बुधवार, २७ मार्च, २०१३

ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली

 दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
      ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।। २ ।।
          शिवभारतकार परमानंद यांचा नातू गोविंद याने वरील शब्दांत ताराबाईची प्रशंसा तर केली आहेच पण तिच्या योग्यतेचेही वर्णन केले आहे. छ. शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा राजाराम याची पत्नी ताराबाई हि सेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी. स. १७०० च्या मार्च महिन्यात सिंहगड येथे राजारामाचे निधन झाले व राजकीय पटलावर ताराबाई नामक वीरांगनेचा प्रवेश झाला. यावेळी तिचे वय अवघे २५ वर्षांचे असून पोटी एक पुत्र तिसरा शिवाजी होता. ( शिवाजी तिसरा, जन्म ९-६-१६९६ )
                   राजारामाच्या मृत्यूची बातमी समजतांच काही काळ औरंगजेबास आपण सर्व दक्षिण जिंकलो असा भास झाला. शिवाजीने स्थापलेल्या स्वराज्याचा वारस आपल्या कैदेत आहे. बस्स, आता दक्षिण आपलीचं ! अशी मोगल बादशहाची भावना बनली. परंतु, लवकरचं त्याचा भ्रमनिरास झाला. राजारामाच्या चार बायकांपैकी ताराबाई व राजसबाई विशेष कर्तुत्ववान होत्या. अधिकार व सत्तालालसा दोघीनांही होती व सवतीमत्सरही भरपूर होता. त्यात भर पडली राजारामानंतर गादीचा वारस कोण या प्रश्नाची !
                 ताराबाईचा मुलगा शिवाजी हा यावेळी ४ वर्षांचा असून राजसबाईचा पुत्र संभाजी हे केवळ २ वर्षांचा होता. अशा परिस्थितीत ताराबाईने आपल्या मुलाला राज्याचा स्वामी बनवण्याचे ठरवताच थोडा गोंधळ व वाद निर्माण झाला. परंतु, लवकरचं त्याचे निरसन होऊन विशाळगडी शिवाजीचे राज्यारोहण झाले. मुलाच्या नावाने कारभार हाती घेऊन ताराबाईने राजसबाई व संभाजीला नजरकैदेत टाकले आणि मोगलांशी सुरु असलेला लढा नेटाने पुढे चालवला. स. १७०० ते १७०७, तब्बल सात वर्षे ताराबाईने औरंगजेबाच्या प्रयत्नांना दाद न देता स्वराज्य राखण्याचे प्रयत्न शर्थीने चालवले. याच काळात स्वराज्यातील प्रमुख किल्ले जिंकण्याच्या कामगिरीवर औरंगजेब स्वतः निघाला. आरंभी त्यास थोडेफार यश मिळाले पण लवकरचं त्याची स्वारी रेंगाळली.
               या काळात ताराबाईने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला.  संभाजी, येसूबाई, राजाराम यांची उदाहरणे नजरेसमोर असल्याने तिने आपला मुक्काम कधीही एका विशिष्ट किल्ल्यावर न ठेवता ती सतत आपला मुक्काम बदलायची. त्यामुळे संभाजीप्रमाणे कैद होण्याचा किंवा येसूबाई - राजाराम प्रमाणे किल्ल्यात कोंडून पडण्याचा प्रसंग तिच्यावर ओढवला नाही. तसेच स्वराज्यातील प्रत्येक किल्ला ताब्यात घेण्याचा औरंगजेबाचा अट्टाहास ताडून तिने किल्ले लढविण्याचेही नवे धोरण आखले.
