मंगळवार, १९ मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - १ )


            मराठी बखरकारांनी पुण्यश्लोक, अजातशत्रू  या विशेषणांनी गौरवलेल्या शाहूची भित्रा, दुबळा, अकर्तुत्ववान, नेभळट इ. गौरवपरपदांनी बऱ्याच मराठी इतिहासकारांनी हेटाळणी देखील केली आहे. याच शाहुच्या पदरी उदयास आलेल्या भट घराण्यातील पेशव्यांनी पुढे प्रत्यक्ष छत्रपतींना गुंडाळून ब्राम्हणी पेशवाई उभारल्यामुळे कित्येक इतिहासकारांनी याबाबत शाहूस दोषी धरले आहे. ( प्रस्तुत लेखकाचे देखील असेच मत आहे. )  स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा हा नातू, संभाजीचा पुत्र नेमका होता तरी कसा याविषयी सर्वसामान्य इतिहास वाचकांना फारशी माहिती नसल्याने इतिहासकारांनी शाहूस दिलेली दुषणे खरी मानून ते देखील शाहूविषयी प्रतिकूल मत बाळगून आहेत. प्रस्तुत लेखाद्वारे दुसरा शिवाजी उर्फ शाहू हा नेमका कसा होता हे जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  
ता. १८ मे १६८२ रोजी शाहूचा जन्म रायगडजवळील गंगावली गावी झाला. आपल्या पराक्रमी पित्याची आठवण म्हणून संभाजीने आपल्या मुलाचे नाव ' शिवाजी ' ठेवले. स. १६८२ मध्ये जन्मलेला दुसरा शिवाजी हा काहीसा दुर्दैवी निघाला. स. १६८९ मध्ये त्यास पितृशोक तर अनुभवा लागलाच पण त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यास मोगलांच्या नजरकैदेत जाण्याचा प्रसंग ओढवला. छ. संभाजीचे मोगलांच्या कैदेत जाणे, राजारामाची नजरकैदेतून सुटका होऊन त्याने मंचकारोहण करणे, संभाजीच्या सुटकेसाठी नव्या छत्रपतीकडून कसलाही खटाटोप न होणे, मोगलांचा रायगडी वेढा पडताच येसूबाईच्या सल्ल्याने राजारामचे जिंजीला निघून जाणे इ. लागोपाठ विद्युतवेगाने घडणाऱ्या घटनांनी काही काळ का होईना पण मराठी सरदार पुरते भांबावले होते. संभाजीची पत्नी व ८ - ९ वर्षे महाराणीपद अनुभवलेली येसूबाई देखील या बनावाने बरीच चकित झाली असावी. जरी तिने रायगडाहून राजारामास निघून जाण्याचा सल्ला दिला असला तरी बाहेर राहून आपली सर्वोतपरी मदत करून व रायगड शत्रूहाती पडण्यापूर्वी आपणांस पुत्रासह येथून बाहेर काढण्याचेही बजावले होते. परंतु, राजारामाने येसूबाईचा अर्धाच सल्ला मान्य केला. स्वतः तो तर निसटला पण येसूबाई व शाहूच्या सुटकेविषयी त्याने काहीशी अनास्थाच बाळगली. ७ वर्षांचा शाहू घरातील व घराबाहेरील राजकारण समजण्याइतका सुज्ञ होता का ? हा प्रश्न एकवेळ बाजूला ठेऊ पण वयाच्या ७ व्या वर्षी हे आघात भोगणाऱ्या शाहूच्या मनावर या घटनांचे पडसाद कसे उमटले असतील याची वाचकांनीच आपल्या मनाशी कल्पना करावी.
              ३ नोव्हेंबर १६८९ ते ८ मे १७०७ -- जवळपास १७ - १८ वर्षे शाहू मोगलांच्या नजरकैदेत राहिला. या प्रदीर्घ अवधीत त्याचे बालपण शत्रूच्या गोटांत गेले. मोगलांच्या मेहरबानीने जे काही शिक्षण मिळाले तेवढेच.  औरंगजेबाने शिवाजीचे नाव बदलून शाहू तर केलेच पण त्याचे लग्नही लावून दिले. शाहूच्या बाबतीत नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी औरंगजेबाची चलबिचल चालली होती. संभाजीला पकडून ठार केले, रायड जिंकला, राजाराम परागंदा झाला तरी स्वराज्याचे एकांडे शिलेदार अजून लढत होते. अशा परिस्थितीमध्ये शाहूला मुस्लिम करून त्यास स्वराज्यात परत पाठवावे कि आहे त्याच स्थितीत म्हणजे त्याचे धर्मांतर न करताच मोगल बादशाहीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन स्वराज्यात रवाना करावे अथवा मारून टाकावे किंवा मरेपर्यंत त्यास कैदेतच ठेवावे ! नेमके काय करावे ? औरंगजेब्ची याच बाबतीत मती गुंग झाली होती.
