हात चोळत बसायला लावले.
            मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर परसोजी भोसल्याची शाहूला मोठी मदत झाली होती. परसोजी मरण पावल्यावर कान्होजी भोसले अधिकारावर आला. फौजबंद व स्वतंत्र वृत्तीचा असल्याने कान्होजी हा इतर मराठी सरदारांशी - विशेषतः पेशव्याशी अधिक  फटकून वागे. भोसले - पेशवे घराण्याची हि चुरस पेशवाई अखेर पर्यंत दिसत असली तरी तिचा आरंभ बाजीरावाच्या काळातच झाल्याचे दिसून येते. स. १७२४ - २५ मध्ये कान्होजी निजामाच्या तंत्राने चालू लागल्यामुळे स्वतः शाहूने त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळी प्रत्यक्ष भेटीत शाहूने त्याची समजूत घालून त्यास बाजीरावासोबत कर्नाटक स्वारीस पाठवले. परंतु घरातील कटकटी व बाजीरावा सोबतची सत्तास्पर्धा यांमध्ये कान्होजी गुरफटला जाउन त्याच्या हातून विशेष असे काही कार्य घडून आले नाही. पुढे स. १७२९ - ३० मध्ये त्याने निजामाशी स्नेहसंबंध जोडून त्याच्याकडे जाण्याची तयारी केली. त्यावेळी शाहूने, कान्होजीचा पुतण्या रघुजी यास, कान्होजीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली. रघुजीने कान्होजीला कैद करून साताऱ्यास पाठवले. तेथे सात वर्षांची कैद भोगून बंदिवासातच त्याचा मृत्यू झाला. कान्होजी भोसल्याच्या प्रकरणी बाजीरावाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाउन लक्ष घातल्याने या दोघांचा खटका उडणे स्वाभाविक होते. त्यात कान्होजीचा पुतण्या व इतर नातलग त्याच्या विरोधात असल्याने कान्होजीला दुर्बल करणे बाजीरावास काहीसे सोपे गेले. या प्रकरणी एक राजा म्हणून पुढाकार घेऊन आपल्या सरदारांना आळ्यात ठेवण्याचे जे कार्य शाहूने पार पाडायला हवे होते, ते पार पाडण्यास तो पुरता असमर्थ ठरला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, ताराबाईच्या विरोधातील समरप्रसंग अपवाद केल्यास स. १७०८ - ९ नंतर मोहिमांवर जाण्याचे शाहूने साफ टाळल्याचे दिसून येते. अर्थात, त्याचा हा निर्णय त्याने स्वेच्छेने घेतला होता कि परिस्थितीमुळे तो तसा वागत गेला हे समजायला मार्ग नाही, पण जाग्यावर बसून राज्य सांभाळण्याचे व राज्याचा विस्तार करण्याचे कार्य करता येत नाही हे त्याच्या लक्षात आले नाही. याचा परिणाम म्हणजे सातारच्या आसपासचे राजकारण सोडल्यास दूरवरील राजकारणे -- उदा. राजपुताना, गुजराथ, दिल्ली, हैद्राबाद इ. -- करण्यास किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यास तो साफ अपयशी ठरला आणि या राजकारणांचे सर्व नियंत्रण बाजीराव पेशव्याकडे गेले. बाजीरावाने हे हेतुपूर्वक केले असेही म्हणता येऊ शकते पण या ठिकाणी हे पण लक्षात घेतले पाहिजे कि, जर बाजीराव पुढे आला नसता तरी शाहूचे अधिकार नियंत्रित करण्यास कोणी मराठी सरदार वा अष्टप्रधान मंडळातील कोणी प्रधान पुढे आलाच नसता असे नाही. राजारामाच्या कारकिर्दीचा दाखला घेतल्यास संताजी व धनाजीने त्यास कित्येकदा वाकवल्याचे दिसून येते. खुद्द शाहूला देखील धनाजी - चंद्रसेन या पिता - पुत्रांनी काय कमी त्रास दिला होता. सारांश, स. १७२० नंतर जसजसा मराठी राज्याचा विस्तार होऊ लागला तसतसा शाहूच्या अधिकारांचाही संकोच होत गेला.