          आजवर मोगल सैन्य गड - किल्ल्यांना वेढा घालून बसल्यावर बाहेर फिरणाऱ्या मराठी फौजा त्यांच्यावर छापे मारून व रसद तोडून त्यांना हैराण करत. जिंजीसारख्या ठिकाणी राजारामाने हेच तंत्र वापरून दीर्घकाळ मोगलांना झुंजवत ठेवले. परंतु, याच जोडीला ताराबाईने आणखी एक युक्ती अंमलात आणली. पावसाळा तोंडावर येईपर्यंत किल्ला लढवायचा व पावसाळ्यास आरंभ झाला कि किल्ला शत्रूच्या हवाली करायचा. पण तत्पूर्वी किल्ल्यावरील दारुगोळा व दाणागोटा नष्ट करायचा किंवा सोबत घेऊन बाहेर पडायचे. ज्यामुळे किल्ला ताब्यात येउन देखील त्याचा लगोलग बंदोबस्त करणे मोगलांना शक्य होऊ नये. आणि मोगलांची मुख्य सेना त्या किल्ल्यापासून लांब गेली कि, आपल्या धाडसी लष्करी तुकड्यांच्या मार्फत गेलेला किल्ला परत आपल्या ताब्यात घ्यायचा. ताराबाईच्या या धोरणामुळे मराठी मुलखातील किल्ले जिंकणे औरंगजेबास भलतेच महागात पडले. एकतर वर्षभर एखाद्या गडाला वेढा घालायचा. वेढ्याच्या काळातील नुकसान सोसायचे. वर दक्षिणा म्हणून किल्लेदाराला रोख रकम मोजून किल्ला ताब्यात घ्यायचा. आणि वर्ष - सहा महिने खपून जिंकलेला किल्ला आपली पाठ वळतांच मराठ्यांनी जिंकल्याची बातमी ऐकायची. औरंगजेबाच्या मनाला काय यातना होत असतील ते तोच जाणे !
           या सात वर्षांच्या काळात दिवा विझण्यापूर्वी जसा मोठा होतो त्याप्रमाणे औरंगजेबाने आपले अखेरचे सर्व प्रयत्न करून पाहिले. ताराबाईचे प्रमुख सहाय्यक रामचंद्रपंत अमात्य व परशुरामपंत प्रतिनिधी यांच्यात फूट पाडण्यासाठी फितुरीची बनावट पत्रे बनवली. शाहूला आपले मांडलिक बनवून त्याची मराठी राज्यावर नियुक्ती करण्याचाही त्याचा बेत चालला होता पण शाहूची प्रत्यक्ष सुटका करण्यास त्याचे मन धजावत नव्हते. कारण, या प्रदीर्घ मोहिमेत शाहूच्या रुपाने मिळालेले एकमेव यश त्याला अखेरच्या क्षणी गमवायचे नव्हते. वस्तुतः याचवेळी त्याने शाहूला सोडले असते तर ताराबाई व शाहू यांच्यात कलागत लागून औरंगजेबाचे कार्य थोड्या प्रमाणात तरी घडून आले असते. कारण, सात वर्षे सत्ता हाती घेऊन राज्यकारभार करणारी ताराराणी सुखासुखी शाहूच्या हाती राज्यकारभार सोपवणार नव्हती. याविषयीचा अंदाज खरेतर औरंगजेबासारख्या राजकारणात हयात घालवलेल्या व्यक्तीच्या लक्षात यायला हवा होता. पण मराठी राज्याच्या सुदैवाने औरंगजेबास हि दुर्बुद्धी सुचली नाही.
             औरंगजेबासोबत मराठी राज्याचा जो काही २५ वर्षे लढा चालला होता, त्याचे अखेरच्या काळात बरेचसे स्वरूप बदलले होते. राजाराम सत्तेवर येउन स्थिरावला त्यावेळी मराठी सरदारांचे काही गट पडले होते. एक गट स्वराज्यनिष्ठ होता. छ. शिवाजीमहाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यास तो कटिबद्ध होता. दुसरा गट भाडोत्री सरदारांचा होता. जो कोणी रोख पगार व जहागीर / वतन  देईल त्याच्या बाजूने लढायचं असा त्यांचा निर्धार होता. तिसरा गट होता स्वतंत्र वृत्तीच्या एकांड्या शिलेदारांचा. यांना स्वराज्य, मोगलाई यांत फारसा रस नव्हता. आपल्या पथकाच्या / लष्करी सामर्थ्याच्या बळावर प्रांतांत लुटालूट करून आपले सैनिकी बळ वाढवणे आणि स्वपराक्रमावर नवीन मुलुख जिंकून त्यात आपले स्वतंत्र अधिष्ठान निर्माण करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय / उद्दिष्ट होते.
               या तीन गटातील सरदारांपैकी पहिल्या व तिसऱ्या गटातील सरदारांचा मोगलांना विशेष जाच झाला. स्वराज्यनिष्ठावंतांविषयी या ठिकाणी फार काय लिहायचे, पण एकांड्या शिलेदारांचा प्रश्न वेगळा होता. स्वराज्यातील मुलुख धुवून निघाल्यामुळे लूटमारीस योग्य राहिला नव्हता. राहता राहिला मोगलांच्या अंमलाखालील सधन प्रदेश, तर तो तुटून लुटण्यास त्यांनी कमी केले नाही. या तिसऱ्या गटातील सरदारांनीच गुजराथ, माळवा इ. प्रांतांवर सतत स्वाऱ्या करून उत्तरेतून येणारी औरंगजेबाची रसद तोडून मोगलांना रडकुंडीस आणले. मराठ्यांच्या तथाकथित स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यांत याच सरदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आंग्रे, भोसले, पवार, होळकर, शिंदे, कदम बांडे इ. काही नावे वाचकांच्या परिचयाची आहेतचं. या सरदारांना स्वराज्य वा मोगलाई यांच्याशी काही देणे - घेणे नव्हते. मोठमोठ्या फौजा बाळगून हे बलवान झाले होते व लहानमोठे प्रदेश बळकावून एकप्रकारे स्वतंत्र संस्थानिक बनले होते. अशा सरदारांना काबूत आणण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले प्रदेश त्यांच्याजवळचं ठेऊन व त्यांचे महत्त्व रक्षून आपले कार्य साधून घेण्याचा एकचं मार्ग उपलब्ध राहिला होता. ज्याचा अवलंब वारसा युद्धांत ताराबाई व शाहू यांनी केल्याचे दिसून येते.
          स्वराज्यनिष्ठांच्या गटातील नावांचे आता संशोधनचं करावे लागेल. कारण, या गटात मोडतील अशा मंडळींची नावे चटकन आठवत नाहीत. काहीजण म्हणतील कि, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य यांचे काय ? ते स्वराज्यनिष्ठ नव्हते का ? तर प्रिय वाचकहो, ते निश्चित स्वराज्यनिष्ठ होते पण वतनाच्या आसक्तीपासून दुर्दैवाने ते लांब राहू शकले नाहीत. मोगलांविरुद्ध ते स्वराज्यनिष्ठेने लढले पण वारसा युद्धांत मात्र त्यांनी वतनास प्राधान्य दिले. याला एखादाच खंडो बल्लाळ सारखा अपवाद दिसून येतो. असो, राहता राहिला मुद्दा भाडोत्री सरदारांचा तर माने, निंबाळकर प्रभूती सरदार या गटात मोडणारे सरदार असून पुढील काळात त्यांनी मोगलांचाच पक्ष स्वीकारला. परिणामी, पुढच्या राजकारणात त्यांना अजिबात महत्त्व राहिले नाही. उत्तर पेशवाईत हुजऱ्याचा मुख्य कारभारी झालेला त्रिंबकजी डेंगळे जे कार्य करून व लौकिक संपादन करून इतिहासात अजरामर झाला त्याच्या तुलनेने हे खानदानी मराठा सरदार बदनामीच्या का होईना पण अडगळीतचं पडून राहिले. त्यांच्या अस्तित्वाचा कोणाला फायदाही झाला नाही व त्यांच्या मदतीविना कोणाचे अडलेही नाही !
          स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर शाहू कैदेतून सुटून आला त्यावेळी उपरोक्त तीन गटांतील मराठी सरदारांचे राजकारणावर वर्चस्व होते. मोगलांच्या कैदेतून सुटून आलेल्या शाहूने ताराबाईकडे राज्यकारभार आपल्या हवाली करण्याची मागणी केली. परंतु, ताराबाईने ती साफ धुडकावून लावत स्पष्ट शब्दांत सांगितले कि, शिवाजीमहाराजांनी कमावलेले राज्य शाहूच्या वडिलांनी -- म्हणजे संभाजीने -- गमावले. आज ज्या राज्यावर ताराबाईचा अंमल आहे व ज्या राज्यावर शाहू आपला अधिकार सांगत आहे ते राज्य राजारामाने संपादले आहे. वडिलोपार्जित राज्यावर हक्क सांगणे निराळे पण चुलत्याने कमावलेल्या राज्यावर पुतण्या कसा काय हक्क सांगू शकतो ? ताराबाईचा युक्तीवाद बिनतोड आणि न्यायाचा होता. परंतु तिची बाजू तिच्याच लोकांना उचलून धरणे योग्य वाटले नाही. इतिहासकार याविषयीचे समर्थन करताना लिहितात कि, राजारामाने जरी मंचकारोहण केले असले तरी राज्याचा मालक हा शाहूचं आहे हि त्याची भावना अखेरपर्यंत कायम होती व शाहूला मोगलांच्या कैदेतून सोडवून त्यास राज्याचा अधिकार सोपवण्याचा त्याचा मानस होता. राजारामाची जी भावना होती, तीच समजूत त्याच्या प्रधानमंडळाची व सरदारांची देखील होती. स. १७०७ मध्ये जेव्हा शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परतला त्यावेळी धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य इ. चे मत शाहूकडे ताराबाईने राज्याचे अधिकार सोपवावेत असेच होते. परंतु, ताराबाईने ठणकावून सांगितले कि, शाहूचा या राज्यावर कोणत्याही प्रकारे हक्क पोहोचत नाही.
             इतिहासकार काहीही सांगोत, पण ताराबाईचा पक्ष हा न्यायाचा होता हे उघड आहे. असो, शाहूचा या राज्यावर कसलाही अधिकार नाही इतकेच सांगून ताराबाई थांबली नाही तर तिने आपल्या सर्व सरदारांकडून एकनिष्ठेतच्या शपथा घेऊन शाहूसोबत लढण्याची तयारी केली. वस्तुतः, ताराबाईची यावेळी थोडी हलाखी होती. एकतर तिची बरीचशी फौज ठिकठिकाणी मोगलांशी लढण्यात गुंतली होती. तिचा मुख्य सेनापती धनाजी जाधव याची निष्ठा डळमळीत झालेली होती. डळमळीत धनाजीला वेसण म्हणून तिने परशुरामपंत प्रतिनिधीला सोबत पाठवले. पण, खंडो बल्लाळ चिटणीसाने आपले सर्व वजन खर्चून धनाजीला शाहूच्या पदरात घातले आणि स. १७०७ च्या खेडच्या लढाईत जाधवाची फौज तटस्थ राहिल्याने ताराराणीच्या सैन्याचा पराभव झाला.
              खेडच्या लढाईनंतर शाहूचे आक्रमण वाढत गेले व स. १७०८ च्या आरंभी राज्याभिषेक झाल्यावर त्याने कोल्हापूरवर स्वारी केली. शाहूच्या सैन्याशी समोरासमोर लढण्याची तयारी नसल्याने ताराबाईने आपले प्रमुख किल्ले लढवण्याची जबाबदारी रामचंद्रपंतावर टाकून ती स्वतः मालवणला निघून गेली. शाहूची कोल्हापूर मोहीम जरी यशस्वी झाली असली तरी फार काळ तो तिकडे थांबला नाही व त्याची पाठ फिरताच ताराराणीने फिरून एकदा गेलेला मुलुख व गड - किल्ले जिंकून घेतले. दरम्यान मोगलांच्या वारसा युद्धाचा निकाल लागून मोगल शहजादा मुअज्जम उर्फ बहादूरशहा हा बादशाह झाला. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपण वारस आहोत व दक्षिणच्या सहा सुभ्यांतून आपणांस चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचा अधिकार मिळावा अशी मागणी शाहू व ताराबाईने बहादूरशहाकडे केली. मोगलांनी धूर्तपणे सांगितले कि, चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा तयार आहेत पण तुमच्यापैकी त्या कोणाच्या नावे द्यायच्या तेवढे सांगा ! तात्पर्य, ताराबाई किंवा शाहू यांच्यापैकी एकालाच मोगलांकडून चौथाई व सरदेशमुखी मिळणार होती आणि या दोघांपैकी ती नशीबवान व्यक्ती कोण असणार याचा फैसला रणभूमीवरच होणार होता. याबाबतीत शाहूपेक्षा ताराबाई जास्त हुशार निघाली. मोगलांच्या निवाड्याने, संभाव्य वारसा युद्धांत शाहूला मोगलांचे पाठबळ मिळणार नाही हे एक उघड गुपित होते. त्याचा फायदा उचलून तिने दक्षिणेतील मोगली अंमलदारांना शाहूच्या विरोधात चिथावणी दिली. आरमारप्रमुख कान्होजी आंग्रेला कोकणातून घाटावर येण्याची आज्ञा सोडली. शाहूचा सेनापती चंदसेन जाधव यास, तिने आपल्या पक्षास वळवून घेण्याचा प्रयत्न केला. आरंभी ताराबाईच्या खटपटीला यश मिळत गेले पण बाहेरच्या शत्रूशी लढत असताना घरातील शत्रूकडे तिचे अक्षम्य दुर्लक्ष होऊन तिच्यावर विपरीत प्रसंग ओढवला.
              स. १७१४ च्या जुलै - ऑक्टोबर दरम्यान रामचंद्र अमात्य, गिरजोजी यादव इ. च्या मदतीने राजसबाई व संभाजी यांनी ताराबाईस तिच्या मुलासह कैद करून सत्ता आपल्या हाती घेतली. स. १७१४ पासून स. १७४९ पर्यंत तब्बल ३५ वर्षे ताराराणीस राजकीय अज्ञातवास भोगावा लागला. या ३५ वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली होती. ज्या मुलाच्या बळावर मोठ्या हिरीरीने तिने राज्याचा पसारा मांडला होता तो शिवाजी स. १७२७ मध्ये मरण पावला. त्याच्या निधनाने ताराबाईचा जोर काहीसा ओसरला. इकडे शाहूला आवर घालणे संभाजीला शक्य न झाल्याने त्याने निजामाची मदत स्वीकारली. परंतु, त्यामुळे फारसा फरक पडला नाही व एका लढाईत शाहूच्या सरदारांकडून संभाजी पराभूत झाला. त्या लढाईत संभाजीचा सर्व परिवार व ताराबाई शाहूच्या सैन्याच्या हाती लागले. संभाजीच्या परिवारास कोल्हापुरास परत पाठवण्यात आले. ताराबाईची देखील कोल्हापुरास रवानगी करण्याचा शाहूचा विचार होता पण कोठेही गेल्याने आपली कैद टळत नाही हे जाणून तिने साताऱ्यासच राहण्याचा निर्णय घेतला. ( स. १७३० )
             स. १७३० ते ४९ पर्यंत तब्बल १९ वर्षे ताराबाईने साताऱ्यास काढली. या अवधीत स्वराज्याचे साम्राज्य झाल्याचे जसे तिच्या लक्षात आले त्याचप्रमाणे दरबारावरील शाहूचे नियंत्रण हळूहळू कमी होत जाउन पेशव्याचे प्रस्थ वाढत चालल्याचेही तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. स. १७४५ - ४६ पासून शाहूच्या वारसाचा शोध घेण्यास आरंभ झाला. शाहूला मूलबाळ नव्हते आणि कोल्हापूरच्या संभाजी देखील निपुत्रिक होता. अशा स्थितीत विठोजीराजे व शरफोजी राजे यांच्या वंशातील एखादा मुलगा दत्तक घ्यावा किंवा रघुजी भोसल्याच्या मुलास दत्तक घ्यावे असा शाहूचा विचार होता. त्यावेळी ताराबाईने आपले मौन सोडले आणि शाहूला सांगितले कि, औरस वंशज हयात असताना दत्तकाचा शोध का घेता ? ताराराणीच्या या प्रश्नाने शाहू गडबडला. ताराबाईच्या वाक्यांचा त्याला काहीच अर्थ लागेना. तेव्हा तिने खुलासा केला कि, माझा मुलगा शिवाजी यांस बंदिवासात असताना मुलगा झाला. परंतु, हि गोष्ट उघडकीस आल्यावर संभाजीने त्यास ठार करण्याचे प्रयत्न केले म्हणून आपण त्यास गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले आहे. त्यास आणून गादीवर बसवावे. आपल्या चुलतीचा खटपटी स्वभाव शाहू पुरेपूर ओळखून होता. त्याने तिला सरळ विचारले कि, तुम्ही सांगता त्यास प्रमाण काय ?
                   तेव्हा ताराबाईने सांगितले कि, या प्रकरणाची सर्व माहिती कोल्हापूरचा अमात्य भगवंत रामचंद्र यास आहे. तेव्हा शाहूने स्पष्ट केले कि, भगवंत रामचंद्राने श्रीकृष्णेचे उदक हाती घेऊन हि माहिती सत्य असल्याचे सांगून ते जल माझ्या हातावर घालावे. ताराबाईने यास संमती देऊन भगवंत रामचंद्रास तसा निरोप पाठविला. इकडे शाहूने भगवंतराव नरहर दप्तरदार यास भगवंत रामचंद्र अमात्याच्या भेटीस पाठवून ताराबाईच्या नातवाची प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगितले. भगवंत दप्तरदाराने शाहूच्या आज्ञेनुसार कार्य करून सर्व वृत्तांत शाहूला कळवला. त्यानंतर शाहूने आपला विश्वासू चिटणीस गोविंदराव याला ताराबाईच्या नातवाची भेट घेऊन तो खरोखरच तिचा नातू आहे का याचा तपास करण्यासाठी पाठवले. गोविंदरावाने ताराबाईच्या नातवाची -- राम्राजाची -- दोन तीन वेळा भेट घेऊन हा अस्सल राजपुत्र असल्याची शक्य तितकी खात्री करून घेतली व तसे शाहूस त्याने कळवले. पुढे कोल्हापूरचा अमात्य भगवंत रामचंद्र हा साताऱ्याजवळ आला. कृष्णनदीच्या साक्षीने शपथक्रिया करण्यास खरेतर शाहू स्वतः जाणार होता पण प्रकृती ठीक नसल्याने त्याने आपल्या तर्फेने जगजीवन परशुराम प्रतिनिधी यांस पाठवले. कृष्णा नदीचे जल हाती घेऊन भगवंतराव अमात्याने रामराजा ताराबाईचा नातू असल्याचे शपथपूर्वक सांगितले. या घटनेची बातमी शाहूला पाठवण्यात आली. ताराबाईच्या सांगण्याची सत्यता पडताळून पाहिल्यावर देखील आपल्या हयातीत तिच्या नातवास आणून राज्याभिषेक करण्याची वा भावी वारस म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्याची छाती शाहूस झाली नाही. यावरून नजरकैदेत असलेल्या ताराराणीच्या योग्यतेचा अंदाज बांधता येतो. इतिहासकार पुराव्यांच्या आधारे काहीही म्हणोत, परंतु आपल्या हयातीत ताराबाईच्या नातवास साताऱ्यास आणणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा हाणून घेणे हे शाहूने ओळखले व म्हणूनचं त्याने आपल्या मृत्यूनंतर रामराजास साताऱ्यास आणण्याची आज्ञा केली.
            यावरचं शाहू थांबला नाही तर मृत्युपूर्वी स्वहस्ते दोन याद्या त्याने पेशव्यास लिहून दिल्या. त्या याद्यांनुसार, आपल्या वंशाच्या आज्ञेत राहून राज्य सांभाळण्याची शाहूने पेशव्यास आज्ञा केल्याचे स्पष्ट दिसून येते. याचा असाही अर्थ होतो कि, रामराजास हाताशी धरून ताराबाई राज्यकारभार हाती घेईल ; तसे न घडावे यासाठी पेशव्याने रामराजास हाताशी धरावे असे शाहू पेशव्यास अप्रत्यक्षपणे सुचवत आहे. तसेच, आपल्या वंशाच्या आज्ञेत राहायचे याचा स्पष्ट अर्थ असा कि, रामराजा वगळता इतरांची आज्ञा मानण्याचे कारण नाही व हे इतर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त ताराराणी होय !
         दिनांक ४ जानेवारी १७५० रोजी ताराराणीचा नातू रामराजा छत्रपती बनला. तत्पूर्वीचं ताराबाईने आपले राजकीय जाळे विणायला सुरुवात केली होती. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूचे निधन झाले. ताराबाईला आता प्रतिस्पर्धी म्हणून शाहूच्या राणीचा -- सकवारबाईचा -- तेवढा अडथळा होता. तिच्या सुदैवाने पेशव्याची देखील शत्रू सकवारबाईचं असल्याने त्यांनी संगनमताने तिला एकप्रकारे सती जाण्यास भाग पाडले. पहिले आठ - पंधरा दिवस नानासाहेब पेशवा व ताराबाई यांच्यात सौरस्य होते पण पेशव्याने रामराजास हाताशी धरून राज्यकारभार हाती घेण्यास आरंभ करताच ताराराणी चवताळली व तिने स. १७५० च्या नोव्हेंबर अखेर सातारच्या किल्ल्यावर रामराजास भेटीस बोलावून कैद केले. प्रत्यक्ष छत्रपतीचं कैद झाल्याने पेशव्यावर   अडचणीचा प्रसंग उद्भवला. सातारच्या किल्ल्यावर हल्ला चढवून रामराजाची सुटका करण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होता पण धन्याच्या विरुद्ध हत्यार उपसल्याचा गवगवा झाला असता. त्याशिवाय ताराबाईने खरोखरचं रामराजास अटक केली आहे कि, या दोघांनी मिळून नाटक केले आहे याचा प्रथम शोध घेणे त्यास गरजेचे वाटले. तेव्हा त्याने किल्ल्याभोवती चौक्या बसवून पुण्याला निघून जाण्यात धन्यता मानली. मात्र जाताना त्याने सातारा शहरातील छत्रपतींचा सर्व जामदारखाना आपल्या ताब्यात घेतला. ताराबाईच्या हाती काही द्रव्यबळ लागू नये म्हणून त्याने हे कृत्य केले असले तरी आपल्याच मालकाचा जामदारखाना त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय ताब्यात घेणे म्हणजे एकप्रकारे लूट करणे किंवा दरोडा घालणे होय ! आणि हे कृत्य नानासाहेब पेशव्याने केले.
         रामराजास कैदेत ठेऊन राज्यकारभार करण्याचा ताराबाईने प्रयत्न करून पाहिला पण लवकरचं तिच्या लक्षात आले कि, लष्कराच्या व खजिन्याच्या आभावी आपणांस फारसे काही करता येणे शक्य नाही आणि याच दोन साधनांच्या आधारे प्रबळ होऊन पेशव्याने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला आहे. तेव्हा तिने पेशव्याच्या विरोधात रणशिंग फुंकले. पोर्तुगीज, मोगल, निजाम, फ्रेंच, इंग्रज, सिद्दी इ. सोबत तिने पत्रव्यवहार सुरु करून पेशव्याच्या विरोधात त्यांची मदत मागितली. पेशवा आणि इतर  दरबारी मानकऱ्यांचे पटत नाही हे ओळखून प्रतिनिधी, सेनापती, आंग्रे इ. ना तिने पेशव्याच्या विरोधात चिथावणी दिली. केवळ एवढ्यावरचं न थांबता शिंदे - होळकरांना देखील पेशव्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. आधीचं नानासाहेब आपल्या या दोन बलदंड सरदारांच्या विषयी साशंक होता त्यात ताराबाईच्या कारस्थानाची भर पडल्याने पेशवा गडबडला. परंतु ताराबाईच्या राजकीय चातुर्याचा खरा फटका त्याला अजून बसायचा होता. नानासाहेबाचा चुलतभाऊ सदाशिवराव यालाचं ताराराणीने अप्रत्यक्षपणे फूस लावून कोल्हापूरची पेशवाई स्वीकारण्यास प्रवृत्त केले. यावरून ताराबाईच्या हिकमती स्वभावाची कल्पना यावी.
           ताराबाईचे कारस्थान खोलवर गेले होते यात शंकाच नाही परंतु, हाताशी सैन्य व द्रव्यबळ नसल्याने तिच्या कारस्थानाचा जोर लटका पडत गेला. तुळाजी आंगऱ्याने पेशव्याला थोडाफार उपद्रव दिला पण तो जास्त काही करू शकला नाही. सेनापती दाभाडे तर डभईच्या तडाख्याने थंडचं झाले होते. उमाबाई दाभाडेने आपला सरदार दमाजी गायकवाड यास ताराबाईच्या मदतीस पाठवले. दमाजी पुण्यावर चालून आला तेव्हा पेशवा निजामाशी लढण्यात मग्न होता. मात्र पेशव्याच्या सरदारांनी दमाजी गायकवाडाचा पराभव करून त्याचे बळ मोडले. ( मार्च १७५१ ) दमाजीचा बंडावा संपुष्टात येताच ताराबाईचे बळ सरले. तिने शरणागती पत्करली. पण तत्पूर्वी आपल्या आक्रस्ताळपणाचे दर्शनही घडवले. शाहूच्या पश्चात गादीवर बसलेला रामराजा हा आपला नातू नाही असे तिने जाहीर केले ! यामुळे खानदानी मराठ्यांमध्ये खळबळ माजली. कारण, कित्येक मराठा सरदारांनी आपल्या मुली रामराजास दिल्या होत्या व ते छत्रपतींचे नातलग बनले होते. तोच रामराजा जर ताराबाईचा नातू नाही तर मग आहे तरी कोण ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी ताराबाईस विचारले. तिने यावर काय उत्तर दिले ते इतिहासात नमूद नाही.
           रामराजा खोटा असल्याचे जाहीर झाल्यावर ताराबाईचे सहाय्यक तिला सोडून जाऊ लागले. या दरम्यान ताराबाईला देखील समजून चुकले होते कि, पेशव्याशी तडजोड करण्यातचं निभाव आहे. पण सहजी वाकेल ती ताराराणी कसली ? अखेरचा पर्याय म्हणून तिने कोल्हापूरच्या संभाजीला साताऱ्यास येउन राज्य ताब्यात घेण्याची सूचना केली. परंतु, तुम्ही रामराजास मारून टाका मग मी येतो असे संभाजीचे म्हणणे पडले. यामागील त्याचे हेतू स्पष्ट होते. रामराजास आणण्याचा पुढाकार जसा ताराबाईने घेतला तसाच त्याला ठार करण्यातही घ्यावा. म्हणजे परस्पर तिची बदनामी होईल ती निराळी. त्याशिवाय रामराजा जिवंत असताना आपण जर साताऱ्यास गेलो व पुढेमागे आपले आणि ताराबाईचे पटले नाही तर नवा उपद्व्याप करण्यास रामराजारुपी साधन शिल्लक राहू देऊ नये. संभाजीच्या निरोपातील खोच जाणून ताराबाईने आपला हात आवरता घेतला व पेशव्याशी समेट केला. त्यानुसार रामराजा तिच्याच ताब्यात राहील हे पेशव्याने मंजूर केले. तसेच राज्यकारभार आपल्या संमतीने चालवावा, रामराजाच्या नव्हे हि ताराबाईची अट देखील नानासाहेबाने मान्य केली. तेव्हा शपथपूर्वक सर्वांसमोर रामराजा हा आपला नातू नसल्याचे ताराबाईने मान्य केले. ( सप्टेंबर स. १७५२ )
           यानंतर ताराबाईने राजकीय घडामोडींमध्ये फारसा सहभाग घेतला नाही. ताराबाईचे सामर्थ्य पेशवा ओळखून होता. त्यानेही तिला फारसे न दुखवता राज्यकारभार चालवला. अखेर १० डिसेंबर १७६१ रोजी तिचे सातारा येथे निधन झाले. अखेरपर्यंत रामराजा तिच्या कैदेत राहिला. त्याला सोडवण्याचा प्रयत्न पेशव्याने केलाचं नाही. जसा फत्तेसिंग तसाच रामराजा समजून त्यास आहे त्या स्थितीत ठेवण्यात आले. पण फत्तेसिंग व रामराजामधील महत्त्वाचा फरक म्हणजे रामराजा नाममात्र छत्रपती म्हणून कायम  राहिला असला तरी तो राजपुरुष नसल्याने छत्रपतींचा कोणताही अधिकार त्यास मिळाला नाही.
           रामराजाच्या प्रकरणातील नेमके सत्य कधी उजेडांत येईल कि नाही माहिती नाही पण, या बनावाची उभारणी करून समस्त मराठी साम्राज्याला अल्पकाळ का होईना जो हादरा ताराराणीने दिला त्यावरून तिच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते. तिच्या कल्पक बुद्धीला जर प्रबळ लष्करी सामर्थ्याची जोड मिळाली असती तर नानासाहेबाकडे पेशवेपद राहिलेचं असते असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. रामराजा खोटा असे न सांगता त्यालाच गोडीगुलाबीने तिने आपल्या पक्षास वळवून घेतले असते तर मराठी राज्यातील पेशव्यांचा वाढता प्रभाव मर्यादित होऊन छत्रपतींचे महत्त्व परत वाढीस लागलेचं नसते असे म्हणवत नाही. लष्करी बळावर आपले गेलेले पेशवेपद नानासाहेबाने शाहूकडून अक्षरशः हिसकावून घेतले. पण त्याच नानासाहेबास, ताराबाईने रामराजास पकडून सातरचा किल्ला बळकावला तेव्हा किल्ल्यावर हल्ला चढवण्याचे धैर्य झाले नाही. कारण तो ओळखून होता कि, ताराराणी म्हणजे शाहू नव्हे ! याबाबतीत ताराबाई नानासाहेबास गुरु भेटली ! ! सारांश, अठराव्या शतकातील हिंदुस्थानात होऊन गेलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या मालिकेत ताराबाईचे नाव अग्रभागी असल्याचे दिसून येते.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

मुळ शिवशाही का व कशी लोप पावली याचे हे विवरण.