                  आपल्या मृत्युपूर्वी शाहूला त्याने झुल्फीकारखानसोबत स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर रवाना केले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मोहिमेसाठी बाहेर पडलेल्या शाहूला आपल्या ताब्यात घेण्यास मराठी सरदार उत्सुक होते परंतु शाहू मात्र बाहेर पडण्यास राजी नसल्याचे दिसून येते. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्याच्या मुलांमध्ये बादशाही तख्तासाठी तंटा निर्माण झाला. त्यावेळी शाहू शहजादा आजमच्या गोटांत होता. शहजादा मुअज्जम हा उत्तरेत असून कामबक्ष विजापुराकडे होता. औरंगजेबाचा दफनविधी उरकून आजम, मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. त्याच्या सोबत शाहू व त्याचा परिवार देखील होता. शाहुच्या बाबतीत कोणताही निर्णय न घेता त्यास कैदेतच ठेवण्याचा आजमचा आरंभी बेत होता. परंतु आजमच्या कित्येक राजपूत व मुस्लिम सरदारांनी आणि त्याची बहिण झीनतुन्नीसाबेगमने शाहूला कैदेतून सोडण्याची आजामला गळ घातल्याने काही अटींवर ८ मे १७०७ च्या आसपास शाहू माळव्यातील शाही छावणीतून बाहेर पडून दक्षिणच्या वाटेला लागला.
              उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते  कि, मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहूने आपले राज्य परत मिळवायचे होते. शाहू मोगलांशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याची आई येसूबाई, दोन्ही राण्या, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग इ. सर्व नातलग आजमने आपल्या सोबत ओलिस म्हणून ठेवले. शाहूला मोगल बादशाहीतर्फे दक्षिणच्या सहा सुभ्यातुन चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची मोकळीक दिली होती पण यासाठीचे अधिकृत फर्मान त्यास नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले. सारांश, ताराबाईच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठी सरदारांना घरच्या भांडणात गुंतवण्यासाठी व आपल्या भावांना सत्ताप्राप्तीसाठी त्यांची कसलीही मदत न मिळावी या हेतूंनी प्रेरित होऊन आजमने मुद्दाम शाहूला कैदेतून मोकळे केले असे म्हणता येते. कारण, शाहूला आपले राज्य मोगलांच्या विरोधात लढून नाही तर आपल्या चुलतीच्या विरोधात लढून मिळवायचे होते. यदाकदाचित शाहू - ताराबाई युती झाली तर त्या युतीचा आपणांस उपद्रव होऊ नये यासाठी शाहूचा परिवार मोगलांनी ओलिस धरला. याशिवाय मोगलांशी एकनिष्ठ राहिल्यास दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीची सनद शाहूला देण्याचे प्रलोभनही दाखवण्यात आले. मोगली कैदेतून सुटून शाहू बाहेर पडला तेव्हा जवळचा सेवकवर्ग अपवाद केल्यास त्याच्यासोबत ना सैन्य होते ना खजिना !
                बीजागड उर्फ बढवाणी नावाचे संस्थान नर्मदेच्या दक्षिणेस होते. तेथील राजपूत संस्थानिक मोहनसिंग रावळ हा अलीकडे मराठी सरदारांच्या मदतीने मोगलांशी लढत होता. याच मोहनसिंगांच्या मदतीमुळे नेमाजी शिंदे वगैरे सरदार नर्मदापार माळव्यावर चालून जात होते. शाहूचा या मोहनसिंगाशी स्नेहसंबंध होता. मोगली छावणीतून बाहेर पडताच शाहू मोहनसिंगाकडे आला. तेथून जुजुबी मदत घेऊन तापी किनाऱ्यावरील जमीनदार अमृतराव कदम बांडे याच्या सोबत शाहू महाराष्ट्राच्या रोखाने निघाला. महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात मल्हारराव होळकर हा कदम बांड्यांकडे शिलेदारी करीत होता व पुढील काळात बढवाणीच्या संस्थानिकाच्या मदतीने नर्मदेच्या परिसरात त्याने आपला जम बसविला.
                शाहू जसजसा दक्षिणेकडे सरकू लागला तसतसे परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, निंबाळकर सारखे फौजबंद मराठी सरदार त्याच्या गोटांत दाखल होऊ लागले. मराठी सरदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन शाहूने नगर मुक्कामातून ताराबाई सोबत वाटाघाटी आरंभल्या. शाहूचे मत, मराठी राज्याचा छत्रपती म्हणून त्याचा अधिकार ताराबाईने मान्य करावा असे होते. त्याउलट, ताराबाईचे म्हणणे होते कि, शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य संभाजीने गमावले. तिच्या पतीने -- म्हणजे राजारामाने -- स्वपराक्रमाने नव्याने राज्य संपादन केले आहे. अशा या राज्यावर हक्क सांगण्याचा शाहूला अधिकारच काय ?  तांत्रिकदृष्ट्या या वादात ताराबाईची बाजू योग्य व न्यायाची असल्याचे दिसून येते.  पण १८ व्या शतकातील पुरुषांची मानसिकता पाहता एका कर्तबगार स्त्रीच्या हाताखाली काम करण्याची बव्हंशी मराठी सरदारांची तयारी नव्हती असेच म्हणावे लागते. १८ व्या शतकातील कर्तबगार स्त्रियांच्या मालिकेत ताराबाईचे स्थान अव्वल आहे यात शंकाच नाही. ती युद्धकला, कपट, धूर्तता, निग्रह, तडफ  इ. राजकीय पुढाऱ्यांस आवश्यक अशा गुणांनी युक्त होती व तीच तिची नेमकी कमजोर बाजू होती ! परिणामी, ताराबाईचा पक्ष न्यायाचा असून देखील तिच्याशी निष्ठेने राहण्याची शपथ वाहणारे धनाजी जाधव प्रभूती सरदार शाहूच्या गोटांत दाखल झाले.
                 स. १७०७ च्या ऑक्टोबर महिन्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू व ताराबाईच्या सरदारांची लढाई घडून आली. शाहू स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होता तर ताराबाईच्या फौजेचे नेतृत्व तिचा सेनापती धनजी जाधव याच्याकडे होते. त्याशिवाय परशुरामपंत प्रतिनिधी देखील लढाईत हजर होता. प्रत्यक्ष संग्रमाआधीच शाहूने धनाजी जाधवास फितवण्यात यश मिळवले. परिणामी प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी जाधवाची फौज संग्रामात सहभागी न झाल्याने शाहूच्या सैन्याचा सर्व मारा प्रतिनिधीच्या पथकांवर झाला व शाहूचे आक्रमण असह्य झाल्याने प्रतिनिधीला पळून जावे लागले. शौर्य, तडफ इ. आनुवांशिक गुणांचे शाहूने या निमित्ताने स्वपक्षीयांना व विरोधकांना जे दर्शन घडविले त्यामुळे त्याची बाजू वरचढ बनत गेली. खेडची लढाई जिंकल्यावर शाहूने धनाजी जाधवास सेनापतीपद दिले तर बाळाजी आवजीची वंशपरंपरागत चिटणीशी खंडो बल्लाळ या त्याच्या वारसास दिली. आरंभीच्या दिवसांत शाहूचा जम बसवण्याचे मुख्य काम या खंडो बल्लाळने व परसोजी भोसल्याने पार पाडले हे या ठिकाणी नमूद करणे योग्य होईल.
          खेडच्या लढाईनंतर शाहूने प्रचंडगड, राजगड, चंदन वंदन वगैरे किल्ले ताब्यात घेऊन साताऱ्यास ओरचे लावून १७०८ च्या जानेवारी आरंभी सातारचा किल्ला ताब्यात घेतला. केवळ दोन - तीन महिन्यात शाहूने जे लागोपाठ विजय मावळले त्यामुळे ताराबाईची बाजू काहीशी खचू लागली होती. कारण, मिळणाऱ्या प्रत्येक विजयासोबत ताराबाईला सोडून शाहूकडे जाणाऱ्या मराठी सरदारांची संख्या वाढू लागली होती. स. १७०८ च्या जानेवारीतच शाहूने स्वतःस राज्याभिषेक करून अष्टप्रधानांची नियुक्ती केली.
           त्यानंतर ताराबाईच्या बंदोबस्ताचे कार्य त्याने हाती घेतले. वस्तुतः, ताराबाईला कैद करण्याच्या उद्देशानेच शाहूने साताऱ्यावर हल्ला चढवला होता पण शाहू येण्यापूर्वीच ताराबाई पन्हाळ्याकडे सटकली होती. तेव्हा आता पन्हाळ्यावर स्वारी करणे शाहूस भाग होते. तत्पूर्वी नैतिक उपचारांचा एक भाग म्हणून वारणा नदीच्या दक्षिणेकडील भाग ताराबाई व तिच्या पुत्रास देण्याची तोड शाहूने काढली. मात्र ताराबाई अशा तुकड्यांवर संतुष्ट राहणाऱ्यांमधील नाही हे तो जाणून होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ताराबाईने शाहूची सूचना धुडकावून लावली व फेब्रु. १७०८ मध्ये शाहूच्या फौजा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. याचवेळी सातारच्या आसपास व पुण्यात आपला अंमल प्रस्थापित करण्याचा शाहूचा प्रयत्न चालला होता. यासाठी मोगलांशी लढणे त्यास भाग होते. थोरात, दाभाडे, बाळाजी विश्वनाथ, पवार, निंबाळकर इ. मंडळी त्यासाठी प्रयत्नशील होती.