                 शाहूच्या कारकिर्दीत अनेक नवीन संस्थाने उदयास आली, त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे भोसले घराणे होय ! स. १७०७ मध्ये शाहू नगरला आला. त्यावेळी दौलताबादजवळील पारद गावचे एक प्रकरण उद्भवले. शाहूच्या सैन्यातील लोक रसद गोळा करण्यासाठी फिरत असताना पारद गावच्या पाटलाने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा शाहूची पथके गावावर चालून गेली. गढीच्या आश्रयाने गावकरी व पाटील लढू लागले. या लढाईत पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मारला गेला आणि गाव शाहूच्या ताब्यात आले. मृत पाटलाची पत्नी आपल्या लहान मुलास घेऊन शाहूच्या भेटीस आली व मुलाला शाहूच्या पायांवर घालून अभय मागितले. शाहूने उदार मनाने त्यांना माफी दिली व पारद गाव इनाम म्हणून दिले. त्याशिवाय त्याने आणखी एक गोष्ट विशेष केली. मृत लोखंडे पाटलाच्या मुलास आपल्या सोबत बाळगले व त्याचे नाव फत्तेसिंग भोसले असे ठेवले. या फत्तेसिंगाचा एका राजपुत्राप्रमाणे थाट ठेवण्यात आला. त्याची सर्व जबाबदारी शाहूने आपली उपस्त्री विरुबाई हिच्यावर सोपवली. विरुबाई हि जरी शाहूची लग्नाची बायको नसली ती त्याने तिचा मान महाराणीप्रमाणेचं ठेवलेला होता. स. १७४० अखेर विरुबाईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या खाजगी खर्चासाठी तोडून दिलेला अक्कलकोट परगणा शाहूने फत्तेसिंगास दिला. अशा प्रकारे अक्कलकोट संस्थानची निर्मिती झाली खरी, पण तत्पूर्वीच फत्तेसिंगाच्या मर्यादा शाहू व दरबारी मुत्सद्द्यांच्या लक्षात आल्याने पुढील राजकारणात फत्तेसिंगास फारसे महत्त्व राहिले नाही. शाहूच्या पश्चात इतर सरदार व प्रधानांप्रमाणेचं अक्कलकोटकर देखील पेशव्यांच्या प्रभावाखाली आले.
              फत्तेसिंगास भागानगरचा सुभा देऊन त्यास कर्नाटक प्रांतात पाठवण्याचा शाहूचा विचार होता. त्यानुसार त्याने स. १७२५ मध्ये फत्तेसिंगाच्या नेतृत्वाखाली पेशवे, प्रतिनिधी, सेनापती इ. प्रमुख मंडळी कर्नाटकात रवाना केली. या स्वारीमागे काही विशेष राजकीय कारणेदेखील होती. तंजावारास व्यंकोजीचा वंशज शरफोजी राज्य करत होता. त्यास आसपासच्या मोगल अंमलदारांनी उपद्रव दिल्याने त्याने शाहूकडे मदतीची याचना केली. तसेच याच सुमारास निजाम देखील कर्नाटक प्रांतात जाण्याच्या बेतात होता. अशा परिस्थितीमध्ये शाहूने तातडीने फत्तेसिंगास कर्नाटकात रवाना केले. फत्तेसिंग हा मोहीमप्रमुख असला तरी पेशवा, प्रतिनिधी, सेनापती, सरलष्कर इ. बड्या धेंडांना रगडून त्यांजकडून काम करून घेण्याची त्याची कुवत नव्हती. तसेच शाहूने त्याचा मान राजपुत्रासारखा ठेवला असला तरी तो राजघराण्यातील नाही याची जाणीव त्याच्यासहित इतरांना असल्याने त्याच्या अधिकारांना तशाही मर्यादा पडत होत्या. विशेष काही कार्यभाग न साधता मे १७२६ मध्ये थोडीफार खंडणी वसूल करून फत्तेसिंग मागे फिरला. या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे संताजी घोरपडेचा वंशज व गुत्ती संस्थानचा संस्थापक मुराराव घोरपडे शाहूच्या आज्ञेने फत्तेसिंगास सामील झाला होता. शाहूच्या फौजा साताऱ्यास परत येण्यास निघाल्या त्याचवेळी निजामाने कर्नाटकात जाण्यची तयारी चालवली. तेव्हा निजामाला पायबंद देण्यासाठी शाहूने स. १७२६ च्या नोव्हेंबरमध्ये फिरून एकदा फत्तेसिंगास सर्व प्रमुख सरदारांसह कर्नाटकांत पाठवले. यावेळी फत्तेसिंग स्वतः कलबुर्गा येथे चौथाई वसुलीला गेला तर बाजीराव तसाच पुढे निघून श्रीरंगपट्टणला थडकला. आदल्या स्वारीप्रमाणेच फत्तेसिंगाची हि मोहीम साफ अपयशी झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेशवे - प्रतिनिधी - सेनापती यांच्यातील अंतर्गत लाथाळी हे होय. त्यामुळे मोहीम फक्त रेंगाळत गेली. त्याशिवाय शाहूचे प्रमुख सरदार दूर कर्नाटकांत गेल्याचे पाहून निजामाने कर्नाटक प्रांती न जात कोल्हापूरकर संभाजीला हाताशी धरून खुद्द शाहूलाच राज्यासनावरून खाली खेचण्याचा डाव आरंभला. त्यामुळे शाहूने तातडीने कर्नाटकातील फौजा मागे बोलावल्या. अशा प्रकारे, छ. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर प्रथमचं दक्षिण दिग्विजयास बाहेर पडलेल्या मराठी फौजांना दोनवेळा अपयश घेऊन मागे यावे लागले. मात्र फत्तेसिंग हा विशेष कर्तुत्ववान नसल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकणे बरोबर नाही एवढा धडा मात्र शाहूला या कर्नाटक मोहिमांमधून मिळाला. त्याचप्रमाणे शाहूच्या सरदारांनीही फत्तेसिंगाच्या कुवतीचा अंदाज घेतल्याने पुढील राजकारणात त्यास त्यांनी फारसे महत्त्व दिलेच नाही.
                           मोगल बादशाहाने जरी शाहूला छ. शिवाजी महाराज निर्मित स्वराज्याचा वारस म्हणून मान्यता दिली असली तरी स्वराज्याचे खरे मालक आपणचं हि भावना जशी ताराबाईची होती तशीच संभाजीची देखील होती. संभाजीची मनःस्थिती चंद्रसेन जाधव पूर्णतः ओळखून होता. ताराबाई कैदेत जाण्यापूर्वी किंवा कोल्हापुरच्या गादीवर संभाजी आल्यावर केव्हातरी चंद्रसेन निजामाच्या चाकरीत दाखल झाला होता. परंतु, असे असले तरी कोल्हापुरकरांशी त्याचा स्नेहसंबंध होताच. जाधवाच्या सल्ल्याने निजामाने संभाजीला शाहूविरोधात चिथावणी दिली. शाहू विरोधात लढण्याची संभाजीची तयारी होताच स. १७२६ मध्ये निजामाने कर्नाटक प्रांती जाण्याची हूल उठवून शाहूला कर्नाटकात सैन्य पाठवण्यास भाग पाडले. स. १७२६ अखेरीस शाहूच्या फौजा कर्नाटकात जाताच निजाम व संभाजी उघडपणे शाहूच्या विरोधात चालून आले. वास्तविक, संभाजी असा काहीतरी आततायीपणा करेल म्हणून स. १७२५ अखेर शाहूने त्याच्यासोबत एक तह केला होता. त्यानुसार दोघांच्या फौजा जो काही मोगलांचा प्रांत आपल्या ताब्यात घेतील त्यात उभयतांची निम्मी निम्मी वाटणी असणार होती. उदाहरणार्थ, जर संभाजीने दक्षिणेतील मोगलांचा मुलुख जिंकला तर त्यातील अर्धा त्याने शाहूला द्यायचा आणि शाहुने माळवा, गुजराथ इ. प्रांतात संभाजीला अर्धा वाटा द्यायचा असे ठरले. संभाजीला तर असा निम्मा वाटणीचा व्यवहार मुळातचं नको होता. परंतु, याचवेळी निजामासोबत चाललेले कारस्थान फळास न आल्याने त्याने वरवर तहास मान्यता दर्शवली. इकडे निजामाने शाहूचे सुलतानजी निंबाळकर, चिमणाजी दामोदर हे प्रमुख सरदार फितवले. मुख्य फौज कर्नाटकात गेलेली, जवळचे भरवशाचे सरदार शत्रूला फितूर झालेले अशा स्थितीत देखील शाहूने आपले मनोधैर्य कायम राखले. त्याने कर्नाटकातील सैन्याला ताबडतोब मागे फिरण्याचा आदेश दिला. तसेच कान्होजी भोसले, रायाजी जाधव इ. सरदारांच्या मदतीने निजामाला रोखण्याचाही प्रयत्न केला. शाहूच्या सुदैवाने कोल्हापूरचा संभाजी युद्धकर्मांत तितकासा कुशल नसल्याने त्याच्यावर एका आघाडीचे नेतृत्व सोपवणे निजामाला शक्य झाले नाही. उलट संभाजीच्या संरक्षणासाठी त्याला सतत सोबत बाळगावे लागले. परिणामी शाहूच्या विरोधात एकदम दोन - तीन आघाड्या उघडून लढाई घेण्याचा जो निजामाचा आरंभीचा उद्देश होता तो साफ बाजूला पडला. त्यामुळे त्याच्या स्वारीचा वेग मंदावून कर्नाटकातील मराठी सरदारांना महाराष्ट्रात परतण्यास सवड प्राप्त झाली. लष्करी मोहिमेचा वेग मंदावल्याचा शत्रूला फायदा घेत येऊ नये यासाठी निजामाने मग शाहू आणि बाजीराव यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण केले व त्यात तो यशस्वी देखील झाला. काही काळ बाजीराव व शाहू एकमेकांच्याविषयी साशंक झाले होते पण लवकरचं त्यांच्यात एकी निर्माण झाली व स. १७२८ च्या मार्च महिन्यात मराठी फौजांनी पालखेड येथे निजामाचा पराभव केला. यावेळी झालेल्या तहात निजामाने शाहूच्या राजवटीस मान्यता दिली. दक्षिणेतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना देखील त्याने मंजुरी दिली, पण संभाजीला शाहूच्या ताब्यात देण्याची अट त्याने मानली नाही. तहाची वाटाघाट सुरु असतानाच त्याने संभाजीला कोल्हापुरास पाठवून दिले. निजामाच्या स्वारीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून आली व ती म्हणजे प्रकरण अगदी गळ्याशी आले असताना देखील शाहू स्वतः युद्धआघाडीवर आलाच नाही. जर आरंभीच शाहू स्वतः बाहेर पडला असता तर त्याच्या सरदाराना फितुरी करता आली नसती. उलट शाहू जाग्यावर बसून दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघत बसल्याने आपण काहीही केले तरी हा स्वामी स्वबळावर आपले काय वाकडे करणार अशी भावना सरदारांची बनत गेली.
                पालखेड नंतर बाजीरावाने लागोपाठ अनेक मोहिमांमध्ये विजय मिळवले पण प्रस्तुत लेखाचा नायक शाहू असल्यामुळे त्याच्याशी संबंधित मोहिमांचाच येथे विचार करणे भाग आहे. पालखेडच्या तडाख्यानंतरही संभाजीचे डोळे न उघडल्याने स. १७३० मध्ये आपल्या सर्व प्रमुख सरदारांसह शाहूने कोल्हापूरवर स्वारी केली. यावेळी संभाजीच्या पक्षाला उदाजी चव्हाणाचा मोठा आधार होता. शिरोळ येथे उदाजीला श्रीनिवासराव प्रतिनिधी व धनाजी जाधवाचा मुलगा शंभूसिंग यांनी घेरले. उदाजीच्या बचावासाठी स्वतः संभाजी चालून आला पण, त्याचा काहीही उपयोग न होता प्रतिनिधी आणि जाधवाने संभाजीचा पराभव करून त्यास पळवून लावले. कोल्हापूरची सर्व फौज लुटली गेली. झाडून बुणगे लुटले गेले. संभाजीची आई राजसबाई, ताराबाई व संभाजीच्या बायका कैद झाल्या. त्यांपैकी संभाजीच्या आईला व बायकांना कोल्हापूरास परत पाठवण्यात आले. ताराबाईला देखील कोल्हापूरास पाठवण्याचा शाहूचा विचार होता पण कोठेही गेले असता कैद काही चुकत नाही हे लक्षात घेऊन ताराबाईने शाहूजवळ राहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिची रवानगी साताऱ्यास करण्यात आली. शाहूच्या या स्वारीने संभाजीला शहाणपण सुचून त्याने शाहूसोबत तहाची वाटाघाट आरंभली. स. १७३१ च्या फेब्रुवारीमध्ये कराडजवळ जखीणवाडी येथे शाहू आणि संभाजीची भेट झाली. यावेळी झालेल्या तहानुसार कोल्हापूरचे राज्य एकप्रकारे सातारचे मांडलिक संस्थान बनले. अर्थात, या तहामुळे संभाजी संतुष्ट झाला नाही. परंतु, पालखेडसारखा उपद्व्याप करण्याची त्याची परत हिंमत देखील झाली नाही. या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, शाहूने हि मोहीम स्वतः चालवली आणि या स्वारीचे नेतृत्व चुकुनही त्याने प्रधानमंडळाकडे जाऊ दिले नाही. जेणेकरून, घरच्या भांडणात बाहेरच्यांचा शिरकाव होईल असे असे काही घडू न देण्याची काळजी, शाहूने त्याच्या बाजूने घेतली.
              स. १७२८ मध्ये पालखेडच्या विजयाने जरी शाहूचे आसन स्थिर व बळकट झाले असले तरी त्याला हादरा देण्याचे निजामाचे प्रयत्न सुरुच होते. यावेळी त्याच्या गळाला शाहूचा सेनापती त्रिंबकराव दाभाडे हा लागला होता. त्रिंबकराव हा पराक्रमी व शूर असल्याने आणि बाजीरावाप्रमाणेचं काहीसा उद्दाम असल्यामुळे बाजीरावाचे आणि त्याचे पटत नव्हते. त्यात शाहूच्या एका कृत्याची भर पडली. गुजरात प्रांताचा निम्मा मोकासा त्याने चिमाजीआपाला व निम्मा त्रिंबकरावस दिला. दाभाड्यांना शाहूचा हा निर्णय अजिबात मंजूर नव्हता. तेव्हा शहूने गुजरातच्या बाबतीत फेरविचार करून चिमाजीच्या नावे दिलेला मोकासा रद्द केला. परंतु,यामुळे पेशवे - सेनापती यांच्यातील वैराग्नी पेटायचा तो पेटलाच. या काळात दोघांनी प्रत्यक्ष लढणे टाळले, पण त्यांचे हस्तक मात्र एकमेकांच्या प्रदेशवर ताव मारत होते. तडजोडीच्या उद्देशाने पेशव्यांनी सेनापतीसमोर प्रस्ताव ठेवला कि, गुजराथमध्ये आम्हांस निम्मी वाटणी द्यावी बदल्यात माळव्यात आम्ही तुम्हाला निम्मी वाटणी देऊ. पण सेनापतीने हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि निजामाशी हातमिळवणी करून पेशव्याचा काटा काढण्याचा बेत रचला. निजाम आपल्या फौजेसह दाभाड्यांच्या मदतीस निघाला पण या दोघांच्या सैन्याची युती होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे त्रिंबकरावास गाठून त्याचा पराभव केला. या संग्रामात त्रिंबकराव मारला गेला. डभईच्या प्रसंगाने गुजरातचा तंटा काही मिटला नाही पण पेशव्याची दहशत मात्र इतर सरदारांवर बसून ते पेशव्यास वचकून राहू लागले. दाभाडे - पेशवे वादाचे निवारण करणे शाहूस न जमल्यामुळे एकप्रकारे पेशव्यांचे वर्चस्व वाढत जाण्यास तो देखील काही प्रमाणात कारणीभूत ठरला. सेनापती, प्रतिनिधी सारखी मंडळी पेशव्यावर का चिडून आहेत याच्या कारणांचा शोध घेऊन आपल्या प्रधानांमधील वाद मिटवण्यास शाहूने पुढाकार घ्यायला हवा होता. पण असे दिसून येते कि, पेशव्याचे जसजसे लष्करी सामर्थ्य वाढत चालले होते तसतसे शाहूचे अधिकारवर्चस्व घटू लागले होते.
                         स्वराज्याचा विस्तार कोकणात झाल्यापासून जंजिरेकर सिद्दीचा मराठी राज्याला उपद्रव सुरु झाला होता. सिद्द्यांची खोड मोडण्याचे अनेक प्रयत्न शिवाजी - संभाजी या पितापुत्रांनी केले. परंतु सिद्द्यांना जरब बसवणे यापलीकडे त्यांच्या स्वाऱ्यांचा काही उपयोग झाला नाही. शाहू राज्यावर आला त्यावेळी कोकणात सिद्दी आणि आंग्रे यांचा झगडा जुंपलेला होता. मात्र आंगऱ्यांना एकाच वेळी सिद्दी, मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. शत्रूंना तोंड देणे शक्य नसल्यामुळे एकाच्या मदतीने दुसऱ्याचा पराभव करून ते आपले वर्चस्व राखू पाहत होते. अशा स्थितीत सिद्दी सोबत कधी युद्ध तर कधी तह असे प्रसंग उद्भवत. स. १७३३ मध्ये शाहूने जंजिऱ्यावर मोहीम आखली. आपले सर्व प्रमुख प्रधान व सरदार त्याने या स्वारीसाठी कोकणात रवाना केले. जंजिरा व रायगड ताब्यात घेणे हि या मोहिमेची प्रमुख दोन उद्दिष्ट्ये होती. पैकी रायगड ताब्यात घेण्याचे बाजीरावाने कारस्थान रचले पण प्रतिनिधीने स्वतंत्रपणे प्रयत्न करून रायगड ताब्यात घेतला. आधीच पेशवे - प्रतिनिधी मधून विस्तव जात नव्हता. त्यात प्रतिनिधीच्या या यशाची / कृत्याची भर पडली. परिणामी, बाजीरावाने यापुढे मोहिमेत मनापासून सहभाग घेतलाच नाही. उलट आंगऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रतिनिधीचे पाय खेचण्याचा उपक्रम आरंभिला. याचा परिणाम म्हणजे जंजिरा स्वारी रेंगाळून स. १७३३ च्या डिसेंबरमध्ये बाजीरावाने सिद्दी सोबत तह करून मोहीम आटोपती घेतली. जरी बाजीराव या स्वारीतून बाहेर पडला असला तरी इतर सरदारांच्या मार्फत शाहूने जंजिरा मोहीम सुरूच ठेवली. आंग्रे व इतर मराठी सरदारांच्या प्रयत्नांचे फळ म्हणजे सिद्दी जेरीस येउन त्यांचे बळ खचू लागले. त्यांना कुमक देखील कुठ्न मिळेना. इंग्रज, पोर्तुगीजांनी प्रसंग पाहून आतल्या अंगाने सिद्द्यांना जगवण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा उपयुक्त ठरला नाही. मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात चिमाजी आप्पा मानाजी आंगऱ्याच्या मदतीसाठी कोकणात उतरला. १९ एप्रिल १७३६ रोजी सिद्द्यांचा प्रमुख सरदार सिद्दी सात यास रेवासजवळ श्रीगाव येथील लढाईत चिमाजी आपाने ठार केले. या लढाईने सिद्द्यांचा सर्व जोर संपून ते शरण आले. जंजिरा किल्ला त्यांच्या ताब्यात ठेवण्याच्या अटीवर त्यांनी शाहूचे मांडलिकत्व स्वीकारले. अर्थात हि मांडलिकी फक्त कागदावरचं राहिली हे वेगळे सांगायची गरज नाही. जंजिरा मोहीम तशी यशस्वी झाली पण जंजिरा किल्ला सिद्द्यांच्याच ताब्यात राहिल्याने तिच्या यशाला अपयशाचे मोठे गालबोट लागून राहिले. जर शाहू स्वतः या मोहिमेत युद्ध आघाडीवर दाखल झाला असता तर कदाचित या मोहिमेचे स्वरूप साफ पालटले असते. बाजीराव - पर्तिनिधी यांच्यातील पाय खेचण्याचा खेळ बंद पडला असता. त्याशिवाय इतर सरदार देखील आपापसांतील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्यास परवृत्त झाले असते. परंतु शाहूचा पाय साताऱ्यातून बाहेर न निघाल्याने जंजिरा स्वारी बव्हंशी निष्फळचं ठरली.
                 पालखेड, जंजिरा इ. मोहिमांच्या वेळी सातारा न सोडणाऱ्या शाहूला स. १७३७ मध्ये अचानक स्वारी - शिकारी करण्याची लहर आली. आपले सर्व अष्टप्रधान मंडळ, प्रमुख सरदार, तोफखाना, जनानखाना सोबत घेऊन मिरजेचे ठाणे आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शाहू सातारा सोडून बाहेर पडला. त्याच्या या बादशाही स्वारीचे रसभरीत वर्णन मल्हार रामराव चिटणीसने आपल्या बखरीत केले आहे. स. १७३७ मध्ये त्याने उंब्रज येथे आपली मुख्य छावणी उभारली व तेथून मिरज ताब्यात घेण्यास आणि उदाजी चव्हाणास समज देण्यास सरदार रवाना केले. नंतर स्वतः शाहू मिरजेच्या रोखाने गेला. स. १७३९ च्या ऑक्टोबर आरंभी मिरजेचे ठाणे शाहूच्या ताब्यात आले. मिरज ताब्यात आल्यावर शाहू साताऱ्यास परत फिरला. वास्तविक या स्वारीतून फायदा असा काही विशेष झाला नाही. परंतु, आपले लष्करी नेतृत्व परत एकदा आजमावण्याची व लोकांना आपल्या लष्करी कौशल्याची चमक दाखवण्याची शाहूची इच्छा मात्र काही प्रमाणात पुरू झाली. विशेष म्हणजे याच काळात बाजीराव भोपाळ येथे निजामाशी लढत होता तर वसईला चिमाजीआपा पोर्तुगीजांशी झगडत होता. दिल्लीवर याच वर्षी नादिरशहाची धाड येउन पडली होती. अशा प्रचंड मोठ्या प्रकरणांत मराठी फौजा ठिकठिकाणी गुंतलेल्या असताना शाहूने हि मोहीम आखून यशस्वी करून दाखवली इतकेच फारतर म्हणता येईल.
                   स. १७३९ मध्ये नादीरशहाने दिल्लीत थैमान घातले त्यावेळी मोगल बादशाहीच्या मदतीसाठी शाहूने बाजीराव पेशव्यास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली. या प्रसंगी शाहूने, औरंगजेब बादशाहला दिलेल्या वचनाचा उल्लेख कित्येक इतिहासकार करतात. परंतु, या वचन कथेत दम नसल्याचे माझे ठाम मत आहे. औरंगजेब मरण पावला स. १७०७ मध्ये, शाहूचा जन्म स. १६८२ चा -- म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूप्रसंगी शाहू २४ - २५ वर्षांचा होता. स्वराज्याचे नेतृत्व त्यावेळी ताराबाई करत होती. पुढेमागे ताराबाईचा पाडाव करून शाहू हा राज्याचा अधिकारी होईल असे काय औरंगजेबास स्वप्न पडले होते काय ? त्याहीपलीकडे म्हणजे आपल्यामागे मोगल बादशाहीची धूळदाण होईल हे भविष्य काय औरंगजेबास आधीच कळले होते का ? तात्पर्य, शाहूने औरंगजेबास मोगल बादशाहीच्या रक्षणाचे वचन दिले होते असे म्हणतात ते साफ चुकीचे असल्याचे सिद्ध होते. आयुष्याचा बराचसा काळ -- विशेषतः बालपण ते तारुण्य --- मोगलांच्या सहवासात गेल्याने शाहू मानसिकदृष्ट्या मोगलांच्या थोडासा अधीन झाला होता. होता होईल तितकी मोगल बादशाही राखायची त्याची इच्छा होती. त्याशिवाय आपण आजच्या काळाच्या चष्म्यातून गतकालीन घटनांकडे पाहतो, हा दृष्टीकोनचं मुळात चुकीचा आहे. बाबरपासून औरंगजेबपर्यंतच्या प्रदीर्घ काळात दिल्लीतील मोगलांचे आसन पक्के झाले होते. मोगल राजवटीच्या विरोधात बंडे झाली, नाही असे नाही, पण मोगल बादशाही उलथवून टाकून नवीन राजवट प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. मोगल बादशाहीचा देखावा कायम ठेऊन आपापली सत्ता बळकट करण्याची खेळी त्यावेळचा प्रत्येक सत्ताधीश खेळत होता. मोगल बादशाहीचा हा देखावा स. १८५७ पर्यंत कायम ठेवणे जेथे इंग्रजांना देखील गैर वाटले नाही तिथे मोगलांच्या कैदेत १७ - १८ वर्षे काढलेल्या शाहूचे मन मोगल बादशाही उलथवून टाकण्यास धजवेल हे संभवत नाही. त्याहीपलीकडे विचार केला असता मोगलांनी नर्मदेच्या उत्तरेस आपले राज्य रक्षावे, नर्मदा उतरून दक्षिणेत त्यांनी ढवळाढवळ करू नये अशी छ. शिवाजी महाराजांची देखील भूमिका होती. म्हणजे मोगल बादशाहीचे उत्तरेतील अस्तित्व एका मर्यादेपर्यंत त्यांनाही मंजूर होते असे म्हणता येते. त्यावरून त्यांचा नातू हा आपल्या आजोबांच्याच धोरणाचा पुरस्कार करत होता असे का म्हणू नये ? म्हणजे मोगल बादशाही राखण्याचे अनिष्ट धोरण शाहूने स्वीकारले असा जो आरोप केला जातो त्यात तथ्य नसल्याचे दिसून येते. मोगल बादशाहीचे नाममात्र अस्तित्व राखून राज्यविस्तार करण्यास जर त्याने परवानगी दिली नसती तर मराठी राज्याचा विस्तार नर्मदेच्या उत्तरेकडे झालाच नसता याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. राहता राहिला मोगल बादशाहीच्या रक्षणाचा मुद्दा तर चौथाई व सरदेशमुखीच्या बदल्यात मोगली सत्तेचे  शत्रूंपासून संरक्षण करण्याची अट शाहूने मान्य केली होती. अशा परिस्थितीत, नादिरशहाच्या हल्ल्याच्या वेळेस त्याने बाजीरावास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली तर ती मोगल बादशाहीसोबत केलेल्या करारांच्या अटींना जागूनच केली होती असे म्हणावे लागते.
                     बाजीराव हा निःसंशय पराक्रमी व रणशूर होता. पण त्याचे गोडवे गाण्याच्या नादात अलीकडचे व आधीचे कित्येक इतिहासकार वाहवत गेले आणि शाहूच्या धोरणांकडे डोळसपणे न पाहता त्यांनी त्याला मोगलधार्जिणा ठरवून बाजीरावाला हिरो बनवले. वास्तविक याच बाजीरावाने संधी असताना देखील दिल्ली का लुटली नाही याचा कोणी विचार केला का ? शाहूमुळे निजामाचा बचाव झाला असेही म्हटले जाते, मग भोपाळच्या लढाईत निजामाच्या बचावाला काय शाहू गेला होता ? समजा, निजामाचा संहार न करण्याची शाहूची आज्ञा होती तर मग डभईच्या संग्रामात त्रिंबकरावास मारण्याचा हुकुम बाजीरावास कोणी दिला होता ? त्रिंबकरावाचा मृत्यू जर युद्धातील अपघात मानला तर निजामाचाही तसा अपघात घडवून आणणे बाजीरावास शक्य नव्हते काय ? तात्पर्य, बाजीरावाचे उदात्तीकरण करण्याच्या नादात शाहूची प्रतिमा -- जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी -- मलिन करण्याचे कार्य आमच्या मराठी इतिहासकारांनी केलेलं आहे.
        असो, स. १७४० ,अध्ये २८ एप्रिल रोजी बाजीरावाचा मृत्यू झाला. त्यानंतर २५ जून १७४० रोजी बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहूने पेशवेपद दिले. स. १७४० -४९  या नऊ वर्षांच्या काळात काही महिन्यांचा अपवाद सोडल्यास नानासाहेब हाच पेशवेपदी कायम राहिल्याने राजकारणावर नियंत्रण त्याचेच राहिले. नानासाहेब पेशवा झाला त्यावेळी शाहू साठीच्या जवळ आला होता. म्हणजे शाहुच्या वृद्धावस्थेस आरंभ झाला होता. शाहूच्या कारकीर्दीच्या अखेरच्या दशकातील घटनांची माहिती पुढील व अखेरच्या भागात पाहू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: