सोमवार, २५ मार्च, २०१३

अजातशत्रू ( शाहू -भाग ४ )


             स. १७४० मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला त्यावेळी रघुजी भोसले व फत्तेसिंग शाहूच्या आज्ञेने कर्नाटकांत मोहिमेवर होते. रघुजीने या स्वारीत बाजीरावास जे जमले नाही ते करून दाखवले. अर्काटच्या नवाबाचा रघुजीने पराभव केला. अर्काटकरांची बाजू घेण्यास फ्रेंच वळवळ करू लागले तर त्यांनाही रघुजीने तराटणी देऊन गप्प बसवले. तसेच त्रिचनापल्ली सारखे प्राचीन वैभवाचे स्थळ देखील रघुजीने आपल्या ताब्यात घेऊन तेथील मुस्लिम सत्ताधीश चंदासाहेब यास कैद करून साताऱ्यास पाठवून दिले. त्रिचनापल्ली घेतल्यावर रघुजी पुढील बेत आखणार इतक्यांत बाजीराव मरण पावल्याची बातमी आल्यामुळे त्याने मोहीम आटोपती घेतली. त्रिचनापल्ली त्याने मुराराव घोरापड्याच्या ताब्यात देऊन त्याने फत्तेसिंगसोबत परतीची वाट धरली. चिटणीस बखरीचा दाखला घेतला असता असे दिसून येते कि, फत्तेसिंगाचे रघुजीसोबत साताऱ्यास परत येणे शाहूला आवडले नाही. त्याच्या मते फत्तेसिंगाने स्वतः त्रिचनापल्ली येथे राहायला हवे होते. त्यातच मुराराव घोरपड्याच्या ताब्यात त्रिचनापल्लीसारखे ठिकाण दिल्याने शाहूच्या नाराजीत भर पडली. कारण, शाहूच्या आज्ञेने जरी मुराराव कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभागी होत असला तरी तो काही शाहूचा अधिकृत सरदार नव्हता. त्यामुळे शाहूची नाराजी स्वाभाविक होती. असे असले तरी, रघुजीसमोर तरी दुसरा पर्याय काय होता ? एव्हाना त्यास फत्तेसिंगाची कर्तबगारी समजून चुकली होती. त्याला एकट्याला मागे ठेवण्यात काही अर्थ नव्हता. म्हणूनच त्याने मुरारावास जवळ करून कर्नाटकातून माघार घेतली.
                 इकडे नानासाहेबाने पेशवेपद मिळाल्यावर एक नवीनचं पराक्रम करून ठेवला. कोल्हापूरच्या संभाजीसोबत त्याने एक गुप्त करार करून शाहूच्या पश्चात संभाजीला सातारच्या गादीवर बसवण्याचे मान्य केले. शाहूची वृद्धावस्था, त्याला पुत्रसंतान नसणे आणि राज्याचा वाढता विस्तार पाहता पुढे काय हा प्रश्न दरबारातील मुत्सद्यांच्या समोर उभा राहू लागला होता. या प्रश्नाचे निरसन करण्याच्या नावाखाली आपापला स्वार्थ साधण्यास नानासाहेब पेशवा व रघुजी भोसले धडपडू लागले. पेशव्याची इच्छा अशी कि, सातारा व कोल्हापूर हि दोन राज्ये एक करावीत. संभाजीपण यावेळी म्हातारा झाला होता आणि त्यालाही मुलबाळ नव्हते. त्याशिवाय तो फारसा कर्तबगार नसल्याने त्यास कधीही गुंडाळून ठेवणे पेशव्याला सहजशक्य होते. मिळून सातारा व कोल्हापूर हि दोन राज्ये एक करून पेशवा आपले सामर्थ्य व महत्त्व वाढवू इच्छित होता. त्याउलट रघुजीचे बेत होते. शाहूची धाकटी राणी सगुणाबाई हि रघुजीच्या आईची चुलत बहिण असल्याने रघुजीच्या मुलांपैकी एकाला दत्तक घेण्याचा सगुणाबाईचा विचार चालला होता व शाहू देखील त्यास अनुकूल होता. पण काही कारणांनी हा बेत अंमलात आणता आला नाही. सातारची गादी आपल्या मुलाला मिळवून देण्याव्यतिरिक्त आणखी एक उद्देश रघुजीच्या मनात होता व तो म्हणजे नानासाहेबास पेशवेपदावरून दूर करणे हा होय ! सारांश, स. १७४० - ४१ पासून सातारचे मुत्सद्दी शाहूच्या मरणाची वाट बघू लागले होते.
               स. १७४३ च्या मे व जून महिन्यात शाहू आजारी पडला. त्याकाळात सर्व हिंदुस्थानातील सत्ताधीशांचे लक्ष साताऱ्यात काय होते याकडे लागले होते. परंतु, सुदैवाने शाहू आजारातून उठला. पण यावेळी त्याच्यात पूर्वीसारखा जोर राहिला नव्हता. त्यातचं त्याच्या घरातील प्रकरणांची भर पडली. त्याच्या दोन्ही राण्यांचे आपसांत पटत तर नव्हतेच पण दरबारी राजकारणात देखील त्या नको तितका हस्तक्षेप करीत. न्याय - निवाड्याच्या बाबतीत देखील त्या पुढाकार घेत व न्याय - अन्यान न पाहता आपल्या माणसांची बाजू उचलून धरत. त्यांच्या या मनमानी कारभारा समोर शाहूचे देखील फारसे काही चालत नव्हते.  वृद्धावस्था, अस्थिर प्रकृती, बायकांची भांडणे इ. मुळे तो पुरता वैतागून गेला. त्यातचं अलीकडे नानासाहेब पेशवा शाहूच्या पूर्वपरवानगी शिवाय कित्येक राजकीय प्रकरणे स्वबळावर उरकू लागल्याने त्याच्याविषयी शाहू साशंक बनला आणि स. १७४७ च्या जानेवारी - मार्च दरम्यान केव्हातरी त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केले. नानासाहेबाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पेशवा बनवण्याचा शाहूचा विचार होता पण आपल्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्याच्या बळावर नानासाहेबाने इतर मराठी मुत्सद्द्यांना व सरदारांना असा धाक घातला होता कि, त्याने रिक्त केलेलं पंतप्रधानपद स्वीकारण्यास कोणी पुढे येईना. त्याशिवाय आपल्या लष्करी बळाचा खुद्द शाहुवर देखील प्रयोग करण्यास नानासाहेबाने मागेपुढे पाहिले नाही.  शाहूस लिहिलेल्या एका पत्रात त्याने आपले पद परत न दिल्यास आपण ' बाहेरील इज्जतीचा दरकार सोडून बसू ' अशी स्पष्ट शब्दांत धमकी दिली. इज्जतीचा दरकार सोडून नानासाहेब काय करणार होता ? कदाचित लष्करी बळावर त्याने शाहूला कैद करून संभाजीला साताऱ्यास आणले असते किंवा इतर कोणाला तरी सातारची गादी दिली असती किंवा त्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली असती. सारांश, नानासाहेबाने आपले लष्करी बळ शाहूच्या निदर्शनास आणून देताच एप्रिलमध्ये शाहूने त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली व या प्रकरणावर पडदा टाकला. ( स. १७४७ )
                 यानंतर राज्याच्या कारभारात शाहूने पूर्वीसारखे लक्ष घालणे सोडूनचं दिले. तसेही त्याच्या हाती आता फारसे अधिकार शिल्लकचं कुठे राहिले होते म्हणा ! फक्त सातारा व आसपासच्या प्रदेशावर आता त्याची हुकुमत होती व ती हुकुमत देखील किती पोकळ होती हे त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केल्यावर त्याच्या लक्षात आले. त्यातच २५ ऑगस्ट १७४८ रोजी शाहूची धाकटी राणी सगुणाबाईचे निधन झाल्याने तो मनातून पुरता खचला. त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. शाहूचा अंतकाळ समीप आल्याचे जाणून मुत्सद्दी पुढील उलाढालीस प्रवृत्त झाले. शाहूची थोरली राणी सकवारबाईने विठोजीराजांच्या व शरीफजी राजांच्या वंशजांपैकी एकाला दत्तक घेण्याचा बेत आखला. नानासाहेबाचे संभाजीसोबतचे स्नेहसंबंध वाढीस लागले. रघुजी भोसले यात सहभाग घेणार पण त्याची पुरस्कर्ती सगुणाबाई आता हयात नसल्याने त्याने यात सहभाग घेतला नाही. याच सुमारास कैदेत असलेल्या ताराबाईने आपला नातू हयात असल्याने जाहीर करून मुत्साद्द्यांमध्ये आणखीनचं गोंधळ माजवला. खुद्द शाहूला यातील कोणतीच मसलत पसंत नव्हती. तरीही नाईलाजाने त्याने ताराबाईच्या नातवास आपल्या माघारी साताऱ्यास आणण्याचे ठरवले. परंतु, तत्पूर्वी ताराबाईचा महत्त्वकांक्षी व खटपटी स्वभाव जाणून त्याने ताराबाई ज्यास आपला नातू म्हणत आहे तो खरोखरचं राजपुत्र आहे कि नाही याची गोविंदराव चिटणीस मार्फत खात्री करून घेतली. आपल्या हातातील डाव ताराबाईच्या हातात जात आहे हे पाहून सकवारबाईने कोल्हापूरच्या संभाजीस साताऱ्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार संभाजी कोल्हापुरातून बाहेर देखील पडला पण शाहूला हे समजताच त्याने संभाजीला परत जाण्याची आज्ञा केली. तेव्हा संभाजी चुपचाप माघारी वळाला. इकडे, पुढील निरवानिरव करण्याची शाहूने तयारी चालवली व आपल्या सर्व प्रमुख सरदारांना भेटीस बोलावले. बव्हंशी प्रधान व सरदार पेशव्यास अनुकूल असल्याने शाहूच्या आज्ञेनुसार फारसे कोणी साताऱ्यास येउन दाखल झाले नाही. तेव्हा निरुपायाने शाहूने स्वहस्ते दोन याद्या नानासाहेब पेशव्यास लिहून दिल्या. या याद्या म्हणजे शाहूचे एकप्रकारे राजकीय मृत्यूपत्रचं होय ! या याद्यांनुसार वागण्याचे नानासाहेबाने मान्य केले. तसेच शाहूच्या इच्छेनुसार त्याच्या पश्चात ताराबाईचा नातू रामराजा यास साताऱ्यास आणून त्यास राज्यपद देण्याचेही पेशव्याने मान्य केले. ( ऑक्टोबर १७४९ )
                पुढे लवकरचं १५ डिसेंबर १७४९ रोजी वृद्धापकाळाने शाहूचे निधन झाले. त्याची पत्नी सकवारबाई हिने सहगमन केले. अर्थात, तिने स्वखुशीने सहगमन केली कि तिला तसे करण्यास भाग पाडले हा एक वादाचा मुद्दा आहे पण प्रस्तुत ठिकाणी त्या वादात शिरण्याचे काही प्रयोजन नाही. शाहूच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार ४ जानेवारी १७५० रोजी ताराबाईचा नातू, रामराजा यास सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून बसवण्यात आले.
                इथपर्यंत आपण शाहूच्या हयातीचा व राजकीय कारकीर्दीचा धावता आढावा घेतला. छ. शिवाजी महाराजांचा नातू व संभाजीचा मुलगा म्हणून ज्या प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा मराठी इतिहास वाचक मंडळी शाहुकडून बाळगून असतात, त्या अपेक्षेप्रमाणे शाहूचे वर्तन घडले नव्हते हे उघड आहे. मात्र आपल्या पराक्रमी आजोबाच्या कीर्तीला कलंक लागेल असेही काही कार्य / कृत्य त्याने केले नाही. राजकारणात एक छत्रपती म्हणून वावरतांना स. १७२० नंतर शाहू हळूहळू कमजोर पडत चालल्याचे दिसून येते. आरंभी मोहिमांवर स्वतः जाणारा शाहू येथून पुढे स्वारीवर जाण्याचे टाळताना दिसू लागला. स. १७२० पूर्वी त्याच्या सरदारांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते व शाहू स्वतः मोहिमेवर जात असल्याने त्यांच्या स्वैर वर्तनावर काहीसे नियंत्रण होते. परंतु बाजीरावाच्या काळात हि परिस्थिती साफ बदलली. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावाने आपले महत्त्व व सामर्थ्य इतके वाढवले कि, राजकारणाचे केंद्र सातारा येथून पुण्यास कधी आले हे लोकांना उमगलेचं नाही. शाहूच्या आज्ञेने बाजीराव जंजिरा स्वारीस गेला आणि मध्येच मोहिमेतून अंग काढून बाजूला झाला. पण बाजीराव म्हणजे मराठी राज्य वा शौर्य नाही हे शाहूने, बाजीरावाच्या अनुपस्थितीमध्ये जंजिरा मोहीम चालवून सिद्ध केले. जंजिऱ्याच्या स्वारीत शेवटी मानाजी आंगऱ्यास मदत करण्यासाठी म्हणून चिमाजीने सहभाग घेतला आणि यशाचा वाटेकरी बनला. शाहूच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील १७२० -४० हि वीस वर्षे यासाठी महत्त्वाची आहेत कि, बाजीराव - चिमाजीचे पराक्रम एकापाठोपाठ एक अशा प्रकारे झळकल्याने पेशवेबंधूंना कमालीचे महत्त्व आले आणि त्यामानाने इतर प्रधान व सरदारांचे महत्त्व घटत गेले. इंचबर्डन व गोर्डन या इंग्रज वकिलांनी स. १७३९ च्या जून महिन्यात शाहू व पेशव्यासोबत झालेल्या भेटीत हाच निष्कर्ष काढला.   
                एका बाबतीत मात्र शाहूने पेशव्यांना फारसे जुमानल्याचे दिसत नाही व ती बाब म्हणजे कोल्हापूरकर संभाजीचे प्रकरण ! कोल्हापूरचे राजकारण त्याने स्वतःहून चालवले. त्यात पेशव्याचा किंवा इतर कोणाचा शिरकाव होऊन दिला नाही पण हि कसर पुढे नानासाहेबाने बहरून काढली. पेशवेपद मिळताच संभाजीला शाहूच्या नंतर सातारची गादी देण्याचे मान्य करून गडी मोकळा झाला. नानासाहेबाच्या काळात आजारपण व घरगुती भांडणे यांमुळे शाहू व्यापला जाउन राजकारणावरील त्याचे लक्ष उडाले. पण हाच काळ राजकीय संक्रमणाचा असल्यामुळे आणि अशा परिस्थितीला तोंड देण्याची कुवत नानासाहेबाची नसल्याने भविष्यात मारतही राज्यावर पानिपतचे अरिष्ट ओढवले. उदाहरणार्थ, याच काळात शिंदे - होळकरांनी जयपूर प्रकरणी नसत्या भानगडी करून राजपुतांचे वैर पदरात पाडून घेतले. शाहू व राजमंडळ यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या नादात शिंदे - होळकर स्वतंत्रपणे वागू लागल्याचे नानासाहेबाच्या लक्षात आलेच नाही. पुढे आपली चूक ध्यानात आल्यावर त्याने या दोन सरदारांमध्ये भांडणे लावून त्यांना दुर्बल करण्याचे आत्मघातकी धोरण स्वीकारले.
                   बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्यात कित्येकदा शाहूने नको तितका उदारपणा दाखवल्याचे दिसून येते. आरंभीच्या काळात त्याचा स्वभाव तितका मृदू नव्हता. परशुरामपंत प्रतिनिधी ताराबाईस सोडून शाहूला येउन मिळाल्यावर त्याने त्यास आपल्या तर्फेने प्रतिनिधीपद दिले. पुढे चंद्रसेन जाधवाच्या बंडास परशुरामाची फूस असल्याने लक्षात आल्यावर शाहूने परशुरामास कैद करून त्याचे डोळे काढण्याची आज्ञा फर्मावली. परंतु, खंडो बल्लाळने मध्ये पडून प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे परशुरामाचे डोळे वाचले मात्र कैद काही टळली नाही. प्रतिनिधीच्या बाबतीत इतकी कठोरता धारण करणारा हाच शाहू पुढे दमाजी थोरात, उदाजी चव्हाण इ. च्या बाबतीत मात्र जालीम उपाय योजताना दिसत नाही. अशा सरदारांना वारंवार माफी देऊन त्याने एकप्रकारे या सरदारांना व इतरांना देखील आपल्या विरोधात बंड करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे झाले.  
                    जो प्रकार बंडखोरांच्या बाबतीत तोच आपल्या चढेल नोकरांच्या बाबतीत करून शाहूने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पेशवा - सेनापती, पेशवा - आरमारप्रमुख, पेशवा - प्रतिनिधी, पेशवे - भोसले इ. वादांत त्याने निर्णायक अशी भूमिका कधी घेतलीच नाही. वस्तुतः शाहू हा धनी असून इतर त्याचे नोकर होते पण असे असतानाही शाहूला आपल्याच नोकरांची भीड पडत गेली. हा कदाचित प्रदीर्घ मोगली कैदेचा परिणाम तर नसावा ना ! आपल्यापेक्षा जो जबरदस्त असेल त्याच्यासमोर मान झुकवण्याची जी सवय शाहूला कैदेत असताना लागली होती ती नंतरही कायम राहिली होती असे कित्येकदा वाटते. पण याचा परिणाम मराठी राज्याला अतिशय घातक असा झाला.      बाजीरावाने सेनापतीला लोळवले. आंगऱ्यांच्या विरोधात इंग्रजांशी हातमिळवणी केली. प्रतिनिधीच्या ईर्ष्येने मुद्दाम जंजिरा मोहीम रखडवली. नानासाहेबाने पुढे कर्नाटकात इतर कोणत्याही मराठी सरदाराचा शिरकाव होऊ दिला नाही. शाहूच्या पाठबळावर बाबूजी नायकाने कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न केला पण प्रसंगी निजामाशी संधान बांधून नानासाहेबाने बाबूजीचा कर्नाटकातून साफ उठावा  केला. याचा परिणाम म्हणजे, कर्नाटकात मुस्लिम आणि युरोपियन सत्ता प्रबळ होऊन तो भाग मराठी राज्याच्या ताब्यातून कायमचा निघून गेला. शाहूने वेळीच पेशव्यांना न रोखल्यामुळे पेशव्यांची हिंमत व सामर्थ्य वाढतच गेले. पुढे आपल्या विरोधकांचा तडकाफडकी बंदोबस्त करून पेशव्यांनी इतर प्रधानांवर आणि सरदारांवर आपला वचक बसवला व हा प्रकार छत्रपती असून देखील शाहू निमुटपणे पाहत बसला.
                      शाहूच्या या उदार आणि शांत वृत्तीचा फायदा कोल्हापूरकरांनी भरपूर घेतला. संभाजीने शाहुवर कित्येकदा मारेकरी घातले, पण शाहूने संभाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे कधी मनावर घेतले नाही. त्याच्या जागी खुद्द कोल्हापूरचा संभाजी वा ताराबाई असते तर मिळालेल्या संधीचे भांडवल करून त्यांनी शाहूचा केव्हाच निकाल लावला असता. परंतु, शाहूने मात्र असे काही केल्याचे दिसून येत नाही. शाहूवर तो मोगलाधार्जिणा असल्याचे अनेक आरोप होतात. परंतु, हे आरोप अजूनपर्यंत कोणी पुराव्याने सिद्ध केलेले नाहीत. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेचं निजामाचे अस्तित्व शिल्लक राहिले असेही म्हटले जाते पण त्यातही तथ्य नाही. पालखेड प्रसंगी बाजीराव निजामाला लोळवेल  असे खुद्द बाजीरावाला वाटत नव्हते तर इतरांची काय कथा ! पालखेड नंतर निजामाशी भोपाळ येथे बाजीरावाचा संग्राम घडून आला पण, सोबत तोफा - बंदुका नसल्याने त्याला निजामाचा काटा काढता आला नाही. पुढे नानासाहेबाच्या कारकिर्दीत शाहू हयात असेपर्यंत निजामाशी प्रत्यक्ष असा संघर्षचं न उद्भवल्याने लढाईचा प्रसंग आलाच नाही. शाहूच्या निधनानंतर पेशवे - निजाम यांच्यात वैमनस्य आले पण त्याची चर्चा येथे अनावश्यक आहे.
    सारांश, शाहूच्या एकूण जीवनाचा व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कि, मराठ्यांचा हा राजा आपल्या आजोबा वा बापाप्रमाणे पराक्रमी, कर्तबगार व धोरणी नसला तरी नेभळट, कर्तुत्वशून्य देखील नव्हता. बालपण शत्रूच्या कैदेत गेल्याने त्याच्या मनाची जी काही जडणघडण झाली तिचा विचार केल्याखेरीज त्याच्या स्वभावाचा व वर्तनक्रमाचा अंदाज येणार नाही. ज्या ठिकाणी सतत आपल्या जीवितावर वा धर्मावर घाला पडण्याची धास्ती आहे अशा ठिकाणी १७ - १८ वर्षे काढावी लागल्याने कोणाचाही स्वभाव हा शांत व उदार आणि तडकाफडकी निर्णय घेण्यास असमर्थ असा बनणे स्वाभाविक होते. शाहूच्या बाबतीत हेच घडून आले. स. १७०७ मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर पहिल्या दोन - चार वर्षांत त्याचा मुळचा स्वभाव दिसून आला. पण हि उमेद अल्पकाळचं टिकली आणि पुढे त्याची वृत्ती शांत होत गेली. शाहू हा शिवाजी - संभाजीच्या मनाने चैनी व विलासी असला तरी राज्यकारभाराकडे त्याचे दुर्लक्ष कधी झाले नाही. औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू सतत त्याच्या सोबत वावरत असल्याने स्वारीत, दरबारात कसे वर्तन करायचे, कारभार कसा करायचा याचे अप्रत्यक्ष शिक्षण त्यास तिथेच मिळाले होते. त्या शिक्षणाचा फायदा त्यास पुढील आयुष्यात बराच झाला. मुक्कामात वा प्रवासांत कोठेही जनतेची तक्रार ऐकून त्यावर त्वरित निर्णय देण्यास शाहू नेहमी तत्पर असे.
        तात्पर्य, फारसा महत्त्वकांक्षी नसला तरी कर्तबागार पण काहीसा दुबळ्या मनाचा हा दुसरा शिवाजी उर्फ शिवाजी, बखरकारांनी गौरवल्याप्रमाणे ' अजातशत्रू ' निश्चितचं होता.  अकारण कोणाला दुखवायचे नाही, आपली खोड काढणाऱ्यास फारसे गंभीर शासन करायचे नाही अशा राज्यकर्त्याचा शत्रू तर कोण बनणार व याच्याशी वैर ते काय धरणार ?

२ टिप्पण्या:

deom म्हणाले...

शाहू महाराजांवर एवढे प्राणघातक हल्ले होवून, या लेखाचे शीर्षक " अजातशत्रू" कदाचित समर्पक नसावे.

sanjay kshirsagar म्हणाले...

deom,
छ. शाहूवर जे काही प्राणघातक हल्ले झाले त्यामागील मुख्य कारण म्हणजे शाहू हा स्वराज्याचा छत्रपती होता. केवळ हे एक कारण वजा केल्यास शाहूसोबत मुद्दाम वैर -- अगदी व्यक्तिगत वैर देखील कोणी असे धरले नाही व त्यामुळेचं बखरकारांनी शाहूला अजातशत्रू हि उपाधी दिली आहे. या लेखाला देखील हेच शीर्षक देण्यामागील मुख्य कारण म्हणजे, मला स्वतःला शाहूच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायचा होता. शाहू हा नेमका कसा होता हे जाणून घ्यायचे होते आणि तो खरोखर अजातशत्रू होता का हे देखील अभ्यासायचे होते. सदर लेखमाला पूर्ण करताना माझ्या लक्षात आले कि, बखरकारांनी अजातशत्रू म्हणून शाहूचा जो गौरव केला आहे तो यथायोग्य आहे म्हणून मी लेखमालिकेचा समारोप करताना त्यास अजातशत्रू म्हणून गौरवले आहे. अर्थात या ठिकाणी प्रामाणिकपणे मी हे देखील कबूल करतो कि, छ. शाहूला ' अजातशत्रू ' म्हणून गौरवण्याइतका मी काही मोठा नाही.