                  शाहूची कोल्हापूर मोहीम बऱ्यापैकी यशस्वी झाली. वसंतगड, पावनगड, पन्हाळा, विशाळगड इ. किल्ले ताब्यात घेऊन रांगणा किल्ला जिंकण्यासाठी शाहू पुढे सरकला. त्यावेळी ताराबाईचा मुक्काम रांगण्यावर होता. शाहू रांगणा घेण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून ताराबाईने रांगणा लढवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्यावर सोपवली व ती मालवणला निघून गेली. इकडे शाहू कोल्हापूर मोहिमेत मग्न होता त्याच सुमारास म्हणजे स. १७०८ च्या जुलै महिन्यात त्याचा सेनापती धनाजी जाधव हा मरण पावला. जाधवाच्या मृत्यूने शाहू खचला किंवा त्याची बाजू दुबळी झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण धनाजीच्या तोडीचे कित्येक पराक्रमी सरदार शाहूच्या पदरी होते. धनाजीच्या निधनानंतर शाहूने सेनापतीपद धनाजीचा मुलगा चंद्रसेन यास दिले.
                    दरम्यान स. १७०८ मध्ये मोगल बादशाह मुअज्जम उर्फ बहादूरशहा नगरला येउन दाखल झाला होता. शहजादा कामबक्षचा निकाल लावून आपले बादशाही पद सुरक्षित राखण्यासाठी त्याने हि मोहीम आखली होती. या मोहिमेत मराठी सरदारांची कामबक्षला मदत न व्हावी या हेतूने त्याने शाहूला आपल्या मदतीस येण्याची आज्ञा केली. स. १७०७ मध्ये मुअज्जमने शहजादा आजमचा पराभव करून त्याचा निकाल लावल्याने शाहूचा परिवार आता मुअज्जमच्या ताब्यात आला होता. अशा परिस्थितीत शाहूला मुअज्जम उर्फ बहादूरशहाची आज्ञा पाळणे भागच होते. परंतु, तो स्वतः बहादूरशहाकडे गेला नाही. आपल्या मार्फत म्हणून त्याने नेमाजी शिंद्यास मोगल बादशाहच्या मदतीस पाठवले व आपला मुक्काम साताऱ्यास हलवला.  शाहू कोल्हापूरातून निघून जाताच ताराबाईने त्वरेने येउन पन्हाळा ताब्यात घेतला. कोल्हापुरास यावेळी शाहूच्या मार्फत नेमलेला परसोजी भोसले होता. त्याने किंवा शाहूने ताराबाईच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

       स. १७०९ च्या जानेवारीत बहादूरशहाने कामबक्षाचा पराभव करून त्यास ठार केले. बहादूरशहाचे आसन स्थिर झाल्याचे पाहताच आपल्या राज्यास मोगलांची मान्यता मिळावी व दक्षिणच्या सहा सुभ्यातुन चौथाई, सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचे फर्मान मिळावे यासाठी शाहू आणि ताराबाईने आपापले वकील बहादूरशहाकडे रवाना केले. मोगली मुत्सद्यांच्या सल्ल्यानुसार बहादुरशहाने शाहू व ताराबाई यांना सांगितले कि, तुम्ही आपापसांत आधी निश्चित करा कि, शिवाजीच्या राज्यावर तुमच्यापैकी नेमका कोणाचा अधिकार आहे. मगच आम्ही तुम्हाला चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा देऊ. मोगलांच्या या पवित्र्याने शाहूचा भ्रमनिरास झाला तर त्यामानाने ताराबाईस विशेष बळ प्राप्त झाले. कारण, मोगलांच्या या निवाड्याने शाहूला मोगल दरबारचा सक्रिय पाठिंबा नसल्याचे जाहीर झाले. ताराबाई व शाहू यांच्यात तंटा लावून मोगल स्वस्थ बसले नाहीत. शाहूने सोडवलेले प्रांत परत फिरून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला. पुणे प्रांत म्हणजे स्वराज्याचा गाभा. तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शाहूच्या सरदारांच्या व मोगलांच्या बऱ्याच लढाया पुण्याच्या आसपास घडून आल्या. इकडे ताराबाईने आपले राजकीय चातुर्य पणाला लावून दक्षिणेतील मोगल अंमलदारांना आपल्या पक्षास मिळवून शाहूचा उच्छेद चालवला. सारांश, ताराबाई व मोगल यांच्या कात्रीत शाहू चांगलाच सापडला व संभाजीचा हा पुत्र या अडचणीतून कसा मार्ग काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: